Next
लढवय्या...
अमित मधुकर डोंगरे
Friday, June 14 | 02:00 PM
15 0 0
Share this story


यश-अपयश सर्व काही त्यानं पाहिलं आहे, परंतु कधीही हार मानली नाही. जिद्द त्याच्या नसानसांत भिनली आहे. दिल, दोस्ती आणि दुनियादारी त्याच्यासाठी सर्व काही आहे, असा युवराजसिंग आता कॅन्सरग्रस्तांसाठी झोकून देऊन काम करणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतानाच त्यानं त्याच्या कामाची नवी दिशा स्पष्ट केली आहे.

वडिलांचे स्वप्न


युवराजचे वडील योगराजसिंग यांनी युवराजला जागतिक स्तरावरचा अव्वल क्रिकेटपटू घडविण्याचे स्वप्न पाहिले होते, हेच स्वप्न उराशी घेत युवराजने शालेय स्तरापासून रणजी करंडक स्पर्धेतही सातत्यपूर्ण कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळविले व वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

बालकलाकार
युवराजने बालकलाकार म्हणून ‘मेहंदी सांगा दी’ आणि ‘सरदारा’ या लघुपटांत अभिनयदेखील केला होता. त्याला या लघुपटात काम केल्यामुळेच पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या उत्पादनांच्या जाहिराती करताना मोठा आत्मविश्वास मिळाला. सचिन तेंडुलकरप्रमाणेच युवराजही जाहिरातकंपन्यांसाठी एक देखणा मॉडेल होता.

हुशार विद्यार्थी ते खेळाडू
डीएव्ही शाळेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने याच संस्थेच्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. खरेतर त्याला अभ्यासापेक्षाही खेळांमध्येच जास्त गोडी होती. त्याने सुरुवातीला क्रिकेटपेक्षा टेनिस व रोलर स्केटिंगमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यात त्याने राज्यस्तरावरही विविध स्पर्धांत बक्षिसे मिळविली आहेत. मात्र दहावीनंतर त्याला क्रिकेटमध्ये जास्त रस वाटू लागला व देशाला एक अफलातून क्रिकेटपटू मिळाला. त्याने शिक्षणातही चांगली प्रगती दाखविली होती मात्र त्यानंतर त्याने क्रिकेटकडे जास्त लक्ष दिले.

विक्रमी प्रारंभ
युवराजसिंगच्या नावावर एक अविश्वसनीय विक्रम जमा आहे. सतरा आणि एकोणीस वर्षांखालील गटाच्या विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेत सहभागी होताना त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर संघाला विजेतेपद मिळवून दिले, इतकेच नाही तर या स्पर्धांमध्ये तो स्पर्धेचा मानकरीदेखील ठरला. पुढे जेव्हा त्याने २०११च्या विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली व स्पर्धेचा मानकरी हे पारितोषिक मिळविले तेव्हा सर्व वयोगटांत अशी कामगिरी करणारा भारताचा एकमेव क्रिकेटपटू ठरला.

पदार्पण गाजले
१९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद मिळविले तेव्हा युवराजच्या कामगिरीने निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वेधले. त्याचवेळी त्याची भारतीय संघात निवड झाली. त्याने केनयाविरुद्ध पहिला सामना खेळला. विविध संघांविरुद्ध त्याने खेळ केला असला तरी त्याची कामगिरी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध जास्त बहरायची. त्याने कसोटी क्रिकेटपेक्षा एकदिवसीय व टी-२० सामन्यांमध्ये जास्त सरस कामगिरी केली, कारण त्याला कसोटी क्रिकेट जास्त मानवले नाही. एकदिवसीय सामन्यांमध्ये मात्र त्याने संघाला चौथ्या स्थानावरील आश्वासक खेळाडू म्हणून अनेक अविश्वसनीय विजय मिळवून दिले आहेत.

कारकीर्द
३०४ एकदिवसीय सामन्यांत युवराजने १४ शतके आणि ५२ अर्धशतके यांच्या मदतीने आठ हजारांपेक्षा जास्त धावा केल्या. ५८ टी-२० सामने खेळताना त्याने आठ अर्धशतकांच्या मदतीने अकराशेपेक्षा जास्त धावा केल्या. प्रथम दर्जाच्या १३९ सामन्यांत त्याने २६ शतके आणि ३६ अर्धशतकांच्या मदतीने आठ हजारांपेक्षाही जास्त धावा कुटल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांत उपयुक्त गोलंदाजी करताना त्याने शंभरपेक्षाही जास्त बळी मिळविले आहेत.

गांगुली व सचिनकडून प्रेरणा
जागतिक क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट सचिन तेंडुलकर आणि भारताचा आक्रमक कर्णधार सौरव गांगुली यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचे युवराज सांगतो. गांगुलीने त्याच्यातील गुणवत्तेला खरा न्याय दिला. त्याच्यातील अष्टपैलूत्वाची जाणीव गांगुलीलाच झाली व त्याने महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्याच्यातील गोलंदाजाची पुरेपूर वापर करून घेतला. त्याच्यावर विश्वास ठेवत गांगुलीनेच खरेतर त्याची कारकीर्द घडविली. सचिन तेंडुलकरने युवराजला साथीला घेत कसोटी सामन्यांमध्ये संघाला अनेक विजय मिळवून दिले. सचिनने त्याच्या अपयशातही त्याला साथ देत त्याच्यात पुन्हा आत्मविश्वास कसा येईल, यासाठी प्रयत्न केले त्यामुळेच युवराज २०११ च्या विश्वकरंडकस्पर्धेत स्पर्धेचा मानकरी ठरला. या स्पर्धेचे विजेतेपद मला एका खास व्यक्तीला द्यायचे आहे असे तो सांगायचा, आणि ही खास व्यक्ती सचिनच होती हे त्याने स्पर्धेतील विजयानंतर जाहीर केले.


अविस्मरणीय खेळी
२००० साली आंतरराष्ट्रीय  सामने खेळायला सुरुवात केल्यानंतर, २००२ सालातील नॅटवेस्ट मालिकेतील खेळी, २००४ मधील लाहोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध झळकावलेले कसोटी शतक, २००७ च्या टी-२० विश्वकरंडकस्पर्धेत इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात फटकावलेले सलग सहा षटकार आणि २०११ च्या विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेतील त्याची फलंदाजी क्रिकेटचाहते कधीही विसरणार नाहीत.

कॅन्सरवर यशस्वी मात
२०११ ची विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धा भारतात झाली. या स्पर्धेत सहभागी होताना युवराजला कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. मात्र त्याने आपल्या कुटुंबीयांखेरीज कोणालाही याची कल्पना दिली नाही. या आजारासह त्याने या स्पर्धेत खेळ केला. सचिनला त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी भेट देण्यासाठीच युवराज खेळला. स्पर्धेतील विजेतेपद मिळविल्यानंतर तोच स्पर्धेचा मानकरीदेखील ठरला होता. या स्पर्धेनंतर त्याने आपल्या आजाराची सगळ्यांना कल्पना दिली आणि अवघे जागतिक क्रिकेट हादरून गेले. त्याने उपचारांसाठी अमेरिका गाठली. तिथे त्याने उपचार घेतले व पूर्ण बरा होत पुन्हा मायदेशी परतला. त्याने जिद्दीने पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळविले, काही सरस खेळीदेखील केल्या. मात्र त्याचवेळी त्याच्यातील तो पूर्वीचा ‘युवी’ दिसला नाही, अखेर त्याने या खेळाला अलविदा केले.

अपयशाचा चटका
२०१४ साली टी-२० विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांत २१ चेंडूत त्याला केवळ ११ धावा करता आल्या. तेव्हाच त्याने निवृत्तीचा विचार सुरू केला होता. त्याने त्यानंतर अनेक सामन्यांत सहभाग घेतला मात्र त्याच्यातील आत्मविश्वास कमी झाला होता. त्याला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत होता. मात्र एखादी मोठी खेळी केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला सूर गवसेल अशी आशा त्याला होती, मात्र तीदेखील फोल ठरली व त्याने अखेर निवृत्तीचा विचार पक्का केला.

मंडळाकडून अपेक्षाभंग
सचिन तेंडुलकरला आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर खेळण्याची संधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिली. अशीच संधी युवराजलाही द्यायला हवी होती. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलच्या हॉलमध्ये युवराजने आपल्या निवृत्तीची घोषणा केली, याची खंत कायमच राहणार. मंडळाने वीरेंद्र सेहवाग, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, राहुल द्रविड यांच्याबाबतीत जे केले तेच युवराजच्या बाबतीत केले. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेत संघात स्थान मिळविण्यात अपयशी ठरला तेव्हाच युवराजच्या मनात निवृत्तीबाबत निर्णय पक्का झाला. यो-यो तंदुरुस्ती चाचणीत पास झाला तरच अखेरचा सामना खेळण्याची संधी मिळेल व त्यात निवृत्तीची घोषणा कर, असे मंडळाने त्याला सांगितलं होते. मात्र मंडळाने त्यात पास झाल्यानंतरदेखील त्याला संधी दिली नाही याची खंत क्रिकेटचाहत्यांना कायम वाटत राहील.

अफलातून कारकीर्द
२००० साली १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेत २०३ धावा करत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. याच वर्षी केनयविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणानंतरच्या दुसऱ्याच सामन्यात ऑस्ट्रलियाविरुद्ध ८० धावांची अविश्वसनीय खेळी केली. २००२ साली नॅटवेस्ट मालिकेत इंग्लंडमध्ये त्यांच्याच विरुद्ध ६९ धावांची खेळी करत संघाला एक अशक्यप्राय विजय मिळवून दिला. २००४ साली ऑस्ट्रलियाविरुद्ध १२२ चेंडूत १३९ धावांची खेळी करताना आपल्यातील जिद्दी खेळाडूचा दाखला दिला. २००६ साली पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत ८७, ६९ आणि १०७ अशा खेळी करताना संघाला ४-१ असा विजय मिळवून दिला. २००७ साली टी-२० विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेत ब्रॉडच्या एकाच षटकात सलग सहा षटकार फटकावत अनोखा विक्रम साकारला. २००७ साली बंगळुरूमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत १६९ धावांची खेळी करून आपल्यातील जिद्दी खेळाची साक्ष दिली. २०११ च्या विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेत एक शतक आणि चार अर्धशतकांच्या मदतीने ९०.५० च्या सरासरीच्या जोरावर त्याने एकूण ३६२ धावा केल्या. तसेच गोलंदाजीतही चुणूक दाखविताना १५ बळी देखील मिळविले. अशी कामगिरी करणारा विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेच्या इतिहासातील पहिलाच खेळाडू बनण्याचा मान त्याने मिळविला. २०१७ साली सचिनसह बहुमोल भागीदारी करताना कटक येथील कसोटीत इंग्लंडविरुद्ध त्याने १२२ चेंडुत १३४ धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. या बरोबरच त्याने अशा अनेक खेळी साकारल्या असून त्याचे चाहते त्याची कामगिरी कायमच लक्षात ठेवतील.

टी-२० खेळतच राहणार
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्ती जाहीर केली असली तरी, इंडियन प्रीमिअर लीग आणि जागतिक स्तरावर होणाऱ्या तशाच स्पर्धांमध्ये यापुढेही खेळत राहणार असल्याचे त्याने स्पष्ट केलेय. वास्तविक त्याचसाठी त्यानं ही निवृत्ती घेतली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी निवृत्ती घेतली आहे. ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडिज, कॅनडा व श्रीलंका येथेदेखील आयपीएलसारख्या स्पर्धा होतात, त्यात आणखी काही काळ सहभागी होत खेळाशी संबंध टिकवून ठेवण्याची त्याची इच्छा आहे.

युवी कॅन
युवराज जेव्हा कॅन्सरमधून पूर्ण बरा होऊन मायदेशी परतला तेव्हा त्याने ‘युवी कॅन’ नावाची संस्था स्थापन केली. याद्वारे त्याने कॅन्सरसारख्या आजाराशी झुंजणाऱ्या अनेक रुग्णांसाठी मदत गोळा केली आहे. आता निवृत्तीनंतर या संस्थेची व्याप्ती वाढवून अनेक रुग्णांना मदतीचा हात पुढे करणार असल्याचे त्याने सांगितले आहे. भारतात अनेक रुग्ण या आजारामुळे खचून जात आहेत, त्यांना उपचारांचा खर्चदेखील परवडत नाही, त्यामुळे अशा व्यक्तींसाठी यापुढे आपली संस्था काम करेल असे त्याने स्पष्ट केले.

मॉडेलशी विवाह
भारतात ‘बिग बॉस’ हा शो खूप प्रसिद्ध आहे. त्यात सहभागी झालेली अभिनेत्री व मॉडेल हेजल क्रिच हिच्याशी युवराज विवाहबद्ध झाला. खरेतर तो जेव्हा भरात होता तेव्हा त्याचे नाव अनेकींशी जोडले जात होते. मात्र युवराजने नेहमीच अशा वृत्तांचे खंडन केले होते. भारतीय संघाने विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धा जवळपास २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा जिंकली तेव्हा त्याची हेजलशी ओळख झाली व त्यानंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले व जागतिक क्रिकेटचा हा लाडका राजपुत्र विवाहबद्ध झाला.

नवी ओळख व्हावी
एक क्रिकेटपटू म्हणून देश आपल्याला नेहमीच ओळखेल, मात्र आता समाजासाठी योगदान देणारी व्यक्ती म्हणून ओळख व्हावी ही इच्छा असल्याचे सांगत त्याने आपल्यातील माणुसकीची ग्वाही दिली. जोवर क्रिकेट आहे तोवर जागतिक क्रिकेटच्या या ‘राजपुत्रा’ची ओळख कायम राहणार आहे. एक खेळाडू, एक अत्यंत चांगली व्यक्ती आणि समाजासाठी काम करण्याची कळकळ वाटणारा माणूस म्हणून त्याची ओळख क्रिकेटचाहते कधीच विसरणार नाहीत.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link