Next
कामातून मिळाली ओळख
मुक्ता बर्वे
Friday, August 09 | 02:30 PM
15 0 0
Share this story

नमस्कार! मागच्या भागात, मी नाटकात कशी आले याबद्दल बोलले होते. नाटक सुरू असतानाच मला ‘घडलंय बिघडलंय’ ही पहिली टीव्ही मालिका मिळाली आणि रंगभूमी व छोटा पडदा असा माझा समांतर प्रवास सुरू झाला. ‘घडलंय बिघडलंय’ हा कार्यक्रम म्हणजे नाटक आणि मालिका यांच्या मधील प्रकार होता, त्यामुळे टीव्हीचं माध्यम समजून घ्यायला त्याची मदत झाली.
राजकीय व्यंगावर भाष्य करणारी ती मालिका होती. त्यात खूप वेगवेगळ्या भूमिका करायला मिळायच्या. त्यामुळे अभिनेत्री म्हणून मला स्वतःला जोखता आलं. श्रीरंग गोडबोले, विनोद तळेकर, गीता गोडबोले यांनीही मला वेगवेगळ्या भूमिका देऊन माझी तयारी करून घेतली. त्या मालिकेमुळे माझा पाया पक्का झाला. दरम्यान ‘देहभान’ नावाचं माझं दुसरं नाटक सुरू होतं. ते बघून मला ‘चकवा’ नावाचा चित्रपट मिळाला. तो माझा पहिला चित्रपट. काम करताना लक्षात येत गेलं, की ही सगळीच माध्यमं वेगळी आहेत. त्याकडे बघताना एक गैरसमज असतो की एकदा तुम्ही अभिनय करायला लागलात की तुम्हाला सगळ्या माध्यमांतील सगळं कळू लागेल, पण असं होत नाही. त्यातले बारकावे हळूहळू कळत गेले.
रंगभूमी, छोटा पडदा आणि मोठा पडदा ही माध्यमं एकमेकांना पूरक असली तरी त्यांच्या गरजा, आव्हानं वेगवेगळी आहेत. नशिबानं माझ्याकडे सातत्यानं काम येत होतं आणि महत्त्वाचं म्हणजे मला एका कामातून दुसरं काम मिळत गेलं. फोटोशूट करून, फोटो दाखवून काम मिळवणं यावर लहानपणापासून कधीच माझा विश्वास नव्हता आणि आताही नाहीये. मला वाटायचं की माझं काम बघून मला काम मिळालं तर मजा येईल आणि तरच समोरच्याला कळू शकेल की मी काय करू शकते. सुंदर दिसणं हा माझा कधी निकष नव्हता आणि त्यावर विश्वासही नव्हता. त्यामुळे त्या काळात मी माझ्याच विचारांना अनुसरत होते. फोटो चांगला येणं ही त्या फोटोग्राफरची कमाल असते त्यात माझं काय कौतुक, हे माझं म्हणणं असायचं. तो फोटो बघून जर मला कुणी निवडलं तर त्याच्या मनात जी प्रतिमा तयार झाली असेल तशी मी नसेन तर घोळ होतो. त्यानं नैराश्यही येऊ शकतं. केवळ फोटो हीच तुमची ओळख राहिली तर त्याचं वाईट वाटायला लागतं, हे मी आजूबाजूला बघत होते.
मला माझ्या रंगभूमीवरच्या कामांनी पुढे यायला खूप मदत केली आणि माझ्या घरच्यांनीही माझ्यावर नेहमी विश्वास दाखवला. मी छोटी छोटी बरीच कामं करत होते. परंतु मुख्य भूमिकेत यायला, जाहिरातीत ठळकपणे नाव यायला, नावानं ओळखली जायला सात-आठ वर्षांचा काळ गेला. घरचा अभ्यास खूप केला की परीक्षा चांगली जाते म्हणतात ना, तसं माझं झालं. त्या मधल्या काळात गृहपाठ खूप झाल्यामुळे पुढच्या परीक्षा सोप्या गेल्या. मी ती प्रक्रिया एन्जॉय केली. ती खरी जडणघडण होती. आजकाल नवीन येणाऱ्या मुलांना या प्रक्रियेतून जाता येत नाही. कारण कुणाकडेच वेळ नसतो. त्यामुळे मूलभूत गोष्टी जसं की मेकअप करता येणं, स्वतःचा जिम इन्स्ट्रक्टर असणं, पर्सनल टीम असणं, ग्रुमिंग वगैरे गोष्टी नवीन मुलं जन्माला येतानाच घेऊन येतात की काय असं वाटतं. हे काही नव्हतं माझ्यावेळी आणि ती माझी गरजही नव्हती. परंतु आजकाल ती गरज झाली आहे. तेव्हा टीव्ही वाहिन्यांचीही भाऊगर्दी नव्हती. त्यामुळे रंगभूमीवर मला खूप काम करता आलं. नाटक तर प्रेमानंच करत होते. नाटकातून टीव्ही मालिका आणि तिथून चित्रपट मिळत गेले.
एका बाबतीत मी खूप भाग्यवान आहे की या सगळ्या प्रक्रियेतून जाताना मला खूप पुरस्कार मिळत गेले. मोठ्या मोठ्या लोकांकडून माझ्या कामाचं कौतुक होतं गेलं. शाबासकी कुणाला नको असते! खूप चांगल्या अर्थानं ओळख मिळत गेली आणि ते आजतागायत सुरू आहे. पुरस्कारांमधून एक ऊर्जा मिळत होती. कुणीतरी नावानं ओळखणं यात जी गंमत असते, तो पहिला अनुभव मला ‘घडलंय-बिघडलंय’नं दिला. मी प्रयोगासाठी ट्रेननं बोरीवलीला चालले होते. डब्यात बरीच गर्दी होती. त्यात एका बाईंनी मला ‘घडलंय-बिघडलंय मध्ये काम करणारी मुक्ता बर्वे’ म्हणून ओळखलं. मला खूप मस्त वाटलं की आई-बाबांव्यतिरिक्त आपल्याला कुणीतरी ओळखलं. नंतर असे अनेक अनुभव आले. मात्र तो पहिला अनुभव कायम लक्षात राहील. त्या बाई परत दिसल्या तर त्यांचा चेहरा ओळखेन इतकं ते लक्षात राहिलं आहे.
एव्हाना मुंबईचीही थोडी सवय झाली होती. ते वयही नाटकाच्या वेडानं झपाटून टाकणारं होतं. नाटक हाच श्वास, नाटक हाच ध्यास अशा ध्येयानं मी आले होते. म्हणजे बाकीची माध्यमं वाईट आहेत असं कुणी सांगितलं नव्हतं; परंतु मला नाटक करणं हेच सगळ्यात भारी वाटत होतं. जसजशी मी बाकीच्या गोष्टी, म्हणजे टीव्ही, चित्रपट करू लागले तेव्हा कळलं की आव्हानं वेगळी आहेत. चित्रपटाचं माध्यम मात्र मला पूर्णतः नव्यानं अनुभवता आलं. माझा पहिला दिग्दर्शक जतीन वागळे आणि कॅमेरामन शिरीष देसाई यांनी मला सांगितलं होतं, की ‘चित्रपट म्हणजे तू जे करणार आहेस ते त्या पडद्यावर चाळीसपट मोठं दिसणार आहे.’ मी नाटकाच्या पद्धतीनं काम करत होते, पण त्यांनी मला त्या माध्यमातील बारकावे समजावले. जसे, नाटकात ‘नाही’ म्हणण्यासाठी मान इकडून तिकडे हलवावी लागत असेल तर चित्रपटात ते काम डोळ्यांनी करता येतं. अशा अनेक गोष्टी मला चांगल्या लोकांकडून कळत गेल्या आणि त्या माध्यमाचं भान आलं. ते माझे या क्षेत्रातले बालपणाचे दिवस होते, असं मी मानते.
दुसऱ्या नाटकात मला नीनाताई (नीना कुलकर्णी) भेटली. बालपणी योग्य पोषक आहार मिळाला की मोठेपणी तुम्ही सुदृढ होता, तसं या लोकांमुळे या क्षेत्रातलं माझं बालपण सशक्त होत गेलं. नीनाताईनं मला शिकवलं की काम करताना वेळ चांगला जातोच, मात्र दोन कामांच्या मधला वेळही चांगला गेला पाहिजे. नाटकाचा दौरा असल्यावर आम्ही मधल्या वेळेत लेखन, वाचन, चर्चा अशांतून त्याचा परिपूर्ण उपभोग घ्यायचो. माझी आई मला खूपदा सांगायची, की तुझं काम तुला आवडतं, त्यामुळे तो वेळ चांगला जाणारच. परंतु मधल्या दिवसांत तू स्वतःला छान ठेवलं पाहिजेस, म्हणजे तू नवीन कामाला सामोरी जाशील तेव्हा छान ‘हेल्दी’ असशील. त्याचं महत्त्व आज कळतंय.
हे सगळं चालू असताना मला एक महत्त्वाचं नाटक मिळालं ते म्हणजे ‘हम तो तेरे आशिक है’, ज्यानं मला पहिल्यांदा कथानायिका म्हणून प्रेक्षकांसमोर आणलं. तोपर्यंत मी दुय्यम भूमिकांमध्ये होते. या नाटकानं ती संधी दिली आणि त्यानंतर ‘जोगवा’ चित्रपट आला. हे दोन्ही माझ्या करिअरमधले खूप महत्त्वाचे टप्पे होते. त्याविषयी सांगेन पुढच्या भागात.
(शब्दांकन : मनीषा नित्सुरे-जोशी)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link