Next
अभिनयातला नवा किरण
हर्षदा सीमा
Friday, October 26 | 02:30 PM
15 0 0
Share this story

मी मूळचा पुण्याचा. बालपणही पुण्यातच गेलं. प्राथमिक शिक्षण पुण्यात झालं. पुढील शिक्षणासाठी गावी सोलापूरला गेलो. त्यानंतर मात्र पुण्यात परतलो. पुण्याच्या यशवंतराव मोहिते महाविद्यालयातून एम.कॉम.चं शिक्षण पूर्ण केलं. अभिनयाची आवड होती अशातला काही भाग नाही, पुढे आपल्याला अभिनयाच्या क्षेत्रात काम करायचंय असंही काही ठरलं नव्हतं. शाळेत होणाऱ्या नृत्यस्पर्धांमधून सहभागी व्हायचो. माझ्यातल्या सुप्त अभिनयगुणांची जाणीव होण्यामागे एक किस्सा आहे. तो असा, की मी खूप मस्तीखोर होतो. ८ वी मध्ये असताना आमच्या शाळेचा स्काउट कॅम्प गेला होता. आमच्या वर्गातल्या मुली तशा फार हुशार...सगळ्यात सक्रिय... आणि आम्ही मात्र उनाडक्या करणारे... तिथेही तेच करत होतो. तेव्हा सरांनी थोडा दम भरला आणि म्हणाले काहीतरी करून दाखवा, नुसत्या उनाडक्या करू नका. तेव्हा मला थोडासा राग आला आणि मी सगळ्या मुलांना लगेच एकत्र केलं आणि एक नाटुकली बसवली. ती नाटुकली खूप छान झाली. त्या नाटुकलीमुळे शाळेत होणाऱ्या सगळ्याच सांस्कृतिक कार्यक्रमांची धुरा माझ्याकडे आली. अभिनयाची गोडी तर लागलेली, तरी अजूनही करिअर म्हणून त्याकडे पाहिलं नव्हतं. तू नाटक खूप छान करतोस, त्यात पुढे काहीतरी कर, असं आमच्या शाळेचे बनसोडेसर नेहमी मला सांगायचे. एकंदरीतच तेव्हा अभिनयक्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. तितकीशी आर्थिक परिस्थितीसुद्धा नव्हती. पुढे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून महिंद्रा कंपनीमध्ये कामाला सुरुवात केली. २०११ साली मी खूप आजारी होतो. आजारपणामुळे मला जॉब सोडवा लागला. त्यावेळी आता काय करायचं असा प्रश्न उभा राहिला. त्याक्षणी अभिनयाची आवड आणि बनसोडेसरांची कौतुकाची थाप या दोन्ही गोष्टींची आठवण झाली आणि मी या क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. एकांकिकेची तालीम सुरू केेली. घरच्यांना या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. सहा महिन्यांनी प्रयोगाला आल्यानंतर त्यांना मी सध्या काय करत होतो ते कळलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला दिसला.

अभिनयाकडे वळताना...
करिअर म्हणून अभिनयक्षेत्राचा विचार करायला सुरुवात केली. घरी अभिनयाची पार्श्वभूमी नव्हती. माझा भाऊ पत्रकार आहे. त्यानं मला या क्षेत्रातल्या संघर्षाची कल्पना दिली. मी जॉब करून अभिनय करावा असं त्याचं मत होतं. त्यावेळी मी डीजे म्हणून काम करत होतो. ऑफिसमध्ये एकदा कार्यक्रम होता आणि नेमका डीजे वाजवणारा आला नाही, त्यावेळी मी तिथे उभा राहून गाणी वाजवली. तेव्हापासून मला ती आवड लागली. त्यातले अनेक बारकावे मी शिकून घेतले. त्यातूनच संगीताची आवड निर्माण झाली. म्युझिक शो, कंपोझिंग करून मी पैसे कमावू लागलो. परंतु २००७ मध्ये बाबा गेल्यानं घराची संपूर्ण धुरा आम्हा दोघांवर होती. नंतर भावाचं लग्न झाल्यानंतर थोड्या जबाबदाऱ्या वाढल्या. त्यावेळी आईनं खूप सांभाळून घेतलं. मी या क्षेत्रात काहीतरी करून दाखवू शकतो हा माझ्या आईचा विश्वास होता. तिनं नेहमीच मला प्रोत्साहन दिलं. आजही मी मालिकेसाठी साताऱ्यात असतो आणि माझी आई घरी पुण्याला... अजूनही ती सांभाळून घेतेय. तिचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

संघर्षानं बळ मिळालं...
अभिनयाच्या क्षेत्रात संघर्ष हा आहेच. तो मलाही करावा लागला. मी अभिनयक्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतल्यानंतर सगळ्यात प्रथम मला माझ्या भाषा-उच्चारांवर मेहनत घ्यावी लागली. त्यानिमित्तानं मराठी भाषा पुन्हा एकदा नव्यानं शिकायला मिळाली. अभिनयामुळे वाचनाची आवड लागली. पथनाट्य, एकांकिका ते व्यावसायिक नाटक, पुढे मालिका अशा वेगवेगळ्या अभिनयाच्या बदलत्या छटा अनुभवायला मिळाल्या. वेगवेगळ्या ठिकाणी ऑडिशन देतच होतो. बऱ्याच वेळा निवड व्हायची, पण काही कारणांनी ते पूर्ण व्हायचे नाहीत. संघर्ष होता पण त्यातही एक वेगळीच मजा होती. खूप काही शिकायला मिळालं.

...आणि ‘लागिर झालं जी’
एका प्रोजेक्टमध्ये कलादिग्दर्शक म्हणून काम करत असताना शिवानी बावकरशी मैत्री झाली. एकदा शिवानीनं फोन करून माझे फोटो पाठवण्यास सांगितलं. तेव्हा शिवानी ‘लागिरं...’ करतेय हे माहीत नव्हतं. तिनं ते फोटो ‘भैयासाहेब’ ह्या भूमिकेसाठी तेजपालला दाखवले, पण त्याला मी ह्या भूमिकेसाठी साजेसा न वाटल्यानं त्यानं नकार दिला. शिवानीप्रमाणेच निखिल चव्हाणही माझा मित्र. तोही पुण्याचाच. त्याला बाहेर जायचं होत म्हणून त्यानं मला बरोबर चल म्हणून सांगितलं. मी रात्री ३ वाजेपर्यंत शो करून सकाळीच घरी आलो होतो, तसाच उठून त्याच्यासोबत गेलो. निखिलला घेण्यासाठी तेजपाल आलेला, तिथून ते टीझर शूटसाठी मुंबईला जात होते. तेव्हा त्यानं मला ओळखलं, शिवानीनं फोटो दाखवल्याचं सांगितलं. तिथे आमची पुन्हा नव्यानं ओळख झाली. आमची चांगलीच गट्टी जमली. एके दिवशी तेजपालनं छोटी ऑडिशन क्लिप बनवून पाठवायला सांगितली. मी ती पाठवली आणि संध्याकाळी मला तेजपालनं ही भूमिका मी करतोय असं सांगितलं. ‘लागिरं झालं जी’ ही मालिका झी मराठीची आहे कळल्यावर तो आनंद माझ्यात मावत नव्हता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही... या आधी मी नाटक, ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘फुंतरु’ यासारख्या चित्रपटातून भूमिका केल्या होत्या. परंतु ‘लागिरं झालं जी’चा भैयासाहेब माझ्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देणारा ठरला.

किरण ते ‘भैयासाहेब’
‘भैयासाहेब’ हा ‘लागिरं झालं जी’चा खलनायक आहे याची कल्पना तेजपालनं मला आधीच दिली होती. त्यानंतर माझ्या आणखी तीन ऑडिशन झाल्या. ‘हर्षवर्धन’ हे त्याचं नाव आहे पण लोक त्याला प्रेमानं ‘भैयासाहेब’ म्हणतात. ‘भैयासाहेब’ खलनायक असला तरी या पात्राच्या स्वभावाला वेगवेगळ्या छटा आहेत. तो थोडा मूडी आहे, थोडा प्रेमळ आहे. राजकारणी असला तरी समाजकार्य करण्याकडे त्याचा कल आहे. मालिकेच्या प्रत्येक पात्राबरोबर त्याचं एक वेगळं नातं आहे, प्रत्येकाबरोबर वागण्याची त्याची पद्धत वेगळी आहे. त्याला राग आला की तो त्याच्या सवंगड्यांना मारतो, त्यांना त्रास देतो, तेच दुसऱ्या क्षणाला त्यांना प्रेमानं जवळही करतो. स्वभाव थोडा विक्षिप्त असला तरी प्रेमळही आहे. एक माणूस आणि दहा स्वभाव अशी ही व्यक्तिरेखा साकारताना त्याच्या प्रत्येक बाजूवर मेहनत घ्यावी लागते. किरण आणि भैयासाहेब ही दोन विरुद्ध टोकं आहेत. भैयासाहेबांना खूप राग येतो, मला मात्र क्वचितच राग येतो. राग आला तरी मी समोरच्याला प्रेमानं समजवून सांगतो. भैयासाहेब हे गावातलं मोठं प्रस्थ असल्यानं त्याचा रुबाब स्वतःमध्ये भिनवावा लागला. माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे, मात्र भैयासाहेब हा स्वतःच्या आईला कोंडून ठेवतो, तिला ओरडतो.  मालिकेमधली अशी काही दृश्यं चित्रित करताना खूप त्रासही होतो. ही भूमिका साकारताना कुठेही अतिशयोक्ती होऊ नये ह्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. ‘भैयासाहेब’मुळे मला लोकांचं प्रेम मिळू लागलयं त्यामुळे ‘भैयासाहेब’ साकारताना त्याची प्रतिमा मलिन होणार नाही ह्याचीही काळजी घ्यावी लागते. हे सगळं करत असताना मी माझ्या आईला, मित्रांना आणि डीजे लाईफला खूप मिस करतो.

प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय ...
भूमिका साकारताना प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतंय. साताऱ्यात भैयासाहेबांचा एक चाहता आहे जो भैयासाहेबांसारखा राहतो, वागतो, अगदी कपडेही तसेच घालतो. त्यानं एक बुलेटही घेतली आहे. त्याचे मित्र त्याला भैयासाहेब म्हणूनच हाक मारतात. असंच एकदा त्याला मित्रांनी तू भैयासाहेबांसाठी काय करशील असं विचारलं तर त्यानं रक्तदानशिबिर आयोजित केलं आणि या शिबिरात जमा झालेलं रक्त त्यानं एका रुग्णालयाला ‘भैयासाहेब फॅन क्लब’च्या नावानं दान केलं. ही सगळी गोष्ट जेव्हा माझ्या कानावर आली तेव्हा मी अगदीच भरून पावलो.  

आठवणीत राहिलेला किस्सा...
सेटवर रोज गमती जमती घडत असतात. एकदा आमचा अजिंक्यच्या घरातला सीन होता. या सीनच्या फ्रेममध्ये माझ्या अगदी मागे एक म्हैस होती. तिनं अगदी सीनच्या क्लोजला हंबरडा फोडला. सीन ओके झाला. आता ती म्हैस बरोबर मागे असल्यानं ते वगळता येणंही अशक्य होतं. पुन्हा एकदा दृश्य चित्रित करताना त्या म्हशीनं बरोबर त्याच वेळी पुन्हा हंबरडा फोडला. एका क्षणाला असं वाटलं की तिलासुद्धा सीन कळलाय. गावातच सेट असल्यानं अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात. मात्र हा किस्सा मला कायम लक्षात राहणारा आहे.

भविष्यात...
पाणी जसं एखाद्या साच्यात ओतलं की त्या साच्याचा आकार घेतं अगदी तसंच मला एका भूमिकेत न अडकता भविष्यात वेगवेगळ्या भूमिका साकारायच्या आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link