Next
ऑस्ट्रेलियाच्या संघाची दयनीय अवस्था
नितीन मुजुमदार
Friday, January 11 | 03:00 PM
15 0 0
Share this story

एकेकाळी जागतिक क्रिकेटवर राज्य करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या दयनीय अवस्थेत असून मोठ्या संक्रमणातून जात आहे. क्रिकेटजगतात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सर्वाधिक आक्रमक म्हणून ओळखले जातात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या आक्रमकतेला उद्दामपणाचे कवचही लागलेले दिसत आहे. भरीसभर म्हणून बदमाशीतही हे मागे नाहीत. याचीच परिणती स्मिथ आणि वॉर्नर यांच्या वर्षभर घरी बसण्यात झाली. हे दोघे संघात असते तरीही कदाचित ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची ही मालिका गमावली असती, कारण त्यांना एक-दोन नव्हे तर अनेक ठिकाणी ठिगळे पडली आहेत. स्मिथ-वॉर्नर असते तर वगैरे म्हणण्याला आता खरे तर काही अर्थ नाही. आपलाही पृथ्वी शॉ अगदी तयारीचा गडी, पण त्यालाही ऐन भरात असतानाच नाइलाजाने का होईना बाहेर बसावे लागलेच ना!
सध्या आशियातील क्रिकेटसंघांची कामगिरी जोखण्यात येते ती प्रामुख्याने सेना (SENA) देशांमधील कामगिरीने. SENA म्हणजे साऊथ आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे आशिया खंडाबाहेरील प्रमुख देश. आशिया खंडातील खेळपट्ट्या म्हणजे भारत, पाकिस्तान, श्रीलंका व बांगलादेश या देशांतील खेळपट्ट्या! येथील खेळपट्ट्या व हवामान साधारण सारखेच. त्यामुळे या देशांच्या सेना देशांमधील कामगिरीवरून त्यांचे मूल्यमापन केले जाते. भारतीय संघाने २०१८मध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या तीन सेना देशांचे दौरे केले. तीनही दौऱ्यांमध्ये भारताची कामगिरी चढत्या क्रमाने उंचावत गेलेली दिसते. दक्षिण आफ्रिकेत आपल्याला पराभव स्वीकारावा लागला, पण तेथे आपण एक कसोटी जिंकलो. ही कामगिरीही चांगली होती. नंतर इंग्लंडमध्येही आपण एक कसोटी जिंकलो व गमावलेल्या कसोटींमध्ये मार्जिन खूप नव्हते. अगदी थोडी कामगिरी उंचावली असती तर मालिकेच्या निकालात ते स्पष्ट दिसले असते. ऑस्ट्रेलियादौऱ्यात तर कोहलीच्या संघाने गावस्कर-बॉर्डर ट्रॉफी आपल्याकडे राखली तीही कांगारूंना त्यांच्याच देशात चारी मुंड्या चीत करून!
या ऐतिहासिक मालिकेतून भारताला काय मिळाले आणि कोठल्या कमकुवत बाजू आहेत याचे विचारमंथनही व्हायला हवे. सलामीच्या जोडीचा प्रश्न नव्याने उभा राहिला आहे. मात्र पृथ्वी शॉ फिट झाल्यावर मयांक अगरवालशी त्याची छान जोडी जमू शकते. यापूर्वी ते एकत्र खेळले आहेत आणि त्यांनी एकत्र चांगले रिझल्टही दिले आहेत. राहुल आणि विजयसाठी मात्र आता परिस्थिती फार अवघड आहे. मिडल ऑर्डरला क्रमांक तीन व चारसाठी चर्चाही होऊ शकत नाही. त्या जागांवर पुजारा व कोहली प्रदीर्घ काळासाठी नियुक्त असतील! ही मालिका कोहली, पुजारा आणि आपले गोलंदाज यांच्यासाठी प्रामुख्याने लक्षात राहील. अजिंक्य रहाणेने मालिकेत खूप मोठ्या संधी गमावल्या. संघात आपली जागा पक्की करण्यासाठी त्याला हा एक मोठा प्लॅटफॉर्म होता. तरीही पुढच्या कसोटी मालिकेत पुन्हा संधी मिळेल इतपत चांगली कामगिरी त्याने नक्कीच केली आहे. रिषभ पंत ही या मालिकेतील सर्वात मोठी उपलब्धी. भले या आधी तो दोन कसोटी मालिका खेळला असेल, परंतु त्याच्या स्थानाची निश्चिती या मालिकेतील कामगिरीमुळेच झाली आहे. अर्थात त्याचे यष्टीरक्षण हा काहीसा काळजीचा विषय म्हणावा लागेल. रिषभ पंतचे वय लहान आहे, अनुभवाने त्याच्या विकेटमागील कामगिरीत नक्कीच सुधारणा होईल. सध्याही त्याचे यष्टीरक्षण ठीक म्हणता येईल. कर्णधार व यष्टीरक्षक पेनशी त्याची शाब्दिक जुगलबंदी दीर्घकाळ स्मरणात राहील! भारतीय क्रिकेटपटूंची ही नवी पिढी जागतिक स्तरावर सर्वच आघाड्यांवर तोडीस तोड दिसत आहे!
या मालिकेतील सुपरस्टार निःसंशय चेतेश्वर पुजारा आहे. काही महिन्यांपूर्वी इंग्लंडमध्ये कसोटी संघातून वगळला गेलेला पुजारा आज भारताच्या कसोटी संघासाठी अपरिहार्य खेळाडू आहे! काही महिन्यांपूर्वी त्याचा स्ट्राइक रेट हा चर्चेचा आणि चेष्टेचा विषय होता. आज त्याचा स्ट्राइक रेट चर्चेचा आणि कौतुकाचा विषय आहे. आयपीएलला हा योग्य नाही असा शिक्का मारून त्याला कोणताही आयपीएल संघ घेण्यास तयार नाही. एका अर्थाने भारतीय कसोटी संघाचा हा फायदा आहे! निदान एक तरी खेळाडू संघात असा हवाच!
मागील महिन्यात चेतेश्वरच्या वडिलांशी बोलण्याची संधी मिळाली. त्याचे वडील अरविंद पुजारा हे त्याचे कोचही! ते स्वतः सौराष्ट्राकडून रणजी करंडक खेळले आहेत. चेतेश्वरचे काका बिपीन पुजाराही रणजीपटू. चेतेश्वरचे आजोबा जुन्या काळात संस्थानाकडून क्रिकेट खेळत असत. चेतेश्वर लहानाचा मोठा झाला राजकोटमध्ये, वडील अरविंद पुजारा रेल्वेमध्ये इंजिनीयरिंग विभागातून निवृत्त झालेले. त्याच्या खेळातील एकाग्रतेबद्दल ते म्हणाले, “हा वारसा त्याला त्याच्या आईकडून मिळाला.” त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर “चेतेश्वरकडे आहे बॅलन्स ऑफ माईंड, जे कुठल्याही पुस्तकात बघून शिकता येत नाही ना कुठल्या विद्यापीठात शिकता येते. जीवनात कुठलीही गोष्ट यशस्वीरीत्या करण्यासाठी बॅलन्स ऑफ माईंड पाहिजेच.”
या मालिकेत भारताला गवसलेला आणखी एक हिरा म्हणजे जसप्रीत बुमराह. त्याला आगामी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकांसाठी विश्रांती देण्याचा व्यवस्थापनाचा निर्णय अगदी योग्य आहे, असे म्हणावे लागेल. जलदगती गोलंदाजांबाबत हा बर्नआऊटचा धोका मोठा असतो. बुमराह हा जलदगती गोलंदज असल्यामुळे पुरवून पुरवून वापरला तर त्याची जास्त परिणाकारकता दिसेल. क्रिकेटच्या इतर फॉरमॅटपेक्षा जलदगती गोलंदाजांना कसोटीत खूप जास्त ऊर्जा खर्च करावी लागते, त्यात तुम्ही जर संघाचे मुख्य गोलंदाज असाल तर अपेक्षाही अधिक असतात. त्यामुळे आगामी काळात जसप्रीत बुमराह हा ‘हँडल विथ केअर’ उक्तीनुसार वापरावा लागणार आहे. त्यामुळे तो आगामी एकदिवसीय मालिकेत नाही हे चांगलेच. अर्थात नंतर आयपीएलमध्ये पुन्हा फिटनेसची कसोटी आहेच! वर्ल्डकपस्पर्धा आता सहा महिन्यांवरच आहे, हे पण लक्षात घ्यावयास हवे. रवींद्र जाडेजाही फार काळ दुर्लक्षित ठेवून चालणार नाही. त्यानेही आपल्या कामगिरीने योग्य तो मेसेज संघव्यवस्थापनाला दिला आहे. त्यामुळे १०० टक्के विजयी आत्मविश्वास असलेला विराट कोहलीचा संघ आता येत्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कशी कामगिरी करेल, हे पाहावे लागले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link