Next
अनुरूप दिशा मिळण्यासाठी...
शर्मिला लोंढे
Friday, April 12 | 04:00 PM
15 0 0
Share this story


‘व्यवसाय’ म्हणजे ज्या विषयाचा आपण सखोल अभ्यास केला आहे आणि ज्या विषयात आपल्याला गती व रुची आहे अशा विषयाशी निगडित काम करणं. हे काम आपल्याला बहुतेक वेळा कायमस्वरूपी करायचं असतं आणि म्हणूनच ही व्यवसायाची निवड म्हणजे आयुष्यभराचा निर्णय असतो. या अर्थानं हा निर्णय महत्त्वाचा आहेच, शिवाय तो अचूकपणे घेणंही गरजेचं असतं, हे वेगळं सांगायलाच नको.
बदलत्या समाजातील, वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रगतीमुळे शिक्षणाची दालनं अधिक मोकळी झाली आहेत. आज शिक्षणाचं महत्त्वाचं प्रयोजन म्हणजे व्यवसायाची निवड करणं व त्या व्यवसायासाठी विशिष्ट अभ्यासक्रम शिकून तयार होणं असं आहे. अशाप्रकारे शिक्षण व व्यवसाय हे एकत्र जोडले गेले आहेत. नेहमीच्या साच्यातील व्यवसायांमध्ये अनेक नवीन कक्षा, नवीन क्षेत्रं, स्पेशलायझेशन व सुपर स्पेशलायझेन, अनेक शाखा व त्यांच्या पोटशाखा व त्यातील निरनिराळे अभ्यासक्रम, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे व्यवसाय निवडणं कठीण, गोंधळाचं व गुंतागुंतीचं झालं आहे. पर्याय अमर्याद असल्यामुळे, योग्य व अचूक पर्याय हेरण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. म्हणूनच या बदलत्या क्षितिजावर व्यवसाय मार्गदर्शनाची गरज आणि महत्त्व समर्पकच आहे, नाही का?
व्यवसाय मार्गदर्शन म्हणजे व्यवसाय निवडीविषयीचं मार्गदर्शन. सर्वसाधारणपणे विद्यार्थी आपल्या पालकांच्या व शिक्षकांच्या साहाय्यानं ही निवड, निरीक्षण, शालांत परीक्षेतील गुण, लोकप्रिय व्यवसाय अशा निकषांच्या आधारावर करतात. परंतु असे घटक बऱ्याचदा चुकीचे व कधी कधी दिशाभूल करणारे ठरतात. मात्र व्यवसाय मार्गदर्शन ही अतिशय शास्त्रशुद्ध, प्रमाणित व सविस्तर प्रक्रिया आहे. यात अनुरूप व्यवसाय निवडण्यासाठी चांगली दिशा मिळते. व्यवसाय मार्गदर्शनाच्या प्रक्रियेचे दोन भाग आहेत. (१) व्यवसाय मूल्यांकन (करिअर असेसमेंट)- या भागामध्ये चाचण्यांच्या दोन सत्रांचा समावेश असतो. प्रत्येक सत्र अडीच ते तीन तासांचे असते. या सत्रांमध्ये एकूण ९ चाचण्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात. एक बुद्धिमत्ता चाचणी (इंटेलिजन्स टेस्ट), सहा अभिक्षमता चाचण्या (अॅप्टिट्युड टेस्ट्स), एक आवड चाचणी (इंटरेस्ट टेस्ट) व एक व्यक्तिमत्त्व चाचणी (पर्सनॅलिटी टेस्ट) (२) व्यवसाय समुपदेश (करिअर काउंसेलिंग)- या भागात विद्यार्थी व त्यांच्या पालकांसोबत पाऊण ते एक तासाचं सत्र घेतलं जातं. या सत्रात विद्यार्थ्याची संपूर्ण प्रोफाइल समजावली जाते व १० वीनंतर कोणत्या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा इथपासून शेवटपर्यंत सर्व शैक्षणिक पर्यायी अभ्यासक्रम व अनुरूप व्यावसायिक क्षेत्र याबद्दल चर्चा होते. सर्व अभ्यासक्रम व महत्त्वपूर्ण माहिती दिली जाते.
व्यवसाय मार्गदर्शनाच्या या प्रक्रियेमधून प्रत्येकाच्या प्रोफाइलप्रमाणे एखाद्याला एक-दोन पर्याय मिळतील, एखाद्याला चार-पाच, तर एखाद्याला आठ-दहा. अंतिम निवडीचा निर्णय हा विद्यार्थ्याचा असतो. व्यवसाय मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना अनुरूप व्यवसायाची निवड करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे अपयश व निराशेची शक्यता कमी करून व्यवसाय मार्गदर्शन विद्यार्थ्यांना एका सुखी, यशस्वी व सुरळीत व्यवसायमार्गाची दिशा दाखवतं.
व्यवसाय निवडणं हा विषय विद्यार्थ्यांसाठी जेवढा महत्त्वाचा असतो, तेवढाच तो त्यांच्या पालकांसाठीही असतो. मात्र एका पिढीच्या अंतरामुळे, त्यांची मानसिकता, दृष्टिकोन व अनुभव वेगवेगळे असतात. या वेगळेपणातील साम्य असलेल्या हेतू व ध्येयाच्या आधारावर मनमोकळी चर्चा व विचारांची देवाणघेवाण करून, हवी ती सर्व माहिती मिळवून शिक्षणाचा व व्यवसायाचा मार्ग निश्चित करणं नक्कीच सुलभ होईल.
व्यवसायाची निवड करताना, पालकांचं व अर्थात शिक्षकांचं मुलांचं निरीक्षण, अनुभव नक्कीच उपयोगी ठरतात. त्याचबरोबर आता पुस्तकं, मासिकं, वर्तमानपत्रं, दूरदर्शन, कार्यशाळा अशा अनेक माध्यमांतून विविध व्यवसायांबद्दल माहिती उपलब्ध असते. या माहितीचा निरनिराळ्या क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींच्या मुलाखतींचा, सर्व इच्छुकांनी फायदा करून घेतला पाहिजे. वेगवेगळ्या व्यवसायात काम करणाऱ्या व्यक्तींशी बोलून, त्या व्यवसायाच्या चांगल्या/वाईट बाजू समजून घेतल्या पाहिजेत. अशा पद्धतीनं, एखादा व्यवसाय आपल्याला आवडेल की नाही, याची नीट पारख करणं सोपं जातं. शिक्षणाच्या बाजूंनं एखादा अभ्यासक्रम निवडताना, त्यातील विषयांची व विषयांतर्गत असलेल्या सर्व मुद्यांची फोड लक्षात घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे व्यवसायाच्या बाजूनं सर्व समर्पक माहिती गोळा केल्यावर त्या व्यवसायाशी निगडित जीवनशैली आपल्या आयुष्याबद्दलच्या कल्पनेशी पडताळून बघणं तितकंच गरजेचं आहे. या सर्व गोष्टींबरोबर किंवा या सगळ्या गोष्टींच्या आधी, व्यावसायिक समुपदेशकाकडून व्यवसाय मार्गदर्शन घेतलं पाहिजे.
‘जाण-भान’ या शृंखलेतील हा शेवटचा लेख आहे. हा प्रवास संपला असला तरी आपल्या गाठीशी ज्ञानाची/माहितीची/विचारांची बरीच शिदोरी जमा झाली आहे. ही शिदोरी आपल्याला नक्कीच अनुरूप दिशा मिळवायला मदत करेल. ही अनुरूप दिशा शोधताना, इतर सगळे काय करत आहेत ते पाहण्यापेक्षा, सर्वांच्या प्रवाहात वाहून जाण्यापेक्षा स्वत:च्या क्षमतांचा, आवडींचा, गुण-दोषांचा विचार प्रत्येकाला करायला हवा व त्याला अनुरूप मार्ग शोधायला हवा. कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी, त्यासाठी लागणारी अभिक्षमता व आवड असणं अनिवार्य आहे. क्षमता आणि आवड ही यशाच्या गाडीची दोन चाकं आहेत, जी नीट संयुक्तपणे एकत्रित चालली तर यशाची गोडी न डगमगता सुरळीतपणे मार्गस्थ होईल. मग यश मिळवण्यासाठी कष्ट करायची तयारी हवी व ते यश समाधानकारक व सुखावह वाटण्यासाठी आपल्या कामाबद्दल, व्यवसायाबद्दल अभिमान हवा! अशी ही शिदोरी गाठीशी बांधून, पुढचा प्रवास करुया व अनुरूप दिशेला जाऊन यशाचं शिखर गाठुया. सर्व विद्यार्थी/विद्यार्थिनींना माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा!

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link