Next
शुभंकर्स ‘डे’!
नितीन मुजुमदार
Friday, November 16 | 04:00 PM
15 0 0
Share this storyदिवाळीच्या आधीच शुभंकर डे याने विजयाचा फटाका फोडला. सुपर १०० दर्जा असलेल्या कारकिर्दीतील ग्रँड प्रिक्स स्पर्धेतील आपले पाहिलेवाहिले अजिंक्यपद मिळवताना त्याने याच स्पर्धेदरम्यान बॅडमिंटनमधील लिजेंड लिन डॅनला हरवून आपल्या यशाला सोनेरी किनारही लावली! लिन डॅनची कारकीर्द भलेही आज अखेरच्या टप्प्यात असेल, त्याच्यावरील हा विजय शुभंकरच्या भावी कारकिर्दीसाठी नक्कीच खूप प्रेरणादायक ठरेल. या विजयामुळे आणि त्याच स्पर्धेतील अजिंक्यपदामुळेही, शुभंकरचे १ नोव्हेंबर रोजी ६४वे असलेले जागतिक रँकिंग नक्कीच काहीशा वरच्या दिशेने झेप घेईल. लिन डॅनच्या नावावर पाच जागतिक अजिंक्यपदे तर दोन ऑलिंपिक सुवर्णपदके (२००८ आणि २०१२) जमा आहेत. तब्बल सहा वेळा त्याने ऑल इंग्लंड स्पर्धाही जिंकली आहे. अशा या महान खेळाडूस पराभूत करून आपल्या कारकिर्दीतील एका अत्यंत महत्त्वपूर्ण दिवसाची नोंद केली, तो दिवस शुभंकर्स ‘डे’ होता हेच खरे!

डेन्मार्कहून ‘झी मराठी दिशा’ला खास मुलाखत देताना २४ वर्षीय शुभंकरने मनमोकळा संवाद साधला. शुभंकर सध्या वर्षातील काही काळ डेन्मार्कमध्ये असतो. तेथील सर्किटमध्ये त्यामुळे खेळणे त्याला सोपे जाते. जागतिक रँकिंग चारवर असलेला व्हिक्टर ऍक्सलसन हा डेन्मार्कचाच. लिन डॅनवरील विजयानंतर त्याने शुभंकरला टेक्स्ट मेसेज करून त्याचे अभिनंदनदेखील केले होते.

शुभंकरच्या कारकिर्दीच्या महत्त्वाच्या टप्प्याची सुरुवात एखाद्या टिपिकल हिंदी चित्रपटात अगदी फिट होईल अशी झाली. बॅडमिंटनमध्येच करिअर करायचे म्हणून वडीलधाऱ्या मंडळींची परवानगी न घेता स्वारी कोलकात्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसली! शुभंकर वयाच्या पंधराव्या वर्षीच १९ वर्षांखालील वयोगटाचा स्टेट चॅम्पियन झाला होता. त्यानंतर त्याला काही वर्षांतच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी आली. शुभंकर याबाबत सांगतो,“मला ही नोकरी स्वीकारायची नव्हती, कारण पूर्ण वेळ बॅडमिंटनमध्ये करिअर करायचे होते. मात्र मी ही नोकरी लगेच स्वीकारावी असे माझ्या आईवडिलांना वाटत होते. मग मी मुंबईत श्रीकांत वाडसरांशी बोललो. घरात कोणाशीही काहीही न बोलता ५०० रुपयांची नोट खिशात टाकली आणि मुंबईची वाट पकडली.” बादल भट्टाचार्य हे शुभंकरचे सुरुवातीचे प्रशिक्षक. शुभंकर म्हणतो, “मी जो काही आज आहे त्यात भट्टाचार्यसरांचा मोठा वाटा आहे. त्यांना माझ्या गुणवत्तेबाबत खूप विश्वास होता.”
शुभंकर मुंबईत नामवंत बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्याकडे दोन वर्षे होता. वाडसरांनी त्याला काहीही फी न घेता प्रशिक्षणच दिले असे नव्हे, तर ठाण्यात स्वतःच्या घरी त्याची निवासाची व्यवस्थादेखील केली. त्यानंतर त्याने बेंगळुरूमध्ये टॉम जॉन यांच्याकडे प्रशिक्षण घेतले. टॉम जॉनसरांनी त्याला आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनकडे वळण्यास प्रवृत्त केले. २०१६पासून तो कोपनहेगन, डेन्मार्कमध्ये राहून प्रशिक्षण घेण्यावर व तेथील स्थानिक तसेच युरोपीयन स्पर्धा खेळण्यावर भर देत आहे. तेथे तो ग्रॅव स्ट्रान्ड्स क्लबकडून खेळतो.

शुभंकरची मोठी बहीण मौमिता दास हिचा त्याची कारकीर्द घडवण्यामध्ये मोठा वाटा आहे. शुभंकर मौमिताबद्दल सांगतो, “मी आज जो काही आहे तो तिच्यामुळे! आजही मला ते दिवस चांगले लक्षात आहेत जेव्हा मी नऊ वर्षांचा होतो. आमचे राहते घर बेलघरीया येथे होते. तेथून मी सराव करत असलेला रायपूर क्लब खूप लांब होता. फक्त तेथे जायलाच त्यावेळी दोन तास लागत. अशा परिस्थितीत मौमिता दुपारी ३ ते रात्री ११.३० पर्यंत माझ्याबरोबर असे. पाच तास सराव असे त्यावेळी ती तेथील कॅन्टिनमध्ये भरपूर डासांना तोंड देत एकटी बसून राही. आजही मी माझ्या बाबतीतील प्रत्येक गोष्ट तिच्याशी बोलतो.”

गेल्या वर्षी भारतातील बॅडमिंटन प्रीमिअर लीगमध्ये शुभांकरची निवड झाली नव्हती. मात्र बेंगळुरू ब्लास्टर्सने त्याला त्यावेळी अनफिट झालेल्या हर्षिल दाणीऐवजी नंतर संघात घेतले. यंदाही बॅडमिंटन प्रीमिअर लीगमध्ये त्याला स्थान मिळालेले नाही. त्याच्यापेक्षा खाली रँक असलेले शटलर्स मात्र निवडले गेलेले दिसतात.
शुभंकरची संपूर्ण कारकीर्द काहीशी एकला चलो रे पद्धतीची. मध्यमवर्गीय कुटुंबातील शुभंकर आजही स्पॉन्सरशिप मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. पुण्याच्या लक्ष्य इन्स्टिट्यूटतर्फे त्याला दरवर्षी शिष्यवृत्ती मिळते. रेल्वेमध्ये नोकरी करणाऱ्या शुभंकरला आणखीही काही पुरस्कर्ते मिळणे गरजेचे आहे. २०१७ साली त्याने राष्ट्रीय सीनिअर बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत बी साई प्रणिथला हरवले होते. सुपर सीरिज दर्जाची स्पर्धा जिंकणाऱ्या अगदी मोजक्या भारतीय शटलर्सपैकी प्रणिथ एक आहे. शुभंकरने अधिकाधिक अग्रमानांकित भारतीय शटलर्सशी खेळणे गरजेचे आहे आणि हे तो स्वतः बोलूनही दाखवतो.

प.बंगालमध्ये त्याने स्वतःच्या नावाने अकादमीही चालू केली आहे. सध्या दोन कोर्ट व सुमारे ६० प्रशिक्षणार्थी असे अकादमीचे स्वरूप आहे. शुभंकरची भावंडे तेथे त्याला मदत करतात. नजीकच्या काळात जागतिक रँकिंगमध्ये ४०च्या आत येण्यासाठी तो प्रयत्नशील असेल. आगामी ऑल इंग्लंड स्पर्धा खेळण्यासही तो उत्सुक आहे.

डेन्मार्कमध्ये काही वर्षे व्यतीत करूनही त्याला बॅडमिंटनमधील डॅनिश लिजेंड मॉर्टेन फ्रॉस्ट हेंसेनला अजून भेटता आलेले नाही. अगदी अलिकडे मॉर्टेन फ्रॉस्ट डेन्मार्कमध्ये परतला असून तत्पूर्वी तो सुमारे अडीच वर्षे मलेशियात बॅडमिंटनचा टेक्निकल डायरेक्टर होता.

जर्मनीतील सुपर १०० दर्जाची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्यामुळे शुभंकरचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. आता याचा उपयोग त्याने आगामी वर्षातील स्पर्धांमध्ये केला, तर ती बाब त्याच्या कारकिर्दीला मोठे वळण देणारी ठरेल!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link