Next
नाना वर्तक
सुरेश खरे
Friday, October 12 | 01:30 PM
15 0 0
Share this storyकाही काही माणसं आपल्या आयुष्यात काही काळापुरती येतात. ती आपलं काहीतरी देणं लागतात. ते देणं देऊन झालं, की ती आपल्या आयुष्यातून निघून जातात. हे इतकं सहज घडतं, की आपल्याला जाणवतही नाही. कधी कधी ती जे काही देतात त्या लहान गोष्टी असतात, तर कित्येकदा त्या फार मोलाच्या असतात. त्यांचं मोल आपल्याला त्या वेळी समजत नाही. कधीतरी कुठल्यातरी क्षणी ते आपल्याला समजतं, जाणवतं. हे सगळे विचार यायचं कारण आज अचानक नाना वर्तकची आठवण झाली. तशी आठवण यायला काही कारणही घडलं नाही.

या आठवणींचं असंच असतं. कुठेतरी मनाच्या सांदीकोपऱ्यात दडून राहिलेली आठवण अचानक उफाळून वर येते. तर सांगत होतो नाना वर्तकविषयी. म्हणजे त्याचं नाव नारायण वर्तक, पण माझी-त्याची ओळख झाली ती नाना म्हणून. सावळा वर्ण, जाड भुवया, उग्र चेहरा आणि भेदक नजर. प्रथमदर्शनी धाक वाटावा असं त्याचं एकूण व्यक्तिमत्त्व होतं. आम्ही त्यावेळी गिरगावात राहत होतो. माझं वय असेल त्यावेळी जेमतेम दहा-अकरा वर्षं. नाना माझ्याहून पाचसहा वर्षं तरी मोठा असावा. कोकणातून तो मुंबईत आला. आमच्या चाळीतल्या नाकेल्या जोश्यांकडे तो राहायचा. (चाळीमध्ये चारपाच जोशी असल्यामुळे त्यांची ओळख नाकेला जोशी, टकलू जोशी, घारा जोशी, गिड्डा जोशी अशी चटकन लक्षात येणारी असे). त्या काळी कोकणातून कामधंद्याकरता येणारी गावाकडची माणसं मुंबईत जम बसेपर्यंत आपल्या नातेवाईकांकडे राहत असत. नाना नाकेल्या जोश्यांकडे राहायचा, बाहेर खानावळीत जेवायचा, गॅलरीत झोपायचा, सार्वजनिक टाकीच्या नळावर बारा महिने गार पाण्यानं अंघोळ करायचा. नाना चांगला स्टेनोग्राफर होता. त्याला एलआयसीमध्ये नोकरी मिळाली.

नानाची आणि माझी ओळख कशी झाली ते मला आठवत नाही, पण का कोण जाणे त्याला माझ्याविषयी आत्मीयता वाटायला लागली.
एक दिवस त्यानं मला विचारलं, “व्यायामशाळेत जातोस की नाही?”
“नाही. मला वेळ नाही मिळत नाही, सकाळी आणि संध्याकाळीही…”
“ते काही नाही. सबब नाही चालायची. या वयात व्यायाम केलाच पाहिजे. उद्यापासून रोज व्यायामशाळेत जायचं.” नानानं दम भरला. मी नुसतीच मान डोलावली.
संध्याकाळी नाना भेटला. “तुझी कांदेवाडीतल्या व्यायामशाळेची फी भरून आलोय.” नानानं सांगितलं. माझा नाइलाज झाला. मी दुसऱ्या दिवसापासून व्यायामशाळेत जायला सुरुवात केली. सुरुवातीला मला कंटाळा यायचा. मी टाळाटाळ करायचो, पण नाना सकाळी उठून गॅलरीत उभा राहून मी जातोय की नाही यावर लक्ष ठेवून असायचा. त्याच्या धाकानं मी नेमानं जायला लागलो. मग हळूहळू सवय झाली, पुढे गोडी लागली. तेव्हापासून आजतागायत मी नेमानं व्यायाम करत आलो आहे. मी आपणहून कधीच व्यायामशाळेत गेलो नसतो. केवळ नानानं दम भरल्यामुळे.

नाना एवढ्यावरच थांबला नाही. एक दिवस त्यानं विचारलं, “रोज दूध पितोस की नाही?” “आमच्याकडे कुणीच दूध पीत नाही.” मी सांगितलं. आम्ही तीन भावंडं, आई आणि वडील. पाच जणांच्या कुटुंबाला रोज दूध पिणं परवडण्यासारखं नव्हतं, पण हे त्याला कुठं सांगणार?
“ते काही नाही,” नाना म्हणाला, “व्यायाम करायचा म्हणजे रोज दूध प्यायलाच पाहिजे. तुला मी दर महिन्याला दहा रुपये पॉकेटमनी देईन. नाक्यावर सांडूंचं दुकान आहे. तिथं दूध मिळतं. रोज कपभर दूध प्यायचं.” मला चमत्कारिक वाटलं, पण त्याच्या नजरेतली जरब पाहून मला काही बोलायचा धीर झाला नाही.
मी घरी बोललो नाही. कुणाला ते रुचलं नसतं. मी मॅट्रिक होईपर्यंत नाना मला महिन्याला पॉकेटमनी देत होता. कॉलेजात गेल्यावर मी शिकवण्या करायला लागलो आणि नानाकडून पॉकेटमनी घ्यायचं मी थांबवलं. नानानं मला रोज दूध प्यायची सवय लावली ती आजतागायत कायम आहे.

नाना गणपतीचा उपासक होता. अनुष्ठानं, जपजाप्य हे त्याचं नेहमी चालूच असे. एक दिवस त्यानं मला विचारलं, “गणपती अथर्वशीर्ष येतं?” मी मान हलवली. नाना काही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी त्यानं मला गणपती अथर्वशीर्षाचं पुस्तक दिलं. “तू वक्तृत्वस्पर्धेत भाग घेतोस. वाणी कशी शुद्ध, स्पष्ट हवी. उच्चार शुद्ध हवेत.” त्यानं माझ्याकडून अथर्वशीर्ष पाठ करून घेतलं. आणि वर माझ्या आईला येऊन सांगितलं, की हा रोज म्हणतोय की नाही ते बघा! नाना सांगेल तसं मी करत गेलो. मी त्याच्या धाकात होतो. मला समजत होतं, की तो जे काही करतोय किंवा मला करायला सांगतोय ते माझ्या भल्याकरताच आहे. त्यात त्याचा काडीचाही फायदा नाही, पण त्याच्या सांगण्यातला रुक्षपणा मला बोचायचा. त्याच्या सांगण्यामध्ये असणारी हुकमत मला आवडत नसे. तो हे सगळं का करतोय हे मी कधीच समजू शकलो नाही. त्याच्या मनात माझ्याविषयी माया, जिव्हाळा असेल. म्हणजे असणारच, पण तो भावनेचा ओलावा शब्दांत कधी व्यक्त झाला नाही. नाना पुढे बदली होऊन साताऱ्याला गेला. त्यानंतर फक्त एकदा भेटला. आता तो कुठे असतो, काय करतो मला कल्पना नाही. रोज व्यायाम करणं, दूध पिणं आणि अथर्वशीर्ष म्हणणं या आयुष्यभर पुरणाऱ्या तीन गोष्टी मला देणं इतकंच त्याचं माझ्या आयुष्यात येण्याचं प्रयोजन होतं! दुसरं काय?
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link