Next
...आणि मी घडत गेले
मृण्मयी देशपांडे
Friday, July 12 | 03:00 PM
15 0 0
Share this story

नमस्कार, या क्षेत्रात माझी सुरुवात कशी झाली, त्याविषयी मी लेखाच्या पहिल्या भागात लिहिलं होतं.  शाळेपासूनच मला नाटकात कामं करण्याची संधी मिळत होती आणि मग कॉलेज, हौशी रंगभूमीवर काम करत असतानाच ‘अग्निहोत्र’ ही पहिली टीव्ही मालिका मिळाली. इथपर्यंत सगळं ठरल्याप्रमाणे घडत गेलं. परंतु त्यानंतर चारच महिन्यात  ‘कुंकू’ मालिका सुरू झाली आणि माझी तारेवरची कसरतही! तिथून माझ्या मुंबई-पुणे-मुंबई या रोजच्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू झाला.

‘अग्निहोत्र’ चे चित्रिकरण पुण्यात आणि ‘कुंकू’चं चित्रीकरण मुंबईत व्हायचं. एकावेळी दोन डेलिसोप करणं हेच मोठं आव्हान होतं. म्हणजे तीस दिवसांचा महिना असेल, तर मी चाळीस दिवस काम कारायचे. तेव्हा असं झालं होतं की, मला अर्धा दिवस जरी मिळाला तरी मी पुण्याला जायचे. मला काम करायला आवडतं, पण त्याचा अतिरेक झाला होता. एकदा तर सलग चार दिवस सकाळी मुंबईत शूटिंग करून मी संध्याकाळी पुण्याला जायला निघायचे आणि रात्री पुण्यात शूटिंग करून पुन्हा सकाळी मुंबईत शूटिंगच्या ठिकाणी हजर व्हायचे. तीन दिवस चार रात्री सलग मी अशा पद्धतीने काम केलं होतं आणि चौथ्या दिवशी जेव्हा मी रात्री विश्रांती घ्यायला गेले, तेव्हा माझे डोळेच मिटेनात. मी डोळे मिटले की त्रास होत होता.  शेवटी मग आजी-आजोबा माझ्या मदतीला अक्षरशः धावून आले आणि बोरिवलीत आम्ही तात्पुरते राहू लागलो. 

‘अग्निहोत्र’मालिका संपली आणि काही दिवसातच ‘एका पेक्षा एक’ सुरू झालं.  तेव्हा मी सकाळी सहा वाजता बोरिवलीहून निघून गोरेगावला ‘कुंकू’चं शूटिंग करायला जात असे. संध्याकाळी तिथून निघून जुहूला जायचं आणि नृत्याची तालीम करून रात्री उशिरा घरी पोहोचायचं, असा माझा दिनक्रम होता.  म्हणजे रात्री दीड-दोन वाजता घरी पोहोचायचं आणि पहाटे उठून पुन्हा गोरेगावला ‘कुंकू’च्या सेटवर पोहोचावं लागे.  असं पाच-सहा महिने मी केलं. ‘एका पेक्षा एक’चं ते पहिले पर्व होतं आणि मी ते जिंकले होतं. त्यामुळे त्याचा आनंद वेगळाच होता. माझ्या आयुष्यातील तो पहिला रिएलिटी शो होता आणि तो मला जिंकायचाच होता. मी त्याकडे खूपच गांभीर्याने बघत होते. एकूणच ती तीन-चार वर्ष माझ्यासाठी खूपच धावपळीची होती.  घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय यातलं काहीच शक्य झालं नसतं. ‘कुंकू’ मालिकेने मला काय दिलं असं कुणी विचारलं तर मी सांगते की, ‘कुंकू’ मालिकेने मला सगळचं दिलं. सुहास मावशी(सुहास जोशी), सुनील दादा (सुनील बर्वे), आमचा दिग्दर्शक मंगेश कठाळे आणि इतरही बरेच कलाकार होते. तिथे ज्येष्ठ-कनिष्ठ असं काहीच नव्हतं. आम्ही सगळे एकमेकांचे मित्र बनलो होतो. अजूनही प्रेक्षक त्या मालिकेची आठवण काढतात. ती मालिका संपत आली तेव्हाच मला नवीन काहीतरी करण्याचे वेध लागले होते. एक काम सातत्याने अनेक वर्षं केलं की मला नवीन आव्हानांचे वेध लागतात. एक मालिका अनेक वर्षं केली की त्यात नवीन काही राहत नाही. त्या व्यक्तिरेखेचं हसणं, बोलणं, रडणं सगळं ठरून जातं. त्याचवेळी ‘झी’नेही ती मालिका आवरती घेतली. कलाकृतीचा जीव ओळखून कुठे थांबायचं हे पक्क माहीत असलं की ती कलाकृती आणखी जास्त काळ  लोकांच्या स्मरणात राहते. 

टीव्ही मालिकांवर कधी प्रेक्षक कौतुकाचा वर्षाव करतात तर कधी टोकाची टीका करतात. तशीच टीका ते कलाकारांवरही करतात.  आत्तापर्यंत कामावरून माझ्यावर कधी कठोर टीका झालेली नाही किंवा भयंकर ट्रोलिंगला वगैरे सुदैवानं सामोरं जावं लागलेलं नाही. पण पुढचं काही सांगता येत नाही, कशा भूमिका वाट्याला येतील ते! अर्थात ट्रोल करायला आजकाल डोकं लागत नाही. कुणीही कुणालाही ट्रोल करतात.  ‘कुंकू ’मालिकेच्या बाबतीत सांगायचं, तर त्या मालिकेच्या टीकाकारांपेक्षा त्याचे चाहते अधिक होते.  ‘कुंकू’ मालिका संपली आणि लगेचच माझं चित्रपटांसाठी शूटिंग सुरू झालं. या क्षेत्रात आल्यापासून जवळ-जवळ सहा वर्षं मी रोज कुठे ना कुठे शूटिंग करत होते. त्यामुळे मध्ये आराम असा मिळालाच नाही.  त्यादरम्यान ‘ध्यानीमनी’, ‘मोकळा श्वास’, ‘पुणे व्हाया बिहार’,‘आंधळी कोशिंबीर’, ‘संशयकल्लोळ’ हे चित्रपट मी करत होते. या काळातही माझं  मुंबई-पुणे-मुंबई जाणं–येणं सुरूच होतं... ते मागील तीन वर्षांपूर्वी थांबलं, जेव्हा माझं लग्न झालं आणि मला मुंबईतच  माझं कुटुंब मिळालं.  आधी तर असं व्हायचं की आईची, घराची आठवण आली की मी अर्ध्या दिवसात पुण्याला जाऊन यायचे; आता तसं होत नाही.  गंमत अशी झाली की मी मुंबईत आले आणि पुण्यात शूटिंग असलेली कामं वाढली.  आजकाल शूटिंग कुठेही असू शकतं.  गेल्या काही महिन्यात तर मी मुंबईत शूटिंगच केलं नाहीये.

 या क्षेत्राचा असा एक नियम आहे की तुम्हाला तुमच्या कामातून काम मिळत जातं. माझ्याबाबतीत तेच झालं. मला एका कामातून दुसरं काम मिळत गेलं. ‘मोकळा श्वास’ हा माझा पहिला चित्रपट.  कांचन अधिकारी यांनी ‘कुंकू’ मालिकेतील माझं काम बघूनच मला ‘मोकळा श्वास’ साठी फोन केला होता.  बऱ्याचदा असं होण्याची शक्यता असते की तुम्ही एक भूमिका अनेक वर्ष केली की तोच शिक्का बसतो की काय असं वाटत राहतं. पण त्यासाठी मी माझ्या सगळ्या दिग्दर्शकांची ऋणी आहे की त्यांनी मला नेहमीच वेगवेगळ्या भूमिका करायची संधी दिली. यातून मी घडत गेले. मलाही कुठेतरी वाटत होतंच की माझ्यावर एकच एक शिक्का बसू नये.  ‘कुंकू’ नंतर लगेचच आलेल्या ‘धामधूम’ मध्ये मी टॉमबॉयचं काम केलं होतं. ‘मोकळा श्वास’ मधील भूमिका तर अजूनच वेगळी होती. त्यामुळे मी एकाच पठडीत अडकून पडेन की काय, अशी कधी भीती वाटली नाही. ‘पुणे व्हाया बिहार’ मध्ये तर मी एकदमच वेगळं असं बिहारी मुलीचं काम केलं होतं. ‘नटसम्राट’, ‘फर्जन्द’ मधील भूमिकाही भिन्न जातकुळीच्या होत्या. आमच्या क्षेत्रातले लोक जेव्हा मला ओळखायला लागले तेव्हा त्यांना कळलं की, ‘ही कुंकू मधली जानकी मुळीच नाही. हे जरा वेगळं प्रकरण आहे.’  आणि मग वेगवेगळ्या भूमिका मिळत गेल्या. टाइपकास्ट होण्याची भीती प्रत्येकाला असते आणि ती आपण खोडून काढू शकत नाही, त्यासाठी दिग्दर्शकांची साथ लागते. सुदैवाने वेगवेगळ्या भूमिकांसाठी माझा विचार करणारे दिग्दर्शक मला भेटत गेले. एखाद्या भूमिकेला हो म्हणतानाही मी हाच विचार करते की एकतर ती मला आवडली आहे का आणि दुसरं म्हणजे आधीच्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे का!  आतापर्यंत मी हे निकष पाळत आले आहे. या वळणावर मला एक अतिशय सुंदर चित्रपट मिळाला तो म्हणजे ‘कट्यार काळजात घुसली.’ त्याविषयी आणि आणखी काही महत्त्वाच्या चित्रपटांविषयी बोलेन पुढच्या भागात...
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link