Next
भावनाप्रधान हत्ती
आनंद शिंदे
Friday, August 02 | 03:00 PM
15 0 0
Share this story


हत्तींच्या भावनादेखील तीव्र असतात. माणूस म्हणून आपण या भावना समजून घेऊ, तेव्हा त्यांच्याबरोबरचा माणसाचा तंटा कमी होईल. आंध्र प्रदेशातील एक बातमी सध्या गाजत आहे. पालमनेरजवळ गोबील्ला कोटूर हे गाव आहे. ही जागा ‘कौडिण्या वाइल्डलाइफ सॅन्चुरी’पासून ६० किलोमीटरच्या आसपास आहे. तेथे एका शेतात असलेल्या विजेच्या ट्रान्सफाॅर्मरजवळ हत्तिणीचे पिल्लू गेले आणि विजेचा धक्का बसून जागीच गेले. आपल्या पिल्लाच्या जाण्याचा धक्का या माऊलीला बसला आणि खूप संताप आला. या रागाच्या भरात तिने तो ट्रान्सफाॅर्मर पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकला. अगदी समूळ उपटून टाकला. हे करताना आपल्याला काही धोका पोचेल, इतकाही विचार केला नाही त्या मातेने. ज्या गोष्टीमुळे तिचे पिल्लू गेले ती गोष्टच संपवून टाकण्याची भावना अशी व्यक्त केली तिने!

जंगलातून जाताना एखादा हत्ती मरण पावला तर कळप सहसा आपल्या परीने  तो देह झाकण्याचा प्रयत्न करताना दिसतो. कालांतराने फिरत असताना तो कळप त्याच जागी आला तर आपल्या त्या सहकाऱ्याच्या आठवणीत तो दिवस तेथे घालवतो आणि दुसऱ्या दिवशी पुढे जातो. त्या हत्तीची हाडे त्या ठिकाणी असतील, तर ती आपल्या सोंडेत धरून कुरवाळतात आणि आपल्या भावना, प्रेम व्यक्त करतात. 

काही वेळा पिल्लाच्या धसमुसळेपणामुळे ते धडपडते आणि त्याचा पाय दुखावतो. अशा वेळी पिल्लाची आई आणि पिल्लाच्या काळजीमुळे अख्खा कळप ठरावीक अंतर पुढे जाऊन त्या पिल्लासाठी थांबतो. पिल्लू जन्माला येते, तेव्हा त्याला आईच्या दुधाची प्रचंड गरज असते. त्यासाठी आईने भरपूर खाणे गरजेचे असते. अशा वेळी अख्खा कळप त्या पिल्लाला सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारतो आणि आईला खायला वेळ दिला जातो. काही अनुभव तर फार वेगळे आणि गोड असतात. पिल्लू जन्माला येते आणि आईला दूध येत नाही, तेव्हा कळपातील प्रमुख मादीपासून सगळ्या माद्या पिल्लाला दूध पाजण्याची जबादारी स्वीकारतात. आपल्या कळपातील नवीन पिल्लाबद्दल जी भावना येथे दिसते, ती फार नितळ आणि स्वच्छ असते.

मध्यंतरी वायनाडजवळच्या मुथंगाच्या जंगलात अगदीच लहान, एक महिन्याचे,  पिल्लू आले होते. हरवलेपणाची भावना त्याच्या हालचालींत दिसत होती, पण तरीही पिंजऱ्यातील अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन ते आईचे आचळ शोधायचे. पिल्लू आईचे दूध पिते तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर अंधार येतो. म्हणून तो अंधारकोपरा म्हणजे आई, असे वाटून तेथे धावायचे आणि दूध नाही मिळाले तर हताश व्हायचे. पिल्लू आईपासून वेगळे होणे, हा दोघांवरही मोठा आघात असतो. पिल्लू आणि आई दोघेही त्या काळात अन्नपाणी वर्ज्य करतात. प्रमुख मादीला अशा कठीण काळात आईला खूप आधार द्यावा लागतो. आई खात नसेल तर प्रमुख मादी तिला चारा भरवतानाही बघायला मिळते. बऱ्याचदा पिल्लू आईवेगळे झाल्यावर जगण्याची इच्छा गमावून बसते. कृष्णा, गंगा, राजा, राणी, सुंदरी, अगस्त्यन, उन्नीकृष्णन, लक्ष्मी, किंग अशा अनेक पिल्लांची आई होऊन त्यांना जगायला तयार करताना मी अक्षरश: त्यांची आई होऊन जगलो. यात राजा पिल्लाचे वागणे फार बोलके होते. तो पहिल्यांदा फक्त माझ्याकडे बघत राहिला, पण जवळ आला तेव्हा माझा हात सोंडेत पकडून त्याने स्वत:च्या तोंडात घातला आणि चोखायला लागला. हात चोखताना तो अचानक रडू लागला आणि मी लांब होऊ लागलो तेव्हा मला परत जवळ खेचू लागला. या वागण्यात त्याची हरवलेपणाची आणि आपले कोणीतरी सापडल्याची भावना सहज कळत होती. 

नुकत्याच एका भेटीदरम्यान मी सुनीता आणि मीना या हत्तिणींना दीड वर्षाने भेटलो. सुनीता माझ्यासमोर येताच मी तिच्या सोंडेच्या वरच्या भागात डोके टेकून डोळे मिटले. तिनेही प्रेमळ भावनेने डोळे मिटून घेत तिचे प्रेम व्यक्त केले. 

मीनाचा माहूत बदलला होता. नवा माहूत मला ओळखत नव्हता, म्हणून तो  मला मीनाच्या जवळ जाऊ देईना. मी वाद न घालता दूर गेलो. काही क्षणांतच माहुताला न जुमानता मीना त्याला घेऊनच माझ्याजवळ आली आणि तोंडाने चक् चक् आवाज करत मी आल्याचा आनंद व्यक्त करत सोंड माझ्या हातामध्ये देऊन तेथेच उभी राहिली.

लॉरेन्स अॅन्थनीच्या बाबत घडलेल्या गोष्टीने विज्ञान आणि संशोधकांना आजही बुचकळ्यात टाकले आहे. लॉरेन्स हा जगातील पहिला हत्तीसंवादक. त्याच्या मोठ्या जंगलप्रदेशात त्याने वाचवलेले हत्ती होते. ते वारला तेव्हा कित्येक मैल चालून ते जंगली हत्ती त्याच्या घराबाहेर आले. त्यांनी कोणाला त्रास दिला नाही. लॉरेन्सची बायको फ्रॅक्वाइस घराबाहेर आली, तेव्हा त्या हत्तींनी आपली सोंड पुढे केली. तिने त्यांच्या सोंडेला स्पर्श करून त्यांनी तिचे केलेले सांत्वन स्वीकारले. तो दिवस तिच्या घराबाहेर थांबून दुसऱ्या दिवशी तो कळप निघून गेला. त्या कळपाने ३६५ दिवस मोजले आणि पुढच्या वर्षी त्याच तारखेला लॉरेन्सच्या घराबाहरे परत त्याच्या बायकोला भेटायला आला.ज्या लोकांना लॉरेन्सची घटना ही अतिशयोक्ती वाटते त्यांनी बीबीसीच्या साइटवर जाऊन ही बातमी जरूर बघावी. मी सुरुवातीला म्हटले त्याप्रमाणेच हत्तीच्या भावना या हत्तीइतक्याच मोठ्या असतात. त्या भावना समजून किंवा सामावून घ्यायला हत्तीइतकेच मोठे मन असावे लागते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link