Next
आव्हानात्मक भूमिकांच्या शोधात
शब्दांकन : योगिता राऊत
Friday, April 12 | 04:00 PM
15 0 0
Share this story


मला लहानपणी एकदा कोणीतरी विचारलं होतं, तुला कोण व्हायचं आहे? त्यावेळी उत्तर दिलं, मला डॉक्टर बनून अभिनय करायचा आहे. अभिनय म्हणजे नेमकं काय हे माहीतही नव्हतं तेव्हापासून म्हणजे अडीच-तीन वर्षांची असल्यापासून अभिनय करण्यास सुरुवात केली. गणेशोत्सव, शाळेमध्ये, त्यानंतर आंतरशालेय, आंतरमहाविद्यालयीन, मग हळूहळू मध्य भारत पातळी अशा विविध टप्प्यांवर मी अभिनय केला. दंतवैद्यकशास्त्राचा अभ्यास करताना तीन अंकी नाटकांतही काम करत असल्यानं रंगमंचावरचा  माझा वावर अधिक आत्मविश्वासपूर्ण झाला. विविध व्यक्तिरेखा साकारल्या. कधी विनोदी, तर कधी गंभीर नाटकं केली. अभिनय माझ्या रक्तात भिनू लागला. दंतवैद्यकाची पदवी संपादन केल्यानंतर माझी अभिनयक्षेत्राकडे वाटचाल सुरू झाली.  

घरच्यांचं सहकार्य   
शाळेत आणि कॉलेजमध्ये सगळे मला ‘हुकमी एक्का’ म्हणायचे. ज्या स्पर्धेत सहभाग घेईन, त्यात बक्षीस हे ठरलेलंच. व्यक्त होण्याच्या प्रत्येक स्पर्धेत पारितोषिक मिळत असल्यानं कलेची माझी आवड आईनं नेमकी हेरली आणि तिनंच या अभिनयाच्या क्षेत्रात येण्यासाठी पाठबळ दिलं. त्यामुळे घरातून विरोध असा झालाच नाही. पदवी झाल्यानंतर मी अभिनयक्षेत्र करिअर म्हणून निवडणार असल्याचं बाबांना सांगितलं. अभ्यासात अव्वल असल्यानं वैद्यकीय क्षेत्र सोडू नये असं बाबांना वाटत होतं. तरीही माझ्या या निर्णयाचा त्यांनी आदर  केला. इंजिनीयर आणि एमबीए असणाऱ्या माझ्या दादानं उत्तम नोकरी सोडून चित्रकलेची आवड जपली आहे. त्यानंही माझ्या निर्णयाला संपूर्ण पाठिंबा दिला. त्यामुळे कलाक्षेत्रात येण्यासाठी घरातून पूर्णपणे सहकार्य मिळालं, जे खूपच गरजेचं आहे.

दिग्गजांसोबत काम करण्याची संधी
काम मिळवण्यासाठी ऑडिशन्स चालूच होत्या. त्याचवेळी विविध जाहिराहतीही करत होते. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, जॉन अब्राहम यांच्यासोबत अनेक जाहिराती केल्या आहेत. आतापर्यंत सुमारे पन्नासहून अधिक जाहिराती केल्या आहेत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. त्यांच्याकडून बरंच काही शिकले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही ते समोरच्या सहकलाकारांशी आत्मीयतेनं, आदरपूर्वक वागतात, बोलतात. त्यांच्याकडून मिळालेला हा अनुभव कुठल्याही अभिनयसंस्थेत मिळणार नाही. हे सुरू असतानाच अनुराग कश्यप, सुजित सरकार, प्रदीप सरकार, विनील मॅथ्यू, गौरी शिंदे, अनुपम मिश्रा या नामवंत दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. याच काळात  तीन चित्रपट केले. यातील ‘चिल्ड्रेन ऑफ वॉर’ चित्रपटात एका बांग्लादेशी मुलीची भूमिका साकारली होती. या फिल्मला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. समीक्षकांनी माझ्या भूमिकेचंही कौतुक केलं.

मराठीत पदार्पण झालं  
काही वर्षांपूर्वी विधू विनोद चोप्रा यांच्या चित्रपटासाठी कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर यांच्याकडे ऑडिशन दिली. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं, तुला साजेशी अशी कोणतीही भूमिका असेल, तेव्हा तुझा विचार नक्कीच करेन. आणि त्यांनी ‘भिकारी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी माझं नाव सुचवत शब्द पाळला आणि मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं. या चित्रपटात काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी विलक्षण होता. या चित्रपटात स्वप्निल जोशीनं खूप सांभाळून घेतलं.

आणि पुरस्कार’ मिळाला

याच दरम्यान मी ‘मोह दिया तंधा’ ही पंजाबी शॉर्ट फिल्मदेखील केली. खरं तर यातील ‘मन्नो’च्या व्यक्तिरेखेच्या तयारीला वेळच मिळाला नाही. माझी मैत्रीण ती शॉर्ट फिल्म करणार होती. तिला काम करणं जमणार नसल्यानं तिनं मला विचारलं. कथानक आवडल्यानं मी हो म्हणाले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाला मी त्या सेटवर हजर झाले. शॉर्ट फिल्म करताना मुख्य अडचण होती ती पंजाबी भाषेची. भाषा जरी येत नसली तरी कथानकाचा भावनिक आलेख समजला असल्यानं व्यक्तिरेखा साकारणं कठीण गेलं नाही. भाषेची अडचणही सहकाऱ्यांनी दूर केल्यानं कामाचा अनुभव सुंदरच होता. फिल्म फेस्टिव्हलमध्ये जेव्हा या शॉर्ट फिल्ममधील भूमिकेसाठी मला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’साठी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला, तो आनंद शब्दांत व्यक्त करणं कठीणच आहे. ही व्यक्तिरेखा साकारताना खूप मेहनत घेतली होती ती सार्थकी लागली.  

आयुष्यातील वेगळा टप्पा अनुभवला
आता मी तिग्मांशू धुलिया आणि विशाल फ्युरिया दिग्दर्शित ‘क्रिमिनल जस्टिस’ या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यात जॅकी श्रॉफ, पंकज त्रिपाठी, विक्रांत मेसी, मिता वशिष्ठ आहेत. पुन्हा एक वेगळी व्यक्तिरेखा यानिमित्तानं साकारता आली. एक कलाकार म्हणून परिपूर्ण करणारा हा अनुभव होता. यात मी अवनी शर्मा नावाच्या एका उत्तर भारतीय महिलेची भूमिका साकारली आहे. आयुष्याचा जो टप्पा मी आजवर कधी पाहिलेलाच नाही, तो टप्पा यात अनुभवता आल्याने ही भूमिका आव्हानात्मक होती. ही व्यक्तिरेखा साकारताना नातेसंबंधातील काही भावनिक गोष्टी नव्यानं कळल्या. या भूमिकेचे विविध पैलू असल्यानं ही भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
 
‘वेडिंगचा शिनेमा’ अभिनयाची कार्यशाळा
‘क्रिमिनल जस्टिस’चं चित्रीकरण करताना  डॉ. सलील कुलकर्णी यांचा फोन आला. त्यांनी त्यांच्या चित्रपटाविषयी सांगितलं. परंतु वेळ जमत नसल्यानं काम करणं शक्य नव्हतं.  दीड महिन्यांनंतर पुन्हा सलीलसरांचा फोन आला. त्यानंतर आम्ही भेटलो. सलीलसरांनी कथा वाचून दाखवली आणि ती खूपच सुरेख होती. सरांना ‘परी’मध्ये जे गुण हवे होते, ते माझ्यात दिसले. त्यांना माझं नाव नितीन वैद्य यांनी सुचवलं होतं. या चित्रपटात काम मिळणं, ही माझ्यासाठी पर्वणीच होती. हा चित्रपट नाही तर माझ्यासाठी अभिनयाची कार्यशाळा होती. या चित्रपटात मुक्ता बर्वे, अलका कुबल, शिवाजी साटम, भाऊ कदम यांच्याकडून मी खूप शिकले. या चित्रपटाच्या निमित्तानं आमचं एक कुटुंबच तयार झालं. मी आणि चित्रपटातील परीत थोडंफार साम्य आहे. मुळात आम्ही दोघी डॉक्टर आहोत. माझ्यातही परी इतकाच उत्साह आहे. तिला जशी माणसं आवडतात तशी मलाही आवडतात. मात्र वैयक्तिक आयुष्यात  ‘परी’सारखं प्री वेडिंग शूट करणार नाही.   

नाटकात काम करायचंय
चित्रपट, नाटक की वेबसीरिज यापैकी एक माध्यम निवडण्यास सांगितलं तर मी चित्रपट निवडेन. असं असलं तरी नाटक आणि वेबसीरिज करायलाही नक्कीच आवडेल. माझ्या अभिनयाची सुरुवात रंगमंचावरून झाली असल्यानं साहजिकच नाटकातही काम करायचं आहे. नव्यानं नावारूपास आलेलं वेबसीरिज हे माध्यमही खुणावू लागलं आहे. त्यामुळे या दोन्ही माध्यमांतही मला एक कलाकार म्हणून स्वतःला सिद्ध करायचं आहे. मुळात नाटक आणि वेबसीरिज ही दोन वेगळी माध्यमं आहेत. नाटकासाठी थेट प्रतिक्रिया मिळत असल्यानं ती ऊर्जा वेगळीच असते. एक कलाकार म्हणून तुम्ही जास्त प्रगल्भ होता. त्यामुळे प्रत्येक कलाकाराला नाटक हा प्रकार आवडतोच. नाटकानं एक कलाकार म्हणून तुम्हाला पूर्णत्व येतं.  मी अजून व्यावसायिक नाटकात कधी काम केलं नाही. त्यामुळे मी अशा नाटकाच्या शोधात आहे, ज्यात माझी भूमिका केंद्रस्थानी असेल. ज्यातून मला बरंच काही शिकता येईल आणि एका वेगळ्या व्यक्तिरेखेतून मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचेन. वेबसीरिजबद्दल सांगायचं झालं तर याचं स्वरूप मला खूप आवडतं. या माध्यमातून तुमच्या व्यक्तिरेखेतील विविध पैलू शोधायला तुम्हाला वेळ मिळतो. ज्यानं तुम्ही समृद्ध होता. याशिवाय वेबसीरिजमध्ये विविध विषय हाताळले जातात.  भविष्यातील प्रोजेक्ट सांगायचे तर सध्या संहितांचं वाचन सुरू आहे. मी काही नवीन, आव्हानात्मक भूमिकांच्या शोधात आहे. 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link