Next
वायुकोश सक्षम करणारी आसने
वृंदा प्रभुतेंडुलकर
Friday, May 10 | 03:00 PM
15 0 0
Share this story

आपल्या श्वसनसंस्थेचा अतिशय महत्त्वाचा घटक ‘वायुकोष’ म्हणजे हवेच्या अतिसूक्ष्म पिशव्या, या श्वासनलिकांच्या उपशाखांना द्राक्षाच्या घडांप्रमाणे लगडलेल्या असतात. श्वासावाटे आलेल्या हवेतून ऑक्सिजन काढून घेऊन तो रक्तात मिसळणे तसेच रक्तातील कार्बन-डाय-ऑक्साइड बाहेर काढून टाकणे, ही महत्त्वाची कार्ये वायुकोषांद्वारे केली जातात. प्रदूषण, धूम्रपान, कामाचे स्वरूप, विशिष्ट घटकांची शरीरातील कमतरता, काही आजार, जंतुसंसर्ग अशा कारणांमुळे वायुकोषांची कार्यक्षमता कमी होते. लवकर थकवा येणे, वारंवार सर्दी, श्वासाचा त्रास अशी लक्षणे दिसू लागतात. अपुऱ्या श्वसनाचा दुष्परिणाम हळूहळू संपूर्ण आरोग्यावर होत असतो. यावर इलाज म्हणून श्वसनाच्या बसून करण्याच्या क्रियांप्रमाणे काही आसनेही उपयुक्त ठरतात. मत्स्यासन आणि कंधरासन ही दोन आसने बंद पडलेले अकार्यक्षम वायुकोष उघडण्याबरोबरच पाठीचा कणा, मान, खांदे, शीर्षस्थ व प्रजननग्रंथी या सर्वांची आरोग्यरक्षा करतात.

मत्स्यासन (कालावधी १ मिनिट)

कृती
 पाठीवर झोपून पद्मासन घालावे. दोन्ही हातांचे तळवे दोन्ही खांद्यांजवळ ठेवावेत. हातांची बोटे पायांच्या दिशेला असावीत.
    कंबरेपासून डोक्यापर्यंतचा भाग वर उचलून डोक्याचा मधला भाग (टाळू) जमिनीवर लावून घ्यावा.
     दोन्ही हातांनी पायांचे अंगठे पकडून, कोपरे जमिनीला टेकवून कोपरांच्या साहाय्याने छातीचा भाग संपूर्ण वर उचलावा. (पूर्णस्थिती)
    दोन्ही हात पुन्हा खांद्यांजवळ ठेवून डोके उचलावे व पूर्वस्थितीत नेऊन पद्मासन सोडावे. (विश्राम)

सूचना
     तोंड नेहमी बंद ठेवावे.
    सुरुवातीस पायांचे अंगठे पकडणे शक्य होत नसल्यास दोन्ही हातांचे तळवे ओटीपोटावर ठेवावेत.
    दोन्ही पायांचे गुडघे जमिनीला स्पर्श करून राहतील, वर उचलले जाणार नाहीत असा प्रयत्न करावा.
    पद्मासन घालता येत नसेल तर अर्धपद्मासन किंवा सुखासन (मांडी) घालूनही मत्स्यासन करता येते. अशावेळी हातांचे तळवे ओटीपोटावर ठेवावेत.
    छातीचा भाग वर उचलून घेणे व डोक्याचा मधला भाग जमिनीस लावणे हे सर्वात महत्त्वाचे समजावे.
    हे आसन सर्वांगासनास पूरक आहे.

विशेष सूचना
    मानेचे, पाठीचे व मणक्यांचे विकार, मायग्रेन, व्हर्टिगो, कानांचे विकार असलेल्या साधकांनी हे आसन करू नये.

लाभ
    थायरॉइड-पॅराथायरॉइडग्रंथी कार्यक्षम बनतात. त्यामुळे घशाचा संसर्ग, मलेरिया, टॉन्सिल्स, टायफॉईड इत्यादी विकारांचा प्रतिबंध केला जातो.
    चेहरा, मस्तिष्क, शीर्षस्थ ग्रंथींना होणारा रक्तपुरवठा वाढतो. शीर्षस्थ (पिनिअल व पिट्युटरी) ग्रंथींचे स्राव नियंत्रित होतात.
    चेहरा तजेलदार बनतो, केसांची गळती कमी होते.
    पाठीच्या कण्याचा वरचा भाग लवचीक होण्यास मदत होते.
    प्रजननग्रंथी क्रियाशील होऊन वीर्य दुर्बलता दूर होते.
    मत्स्यासनाच्या पूर्णस्थितीमध्ये कपालभाती व उज्जायी केल्यास कफविकार, दमा, श्वसनविकार, फुप्फुसांची दुर्बलता इत्यादी व्याधी दूर होऊन अधिकाधिक वायुकोष उघडले जातात.
क्षयासारख्या विकारांवरही उपयुक्त ठरते.
मानेचे व खांद्यांचे स्नायू बळकट होतात.


कंधरासन (कालावधी १ मिनिट)

कृती
    दोन्ही पायांचे तळवे कंबरेजवळ जमिनीवर लावावे. दोन्ही पायांच्या तळव्यांमध्ये एक फुटाचे अंतर ठेवावे. दोन्ही हातांनी पायांचे घोटे घट्ट पकडावेत.
    खांदे व पायांचे तळवे जमिनीवर टेकलेले ठेवून पोट व कंबरेचा भाग पूर्णपणे वर उचलावा.
    पायांच्या टाचा वर उचलाव्यात. (पूर्णस्थिती)
    प्रथम पायाच्या टाचा जमिनीवर ठेवून नंतर कंबरेचा भाग हळूहळू खाली आणावा. पाय सरळ सोडावे. (विश्राम)

सूचना
    पायांचे घोटे पकडताना हातांची बोटे एका बाजूला व अंगठा दुसऱ्या बाजूला ठेवून मजबूत पकड घ्यावी.
    एकच्या स्थितीत दोन्ही पायांना कंबरेच्या जास्तीत जास्त जवळ आणावे.
    पोटाचा भाग इतका वर उचलावा, की हनुवटीचा स्पर्श छातीस होईल.
    खांदे वर उचलले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
 
विशेष सूचना
    मानेचे, पाठीचे व मणक्यांचे विकार, मायग्रेन, व्हर्टिगो असलेल्यांनी हे आसन करू नये.

लाभ
    पाठीचा कणा लवचीक बनतो. खांदे, दंड व पायांचे स्नायू मजबूत बनतात.
    अतिश्रमामुळे होणारी पाठ व कंबरदुखी यावर हे आसन उपयुक्त ठरते.
    ओटीपोटाच्या भागावर दबाव व खिंचाव एकत्रितरीत्या दिला जातो. त्यामुळे तेथील नाड्यांची शुद्धी केली जाऊन प्रजननग्रंथी कार्यक्षम होतात.
    छातीचा भाग फुलवला जातो, त्यामुळे फुप्फुसांच्या सर्व भागांत शुद्ध हवा भरली जाते. अधिकाधिक वायुकोष उघडले जातात.
    चेहरा व  मस्तिष्क यांना होणारा रक्तपुरवठा वाढतो.
    शीर्षस्थ ग्रंथींचे स्राव नियंत्रित होऊन शरीराच्या वरच्या भागातील सर्व इंद्रिये कार्यक्षम होण्यास मदत होते.
    नाभी सरकण्याच्या विकारावर उपयुक्त ठरते.
    गर्भाशयाशी संबंधित विकारांवर चांगला परिणाम होतो.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link