Next
विनेशचा ‘भीम’पराक्रम
विशेष प्रतिनिधी
Friday, September 20 | 03:00 PM
15 0 0
Share this story

टोकियो ऑलिंपिकमध्ये (२०२०) आपलं स्थान पक्कं करण्याचा मान महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिनं मिळवला आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. कझाकस्तानमध्ये (नूर-सुलतान) सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्तीस्पर्धेत विनेश फोगटनं (५३ किलो वजनी गटात) ग्रीसच्या मारिया प्रेवोलाराकीवर बुधवारी ४-१ अशी मात करून कांस्यपदकाची कमाई करून हा पराक्रम केला. आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या विनेशला २०१६ साली रिओ इथे झालेल्या ऑलिंपिकस्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. तसेच मागील तीन जागतिक स्पर्धांमध्ये अपयशी ठरल्यानं पदकाविना परतावं लागलं होतं. या पार्श्वभूमीवर तिनं मिळवलेलं यश नक्कीच उल्लेखनीय आणि इतर खेळाडूंचा उत्साह वाढवणारं आहे.
तत्पूर्वी अमेरिकेच्या सारा हिल्डेब्रांटचा ८-२ असा दणदणीत पराभव करून विनेश कांस्यपदकासाठी पात्र ठरली होती. गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सारानं ५३ किलो वजनी गटात रजतपदकाची कमाई केली होती. त्यामुळे जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमधून तिला बाहेर पडावं लागलं होतं. तत्पूर्वी विनेशला जपानच्या मायू मुकेदानं हरवलं होतं. साखळी फेरीत हरल्यानंतर प्रतिस्पर्धी मायू हिनं अंतिम फेरी गाठल्यामुळे विनेशला रिपिचेजमधून रजतपदकासह ऑलिंपिक पात्रतेची संधी होती. यावेळी तिचे प्रयत्न आणि नशिबानंही साथ दिली आणि रेपेचेज राऊंडमध्ये पदक मिळवण्याची कामगिरी तिला करता आली.
जागतिक कुस्तीस्पर्धेत पदक मिळवणारी विनेश फोगट ही पाचवी भारतीय महिला आहे. यापूर्वी अलका ठोमर (२००६), गीता फोगट (२०१२), बबिता फोगट (२०१२) आणि पूजा धांडा (२०१८) यांनी ही कामगिरी केली होती. यापैकी गीता आणि बबिता या विनेशच्या चुलतबहिणी आहेत. विनेशचे काका महाविरसिंग फोगटदेखील विख्यात कुस्तीपटू आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link