Next
माझा वेळ... माझा खेळ...
अनुजा हर्डीकर
Friday, September 20 | 03:00 PM
15 0 0
Share this story


आज सगळी कामे आवरून रमा निवांत बसली होती. रुमानीही तिच्या खेळात छान रमलेली. एरवी रमा जरा मोकळी दिसली की रुमानी लागलीच तिला बिलगायची. शाळेतल्या गप्पा, आजोबांनी-शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी आईला सांगत राही. किंवा ‘तू ही माझ्यासोबत खेळ’ म्हणून तिचा हट्ट सुरू असे. परंतु गेले काही दिवस रमाच्या लक्षात आले होते की रुमानी आता स्वतःच एकटी एकटी खेळते, पूर्वीसारखी येऊन बिलगत नाही, ना तिला ना तिच्या बाबांना. सुरुवातीला रुमानी मोठी होतेय ह्याचा आनंद होता, स्वतःला काम आणि रुमानी यांशिवाय स्वतःचा वेळ मिळायला लागला म्हणून समाधान होते. बरेच दिवस झाले होते, मोकळा वेळ स्वतःसाठी वापरायच्या ऐवजी फक्त रुमानीबरोबर द्यायचे हे तिचे पक्के झाले होते. कारण रुमानीने मांडलेला भातुकलीचा संसार रमाला पुन्हा तिच्या बालपणाची आठवण करून देत होता.
“ए रुमानी, मी पण येऊ का तुझ्यासोबत खेळायला?” रमाने हळूच विचारले. हो सांगावे की नाही रुमानीला कळेचना. “तू खेळणार माझ्याबरोबर? चालेल.” हो म्हटले तरी रुमानीच्या चेहऱ्यावर अजून प्रश्न होते. “आई, मला वाटलं खरंतर तू मला सांगतेय की हा काय खेळ मांडून ठेवला आहेस? आता काय लहान आहेस भातुकली खेळायला? पण तू चक्क माझ्याबरोबर खेळणार आहेस. ठीक आहे. ये की मग माझ्या घरात.” आणि रमाने रुमानीच्या घरात प्रवेश केला.
“हे बघ, कोण आलंय? तुझी आजी. खूप लांबून आली आहे हा बाळा. थांब आपण तिला पाणी देऊया.” रुमानी आपल्या बाहुलीशी बोलत रमासाठी खोटेखोटे पाणी घेऊन गेली. “आजी?” रमाने रुमानीला विचारले, “आजी काय? मला वाटलं, मी तुझी मैत्रीण किंवा तुझी मुलगी होईन म्हणून. तू तर मला एकदम आज्जीच केलंस.”
“ए आई, तू माझी आईच ना! आणि ही माझी मुलगी. म्हणजे तू हिची आजी नाही का? मला नकोय तू मैत्रिण किंवा मुलगी म्हणून. आता माझ्या खेळात मी सांगते ते ऐकायचं ओके?” रमाने गुपचुप मान हलवली. खेळाची पहिली अट रमाला चांगलीच समजली.
“बरं ग बाई, दे मला ते पाणी. हे काय? घरात थंड पाणी नाही? एवढी उन्हाची आले आणि साधंच पाणी. मला काही थंड पाणी प्यायल्याशिवाय समाधान होत नाही.” रमाने अलगद बाहुलीचे आजीपण स्वीकारले. “आमच्या माऊला थंड पाण्याचा त्रास होईल की नाही म्हणून घरात आम्ही थंड पाणी ठेवतच नाही.” रुमानीचे उत्तर.
“अग, तुमच्या माऊला देऊ नका, पण घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ठेवाल की नाही? आणि माऊ थोडीच स्वतः जाऊन थंड पाणी घेणार?” रमाचा प्रतिप्रश्न.
“बघ ग माऊ, आजीला तिचे बाबा म्हणजे माझे आजोबा सांगायचे ते अगदी विसरली ती. थंड पाणी प्यायले की सांधे दुखायला लागतात आणि मग बसते ही गुडघे धरून. तरी अजून थंड पाणी सोडलेलं नाही वाटत.” रमापण काही ऐकायला तयार नव्हती. “तुमच्या शहरात लागतं हो थंड पाणी. आमच्या गावी पाणी थंड आणि चविष्ट. तिथे तर फ्रीजचीपण गरज नव्हती खरंतर. पण, तुम्हीच हट्टानं आम्हाला घ्यायला लावलात आणि आता मला शिकवतेय.“
पुढे रुमानीकडून काय ऐकायला मिळेल ह्या विचाराने रमाला हसायला येत होते.
“बरं बरं. माऊ, ही आजी ना छान छान गोष्टी सांगते मोबाईलमध्ये बघून. पण, आज येताना ती चष्मा गावाला विसरली आहे. आता चष्मा आणायला पुन्हा गावाला कशाला पाठवायचं तिला? गाणी येतात तिला छान छान. तू तिच्याकडून गाणीच शिक हं.” रुमानी आईला-रमाला बोलायची एक संधी सोडत नव्हती.
आपण रुमानीला जे काही शिकवतो, तिला जे त्यातले पटते किंवा खटकते सारेच तिच्या ह्या बाहुलीच्या खेळातून रमाला समजत होते. रमानेही तितक्याच खिलाडूवृत्तीने ते आजीपण निभावले आणि रुमानीसाठी, तिच्या माऊसाठी एक रुमानीचे अत्यंत आवडीचे गाणेही म्हटले. आता रमाच्या मांडीत तिची आणि तिच्या माऊची माऊ होती.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link