Next
धर्मनिरपेक्ष धर्मश्रद्धा
शशिकांत पित्रे
Friday, May 10 | 03:00 PM
15 0 0
Share this story

मतपेटीच्या राजकारणाच्या या कर्कश गोंगाटात धर्म-जाती-वर्णाच्या नावावर होणारी मतांची विभागणी आणि त्याच्या जोरावर प्रत्येक मतदारसंघातील अपेक्षित निकालांच्या बांधल्या जाणाऱ्या अटकळी ऐकून माझ्यासारखे साडेतीन-चार दशके भारतीय सैन्यात मुक्तपणे वावरलेले सोजीर खरोखरच गडबडून जातात. या वाऱ्यावरच्या वरातीत आपण पार परके आहोत याची प्रकर्षाने जाणीव पदोपदी होत राहते.
मिसरूड फुटायच्या आधी सैन्यात पाऊल ठेवल्याक्षणी कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून कोलकात्यापर्यंत साऱ्या देशभरातील अधिकारी आणि जवानांशी एकरूप होण्याची सवय पडल्यामुळे धर्म, जात, प्रदेशाच्या भिंती कधी आडव्या येतच नाहीत. मग ग्रेनेडीअर बटालियनमधील कुलकर्णी-देशपांडे नावाचे कोणी अधिकारी युनिटच्या मशिदीत ईदच्या दिवशी आत्मीयतापूर्ण भक्तिभावाने गुडघे टेकतात, शीख पलटणीचे कमांडर सुब्रमण्यम आपल्या पदोन्नतीनिमित्ताने गुरुद्वारात तीन दिवसांचा अखंडपाठ ठेवतात, जाट रेजिमेंटमधील सरवरखान रामनवमीच्या दिवशी रामजन्माचा पाळणा प्रेमाने हलवतात, गोरखा पलटणीचे सतनामसिंग विजयादशमी दिवशी रेड्याच्या मानेवरून धारदार सुरी फिरल्यावर भक्तिभावाने जवानांबरोबर घोषणा देतात, आघाडीवर असलेल्या नागा रेजिमेंटच्या तंबूमधील चर्चमध्ये ख्रिसमसच्या ‘मिडनाइट मास’साठी सगळे अधिकारी आवर्जून हजर असतात आणि जम्मू-काश्मीर रायफल्सचे कर्नल कमांडंट कूर्गचे जनरल करिअप्पा संपूर्ण रमजान महिन्यात कडक रोजे पाळतात. यात कोणताही कृत्रिमपणा नसतो.
आपल्या रेजिमेंटचा धर्म तोच आपला धर्म, तिच्या चालीरीती त्याच आपल्या चालीरीती हे सर्व काही रक्तात भिनून जाते. सारी जीवनमूल्येच बदलून जातात. राज्यघटनेत काय लिहिले आहे ते सोडा, आज बहुस्रोतीय भारतातील अग्रगण्य सर्वधर्मसमभाव बाळगणारी एकमेव संस्था म्हणजे भारताची संरक्षणदले आणि विशेषकरून भारताचे लष्कर! मंदिर, मशीद, गुरुद्वारा आणि चर्चचे तंबू पलटणीच्या आवारात एका रांगेत उभे असतात. इतकेच कशाला, जागेचा किंवा वेळेचा अभाव असला तर ते सर्व एकाच वास्तूत सामावले जातात. बाहेर पाटी झळकत असते ‘सर्व धर्म स्थल.’ नवीन जागेवर युनिटची छावणी पडली, की सर्वात प्रथम उभे केले जाणारे तंबू धर्मस्थळांचे असतात आणि छावणी उठेपर्यंत ते हलवले जात नाहीत.
याबाबतीत अनेक अस्सल दाखले मला आठवतात. १९७१च्या भरयुद्धादरम्यान पूंछ विभागात १०५ इंजिनीयर रेजिमेंटचे कमांडर होते पुण्याचे कर्नल (आता निवृत्त मेजर जनरल) सुधीर जठार. युनिटचा कॅम्प एका डोंगरसरीच्या पठारावर युद्धाला तोंड लागण्याच्या बऱ्याच आधीपासून होता. अचानक त्याच पठारावर एक आणीबाणीचे हेलिपॅड तयार करण्याचा आदेश जठारांना मिळाला. मंदिर, मशीद, गुरुद्वारा आणि चर्चच्या पत्र्याच्या शेड जिथे उभ्या होत्या, ती जागा त्या साऱ्या परिसरात उपलब्ध असलेला एकच सखल पट्टा होता. धर्मस्थळे हलवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. प्रश्न जटील होता, युनिट तर काही हलणार नव्हते आणि हेलिपॅड लवकरात लवकर तयार होणे आवश्यक होते. मग त्यांनी पलटणीच्या पंडितजी, ग्रंथीजी, मौलावीजीना आणि पाद्री नसल्यामुळे युनिटच्या एका ख्रिश्चन अधिकाऱ्याला पाचारण केले आणि अडचण समजावून सांगितली. थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. मग ग्रंथीजी म्हणाले, “सर, मी अखंडपाठ लगेच सुरू करतो.” मग मंदिरात सत्यनारायणाची पूजा व  मशिदीत विशेष नमाजाचे आयोजन करण्याचे ठरले. तातडीने साऱ्या युनिटचे ‘फॉल इन’ झाले. सर्व जवानांना समजावून सांगण्यात आले. वेगवेगळ्या तुकड्यांचे वाटप झाले. प्रथम एका बाजूला तंबू उभारून त्याच्यात धर्मस्थळे हलवायची, लगोलग दुसऱ्या बाजूला धर्मस्थलांच्या शेड काढायच्या आणि लागलीच डोझर फिरवून हेलिपॅड तयार करायचे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत हेलिपॅड तयारही झाले. ती टेकडी आजतागायत पूंछ विभागात ‘प्रेयर हिल’ म्हणून ओळखली जाते.
२५ इन्फंट्री डिव्हिजनच्या पूंछ आघाडीवरची अशीच दुसरी गोष्ट. त्या आघाडीवर १९७१मध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हल्ला होणार हे जवळजवळ निश्चित दिसत होते. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तेथील ब्रिगेड कमांडर ब्रिगेडिअर नातू (नंतर मेजर जनरल ए. व्ही. नातू, महावीरचक्र) यांनी आपल्या इंजिनीयर कंपनी कमांडरला बोलावून पूंछपासून आघाडीच्या मोर्च्यांना जोडणारा एक पर्यायी हंगामी रस्ता बनवण्यास सांगितले. तो तीन-चार दिवसांत तयार होणे विशेष अवघड नव्हते. परंतु प्रश्न होता तो त्या नव्या ‘अलाइनमेंट’च्या वाटेत एक जागृत ‘पीरस्थान’ होते. सीमेवरील सर्वधर्मीय सैनिकांची या पिरावर इतकी गाढ श्रद्धा होती, की त्या पिराच्या वारी म्हणजे गुरुवारी कोणीही दारू वा मांसाहाराला स्पर्शही करत नसत. आता डोंगराळी भागात रस्ता वळवणे तर अशक्यच. मग पुन्हा अखंडपाठ, सत्यनारायण आणि विशेष नमाजाची एक फैरी झडली. पीर थोडासा हलवण्यात आला आणि नवीन स्थान उत्तम प्रकारे बांधून सजवण्यात आले. रस्ता अगदी वेळेवर तयार झाला. युद्धाला तोंड लागल्यावर अपेक्षेनुसार पाकिस्तानचा हल्ला आला आणि त्याच रस्त्यावरून वेळेत रसद पोचली. पाकिस्तानचा हल्ला परतवण्यात नातूंच्या ब्रिगेडला धवल यश आले. जवानांचा भक्कम विश्वास होता की हे सर्व पीरबाबाच्या कृपेने घडले.
तिसरी गोष्ट ताबारेषेवरील एका पलटणीची. आधीच्या डोग्रा कंपनीच्या जागी नुकतीच खेमखानी मुसलमानांची एक कंपनी आली होती. परंतु त्यांनी मोर्चेबंदी केल्यानंतर लागलीच ताबारेषेच्या दुसऱ्या बाजूने तुफान गोळीबार सुरू झाला. डोके वर काढण्याचीही संधी मिळेना. काही त्यात जखमी झाले. हे काही संपण्याची चिन्हे दिसेनात. काही दिवस वाट पाहून कंपनीचे सुभेदार कमालखानांच्या मनात एक विचार आला. ते तडक आपल्या कंपनी कमांडरसाहेबांच्या बंकरमध्ये पोचले. “साहेब, एक बात ध्यानात आली. डोग्रा पलटण हल्ल्यापासून मंदिराला टाळा लागलाय. मला वाटतं की आपण आरती केली पाहिजे.” मेजर शर्मांनी आपल्याला आरती पाठ नसल्याची कबुली दिली. “मी सोडून कंपनीत आरती आणखी कोणाला येणार?” “त्याची काळजी नाही, साहेब. मी करतो काहीतरी”. कमालखानांनी थेट बंकर गाठला आणि बाहेरच्या तोफगोळ्यांच्या आवाजाला न जुमानता शेजारच्या टेकडीवरील कंपनीच्या पंडितजींशी वायरलेसवर संपर्क साधून त्यांच्याकडून आरती लिहून घेतली. दुसऱ्या दिवशी मंदिर उघडून त्याची साफसफाई करण्यात आली आणि संध्याकाळी सर्व खेमखानी जवान, कमालखान आणि मेजर शर्मांनी आरतीचे सांघिक पारायण केले. भारतीय सैन्याच्या समभावाचे हे नामी उदाहरण. आघाडीवरील हे खरेखुरे प्रसंग, केवळ कथेतले घोडे नव्हेत. भारतीय सैन्यदले धर्मनिरपेक्ष आहेत, परंतु निधर्मी नाहीत. किंबहुना त्यांच्या इच्छाशक्तीचा धर्मश्रद्धा एक महत्त्वाचा घटक आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link