Next
प्रेमाचा झरा
- कांचन जोशी
Friday, November 30 | 06:30 PM
15 0 0
Share this story

एका गावात आवा नावाची एक फटकळ आजी राहत होती. कुठल्याही गोष्टीचं उत्तर ती सरळ देत नसे. कोणी विचारलं, “काय आजी कशा आहात?” तर, “का? मला काय झालंय?”- हे प्रत्युत्तर! त्यामुळे नकोच हिच्याशी बोलणं म्हणून लोक तिला टाळत. तरी आपली हिची टिप्पणी असे- “दिसेनाच जणू?”
तर, अशी ही आवा! कामाला वाघ. तिचा कामाचा झपाटा आणि उरक बघून तरुणही लाजायचे. त्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःवर ओढवून घ्यायची हौस!
आता आपण म्हातारपणाकडे झुकलोय पण निवांत हात जोडून देवापुढं कधी बसलो नाही, याची तिला जाणीव झाली एकदा. यंदा वारीला जायचं, असं तिनं ठरवलं. घरातूनही दुजोरा मिळाला. आवाचा जीव मात्र नातवंडांत अडकलेला होता. त्यांना न्हाऊ-माखू घालणं, गोष्टी सांगणं, प्रसंगी मूल होऊन त्यांच्यात खेळणं, त्यांच्या गप्पा ऐकणं ती फार प्रेमानं करत असे. जगासाठीची आवा आणि नातवंडांसाठीची आवा दोन टोकंच होती म्हणा ना!
वारीचा दिवस आला. आवानं घरातल्यांचा निरोप घेतला. सुनांना पन्नास सूचना केल्या आणि निघाली. थोड्याच वेळात परतली. गावातले वारीला जाणारे जमेपर्यंत वेळ होता म्हणून मधेच येऊन ती नातवाला अंघोळ घालून गेली. गावातून दुसऱ्या गावात जायला बोटीनंच जावं लागे. बोटीच्या एका फेरीत सगळे वारकरी जाणं शक्य नव्हतं म्हणून आवा परत घरी आली आणि नातवंडांना भरवू लागली. नातवंडंही आनंदानं जेवत होती. तिला बोलावायला एक वारकरी आला, तेव्हा साश्रू नेत्रांनी आवा म्हणाली, “माझा विठ्ठल भेटला मला. मी भरवलं त्याला.” आवाच्या गोष्टीवरून मला या श्लोकाची आठवण झाली-

बन्धनानि खलु सन्ति बहूनि प्रेमरज्जुकृतबन्धनमन्यत् |
दारुभेदनिपुणोऽपि षड्ङघ्रिर्निष्क्रियो भवति पङ्कजकोशे||


[लाकूड पोखरणारा भुंगा कमळाच्या कळीत अडकून पडतो. प्रेमाचा दोर खरोखर अनेक बंधनांपेक्षा वेगळाच आहे.]
कितीही कठोर वाटणाऱ्या माणसातही प्रेमाचा झरा असतोच. प्रेमानं माणूस बदलतो, पण तेवढ्या ताकदीनं प्रेम करायला कमळासारखं व्हायचा प्रयत्न आपण मनापासून करतो का?

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link