Next
‘सृष्टी’ची किमया!
नम्रता ढोले-कडू
Friday, August 10 | 03:00 PM
15 0 0
Share this story

गर्दीने खचून भरलेल्या सभागृहात एका पुरस्कारविजेत्या नावाची घोषणा झाली आणि सभागृहातील सर्वांनीच  उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. नवी मुंबईतील पनवेलच्या सी. के. टी. महाविद्यालयाच्या गुणगौरवसमारंभात तृतीय वर्ष विज्ञानविभागातून कॉलेजच्या एका विद्यार्थिनीचे  नाव  पुकारले गेले. ९५. ८% गुण मिळवून तिची गणना मुंबई विद्यापीठाच्या टॉपर्सच्या यादीत झाली. ते नाव होते सृष्टी कुलकर्णी. प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची २१ वर्षांची सृष्टी मनोगत व्यक्त करायला व्यासपीठावर उभी राहिली. तिने अत्यंत सकारात्मक बोलायला सुरुवात केली आणि तिच्या काही वाक्यांनंतर सभागृहातील प्रत्येकाचेच काळीज हेलावले. 
द्वितीय वर्षाच्या परीक्षेदरम्यान सृष्टीला तिच्या पायाच्या त्वचेवर लाल डाग दिसून आले. त्वचारोगतज्ज्ञांना दाखवल्यानंतर आणि काही चाचण्याअंती सृष्टीला ब्लड कॅन्सर असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. बालवर्गापासून सतत वर्गात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या  हसतमुख, उत्साही सृष्टीवर असा आघात झाला होता. उपचारांसाठी तिला एक वर्ष गॅप घ्यावी लागली. दादरचे डॉक्टर  एम. बी. अगरवाल यांच्याकडे ट्रीटमेंट सुरू झाली.
सतत नवे काहीतरी शिकण्याची ऊर्मी बाळगणाऱ्या सृष्टीने या उपचारांच्या कालावधीत मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी जपानी भाषा शिकायला सुरुवात केली. शिक्षिका नेहा खरे  या काळात घरी येऊन तिला शिकवत असत. सृष्टीने या काळात ‘कॅलिडोस्कोप’ नावाचा कथासंग्रह लिहिला.  सृष्टी भरतनाट्यमविशारदही आहे.  मूळची सांगलीची असणारी सृष्टी कॉलेज शिक्षण घेण्यासाठी पनवेल येथे तिच्या आजीकडे राहायला आली. ‘अॅनालिटीकल केमिस्ट्री’मध्ये  तिला रुची आहे. सृष्टीची आई प्राध्यापक  आणि आजी निवृत्त मुख्याध्यापक आहे. या दोघींच्या पाठबळावर सृष्टीने कॅन्सरविरुद्धचा लढा निकराने जिंकला आहे. कॉलेजचे  प्राचार्य डॉ. गडदेसर आणि सर्व प्राध्यापकांचे मोलाचे सहकार्य तिला लाभले. कॉलेजविषयी, आपल्या मित्रमैत्रिणींच्या सहकार्याविषयी सृष्टी खूप भरभरून बोलते. सांगलीमध्ये वॉटर प्रूफिंगचा व्यवसाय करणारे सृष्टीचे बाबा आणि सध्या बारावीत  असलेला लहान भाऊ मोहित या दोघांनी अवघड काळात सतत तिचे मनोबल उंच ठेवण्यात मदत केली आहे. मात्र सृष्टी स्वतःच स्वतःची समुपदेशक आहे, हे ती मोठ्या अभिमानाने सांगते. आत्मविश्वास, चांगुलपणा आणि जीवनाप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर आपण काय करू शकतो, याचे चालतेबोलते उदाहरण म्हणजे सृष्टी.           


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link