Next
रोहितची ‘कसोटी’
अमित मधुकर डोंगरे
Friday, September 20 | 03:00 PM
15 0 0
Share this story

भारताच्या एकदिवसीय क्रिकेटसंघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. जवळपास एक वर्षानंतर त्याला कसोटीसंघात स्थान देण्यात आले असून वेगवान क्रिकेटमधला या दादा फलंदाजासमोर आता स्वत:ला कसोटी फलंदाज म्हणून सिद्ध करण्याचे आव्हान आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या कसोटी सामन्यानंतर रोहितने कसोटीसंघातील स्थान गमावले होते. महान फलंदाज सचिन तेंडुलकरची कारकिर्दीची अखेरची कसोटी मालिका २०१३ साली वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली गेली. त्याच मालिकेतून रोहितने कसोटीत पदार्पण केले होते. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याने १७७ धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. इतकेच नव्हे, तर वानखेडे म्हणजेच रोहितच्या घरच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटीतदेखील त्याने १११ धावांची शानदार शतकी खेळी करत त्याची निवड सार्थ ठरवली होती. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर त्याची संघात निवड झाली होती. तेथील वेगवान व चेंडूला उसळी मिळणाऱ्या खेळपट्ट्यांवर त्याची फलंदाजी निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वास निवडसमितीने त्याची निवड करताना व्यक्त केला होता. याच विश्वासाला सार्थ ठरवताना रोहितनेदेखील एडिलेड कसोटीत संघाच्या विजयात हातभार लावणारी ३७ धावांची खेळी केली. याच सामन्यात त्याला दुखापत झाली व पर्थ कसोटीतून त्याला माघार घ्यावी लागली होती. दुखापत फारशी गंभीर नसल्याने तो मेलबर्न मैदानावर झालेल्या बॉक्सिंगडे कसोटीत खेळला व पहिल्या डावात ६३ धावा फटकावताना संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. ही मालिका भारताने जिंकली, या सामन्यानंतर रोहित कौटुंबिक कारणाने मायदेशी परतला होता.
त्यानंतर कामगिरीतील सातत्याचा अभाव आणि दुखापती यांमुळे रोहितला पुढील कसोटीसंघांत स्थान मिळवण्यात वारंवार अपयश येत होते. त्याचवेळी मुरली विजय आणि शिखर धवन यांनी संघाला सातत्याने चांगली सलामी दिल्यामुळे अतिरिक्त सलामीचा फलंदाज म्हणून रोहितचा विचार झाला नाही.
इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेत मात्र एक नवाच रोहित शर्मा पाहायला मिळाला. संघाच्या फलंदाजीची सूत्रे कर्णधार विराट कोहलीकडून अत्यंत जबाबदारीने स्वत:कडे घेत रोहितने ही संपूर्ण स्पर्धा गाजवली. एकाच विश्वकरंडकस्पर्धेत पाच शतके फटकावण्याचा विक्रमदेखील त्याने साकारला. त्याचे धावांचे सातत्य आणि प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व राखण्याची त्याची हतोटी यावेळी खूपच निराळी होती. म्हणूनच वेस्ट इंडिज दौऱ्यातील टी-२० आणि एकदिवसीय मालिकेबरोबरच त्याला कसोटीसंघात का स्थान मिळाले नाही, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. इतक्या भरात असलेल्या फलंदाजाला टीमबाहेर कसे काय ठेवले जाते, असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला होता. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ निवडताना निवडसमितीने आपली चुक सुधारली व रोहितला कसोटीसंघात स्थान दिले.
एकूण ९६ टी-२० सामन्यांत चार शतके तसेच १७ अर्धशतकांच्या मदतीने दोन हजारांपेक्षाही जास्त धावा करणाऱ्या रोहितने २१८ एकदिवसीय सामन्यांत साडेआठ हजारांपेक्षाही जास्त धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे तीन द्विशतकेदेखील त्याच्या नावावर आहेत. मात्र वेगवान क्रिकेटच्या प्रकारातील हा दादा फलंदाज कसोटीतील कामगिरीबाबत मात्र खूपच मागे पडला आहे. आजवर केवळ २७ कसोटी सामने खेळताना, तीन शतके फटकावूनही जेमतेम दीड हजार धावा त्याच्या खात्यात आहेत.
आता भारतीय संघ मायदेशात कसोटी मालिका खेळत असून भरात असलेल्या रोहितसाठी स्वत:ला कसोटी फलंदाज म्हणून सिद्ध करण्याची ही नामी संधी आहे. संघाला तंत्रशुद्ध तसेच वेगाने धावा करणाऱ्या सलामीच्या फलंदाजाची गरज असून रोहित ही उणीव निश्चितच भरून काढू शकतो. संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात तसेच मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यात रोहितची कामगिरी निर्णायक ठरणार आहे. शुभमन गिल, हनुमा विहारी असे नवनवीन खेळाडू संघात येत आहेत. अशा स्थितीत रोहित यशस्वी ठरला तर त्याचे कसोटीसंघातील स्थानदेखील पक्के होईल, मात्र तो अपयशी ठरला तर त्याच्यासाठी कसोटीसंघाचे दरवाजे कायमचे बंद होऊ शकतात. कोहलीसारखा परिपूर्ण फलंदाज म्हणून सिद्ध करण्याची रोहितसाठी ही अखेरची संधी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link