Next
बाहेर महमाननवाजी, मैदानावर खुन्नस!
दिलीप वेंगसरकर
Friday, June 14 | 02:15 PM
15 0 0
Share this story

भारत-पाकिस्तान लढतींची खुमारी काही औरच. फाळणी, दोन युध्दे अशी पार्श्वभूमी असलेल्या भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधांना क्रिकेटच्या पीचवरही रणभूमीचेच रूप प्राप्त होते. खेळाडूंवरही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांचे दडपण निश्चितच असते. कसोटी, वनडे, टी-२० स्पर्धा कोणताही सामना असो आणि कुठेही असो; तणाव असतोच. सामना जर आखाती देशांत (दुबई, शारजा) असेल तर दडपण अधिकच असते. त्या दडपणाचे कारण म्हणजे तेथील स्टेडियममध्ये दोन्ही देशांचे पाठीराखे निम्मे-निम्मे असतात. त्यामुळे दडपण आपसुक असायचेच. उलट भारतात किंवा पाकिस्तानात सामना असेल, तर हा प्रश्न तितकासा भेडसावत नसे. कारण त्या त्या देशातून (भारत, पाकिस्तान) पाठीराखे प्रेक्षक असणे स्वाभाविकच. 

इंग्लडमधील सध्याच्या विश्वचषकस्पर्धेत दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून भारताने दिमाखदार सुरुवात केली आहे. रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुध्द शानदार शतक झळकावले. व्यावसायिक बाणा त्याच्या या शतकी खेळीत दिसून आला. सलामीला येऊन अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहून संघाची नौका किनाऱ्यापार नेण्यात त्याला यश लाभले.

रोहितचा सलामीचा साथीदार, डावखुऱ्या शिखर धवननेही गतवेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध झुंजार शतक झळकावले. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स यांच्या उसळत्या चेंडूंचा मुकाबला करण्याची जिगर त्याने दाखविली. परंतु दुर्दैवाने त्याच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. शिखरसारख्या फॉर्मात असलेल्या खेळाडूची उणीव भारताला नक्कीच जाणवेल. कर्णधार विराट कोहलीदेखील जबाबदारीने खेळतोय. हार्दिक पांड्याला चौथ्या क्रमांकावर बढती देण्याची कोहलीची चाल यशस्वी ठरली. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, चहल, कुलदीप यादव या भारतीय खेळाडूंच्या आक्रमणात निश्चितच दम असून पहिल्या दोन सामन्यांत त्याची प्रचीती आली. हाच फॉर्म कायम राखल्यास भारताला आगेकूच करणे कठीण जाणार नाही.

चार दशकांपूर्वी १९७८-७९ च्या मोसमात भारताने बिशनसिंग बेदींच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा दौरा केला. त्यांच्या मेहमाननवाजीची तारीफ करावी तेवढी थोडीच. सर्वत्र आमचे आगत स्वागत करण्यात येत असे. पाहुणचारात कुठलीही कसर नसायची. मैदानाबाहेर मित्रत्वाचे नाते परंतु मैदानात उतरल्यावर खुन्नस कायम. 

पंचाच्या निर्णयांचा फटका बसायचाच. चेंडू पायाला लागल्यावर लगेच बाहेरची वाट दाखवली जायची. त्रयस्थ पंच आल्यावर मात्र परिस्थिती बदलली. पाकिस्तान दौऱ्यात आमच्या टीम मीटिंग हॉटेलमधील रूमवर नव्हे तर थेट मैदानात व्हायच्या. मैदानात मीटिंग व्हायच्या कारण ‘रूमबगिंग’ची धास्ती असायची. 

खेळाडूंचे परस्परांशी सौहार्दाचे संबंध होते. जावेद मियाँदाद तर बऱ्याचदा त्याच्या घरी जेवणासाठी बोलवायचा. अगदी आग्रह करून बोलवायचा. ते केवळ तोंडदेखले निमंत्रण नसायचे. बिर्यानी, रोटी, नान, पराठा यांची तर रेलचेल असायची. त्यांचा आहार तगडाच. दोन-तीन रोट्या ते सहज फस्त करायचे. आमचे मात्र अर्ध्या रोटीनेच पोट भरायचे. नॉनव्हेजमध्ये तर खूपच व्हरायटी. वसीम व रमीझ या राजाबंधूंचे वागणेही अदबशीर. इम्रान मात्र सहसा कोणामध्ये फारसा मिसळत नसे. एखादयाने नॉनव्हेजला नकार दिला तर ‘आप बिमार हो क्या’ अशी विचारणा केली जात असे. संघातील शाकाहारी खेळाडू फ्लॉवर-बटाटा, कोबी-बटाटा, दाल-राईस, फ्रुट सॅलड, सुका मेवा यावर भर देत असत.

भारत-पाकिस्तान सामन्यातले क्षण जितके रोमहर्षक तितकेच त्याभोवतीच्या आठवणीही मनात कायम रेंगाळणाऱ्या. साहजिकच इतक्या वर्षांनी इंग्लंडमध्ये आमने-सामने येत असलेल्या या दोन्ही संघांचा अटीतटीचा सामना बघण्याची उत्सुकता 
मलाही आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link