Next
कॅरिबियन बेटांवर ऑस्ट्रेलियन वादळ
सतीश स. कुलकर्णी
Friday, May 17 | 03:00 PM
15 0 0
Share this story

विश्वचषकस्पर्धेची नववी आवृत्ती पार पडली कॅरिबियन बेटांवर- वेस्ट इंडिजमध्ये. बार्बाडोस, जमैका, सेंट लुसिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो, गयाना, अँटिग्वा आणि बार्बुडा, ग्रेनेजा, सेंट किटस आणि नेव्हिस या देशांमध्ये सामने झाले. लांबलेली स्पर्धा, तिकिटाचे चढे दर, अतिव्यापारीकरण आदी मुद्द्यांवरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर टीका झाली. स्पर्धेचं सर्वाधिक आकर्षण असलेली भारत-पाकिस्तान लढत झालीच नाही; कारण दोन्ही संघ गटामध्येच गारद! आयर्लंडविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब वूल्मर हॉटेलातील खोलीत मृतावस्थेत आढळले. हा सर्वांनाच मोठा धक्का होता.
सलग दुसऱ्या स्पर्धेत एकही सामना न गमावता ऑस्ट्रेलियानं जेतेपदाची हॅटट्रिक साधली. सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विजेत्यांचा व सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही विजेत्यांचाच. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ग्लेन मॅकग्रा निवडला गेला. हा बहुमान लाभलेला तो पहिलाच गोलंदाज. स्पर्धा १३ मार्च ते २८ एप्रिल २००७ अशी दीड महिना चालली. सहभागी संघांची संख्या वाढून १६ झाली, तरी सामन्यांची संख्या मागच्या स्पर्धेपेक्षा तीननं कमी झाली, एकूण ५१. स्वरूप काहीसं बदललं. चार गटांमध्ये साखळी सामने, प्रत्येक गटातील दोन संघ ‘सुपर एट’मध्ये, त्यांची साखळी स्पर्धा, एकाच गटातून आलेल्या संघांमध्ये सामना नाही, त्यातून चार संघ उपान्त्य फेरीत असं स्वरूप होतं.
भारत, पाकिस्तान ‘सुपर एट’मध्ये पोहोचलेच नाहीत. भारताचा पहिल्याच सामन्यात बांगलादेशानं पाच गडी राखून पराभव केला. नंतर बर्म्युडाविरुद्ध भारतानं षटकामागे ८.२६ या गतीनं ४३१ धावा करून मिळवलेला मोठा विजय उपयोगाचा नव्हता. कारण शेवटच्या सामन्यात श्रीलंकेकडूनही ६९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आयर्लंडनं पदार्पणातच झिम्बाब्वेशी बरोबरी साधली; दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला तीन गडी राखत हरवून ‘सुपर एट’मध्ये प्रवेश केला. तिथे बांगलादेशावर ७४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. बांगलादेशानं दक्षिण आफ्रिकेला ६७ धावांनी हरवण्याचा चमत्कार केला.
ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका (‘अ’ गट), श्रीलंका, बांगलादेश (‘ब’), न्यूझीलंड, इंग्लंड (‘क’) आणि वेस्ट इंडिज, आयर्लंड (‘ड’ गट) यांनी ‘सुपर एट’मध्ये प्रवेश केला. तिथे इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश व आयर्लंड यांचं आव्हान संपुष्टात आलं. गटात तिन्ही सामने जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा धडाका ‘सुपर एट’मध्येही चालू राहिला. या वाटचालीत दोन महत्त्वाचे घटक होते, सलामीचा फलंदाज मॅथ्यू हेडन आणि पूर्ण स्पर्धेत धारदार मारा करणारा ग्लेन मॅकग्रा.
मात्र गंमत बघा, सर्वोत्तम ठरलेल्या मॅकग्राचा स्पर्धेपूर्वीच निवृत्त होण्याचा विचार होता. ऑस्ट्रेलियातील बहुसंख्य क्रिकेटप्रेमींची भावना तीच होती- संघात मॅकग्रा नको, त्यानं आता निवृत्त व्हावं. तो पूर्वीचा मॅकग्रा आता राहिला नाही; त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी होऊन गेलेली आहे. आता तरुण रक्ताला संधी द्या! याच स्पर्धेनंतर ‘पिजन’ मॅकग्रा (लांबसडक आणि दणकट पायांमुळे सहकारी खेळाडूंनी त्याला दिलेलं लाडकं नाव) निवृत्त झाला- सर्वोत्तम कामगिरी बजावून, ११ सामन्यांमध्ये २६ बळी घेऊन!
व्यवस्थित तेल-पाणी केलेलं एखादं यंत्र जसं सफाईदार काम करत राहतं, तशीच मॅकग्राची कामगिरी होती. प्रत्येक सामन्यात त्याच्या नावावर बळी आहे. त्यानं ३५७ धावा देऊन २६ गडी (सरासरी १३.७३, इकॉनॉमी ४.४१) बाद केले. एकूण सहा वेळा त्यानं सामन्यात तीन बळी घेतले. त्याच्याकडे नाही भयाण वेग किंवा नैसर्गिक स्विंग, पण कौशल्य आणि परिपूर्णतेचा ध्यास ही त्याची अस्त्रं होती. म्हणून इयान चॅपेलनं ऑस्ट्रेलियाच्या सर्वकालीन महान गोलंदाजांच्या पंक्तीत त्याला डेनिस लिली आणि रे लिंडवॉल यांच्या नंतरची मानाची जागा दिली. स्वतःबद्दल मॅकग्रा म्हणतो, ‘माझा दृष्टिकोन नेहमीच सरळ-साधा होता, असतो. तुम्ही शंभरपैकी ९९ वेळा यष्टीवर अचूक मारा करत असाल, तर नक्कीच बळी मिळवणार. त्यात काही शंकाच नाही!’
स्कॉटलंडविरुद्ध फक्त १४ धावांमध्ये ३ गडी बाद करून मॅकग्रानं आपण संपलो नसल्याची जाणीव करून दिली. नेदरलँड्सविरुद्ध त्यानं दोन गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मात्र तो महागडा ठरला. नऊ षटकांत तब्बल ६२ धावा देऊन त्याला फक्त अॅशवेल प्रिन्सचा बळी मिळाला. ‘सुपर एट’मधील सहाही सामन्यांत त्यानं धमाल केली. वेस्ट इंडिजविरुद्ध ख्रिस गेल, सॅम्युएल्स व ब्राव्हो असे तीन बळी मिळवले. बांगलादेशाविरुद्ध फक्त १६ धावांत तीन गडी बाद केले आणि तो सामन्याचा मानकरी बनला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तीन बळींसाठी त्याला ६२ धावा द्याव्या लागल्या खऱ्या; पण इयान बेलला बाद करून त्याची पीटरसनबरोबरची शतकी भागीदारी संपुष्टात आणली. आयर्लंडविरुद्धच्या सामन्याचा मानकरी ठरलेल्या मॅकग्राचे आकडे बोलके होते : ७-१-१७-३. श्रीलंकेविरुद्ध त्यानं संगकारासह दोन आणि न्यूझीलंडविरुद्ध दोन बळी मिळवले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात मॅकग्रानं प्रिन्स व मार्क बाऊचर यांना लागोपाठच्या चेंडूंवर शून्यावरच बाद केलं. त्याला स्वतःला आवडलेला बळी होता जॅक कॅलिसचा. सहाव्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर लेगला सरकत कॅलिसनं एक्स्ट्रा कव्हरकडे चौकार ठोकला. पुढच्या चेंडूवर त्यानं तसाच प्रयत्न केला; पण मॅकग्राच्या यॉर्करनं त्याची उजवी यष्टी मुळासकट उखडली होती. त्याच्या ५-१-१३-३ अशा भन्नाट माऱ्यामुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था पाच बाद २७ अशी दयनीय झाली होती. या एकतर्फी सामन्याचा मानकरी तोच होता.
गोलंदाजीत मॅकग्रापाठोपाठ होते मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) व शॉन टेट (ऑस्ट्रेलिया), त्यांनी प्रत्येकी २३ बळी घेतले. फलंदाजीत अव्वल ठरला कांगारूंचाच मॅथ्यू हेडन. त्यानं ६५९ धावा (तीन शतके, एक अर्धशतक, सरासरी ७३.२२, स्ट्राइक रेट १०१.०७) केल्या. विश्वचषकातील शंभरावं शतक त्यानंच झळकावलं. चारशेहून अधिक धावा करणारे १० फलंदाज होते. एकूण १६ डावांत तीनशेहून अधिक धावा आणि २० शतकं झाली. दक्षिण आफ्रिकेच्या हर्शेल गिब्जनं नेदरलँड्सच्या डान व्हन बंज याला सलग सहा षटकार ठोकले.

शतकवीर गिली सामन्याचा मानकरी

उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला ८१ धावांनी हरवून आलेल्या श्रीलंकेचं आव्हानं कांगारूंपुढे होतं. ब्रिजटाऊनच्या (बार्बाडोस) केन्सिंग्टन ओव्हलवरचा अंतिम सामना पावसामुळे ३८ षटकांचा करण्यात आला. नंतर अपुऱ्या प्रकाशाचा व्यत्यय आल्यानं श्रीलंकेला ३६ षटकांतलं सुधारित लक्ष्य देण्यात आलं. हा सामना म्हणजे विश्वचषकाच्या सर्वांत महत्त्वाच्या लढतीचं विडंबनच म्हणावं लागेल. ऑस्ट्रेलियानं षटकामागे ७.३९ धावांच्या गतीनं चार बाद २८१ अशी मजल मारली, ती अॅडम गिलख्रिस्टच्या शतकामुळे (१०४ चेंडूंमध्ये १४९ - १३ चौकार व ८ षटकार). तोच सामन्याचा मानकरी ठरला. सनथ जयसूर्य व कुमार संगकारा यांनी दुसऱ्या जोडीसाठी ११६ धावांची भागीदारी करूनही श्रीलंकेचे प्रयत्न अपुरे पडले.
सात षटकांत ३१ धावा देऊन एक बळी घेतल्यानंतर मॅकग्राला विश्रांती देण्यात आली होती. सामन्यातलं शेवटचं षटक त्याला देण्याची कर्णधार रिकी पाँटिंग याची इच्छा होती, पण अंधुक प्रकाश आणि सामन्याचा उपचार पूर्ण करण्याचा आग्रह यामुळे त्याला हंगामी फिरकी गोलंदाजांचाच उपयोग करावा लागला. त्यानं निकालात फरक पडला नाही. मॅकग्रानं विश्वचषकासह मोठ्या आनंदानं आपल्या लाडक्या खेळाचा निरोप घेतला.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link