Next
आयपीएलमधील झंझावात
आशिष पेंडसे
Friday, April 19 | 03:00 PM
15 0 0
Share this story

परिपक्व खेळाडू कागीसो रबाडा
सु पर ओव्हरचा तो मुकाबला होता. समोर होता गोलंदाजांचा कर्दनकाळ आंद्रे रसेल. टी-२० चा सामना निर्धारित २०-२० अशा ४० ओव्हरनंतरही बरोबरीत सुटला, तर दोन्ही संघांना फक्त एक-एक ओव्हर खेळण्यास दिली जाते. त्यामध्ये जो संघ सर्वाधिक रन करेल तो जिंकतो. तसेच दोन खेळाडू बाद झाले तर तिथे डाव संपतो. अशावेळी गोलंदाजांवर प्रचंड दबाव असतो. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळताना दिल्ली कॅपिटल्सने ‘सुपर ओव्हर’मध्ये फक्त ९ धावा बनवल्या होत्या. त्यामुळेच आंद्रे रसेल आणि कंपनीला ९ धावांच्या आत रोखण्याचे आव्हान होते. कागीसो रबाडाकडे चेंडू सोपवला आणि एरवी चौकार-षटकारांची होणारी बरसात अचानक थंडावली. तब्बल सहाही चेंडू यॉर्कर पद्धतीचे टाकत या पठ्ठ्याने रसेल आणि कंपनीला १० धावांच्या आतच रोखले आणि अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला.
वास्तविक एकदिवसीय किंवा झटपट क्रिकेट हे आता पूर्णपणे फलंदाजांच्या बाजूने पक्षपात करणारे ठरत आहे. प्रेक्षकही केवळ चौकार आणि षटकारांची आतषबाजी बघायला येतात. सत्तर-ऐंशी धावा झालेला सामना कितीही चुरशीचा झाला तरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाही. त्यांना दोनशे-अडीचशे धावा झालेला सामना बघायचा असतो. त्यामुळेच अशा या फलंदाजांनी व्यापून टाकलेल्या क्रिकेटमध्ये आज, तोही तेवीस वर्षांचा गोलंदाज आपली छाप पाडून जातो हे खरोखरीच विशेष ठरते आहे.
रबाडा हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू. तीन वर्षांपूर्वी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि दीडशे विकेट घेणारा सर्वात तरुण गोलंदाज बनण्याचा मान मिळवला. गेल्या वर्षी भारताच्या आफ्रिका दौऱ्यामध्येदेखील त्याने अतिशय लक्षवेधी कामगिरी केली होती. एकाच वर्षात आफ्रिकेमधील तब्बल ६ पुरस्कार मिळवणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. त्याचप्रमाणे जागतिक क्रिकेट परिषदेच्या कसोटी, एकदिवसीय आणि झटपट क्रिकेटमधील पुरस्कार पटकावणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या आठ सामन्यांत रबाडा याने तब्बल १७  बळी घेतले आहेत. अखेरच्या षटकांमध्ये जिथे फलंदाज एकाच षटकात तब्बल वीस-पंचवीस धावांचा पाऊस पाडतात, अशावेळी रबाडा याने फक्त ८ धावा देण्याची सरासरी राखली आहे. तसेच, अखेरच्या षटकांमध्ये त्याने १० फलंदाजही बाद केले आहेत.
यॉर्कर हे रबाडाचे प्रमुख अस्त्र. यॉर्कर म्हणजे अगदी फलंदाजाच्या पायाचा किंवा स्टंपच्या बुंध्याचा वेध घेऊन टाकलेला चेंडू. तोदेखील तब्बल ताशी १४५ किलोमीटरच्या वेगाने आल्यास फलंदाजाला चेंडू फटकावण्याची संधीच मिळत नाही. अशा प्रकारचा चेंडू टाकता येणे हे अतिशय कौशल्याचे काम आहे. त्यासाठी खूप सरावाची गरज असते. त्याचबरोबर प्रत्यक्ष सामन्याच्या वेळी तुमचे मानसिक आणि शारीरिक संतुलन राखणे अतिशय गरजेचे असते. म्हणूनच एखाद्या गोलंदाजाचा झटपटपद्धतीच्या सामन्यांत त्याचा गौरव होणे म्हणजे एखाद्या फलंदाजाने शतक ठोकणे किंवा ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावल्यासारखे वाटते, असे रबाडा स्पष्ट करतो.
वेस्टइंडिजच्या मार्शल, गार्नर, अँब्रोज यांच्यापासून ऑस्ट्रेलियाच्या लीली, थॉमसन यांच्यापर्यंत फास्ट बॉलर म्हटला की तो अतिशय आक्रमक आणि अक्राळविक्राळ राक्षसी स्वरूपाचा असेल अशी छबी आपल्या मनात असते. दक्षिण आफ्रिकेच्या ॲलन डोनाल्ड किंवा डेरेल स्टेन यांच्यासारख्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले आहे. रबाडा हा त्यांच्यापेक्षा काहीसा वेगळा आहे. त्याचे वडील डॉक्टर तर आई वकील आहे. अतिशय मृदू स्वभावाचा असल्यामुळे तो जणू एखाद्या सॉफ्टवेअर इंजिनीयरप्रमाणे भासतो. त्यामुळेच जोरात पळत येऊन जोरात चेंडू फेकणे अशी त्याच्या गोलंदाजीची शैली नाही. तो अतिशय डोक्याने बॉलिंग करतो. फलंदाज यापुढील चेंडू नेमका कसा खेळणार आहे, त्यासाठी कशी फिल्डिंग लावलेली आहे, अशा सर्व गोष्टींचा विचार करून तो चेंडूचा टप्पा व वेग नियंत्रित करतो. म्हणूनच त्याचा सामना करणे जगभराच्या फलंदाजांना अतिशय अवघड जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघच नव्हे तर आयपीएल झटपट क्रिकेटच्या मागणी असलेल्या स्पर्धेमध्ये त्याने एक अतिशय परिपक्व खेळाडू म्हणून स्थान प्राप्त केले आहे.
फलंदाजांचे चौकर, षटकार हाच केवळ झटपट क्रिकेटमधील रोमांच नसून, रबाडाचे यॉर्कर हेदेखील उल्लेखनीय ठरत आहेत. एखादा अचूक चेंडू आणि गोलंदाजांच्या कौशल्यालादेखील टाळ्या पडतात हे रबाडाच्या कामगिरीने सिद्ध होत आहे. एकदिवसीय वर्ल्ड कपस्पर्धेत रबाडाकडे साऱ्या क्रिकेटविश्वाच्या नजरा असतील.


धमाकेदार आंद्रे रसेल
अखेरच्या चार ओव्हरमध्ये ६६ धावा करण्याचे अशक्यप्राय वाटणारे आव्हान होते. समोर विराट कोहलीसारख्या कुशाग्र नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर बंगलोरची टीम होती. त्यांच्याच घरच्या मैदानावर हा सामना होता. मात्र चार विकेट पडल्यानंतर हा पठ्ठ्या मैदानात आला... जणू चमत्कार घडला आणि कोलकाता नाईट रायडर्सनी हा सामना लीलया जिंकला.
१३ बॉलमध्ये ४८ धावा... ७ षटकार आणि १ चौकार!
...महाराष्ट्रात सर्वत्र घोंगावणारे राजकीय वादळ आपण पाहत आहोत. परंतु आयपीएलच्या मैदानातही सध्या अशीच प्रचंड वादळी बरसात होत आहे. ती म्हणजे आंद्रे रसेल या तुफान खेळाडूच्या माध्यमातून. जगातील कोणतीही गोलंदाजी अक्षरशः धुवून काढणारा, आपल्या अचूक व कल्पक माऱ्याने कोणत्याही फलंदाजाला बाद करण्याची क्षमता असणारा आणि चित्त्याच्या चपळाईने झेल घेत वा रन आऊट करीत, अष्टपैलू कामगिरीची झलक दाखवणारा असा हा वेस्टइंडिजचा धडाकेबाज खेळाडू.
जगातील कोणतेही मैदान मला मोठे वाटत नाही. ऑस्ट्रेलियातील मैदाने खूप मोठी असतात असे सारेच म्हणत होते. तिथेही चेंडू केवळ सीमापारच नाही तर स्टेडियमच्या वरच्या गॅलरीत फटकावला, असे रसेल अभिमानाने सांगतो. रसेलला गोलंदाजी नेमकी कशी टाकायची असा संभ्रम जगातील गोलंदाजांना पडतो आहे. बाउन्सर टाकला तर तो हूकच्या माध्यमातून लेग साइडला सिक्सर मारतो किंवा रॉजर फेडररने टेनिसमध्ये सर्व्हिस करावी अशा पद्धतीने बॅट फिरवून गोलंदाजाच्या डोक्यावरून षटकार खेचतो. यॉर्कर टाकायचा प्रयत्न केला तर उत्कृष्ट स्टेपिंगचा नमुना पेश करत तो चेंडू फुलटॉसमध्ये परावर्तित करून मैदानाच्या कोणत्याही भागात फटकावतो. ऑफ साइडला टाकलेला चेंडू लेग साइडला मारणे, किंवा रिव्हर्स स्विप असो, विकेटकीपरच्या डोक्यावरून चेंडू सीमापार धाडणे असो, अशा कोणत्याही पद्धतीच्या फटक्यांनी हा पठ्ठ्या चौकार-षटकारांची बरसात करतो.
म्हणूनच की काय कोलकाता नाईट रायडर्सने रसेलचे मोल ओळखून त्याला ७ कोटी रुपयांची बोली लावत आपल्याच संघाकडे कायम राखले. आता यापूर्वी आयपीएल जिंकलेला हा धमाकेदार खेळाडू, त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा ठाम निर्धार राखून आहे. यंदाच्या हंगामात त्याने पहिल्या ८ सामन्यांमध्ये ३१२ धावा फटकावून ६ विकेटसुद्धा घेतल्या आहेत. त्याचे करिअर बॅटिंग अव्हरेज १७७ असे आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये तो २२५ पेक्षा अधिकच्या सरासरीने धावा कुटत आहे. रसेलने समजा १०० चेंडूंचा सामना केला तर यामध्ये तो तब्बल २२५ धावा करण्याची क्षमता राखतो. अर्थातच चौकार आणि षटकारांच्या जोरावरच तो असा घणाघात करतो आहे.
रसेल मूळचा वेस्टइंडिजमधील जमेका येथील. गेल्या वर्षीच्या कॅरेबियन लीगमध्ये ४० चेंडूंत शतक ठोकताना सहा चौकार आणि १३ षटकारांची बरसात केली होती. मैदानाबाहेरदेखील रसेल असाच कलंदर व्यक्ती आहे. अर्थात कलंदरपणा हा वेस्टइंडिज क्रिकेटचा स्थायीभाव आहे. विवियन रिचर्ड्स, ब्रायन लारापासून केरोन पोलार्डपर्यंत, विंडीजचे खेळाडू क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटतात. म्हणूनच त्यांचा खेळ पाहण्यास प्रेक्षकांनादेखील खूप आवडते. वर्ल्ड कपच्या मैदानात प्रारंभी अधिपत्य गाजवल्यानंतर गेल्या वीस वर्षांत विंडीज  क्रिकेटची खूप घसरण झाली आहे. तरीही रसेलसारखे मनस्वी खेळाडू विंडीज आणि जगभरातील क्रिकेट जिवंत व लोकप्रिय ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.


संघाचा आधारस्तंभ जॉन बेअरस्टो
कोणत्याही स्तरावरच्या क्रिकेटमध्ये विकेटकीपरला अतिशय अनन्यसाधारण महत्त्व असते. कार्तिक की पंत, महेंद्रसिंग धोनीसमवेत वर्ल्डकपसाठी संघात कोणाला घ्यायचे यावरून गेले अनेक महिने सुरू असलेले तर्कवितर्क, चर्चा आपण सर्वांनीच पाहिले. असे काय विशेष असते या विकेटकीपरमध्ये? त्याला एवढे महत्त्व का दिले जाते?
आयपीएलच्या मैदानामध्ये जॉन बेअरस्टो करत असलेल्या कामगिरीवरून आपल्याला हे लक्षात येईल. त्याने सात सामन्यांमध्ये एका शतकासह तब्बल ३०० हून अधिक धावा ठोकल्या आहेत. तसेच यष्टीमागे दहाहून अधिक बळी घेतले आहेत. त्याचप्रमाणे संघाची रणनीती ठरवणारा एक महत्त्वाचा शिलेदार म्हणून सनरायझर्स हैदराबादच्या संघाचा एक आधारस्तंभ बनला आहे.
जॉन बेअरस्टो हा इंग्लंडच्या यॉर्कशायरचा तडाखेबंद खेळाडू. मधल्या क्रमांकावर येत तो तडाखेबंद खेळी करून झटपट क्रिकेटमध्ये निर्णायक कामगिरी करतो. त्याचप्रमाणे कसोटी क्रिकेटमधील तो संघाचा तारणहार ठरतो आहे. अनेकदा सलामीला येऊनही त्याने आपल्या फलंदाजीचा करिष्मा दाखवला आहे. गोलंदाजीच्या सत्रात संपूर्ण सामनाभर विकेटकीपर अतिशय जवळून प्रत्येक चेंडू बघत असतो. त्यामुळे त्याला खेळपट्टी, एकूण सामन्याचे वातावरण याचा सर्वोत्तम अंदाज येतो. याचा उपयोग आपल्या संघाची फलंदाजी असते त्या वेळेला, सलामीचा फलंदाज आणि मध्य फळीतील फलंदाजांना अतिशय मोलाच्या टिप्स देण्यात तो करतो. तसेच चेंडू किती स्विंग होतो आहे किंवा चेंडू किती स्पिन होतो आहे हे तो अतिशय जवळून बघत असल्यामुळे, कर्णधाराला तो गोलंदाजीच्या क्रमवारीत किंवा गोलंदाजांच्या शैलीत बदल करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना देतो. फिल्डिंग कशा पद्धतीने लावावी, त्यामध्ये काय बदल करायचे याच्याही तो सूचना देत असतो.
यंदाच्या आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नरसमवेत सलामीला येत त्याने अतिशय उत्तम प्रारंभ करून दिला आहे.
यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये तो सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो आहे. सुमारे सव्वादोन कोटी रुपये  बोलीवर त्याला लिलावात खरेदी करण्यात आले. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर याच्यासमवेत त्याने १८५ धावांची सलामी भागीदारी केली. हा आयपीएलमधील विक्रम ठरला आहे. विशेष म्हणजे विराट कोहलीच्या बंगलोरविरुद्ध त्यांनी ही विक्रमी खेळी केली. या सामन्यामध्ये त्याने घणाघाती शतक नोंदवले. आयपीएलच्या गेल्या हंगामामध्ये त्याला कोणीही खरेदी केले नव्हते. परंतु एका वर्षानंतर जॉनने कमाल करून दाखवली. आता तो हैदराबादचा आधारस्तंभ बनला आहे.
टिपिकल इंग्लंडच्या पारंपरिक क्रिकेटमधून ज्युनियर सामन्यांमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने पदार्पण केले. सलग तीन सामन्यांमध्ये शतक ठोकणारा तो पहिला इंग्लिश कर्णधार ठरला. आता त्याचा आदर्श असलेल्या महेंद्रसिंग धोनी याच्यासमवेत एकाच स्पर्धेत खेळण्याची संधी मिळत असल्यामुळे तो एक्सायटेड आहे.
बदलत्या क्रिकेटच्या स्वरूपामुळे विकेटकीपरला अतिशय आव्हानात्मक भूमिका पेलावी लागत आहे. फलंदाज, क्षेत्ररक्षक अशा सर्व आघाड्यांवर अतिशय सजग राहून कामगिरी करावी लागत आहे, असे तो सांगतो.
आयपीएल ही आंतरराष्ट्रीय अनुभव प्राप्त करण्यासाठी अतिशय मोलाची स्पर्धा आहे. एकेकाळी इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने जगभरातील क्रिकेटपटू सहभागी होत असत. परंतु आयपीएलकरता लाभलेले वलय अनन्यसाधारण आहे. त्याच्यामुळे प्रत्येक सामना हा आंतरराष्ट्रीय तोडीच्या सामन्याप्रमाणे अतिशय बहारदार ठरतो. भारतामधील क्रिकेटप्रेमाबद्दल ऐकून होतो, परंतु प्रत्यक्ष मैदानात खेळताना त्यांच्याकडून मिळणारे प्रोत्साहन आणि खराब कामगिरी केल्यानंतर त्यांच्याकडून व्यक्त होणारा संताप हीदेखील खरोखरीच अनुभवण्यासारखी गोष्ट आहे. क्रिकेटचा भारतामधील हा अनुभव खूप काही शिकवून जाणारा आहे आणि एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून कारकीर्द घडवण्यासाठी तो अतिशय मोलाचा ठरतो आहे, असे जॉन स्पष्ट करतो.
भारत हे क्रिकेटचे भविष्य आहे असे त्याला मनापासून वाटते. केवळ भारतामध्ये असलेल्या अतिमहाकाय भूप्रदेशामुळे किंवा लाखोंच्या संख्येने उपस्थित होत असलेला जनसमुदाय यामुळे नव्हे, तर क्रिकेटविषयी असलेली आत्मीयता आणि ज्ञान याच्यामुळे भारतात क्रिकेट खेळणे हे अतिशय अनुभवसंपन्न करणारे ठरते, असेही तो सांगतो. 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link