Next
जीवन आनंदस्वरूप आहे
स्वामी मकरंदनाथ
Friday, October 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

‘आनंदात् हि एव खलु इमानि भुतानि जायन्ते।’ असे उपनिषदे म्हणतात. आनंदामध्ये आणि आनंदाच्याच अधिष्ठानावर सर्व जगताची उत्पत्ती झाली असल्याने आपले जीवन आनंदासाठीच आहे. सर्व कर्मे आनंदासाठीच करावीशी वाटतात. एखाद्या गोष्टीतून पुढे दु:ख होईल असे समजले, तर ती गोष्ट करण्याचे आपण टाळतो, कारण जिवाची स्वाभाविक ओढ आनंदाकडेच असते, नव्हे; जीव मुळातच आनंदस्वरूप आहे. जिवाचे मूळस्वरूप आनंदाचे, प्रेमाचे, शांतीचे असल्याने त्याला आनंदाची, प्रेमाची, शांतीची ओढ असते. फक्त आनंदाचे मूळस्वरूप माहीत होईपर्यंत तो आनंद आपण इंद्रियांनी घेतलेल्या निरनिराळ्या विषयभोगातून मिळवतो. जीवबाह्य गोष्टींतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या लक्षात येते, या बाह्य आनंदाला खूप मर्यादा आहेत आणि आपल्याला तर शाश्वत आनंद हवा आहे!
शाश्वत आनंदात राहायचे असेल, तर सतत निर्माण होणाऱ्या आणि बहिर्गमन करणाऱ्या सर्व वृत्ती अंतर्यामी वळवण्यास सर्व संत सांगतात. वृत्ती आत वळवता आली तर आनंद आहे. स्थूल विषयात रमणारी वृत्ती आत वळून, सूक्ष्म परमात्म्याच्या ठिकाणी रममाण होणे यापरते भाग्य नाही, कारण तेथे आनंदाशिवाय दुसरे काहीच नसते.

विषयसुख भोगून झाल्यावर पूर्ण समाधान होत नाही, उलट तो विषय पुन:पुन्हा मिळवण्याची वखवख वाढते. कोणत्याही विषयाच्या सेवनाने मिळणारे समाधान अल्पकाळ टिकते. वृत्ती इंद्रियांद्वारे कोणत्या ना कोणत्या विषयात रमण्याचा प्रयत्न करते. परंतु तिला विषयांत रमवण्यापेक्षा अंतर्यामी वळवले, तर शाश्वत समाधान, सुख प्राप्त होईल.वृत्ती आत वळवण्यासाठी नामस्मरण हा उत्तम उपाय आहे. नामाला बसताना प्रथमत: बाहेरच्या सगळ्या विषयांना बाहेरच सोडून शांत, डोळे मिटून बसावे. सद्गुरूंचे, ईश्वरस्वरूपाचे स्मरण करावे. नामस्मरणाची साधना जमावी यासाठी सद्गुरूंना प्रार्थना करावी आणि नंतर सावकाशपणे नामाचा उच्चार प्रेमाने, आपला आपल्याला ऐकू येईल इतपत करावा. मनात नाम घेतले तरी चालेल. हा अभ्यास करता करता वृत्ती बाहेर जाणे हळूहळू बंद होते आणि नामस्मरणावर चित्त केंद्रित होते. वृत्ती नामाशी एकरूप होऊ लागते, ज्याचे नाम घेतो आहे तो परमात्मा, नामही परमात्मस्वरूप आणि नाम घेणारा मी जीवही परमात्म्याशी मुळातच एकरूप, तदाकार आहे; हे ज्ञान नाम घेता घेता जेव्हा स्फुरते तेव्हा वृत्ती मावळून केवळ परमात्मभावच शिल्लक राहतो, ही स्थिती निखळ आनंदाची असते. ‘नाम स्मरे निरंतर। ते जाणावे पुण्यशरीर।।’ असे समर्थ म्हणतात. आनंदाची ही स्थिती जशी नामाने प्राप्त होते तशीच ध्यानानेही होते. ध्यानकाली मनाचा लोप झाल्यावर, निस्तरंग स्थितीनंतर ती प्राप्त होते. अशाप्रकारे आत्मस्वरूपाचा प्रयत्न साधकाला वारंवार होऊ लागला, तर तो साधक ज्या मनाने व इंद्रियांनी सर्व व्यवहार करतो त्या मनावर, इंद्रियांवर आत्मस्वरूपाच्या या बोधाचा प्रभाव पडू लागतो; परिणामस्वरूप त्याचा देह निर्मळ, पवित्र होऊन जातो. त्याचे मन व इंद्रियेही आनंदस्वरूप होतात. या आनंदाच्या प्राप्तीनंतर जीव सुखरूप होऊन राहतो. संसारातील कित्येक गोष्टी आपल्या हातात नाहीत, पण परमार्थामध्ये मात्र आपण जेवढी साधना करू तेवढे अधिक समाधान निश्चितपणे मिळत राहते. सद्गुरूंच्या कृपेने आणि आपल्या दीर्घ, निरंतर प्रयत्नांनी खात्रीने मिळणारी गोष्ट म्हणजे ही आनंदस्वरूप स्थिती होय!
(पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य स्वामी माधवनाथ
यांचा वारसा पुढे चालवणारे स्वामी मकरंदनाथ यांचे
खास तरुणांसाठी सदर)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link