
रंगपंचमी, होळी, वसंतपंचमी अशा सणांना आपण रंगांत रंगून जातो. आपण आज शब्दांची, गप्पांची रंगपंचमी खेळूया.
आधी आपण प्रत्येकाला त्याचा त्याचा रंग सांगणार आहोत. तुम्ही जर १५-१६ जण असाल तर ४-४ मुलांचा एक गट करा. एकजण लीडर होईल. गट करताना चारच रंग सांगायचे आहेत. एरवी गोलात बसून आपण आधी १ ते ४ अंक मोजत जातोे. मग १ आकडा म्हणलेल्यांचा एक गट, २चा एक गट, ३ चा एक गट, ४ चा एक गट असे ४ गट होतात. आज आपण याच पद्धतीनं अंकांऐवजी ४ रंग घेऊन गट करणार आहोत. उदाहरणार्थ, गोलात बसल्यावर लाल, पांढरा, हिरवा, निळा अशी नावं घेत जायची. लाल ज्यांचा रंग आलाय त्यांचा एक गट. दुसरा गट पांढरा.. असे ४ गट. मग सगळेजण गोल मोडतील. आणि पुन्हा कोणतंही बंधन न ठेवता पळतील. काही वेळानं जो गट प्रमुख असेल तो आज्ञा करेल- ‘गटात एकत्र या.’ किंवा ‘गट करा पळा पळा, गट करा लाल पांढरा हिरवा निळा. चार जणांचा एक गट उभा राहील कोपऱ्याकोपऱ्यात. या जागा त्या रंगांच्या ठरतील. मग गटप्रमुख सांगेल हिरवा रंग लाल होईल, लाल रंग पांढरा होईल. पांढरा रंग निळा होईल, लाल रंग हिरवा होईल. आता मुलं तसे कोपरे बदलतील. ‘समोरासमोर’ म्हटल्यावर निळा हिरव्याच्याजागी जाईल. हिरवा गट निळ्याच्या जागी जाईल. तसा बदल लाल-पांढऱ्यात होईल. हा खेळ भराभरा खेळायचा आहे. म्हणजे गट बदलण्यात मजा येते. सूचना लक्षात घेऊन त्या पटापट अमलात आणताना मजा येते.