Next
अप्रकाशित इतिहासाची झळाळी
मुलाखत : अश्विनी पारकर
Friday, June 07 | 04:00 PM
15 0 0
Share this story


इतिहासाची आवड लहानपणापासूनच होती का?
लहान असल्यापासूनच इतिहासाची आवड होती. शाळेत असताना शिक्षकांकडून तर कधी पुस्तके वाचून अनेक ऐतिहासिक गोष्टी जाणून घ्यायचो. माझ्या सुदैवानं ज्येष्ठ इतिहासकार निनाद बेडेकर आजोबांचे चांगले मित्र असल्याने त्यांचे घरी येणे-जाणे असायचे. त्यांची व्याख्याने लहान असल्यापासून ऐकत आल्याने इतिहासात अधिकच रुची निर्माण झाली. कालांतराने  बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी ओळख झाली. त्यांचे विचार ऐकायला मिळाले. मोठे झाल्यावर निनादकाकांच्या मार्गदर्शनाखाली ‘फर्जंद’ चित्रपटाचे कथानक लिहिले. आज निनादकाका नाहीत. परंतु ‘फर्जंद’ चित्रपटाला जे यश मिळाले ते केवळ त्यांच्याचमुळे…त्यांच्यामुळेच इतिहासाची गोडी आणि रुची वाढली.

कलाक्षेत्रातच यावे असे का वाटले?
खरे तर घरची कलाक्षेत्राची काहीही पार्श्वभूमी नाही. लहान असताना आम्ही जिथं राहायचो तिथल्या गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात  चुटकुल्यावरून मी नाटक बसवले होते. हीच माझ्यातील कलाकाराची सुरुवात असावी. आजच्या काळात वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे. नवीन पिढीला इतिहासाची ओळख व्हावी, इतिहासातील प्रसंग, घटना, त्यामागची कारणे, त्यातील गमतीजमती या पिढीला कळाव्यात म्हणून मी ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीचे स्वप्न पाहिले. इतिहासातील अनेक अज्ञात पैलू, गोष्टी मला चित्रपटाच्या माध्यमातून सांगायला आवडतात. ‘फर्जंद’ हा चित्रपट म्हणजे कोडांजी फर्जंद या योद्ध्याची कथा आहे. केवळ सात माणसांनी अडीच हजार शत्रूसैन्याचा कसा पराभव केला याची ही कथा. इतिहासातील ही घटना एकमेवाद्वितीय आहे. ही गोष्ट मी चित्रपटाच्या माध्यमातून सांगू शकलो याचा मला आनंद वाटतो.

तुमची अभिनयक्षेत्रातील वाटचाल कशी झाली?
माझे कलाशाखेचे पदवी शिक्षण हे इंग्रजी साहित्यातून व पदव्युत्तर शिक्षण संस्कृतमधून पुण्यात आबासाहेब गरवारे महाविद्यालयात झाले. शाळा आणि महाविद्यालयांतील सवाई एकांकिका स्पर्धातून पारितोषिके मिळाली होती. त्यामुळे रंगभूमीशी माझी नाळ शालेय जीवनापासूनच जुळलेली होती ती कॉलेजमध्ये गेल्यावर अधिक दृढ झाली. रंगभूमीला आपण सर्व कलांची माता म्हणतो. रंगभूमीची आवड ही लहानपणापासूनच होती. ती दिवसागणीक वृद्धिंगत झाली. माझ्या कलाक्षेत्रातील वाटचालीची सुरुवात पुण्यातील प्रायोगिक नाटकांपासून खऱ्या अर्थाने झाली. सत्यदेव दुबे यांच्या व्हॉईस कल्चरमध्ये मोठ्या प्रमाणावर रिसर्च केलेले प्राध्यापक श्यामराव जोशी यांच्याकडे गुरुकुल पद्धतीत नाट्यशिक्षण घेतले. त्यांच्या हाताखाली मी सुमारे दहा ते बारा वर्षे व्हॉईस कल्चर आणि नाटकाचा अभ्यास करत होतो.  पुढे विनय आपटे, संजय सूरकर यांच्या हाताखाली कामे केली. चित्रपटक्षेत्रात काम करत असताना रंगभूमीवरही काम सुरू आहे. रंगभूमीतील काही गोष्टींचा चित्रपट करताना उपयोग होतो. काही गोष्टी मी नटांकडून करवून घेतो. त्याची वेगळीच एक मजा आहे.

तुमचा आगामी चित्रपट ‘फतेशिकस्त’ नेमका काय आहे?
‘फतेेशिकस्त’ हीदेखील ऐतिहासिक पराक्रमाची कथा. या कथेत कमीत कमी संख्येने असलेली माणसे जास्ती जास्त लोकांचा कसा पराभव करतात याची ही गोष्ट. आपण आता सर्जिकल स्ट्राईकविषयी ऐकतो-पाहतो. हा इतिहास म्हणजे त्या काळचा सर्जिकल स्ट्राईक होता. यामध्ये महाराजांचे नियोजन, त्या भागाची भौगोलिक माहिती घेण्याची बुद्धी, मानसशास्त्राविषयी महाराज काय विचार करत होते या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला मिळते. या चित्रपटाच्या माध्यमातून फर्जंदपेक्षा आणखी भव्यदिव्य चित्रपटाची निर्मिती करण्याचा माझा मानस आहे.

ऐतिहासिक चित्रपट करताना इतिहासातील सच्चेपणा व मनोरंजन याचा समतोल कसा साधता?
इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून समोर आणताना त्याच्यातील सच्चेपणा आणि मनोरंजन याचा समतोल साधणे महत्त्वाचे आहेच. आपले इतिहासातील मराठा योद्धे दाखवताना ते कुठेही सुपरहिरो वाटता कामा नयेत याची काळजी घ्यावी लागते. ती माणसे आहेत आणि तशीच वाटली पाहिजे याचा समतोल साधावा लागतो. ‘फर्जंद’मुळे पुढील चित्रपटाविषयीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्याची जबाबदारी निश्चित जाणवते.

फतेशिकस्तलाच फर्जंदची टीम पुन्हा अभिनय करते आहे, याबाबत काय सांगाल?
‘फर्जंद’चीच टीम ‘फतेशिकस्त’ चित्रपटाच्यानिमित्ताने पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे. ही टीम महाराजांविषयी अतीव प्रेम आणि श्रद्धा असणारी टीम आहे. चिन्मय मांडलेकर, अंकित मोहन, मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, हरिश दुधाडे, निखिल राऊत ही मंडळी कोणत्याही व्हॅनिटी व्हॅन अथवा सुखसोयींविना तन्मयतेने काम करत आहेत. आम्ही या चित्रपटाचा लूक भव्यदिव्य ठेवण्यासाठी राजगडावर चित्रण केले आहे. त्यावेळी सर्व कलाकार कोणतीही तक्रार न करता राजगड चढले. आम्ही पूर्ण सामान राजगडावर चढवले. तिथेच खिचडीभात करून खाल्ला. ही मजा या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने आम्ही अनुभवतो आहोत.

ऑपरेशन जटायू, चॅलेंज आणि मृत्युंजय या नाटकांना प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा आहे?

तिन्ही नाटकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद आहे. ‘हे मृत्युंजय’चा आता कोकण दौरा सुरू आहे. त्याचे प्रयोग हाऊसफुल होत आहेत. प्रेक्षक बाहेर उभे राहून नाटक ऐकतात. तीनशे-साडेतीनशे प्रेक्षक नाट्यगृहाच्या बाहेर उभे राहून नाटक ऐकत आहेत, असा अनुभव आम्हाला आला आहे.

‘हे मृत्युंजय’चा प्रयोग हा स्वेच्छामूल्यावर चालतो, यामागचे नेमके कारण काय?
‘स्वेच्छामूल्य’ म्हणजे काय तर तुम्ही नाटक पाहिल्यावर तुम्हाला जर नाटक आवडले ते पुढे जावे असे वाटत असेल तर तुम्हाला वाटेल तेवढी आर्थिक मदत तुम्ही नाटकाला करायची असे त्याचे स्वरूप आहे. हे प्रयोग ठरावीक रकमेची तिकिटे विकून होत नाहीत. आजकाल बऱ्याच मराठी नाटकांमध्ये स्वेच्छामूल्याचे प्रयोग होत आहेत. स्वेच्छामूल्य ही संकल्पना दिग्दर्शक दिनू पेडणेकर यांची आहे. ‘हे मृत्युंंजय’मधून माझ्याकडून सावरकरांचे विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. सावरकरांविषयीचे समज-गैरसमज दूर करण्याचा प्रयत्नही नाटकातून केला जात आहे. केवळ सावरकरच नव्हे तर मदनलाल धिंग्रा, व्ही.व्ही.एस. अय्यर तसेच ज्याला सर्वात तरुण क्रांतिकारक म्हटले जाते ते नानी गोपाळ अशा क्रांतिकारांचे चरित्रही नाटकात आहे.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link