Next
संगणकक्षेत्रात करिअर
शर्मिला लोंढे
Friday, January 04 | 04:00 PM
15 0 0
Share this storyसंगणकशिक्षण या विषयाच्या शृंखलेतील पहिल्या लेखामध्ये आपण नाइलाजास्तव, गरजेनुसार बेतलेलं मूलभूत शिक्षण घेणाऱ्यांचा गट पाहिला. यातील दुसऱ्या लेखात आपण अशा विद्यार्थ्यांचा गट बघितला, ज्यांना संगणकामध्ये गती किंवा रस आहे, किंवा त्यात करिअर करायचंय म्हणून नाही तर नोकरी मिळायला सोपं व्हावं, जॉब प्रोफाइल सुधारावी म्हणून संगणकाचं शिक्षण घेतात. प्रस्तुत लेख या शृंखलेतील तिसरा व शेवटचा लेख आहे.

यात अशा विद्यार्थ्यांचा समावेश आहे, ज्यांना संगणकामध्ये गती व रस दोन्ही आहे व ज्यांना संगणकक्षेत्रात आपलं करिअर करायचं आहे.

संगणकशिक्षणाचे दोन महत्त्वाचे खांब म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. हार्डवेअरचा संबंध कॉम्प्युटर डिझाइन, कॉम्प्युटर इक्विपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, इन्स्टॉलिंग, टेस्टिंग व फंक्शनिंग या सगळ्यांशी असतो. सॉफ्टवेअरचा संबंध अल्गोरिदमचा वापर, प्रोग्रॅमिंग ऑफ लॅन्ग्वेजेस, इन्फर्मेशन सिक्युरिटी मेथड्स इत्यादींशी असतो. संगणकक्षेत्रात करिअर करायचं म्हटलं की बुद्धिमत्ता, तर्कक्षमता व गणितीक्षमता हवीच. हार्डवेअरमध्ये काम करण्यासाठी सॉफ्टवेअरपेक्षा अधिक चांगली तर्कक्षमता व गणितीक्षमता हवी.

या गटातील विद्यार्थ्यांसाठीही अनेक स्तरांवर अभ्यासक्रम आहेत.- अॅडव्हान्स सर्टिफिकेट कोर्सेस जसे, हार्डवेअर अॅण्ड मार्केटिंग, असेम्बली अॅण्ड मेंटेनन्स, इंटरअॅक्टिव्ह मल्टिमीडिया डेव्हलपमेंट, प्रोग्रॅमिंग.

ऑनलाइन सर्टिफिकेट कोर्सेस जसे, कॉम्प्युटर इंजिनीयरिंग, फॉरेन्सिक्स, सायबर सिक्युरिटी, डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेशन, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अॅण्ड सिक्युरिटी, अॅण्ड्राइड डेव्हलपमेंट, क्लाऊड कॉम्प्युटिंग.

डिप्लोमा कोर्सेस, १२ वीनंतर किंवा पदवीनंतर जसे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, कॉम्प्युटिंग, मल्टिलिंग्वल कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग.

पदवीस्तरावर तीन प्रकारचे अभ्यासक्रम आहेत. बी.एससी. – कॉम्प्युटर सायन्स, आयटी व कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स. यातील बी.एससी. (कॉम्प्युटर सायन्स) हा अभ्यासक्रम विज्ञानशाखेच्या विद्यार्थ्यांसाठीच खुला आहे, पण बी.एससी. आयटी व कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स (बी.सी.ए.) हे दोन अभ्यासक्रम विज्ञान व वाणिज्यशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी खुले आहेत. याच विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षणही घेता येतं.

पदविकाअभ्यासक्रमामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटाबेस सिस्टम्स, न्युमरिकल कॉम्प्युटेशन, प्रोग्रॅमिंग लॅन्गवेजेस, सॉफ्टवेअर इंजिनीयरिंग, कॉम्प्युटर ग्राफिक्स यांसारखे विषय अभ्यासाला असतात. पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये रिमोट आणि वायरलेस सेन्सिंग नेटवर्क्स, एम्बेडेड सिस्टिम्स, कॉम्प्युटर कंट्रोल अॅण्ड कॉम्प्युटिंग, ह्युमन अॅण्ड कॉम्प्युटर इंटरअॅक्शन, रिसर्च अॅण्ड अॅनालिसिस, क्युरिकुलम डेव्हपलपमेंट अॅण्ड अॅनालिसिस यांसारखे विषय सामावलेले असतात.
सर्जनशील क्षेत्रांमध्ये संगणकाचं उपयोजन खूपच मोठ्या प्रमाणात होत आहे. उदाहरणार्थ, २डी अॅनिमेशन, ३डी क्रिएटिव्ह डिझाइन, व्हिडिओ गेम्स, वेब डेव्हलपमेंट, ग्राफिक्स, वेब डिझाइन साऊंड एडिटिंग, व्हिडिओ स्ट्रिमिंग, इमेज एडिटिंग इत्यादी. अशा क्षेत्रांमध्ये शिक्षण घेण्यासाठी असामान्य कल्पनाशक्तीची गरज आहे.

संगणकाशी परस्परनिगडित अभियांत्रिकी अभ्यासक्रम म्हणजे कॉम्प्युटर सायन्स, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन. यातील कॉम्प्युटर सायन्समध्ये थोडं हार्डवेअर आणि जास्त सॉफ्टवेअर, आयटीमध्ये फक्त सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशनमध्ये जास्त हार्डवेअर अशी विभागणी केलेली असते. हार्डवेअर व सॉफ्टवेअरमधील फरक व त्यासाठी लागणाऱ्या क्षमता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी शाखांची निवड करावी.

या शेवटच्या गटातील विद्यार्थ्यांमध्ये असामान्य बुद्धिमत्ता, तर्कक्षमता आणि गणितीक्षमता असणं गरजेचं आहे. संगणकाचं शिक्षण घेतल्यानंतर खासगी, कॉर्पोरेट किंवा शैक्षणिक क्षेत्रांमध्ये शिकवणं, सॉफ्टवेअर इंजिनीयर, हार्डवेअर इंजिनीयर, वेब डिझायनर, सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करणं असे पर्याय उपलब्ध आहेत. मूलभूत स्तरावर कॉम्प्युटर ऑपरेटर, अकाउंटंट यांसारखे पर्याय मर्यादित क्षमता उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत.

संगणकाच्या उच्च शिक्षणासाठी बरेच विद्यार्थी परदेशी जाण्याची संधी शोधतात. इतर देशांमध्ये संगणकाचं खूप चांगल्या दर्जाचं शिक्षण उपलब्ध आहे. काही मान्यवर विद्यापीठं म्हणजे स्टॅण्डफोर्ड, मॅसॅच्युसेट्स, एमआटी, ऑक्स्फर्ड, स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, केम्ब्रिज, कॅलिफोर्निया, इम्पिरियल कॉलेज, लंडन.

संगणक खरोखरच एक चमत्कार आहे. त्याचं आकर्षण सर्वांनाच आहे. त्याचं स्थान आपल्या आयुष्यात काय आणि किती ठेवायचं, गरजेपुरतं, सोय म्हणून, फायदा म्हणून की करिअर म्हणून हे प्रत्येकानं आपल्या बुद्धीची झेप, क्षमतांचा प्रकार आणि स्तर व मानसिक कल, आवड, ध्यास बघून ठरवायचं आहे. दिशा दाखवणारे बरेच तपशील या शृंखलेतील तीन लेखांमध्ये आहेत. त्यांच्या साहाय्यानं अनुरूप निवड करणं नक्कीच सोपं होईल.
अधिक माहितीसाठी- www.dte.org.inn
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link