Next
मराठी वाङ्मयेतिहासाचे कोश
निरंजन घाटे
Friday, May 31 | 02:00 PM
15 0 0
Share this story

महाराष्ट्र साहित्य परिषदेनं मराठी वाङ्मयेतिहासाच्या कोशाचे सात खंड छापले आहेत. त्या कोशाची बहुतेकांना, विशेषत: ज्यांना मराठी भाषेच्या अभ्यासात रस आहे अशा अभ्यासकांना माहिती असते. त्याही पलीकडे जाऊन काहींना दाते-कर्वे या कोशाची आठवण होईल, पण मराठी वाङ्मयाचा इतिहास या विषयाचे आणखी दोन कोश आहेत याची फारच थोड्यांना माहिती आहे. हे साधारणपणे एकाच कालखंडात लिहिले गेले आहेत. यातला मराठी कोश १९३७ सालचा, तर इंग्रजी १९३९ सालचा आहे. मराठी ग्रंथाचं नाव ‘मराठी साहित्य समालोचन १८१८-१९३४’ असं आहे. तो वि. सी. सरवटे यांनी सी. ना. गवारीकर यांच्या साहाय्यानं रचला. सरवटे इंदूरच्या साहित्यसभेचे अध्यक्ष, तर गवारीकर सदस्य होते.

इसवी सन १९३५ मध्ये मराठी साहित्यसंमेलन इंदूर येथे भरवण्यात आलं. ते विसावं साहित्यसंमेलन होतं, मात्र ते वर्ष मराठी साहित्यसंमेलनाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष होतं, असं सरवटे म्हणतात. या प्रसंगी स्वागत समितीनं दोन ग्रंथ प्रकाशित करावेत, असं आयोजन समितीस वाटलं. हे दोन ग्रंथ म्हणजे ‘मराठी साहित्य समालोचन’ आणि ‘मध्य भारतीय मराठी वाङ्मय.’ साहित्य समालोचन या ग्रंथाचं काम सुप्रसिद्ध वकील, वक्ते, लेखक, प्रमुख सार्वजनिक कार्यकर्ते वि. सी. सरवटे यांच्यावर सोवण्यात आलं होतं.

या ग्रंथाचे तीन भाग आहेत. पहिल्या भागात १८१८ पर्यंतच्या मराठी साहित्याच्या आढावा घेण्यात आला आहे. मराठी भाषेची उत्पत्ती या इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मताचा आधार घेऊन केलेल्या विवेचनानं पहिल्या खंडाची सुरुवात होते. मग मराठीतील आद्यग्रंथ रचनेचा आढावा घेण्यात आला आहे. महानुभाव कवींच्या ग्रंथरचनेनंतर भास्कर कविश्वर- दामोदर पंडित यांच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर १२६८ ते १८१८ पर्यंतच्या काळाचे तीन विभाग पाडलेले आहेत. ज्ञानेश्वर-तुकाराम, वामन-मोरोपंत आणि राम जोशी-परशुराम अर्थात संत-पंत आणि तंत वाङ्मय असे हे तीन विभाग आहेत.

यातल्या एकनाथांच्या कार्याची कल्पना येण्यासाठी त्यावेळची परिस्थिती कशी होती याचं विस्तृत वर्णन सरवटे यांनी केलं आहे. नाथांनी अवघ्या पंचविसाव्या वर्षी भागवताच्या एकादश ग्रंथावरील टीका काशी येथे पूर्ण केली. नाथांचं हे कृत्य अचाट होतं, असं सरवटे म्हणतात. मूळ संस्कृत भागवत ग्रंथ अतिकठीण, त्यातल्या एकादश स्कंधात भगवान श्रीकृष्णांनी निर्वाण प्रसंगी उद्धवाला जो उपदेश केला होता तो या स्कंधात असल्यामुळे तो परमवंद्य मानला जातो. अशा या स्कंधावर टीका करण्यासाठी गाढ विद्वत्ता आणि अध्यात्मशास्त्रात अधिकार हे आवश्यक होतेच, त्याशिवाय कोणत्याही शास्त्राची भाषा म्हणजे संस्कृतच असा त्या काळात दंडकच होता. नाथांच्या मराठी टीकेची वार्ता काशीतल्या पंडितांना समजली तेव्हा त्यांनी नाथांवर बहिष्कार टाकायचं ठरवलं. आपल्याला वाळीत टाकायचा निर्णय समजल्यावर ते पैठणहून काशीस गेले. तिथे त्यांनी पंडितांच्या सभेत आपली टीका वाचून दाखवली. ते ऐकून पंडितसभेनं नाथांच्या ग्रंथाची पालखीतून मिरवणूक काढली. नाथांच्या मराठी भाषेचा हा विजय होता. त्यामुळेच ते ठामपणे म्हणू शकले,

संस्कृतवाणी देवे केली।
प्राकृत काय चोरापासून झाली।
असोतु या अभिमान भुली।
वृथां बोली काय काज॥

शाळांतून आम्हीच काय पण कुणीच हे शिकलं नसावं. ‘नाथांची हिंदू-तुर्क’ संवाद ही माहितीही मला मजेशीर वाटते. आजच्या परिस्थितीत तर शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये ती समाविष्ट करायलाच हवी. एक ब्राह्मण अधिक एक तुर्क यांच्यातला हा संवाद नाथांनी त्या काळात लिहिला, हे विशेष. दोघंही आपापल्या धर्माची महती अनेकांना ऐकवत असताना त्यांच्या लक्षात येतं की धर्मांच्या विचारात फरक असा काहीच नाही, आपण उगीचच भांडत आहोत. मग-

ते वेळी केले नमन।
येरे आदरे दिधले आलिंगन॥
दोघांसी जाहले समाधान।
आनंदे संपूर्ण निवाले।
असं नाथ म्हणतात.

याच्या पुढच्या काळास या ग्रंथात वामन-मोरोपंतांचा काळ म्हटलं आहे. हा साधारणपणे इसवी सन १६५० ते १८०० दरम्यानचा काळ. खरं तर याची सुरुवात रामदासांनी व्हायला हवी, पण त्या मानानं ज्यांची नावं या कालखंडास दिली आहेत त्यांची ग्रंथसंख्या विपुल असल्यामुळे त्या कालखंडास वामन-मोरोपंतांचं नाव दिलं असं सरवटे म्हणतात.

वामन मोरोपंतांच्या काळातच शाहिरी संप्रदाय उदयास येऊ लागला. या शाहिरांनी मराठीला प्रथम पोवाड्याची देणगी दिली. हे पोवाडे इसवी सन १६५९ पूर्वीही लोकप्रिय होते; असं दिसतं, असं सांगून १६५९ सालच्या अग्निदासरचित पोवाड्याचं उदाहरण सरवटे देतात. त्यानंतर ते एक अत्यंत महत्त्वाची माहिती देतात. ही माहिती मला तरी फारच महत्त्वाची वाटते. ‘हल्ली उपलब्ध असलेले बहुतेक पोवाडे कै. शंकर तुकाराम शालिग्राम यांनी स्वत:च्या प्राचीन वाङ्मयप्रेमाने व मुंबइचे तत्कालीन म्युनिसिपल कमिशनर ऑक्वर्थसाहेबांच्या साहाय्याने गोळा करून छापविले. या दोघांचे महाराष्ट्राने सदैव ऋणी राहिले पाहिजे. यांनी जर त्यावेळी हा उद्योग केला नसता, तर पुष्कळ पोवाड्यांना महाराष्ट्र कायमचा मुकला असता.’ यानंतर त्यांनी घेतलेला शाहिरी वाङ्मयाचा आढावा तर केवळ अप्रतिम आहे. शाहिरी वाङ्मयाबरोबर या ग्रंथाचा पहिला भाग संपतो.

दुसरा भागही तसा छोटासा आहे. त्याचा कालखंड इसवी सन १८१८ ते १८८५ एवढाच आहे. खरं तर सरवटे यांनी या कालखंडाची मर्यादा स्पष्ट केली असली तरीही ते स्वत: ती पाळत नाहीत, त्यामुळे अर्थातच आपला फायदा होतो. सुरुवातीला मॅकॉले, शिक्षणावर ईस्ट इंडिया कंपनी करत असलेला खर्च, छापखाने वगैरे माहिती दिलेली आहे. त्यानंतर या काळातील नियतकालिकं, ख्रिस्ती मंडळींची ग्रंथरचना, इतर ग्रंथरचना, हे सांगता वेळोवेळी मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या फारसी शब्दांचं प्रमाण, संतवाङ्मयामुळे फारसी हटाव कसं साध्य झालं, महाराजांचा राजकोश-राजव्यवहारकोश वगैरे अनेक बाबींचं इथे अभ्यासपूर्ण विवेचन आढळतं. इसवी सन १६२८ ते १७२८ च्या दरम्यान निरनिराळ्या काळातील मराठीतील फारसी शब्दांचं प्रमाण, हा भाग तर खूपच अभ्यास करून लिहिलेला आहे. अशा तऱ्हेचा अभ्यास इतर कुणी केल्याचं अजूनतरी पाहण्यात आलेलं नाही. या अभ्यासाचा एक विशेष म्हणजे शहरात-खेड्यात, सुशिक्षित-अशिक्षितांच्या बोलण्यात-लिहिण्यात, या शब्दांच्या वापराच्या प्रमाणातला बदल. हा अशा प्रकारचा अभ्यास एका इंदूरच्या विद्वानानं करावा आणि तो आपल्याला माहीत असू नये, हे खरोखरच अयोग्य वाटतं. आजकालचे जे प्रबंध वाचायला मिळतात, त्यामध्ये- काही अपवाद आहेत, पण त्यांचं प्रमाण खूप कमीच- एवढा सखोल अभ्यास असता तर मायमराठीच्या भवितव्याची काळजी करायचं कारण उरलं नसतं. अभ्यास विषयावर खरं प्रेम आणि निष्ठा असेल तरच असा अभ्यास होऊ शकतो. या भागाचा शेवट गद्य ग्रंथांच्या वाढीची कारणं आणि गद्याचे प्रकार यांचा विचार करत होतो, पण त्यापूर्वी त्या काळातील पद्यवाङ्मयाचाही सखोल अभ्यास आढळून येतो.

या भागाचा आणखी एक विशेष म्हणजे त्या काळातील शास्त्रीय वाङ्मयाचा घेतलेला आढावा. हा विज्ञानेतिहासाच्या अभ्यासकास अतिशय उपयुक्त ठरतो.

दुसरा खंड हा सुमारे ३०० पानांचा आहे. हा या साहित्य समालोचनाचा तिसरा भाग. तो माहितीनं इतका ठासून भरलेला आहे, की आजकालच्या सुमारे १० मराठी प्रबंधांना ही माहिती उपयुक्त ठरेल. याच्या पद्यविभागात त्या काळातील झाडून बहुतेक सर्व कवींची माहिती दिलेली आहे. या पद्यविभागात विडंबनावरचं प्रकरण अतिशय अभ्यासपूर्ण असून मराठी विडंबनाचा प्रकार प्रथम ‘संगीत हजामत’ या सन १८८२ च्या नाटकामध्ये आढळतो. त्या नाटकात अण्णासाहेबांच्या सौभद्रादी नाटकांतील संगीताचं विडंबन आहे. ‘अरसिक किती हा मेला’ ‘वस्त्र्याने केश सारे न्हाव्याने ताशिले’ (वस्त्रानं देह सारा झाकला) अशी उदाहरणं दिली आहेत. त्यानंतर अत्र्यांच्या विडंबन काव्यावरचं टिपण आहे. ‘विडंबन यशस्वी करण्यासाठी चांगली कल्पनाशक्ती, एक विशिष्ट प्रकारची काव्यस्फूर्ती लागते. विडंबनानंतर रविकिरण मंडळाची सविस्तर माहिती आहे. अखेरीस, १९२४ ते १९३४ या काळात प्रसिद्ध झालेल्या सर्व पद्यग्रंथांची संख्या १००९ तर एकंदर प्रकाशित ग्रंथसंख्या ५२३७ आहे, म्हणजे पद्यग्रंथांचं प्रमाण १९.२ टक्के एवढं आहे, हे सांगितलं आहे.

अशाच प्रकारे गोष्टी व लघुकथा, कादंबरी, नाटकं यांच्याविषयीचा ऊहापोह केलेला आढळतो. या ग्रंथाचा विशेष म्हणजे त्याचं परिशिष्ट. मुंबई सरकारच्या त्रैमासिक याद्यांवरून १८१८ ते १९१७ पर्यंत प्रकाशित झालेल्या ग्रंथांची संख्या त्यात दिली आहेच, शिवाय १९२४ ते १९३४ सालअखेरीस एकूण २७ विषयांवरील किती ग्रंथ दरवर्षी प्रसिद्ध झाले, त्यातले सामान्य वाचकांसाठी किती आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी किती याची आकडेवारी दिली आहे. त्यावरून महाराष्ट्रात त्या काळातही कवितांचं आणि काव्यसंग्रहांचे वैपुल्य होतं, ही बाब लक्षात येते. त्यापेक्षा अर्थातच धार्मिक ग्रंथ जास्त आहेत. मराठी साहित्याच्या अभ्यासकांच्या दृष्टीनं हा साडेचारशेहून थोड्या अधिक पृष्ठांचा कोश निश्चितच उपयुक्त ठरेल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link