Next
प्राचीन साहित्यात हत्ती
आनंद शिंदे
Friday, August 30 | 04:00 PM
15 0 0
Share this story


शाळेत असताना इतिहास या विषयानं जीव अर्धा केला. त्या काळात भविष्यात इतिहास बघणार नाही, असं विचित्र विधानही केलं होतं. परंतु हत्तींनी मला चांगलंच तोंडघशी पाडलं. हत्तीचा अभ्यास करताना मनात विचार आला की रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजीमहाराजांना विविध उपाध्या देऊन त्यांचं वर्णन केलं आहे. त्यात एक उपाधी होती, ‘गजपती.’ गजपती त्याला म्हटलं जात होतं जो एक हजार हत्तींचा स्वामी असतो. मग खोलात गेल्यावर सभासदांच्या बखरीचा एक उल्लेख एके ठिकाणी सापडला, ज्यात शिवरायांकडे १२०० हत्ती आहेत, असं म्हटलं होतं. तसंच रायगडावर जगदीश्वराच्या शिलालेखांवर हत्तीशाळांची निर्मिती केल्याचा उल्लेख तर गडावर हत्तीतलावाचा उल्लेख कळाला. या घटनेत इतिहासातल्या हत्तीनं चांगलंच डोकं वर काढलं.

शोधाशोध चालू असताना हातात कौटिल्याचं अर्थशास्त्र आलं, ज्यात हत्तींसाठी तीन अध्यायांत स्वतंत्र मांडणी तर दोन अध्यायांत स्वतंत्र उल्लेख आढळून आला. यातून विदेशाप्रमाणेच भारतातही हत्तीचा फार चांगला अभ्यास झाल्याचं लक्षात येतं. कौटिल्यानं तेविसाव्या अध्यायामध्ये हत्तीवनं कुठे आणि का असावीत हे सांगताना म्हटलंय, ‘उपयोगी जंगलाचे रक्षण होईल अशा बेताने सीमेवर हस्तीवन राखावे’ जेणेकरून हिंस्र पशू आणि माणूस यांच्यामध्ये हत्ती राहून दोघेही सुरक्षित होतील. याच अध्यायात त्यानं असं म्हटलंय की जे कोणी अनधिकृतपणे हत्तींची शिकार करतील अशा शिकाऱ्यांना देहदंडाची शिक्षा द्यावी. कौटिल्याच्या मते कलिंग अंग, चेदी, करुष हे त्या काळातील देशांमधील हत्ती सर्वात उत्तम हत्ती होत. तर दशार्ण व अपरान्त यातील हत्ती मध्यम आणि पंजाब व सौराष्ट्र इथले हत्ती कनिष्ठ मानावेत. असं सांगताना कौटिल्य असंही म्हणतो, की असं असलं तरी योग्य निगा आणि काळजी घेतली तर सर्वत्र हत्तींचा तेजस्वीपणा, वेग व पराक्रम वाढू शकतो.

कौटिल्यानं हत्तीचं वर्गीकरण करताना १६ नखी हत्ती, १८ नखी हत्ती आणि २० नखी हत्ती असंही केलेलं आहे. सोळा नखी हत्ती सामान्यपणे सर्वत्र सापडतो, तर १८ नखी हत्ती हा सापडण्यास कठीण. यापेक्षा दुर्मिळ म्हणजे २० नखी हत्ती. तो पटकन सापडत नाही. युद्धामध्ये केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या व्यूहरचनांमध्ये संपूर्ण हत्तींची अशी एकत्र रचना कौटिल्यानं सागितली आहे. त्याला शुद्ध व्यूहरचना असं म्हणतात. यात लढणारे हत्ती मध्यभागी, दोन्ही बगलांवर बसायचे हत्ती तर बिनीच्या टोकांवर दाडमर किंवा मदोन्मत्त हत्ती ठेवावेत. या रचनेचा भेद करणं हे हत्तींच्या ताकदीमुळे कठीण असतं.

फक्त हत्तीवर आधारित विविध ग्रंथरचना अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने मांडल्या गेलेल्या दिसतात. त्यात अग्रक्रमानं आसाममधील पुरातन ग्रंथ ‘हस्तिविद्यार्नव’, संस्कृतमधील नीलकंठाचे ‘मातंगतिलक’, पालकाप्य यांचा ‘हस्त्यायुर्वेद’ संभुनाथ यांचा ‘राजेंद्रचिंतामणी’ असे ग्रंथ आहेत. शके १६५६ म्हणजे इसवी सन १७३४ या काळात म्हणजेच पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात सुकुमार बारखत नावाच्या सद्गृहस्थांनी हस्तिविद्यार्नव हा ग्रंथ लिहिला असल्याचं समजतं. या ग्रंथात विविध प्रकारची चित्रं असून तो हस्तलिखितरूपात होता. यातील चित्रांची संख्या एकशे एकाहत्तर आहे. या ग्रंथामध्ये लेखकानं हत्तींसाठी प्रसिद्ध असे वेगवेगळे भूप्रदेश सांगितले आहेत. काही नावं आपल्याला माहीत असतील तर काही कधीही न ऐकलेली. उदाहरणार्थ, मिथिला, चंदा, कौसांबी, प्रयाग. हस्तिबंध, वग, कलिंग, त्रियर्त मरुल, लंका, श्रीपर्वत हे भाग आहेत. जिथे हत्ती मोठ्या प्रमाणात आढळतात. आसाममधील डोंगरभागातील सोमार, जयंतिया, सुलंकिया या ठिकाणच्या हत्तींचं वर्णन करताना लेखक म्हणतो, ते हत्ती लालसर रंगाचे, रुबाबदार, ताकदवान असले तरी ते मवाळवृत्तीचे असतात. याच ग्रंथामध्ये किष्किंध आणि हस्तिनापूर यासंबंधातील माहिती देताना युद्धकारणानं तसंच वनाचा नाश झाल्यानं इथले हत्ती संपल्याचं म्हटलं आहे. अर्थात महाभारताच्या युद्धात प्रचंड प्रमाणात हत्ती मृत्युमुखी पडले. तसंच, युद्धभूमीसाठी वन कमी करून जमीन तयार केली गेली. त्यामुळे हा संदर्भ योग्य लागतो. महाभारतातील उल्लेखानुसार अपरान्त म्हणजे आजच्या कोकण प्रांतात हत्तीचं अस्तित्व होतं. परंतु पुढे ते कधी कमी झालं याचा उल्लेख कुठेही आढळून येत नाही. 

काही ठिकाणी सुलक्षण हत्तीचा उल्लेख विविध ग्रंथांमध्ये आढळून येतो. त्यात त्यांनी म्हटलंय की सुलक्षणी हत्तीच्या कपाळाचा भाग हा लांबून बघितल्यास गाईच्या चेहऱ्यासारखा दिसतो. हत्तीची सोंड जमिनीला टेकून फिरलेली असावी. त्याचप्रमाणे हत्तीच्या शेपटीच्या टोकाला भरपूर केस असावेत. उभं राहताना हत्तीचा मागील भाग हा नर्तकीच्या कमनीय बांध्यासारखा दिसावा. पोटाचा घेर संयमित असावा. तर चालताना उजवा पाय प्रथम पुढे टाकावा.

इतकंच नाही तर इंद्राच्या ऐरावताला दोनऐवजी चार सुळे असल्याचं मानलं जातं. चेन्नईच्या एका मोठ्या मंदिरात खास तसा पुतळा बनवून त्याची मिरवणूकही काढली जाते. हत्तीचं इतकं महत्त्व पुरातनकाळापासून सापडत असूनही हत्ती दुर्लक्षित राहिला आणि आज त्याला वाचवा असं सांगण्याची पाळी आपल्यावर आली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link