Next
विधींची खोगीरभरती
मंगला मराठे
Friday, August 23 | 03:30 PM
15 0 0
Share this story

पूर्वी घरासमोर मांडव घालून चार दिवस चालणारा लग्नसोहळा आता आपण अर्धा दिवस हॉल घेऊन करतो. तेवढ्या वेळात अनेकांना सर्व पारंपरिक विधींसह लग्न करायचे असते. म्हणून सगळे विधी घाईघाईत उरकले जातात. त्यात काही विधी थप्पा मारून आल्यासारखे ‘म्हटले तर केले, वगळले नाहीत’ असे वाटण्यापुरतेच केले जातात. ‘या विधींना अर्थ असतो’, ‘त्यामुळे मुलांवर संस्कार होतात’ असे म्हणत हे विधी केले जातात. केवळ भोज्याला शिवल्यासारखे विधी करून त्यांचा अर्थ मुलांना समजतो का? तर्क लावून विचार केला तर लक्षात येते की लग्नसोहळ्यातील बरेच विधी आता काळाशी सुसंगत राहिलेले नाहीत. उदाहरण म्हणून त्यातल्या काही विधींचा विचार करूया-
मुहूर्त– हा लग्नाच्या तयारीची सुरुवात म्हणून साधारणत: घरात केला जातो. काही जण तो हॉलमध्येच प्रतीकात्मक हळद कांडून करतात. पूर्वी लग्नाच्या जेवणापासून सर्व घरातच केले जायचे. त्यासाठी जास्तीची तयारी करावी लागे. त्याची सुरुवात म्हणून हळद, पापड करणे अशी तयारी करणे म्हणजे मुहूर्त. आता आपण सगळ्याचे कंत्राट देतो.
केळवण– घरातल्या मंडळीना, विशेषत: स्त्रियांना लग्नाच्या तयारीचे भरपूर काम असायचे. मग त्यांचा रोजच्या स्वयंपाकाचा वेळ आणि कष्ट वाचावे म्हणून आजूबाजूचे लोक या मंडळींना जेवायला बोलावीत. शिवाय सासरी गेलेली मुलगी वारंवार माहेरी येत नसे. म्हणून तिचे लाड करून घ्यायचे. यातून केळवणाची पद्धत आली असावी. आता हे कारणच उरले नाही. तरीही केळवणं होतातच.
प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी तर असे कितीतरी विधी आहेत, की ते केवळ रूढी म्हणून आलेले आहेत-
वाङ्निश्चय- वाङ्निश्चय म्हणजे मुलामुलींचे लग्न पक्के केल्याचे पालकांनी एकमेकांना तोंडी वचन देणे. हल्ली काही जण विधीपूर्वक, समारंभपूर्वक साखरपुडा करतात, तरीही लग्नाच्या दिवशी वाङ्निश्चयविधी करतात.
सीमांतपूजन- पूर्वी लग्न वधूच्या घरी मांडव घालून होत असे. वराकडची मंडळी वधूच्या गावात येत. तेव्हा या वऱ्हाडाला गावाच्या वेशीपासून जानवस्यापर्यंत घेऊन येण्यासाठी, वाट दाखवण्यासाठी वधूकडची वडीलधारी माणसे जात. प्रवास करून आलेल्या मंडळींना हातपाय धुवायला पाणी आणि चहा-फराळ देत. हा साधा गृहस्थधर्म होता. पुढे हळूहळू विहिणीचे पाय धुणे, वराकडच्या इतर बायकांचे पाय धुणे असे त्याचे रूप झाले. पाय धुण्याचा हा कार्यक्रम काही वेळा खूप वेळ चालतो आणि त्यात मानापमानाचा खेळही होतो.
रुखवताचे जेवण- लग्न लागण्यापूर्वी वराकडच्या मंडळींची एक छोटेखानी पंगत होते. पूर्वी लहानपणी लग्ने होत म्हणून हे जेवण मुख्यत: नवरा मुलगा आणि त्याची भावंडे यांना म्हणजे वऱ्हाडातल्या लहान मुलांना वाढले जाई. कारण तेव्हा केटरर, नाश्ता ह्या सोयी नव्हत्या. रुखवताची पंगत शास्त्र म्हणून घाईगडबडीने मांडली जाते, मंडळी पानावर बसतात, थोडेसे काहीतरी खाऊन रीत निभावतात आणि बरेचसे पानात टाकून उठतात. तीच गोष्ट रुखवत मांडण्याची. एक कल्पना अशी होती की मुलीने केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू तिच्या सासरच्या मंडळींनी बघाव्या. तिच्या गुणांची त्यांना ओळख व्हावी. आता ही कल्पना कोसो दूर गेली आहे. मुलीला नातेवाईकांनी कौतुकाने करून दिलेल्या वस्तू ठेवल्या तरी एकवेळ ठीक, पण अनेकदा रुखवत ठेवायचे म्हणून महागड्या वस्तूंचे प्रदर्शन मांडले जाते. रुखवतात सजविलेले खाद्यपदार्थ ठेवले जातात. काही ठिकाणी पूर्वी अशी पद्धत होती की हे पदार्थ नव्या नवरा-नवरीने वाटून घायचे. उद्देश हा की शेअरिंग रुजावे आणि मुलीला नवीन घरात थोडी मजा वाटावी. आता मुली मोठ्या असतात. त्यांना रुळण्यासाठी खाऊ आणि खेळाची गरज नाही.
मुलीची जबाबदारी सोपवणारे विधी– काही लग्नांत मुलीचे पालक मुलाकडच्या वडीलधाऱ्या मंडळींच्या डोक्यावर तेवते दिवे असलेले सूप ठेवतात. काही ठिकाणी वधू सासरच्या वडीलधाऱ्यांना ओवाळते. प्रत्येक जण तिला ओवाळणी घालतो. अर्थ हा की हे दिव्याचे सूप डोक्यावर असले तर जितक्या काळजीने सांभाळाल तसेच मुलीला सांभाळावे. पूर्वी सांभाळ करावा लागेल अशा वयात मुलींची लग्ने होत. आता या विधीचा कार्यकारणभावच निघून गेला आहे.
‘आमच्यात असे असते, ही आपली संस्कृती-परंपरा आहे’, असे म्हणत असे विधी चालू राहिले आहेत. यातले बहुतांश विधी वरपक्षाला, विशेषत: वरमाईला खुश ठेवण्यासाठी असतात. या विधींसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करणे, त्या आठवणीने हॉलवर आणणे आणि त्या त्या वेळी हाताशी हजर ठेवणे हे एक मोठे काम असते. कामाबरोबर टेन्शन आणि धावपळही वाढते. वरपक्षाचा इगो सुखावतो आणि वधुपक्षाला ‘लग्न व्यवस्थित करून दिले’ अशी शाबासकी मिळते, इतकेच या विधींचे फलित!
आपली मुलगी त्या घरात जाणार म्हणून त्या घरातल्या लोकांची विशेष खातीरदारी करायची. ‘आता असं काही राहिलेले नाही तरी आपण हौस म्हणून करतो,’ असे म्हटले जाते. हल्ली कार्यात चिडचिड करणे, रुसून बसून कार्याचा खोळंबा करणे असे बटबटीत प्रकार कमी झालेत. हे सर्व विधी वधुपक्षाला वरपक्षासमोर झुकविणारे आहेत. या विधींमधून समाजातली पुरुषप्रधानता ठळकपणे अधोरेखित केली जाते. मुलांच्या गृहस्थाश्रमाचा पाया घालतानाच आपण लिंगभावभेदाला खतपाणी घालतो.
काळाच्या ओघात निरर्थक बनलेल्या आणि वधुपक्षाला दुय्यमपणा देणाऱ्या या विधींना आता रजा द्यायला हरकत नाही. विधींची ही खोगीरभरती टाळली तर समारंभ सुटसुटीत होईल. मुख्य विधी अधिक व्यवस्थितपणे, समजून घेऊन करता येतील. मानपानाच्या ओझ्याशिवाय केवळ आनंदसोहळा साजरा करता येईल.नव्या सोयरिकीची सुरुवात आणि नवदांपत्याच्या संसाराची पायाभरणी निर्मळ, सशक्त होईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link