Next
हे असंच व्हायचं होतं... (भाग १)
मृण्मयी देशपांडे
Friday, July 05 | 04:00 PM
15 0 0
Share this story

नाटक, अभिनय या क्षेत्रांत मी कशी आले, याबद्दल मला लोक नेहमी विचारतात. काहींना वाटतं ‘अग्निहोत्र’ मालिकेतून आले तर काहींच्या मते ‘कुंकू’माझी पहिली मालिका. परंतु हे टप्पे गेल्या काही वर्षांतले. अभिनयाची सुरुवात म्हणाल, तर ती शाळेतच झाली होती.  शाळेत मी नाटकात भाग घ्यायचे. अभ्यासापेक्षा नाटकाकडेच ओढा असायचा. माझे आई-बाबा आणि आजी-आजोबा हेसुद्धा नाटकात काम करायचे. त्यामुळे घरून पाठिंबा होताच. आजी-आजोबा सोलापूरच्या नाट्यसंस्थेत अनेक वर्ष कार्यरत होते.  आई-बाबासुद्धा नाटकात भाग घ्यायचे. त्यामुळे तो वारसा घरूनच मिळाला. इयत्ता पाचवीपासून शाळेच्या नाटकात काम करू लागले. मग तिथून आवड निर्माण झाली आणि या विषयाची गोडीच लागली. नाटक, रंगभूमी आवडू लागली. तिथे मी रमू लागले. बाईंनी दिलेली भूमिका मी चांगल्या पद्धतीने वठवू लागले. शाळेत कौतुक व्हायचं, त्यामुळे आत्मविश्वास वाढला. पुढे मग कॉलेजला गेल्यावर तर अधिक मोठ्या संधी आणि प्रोत्साहन मिळत गेलं. भविष्यात मी याच मार्गावरून पुढे जाणार हे जवळपास निश्चित झालं. माझ्याही आधी याची याची कल्पना आईला होती. त्यामुळे माझ्या नाटकातल्या कामगिरीबद्दल तिला काही संगितलं की ती, ‘हे तर होणारच होतं. मला माहीत होतं’ असं म्हणायची.  माझ्या चांगल्या कामगिरीबद्दल एवढी खात्री आणि विश्वास तिला असायचा. तिचा तोच स्वभाव म्हणा किंवा गुण म्हणा माझ्यात उतरला आणि माझ्या कामगिरीबद्दल मग मीही अधिकाधिक जागरूक राहून आत्मविश्वासाने काम करत गेले.
 ‘आपल्याला येतंय’ हा विश्वास माझ्याही मनात दृढ झाला. दिग्दर्शक सांगेल त्याप्रमाणे आपल्याला काम करता येतं, संवाद म्हणता येतात हे लक्षात आलं.  त्यामुळे मी काही वेगळं करतेय असं वाटलंच नाही. शाळेतल्या सगळ्याच शिक्षकांनी खूप पाठिंबा दिला. एकही वर्षं असं गेलं नाही की मला नाटकात बक्षिस मिळालं नाही. पुढे एस.पी. कॉलेजमध्ये गेल्यावर संधीचं आणखी एक दालनच उघडलं गेलं. कॉलेजमध्येही प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायचे. एकही स्पर्धा सोडली नाही. कॉलेजची पाचही वर्षं नाटकातून सतत कामं केली. मला आठवतंय, ‘चुहे’ ही कॉलेजमधली पहिली एकांकिका. त्यावर्षीची सगळी बक्षिसं त्या एकांकिकेला मिळाली. महाविद्यालयीन स्तरावरचं अभिनयाचं पहिलं परितोषिक मला पहिल्यांदाच मिळालं. त्यानंतर मग तो सिलसिला सुरूच झाला. एक स्पर्धा झाली की दुसरी, मग तिसरी.  त्यानंतर पहिलं वळण आलं ते ‘पोपटी चौकट’या एकांकिकेच्या निमित्ताने. मी दिग्दर्शित केलेली ती पहिली एकांकिका. त्यात मी आणि सिद्धू (सिद्धार्थ चांदेकर) दोघं होतो.  त्यावर्षीच्या सर्व राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांमध्ये ती एकांकिका सगळीकडे पहिली आली होती. पुरूषोत्तम करंडक, सकाळ करंडक, पुल करंडक, आयएनटी, गडकरी करंडक  आणि या  सगळ्यावर कळस चढवला तो सवाई एकांकिका स्पर्धेने. तिथे आम्ही सगळ्याच बाबतीत सर्वोत्कृष्ट पुरस्कारांचे मानकरी ठरलो. ती एकांकिका अनेकांनी बघितली. अजूनही त्या एकांकिकेची लोक आठवण काढतात.  त्यानंतर मी आणि सिद्धूनं मागं वळून पाहिलंच नाही. त्या एकांकिकेतील आमचं काम श्रीरंग गोडबोले यांनी पाहिलं होतं. ती एकांकिका झाली आणि मग आम्हाला ऑडिशनसाठी बोलावलं. मी आणि सिद्धू एकत्रच गेलो,  तिथे पुन्हा आम्हा दोघांची  निवड झाली आणि आमच्या दोघांच्याही आयुष्यात एक महत्त्वाचं वळण आलं ते ‘अग्निहोत्र’ मालिकेच्या रूपानं.  मालिका खूप गाजली. मोठी स्टारकास्ट, दिग्गज कलाकार असलेल्या त्या मालिकेत आम्हाला महत्त्वाच्या भूमिका मिळाल्या. तेव्हाही आई हेच म्हणाली, ‘हे तर होणारच होतं.’ माझ्या सुदैवाने खूप चांगली माणसं भेटत गेली आणि त्यांच्याकडून कळत-नकळत अनेक गोष्टी शिकत गेले. सुरूवातीला काम मिळवण्यासाठी फार संघर्ष करावा लागला नाही; कारण शाळा-कॉलेजमधली नाटकं, मग एकांकिका स्पर्धा आणि तिथून मालिका – हे सगळं ठरवल्याप्रमाणे घडत गेलं आणि मीही ते सहज करत गेले. त्यामुळे मला कधी फार दडपण यायचं नाही. दिग्दर्शक सांगेल तसं काम करता येईल हे पक्कं ठाऊक होतं. त्यामुळे मालिका करतानाही वेगळं वाटलं नाही.  मी खूष होते आणि आत्मविश्वासही बऱ्यापैकी दुणावला होता. नाटकातूनच तो आला असावा, कारण तेव्हा ती एक झिंग होती. कॉलेजमध्ये सगळंच जिंकलं होतं, त्यामुळे तिथूनच तो आत्मविश्वास आला असावा. घरी आई-बाबाही खूष होते. परंतु ते कधीच अवाजवी खूष व्हायचे नाहीत, कोणत्याही बाबतीत. विशेषतः मला मिळणाऱ्या बक्षिसांच्या बाबतीत किंवा जे यश मिळत होतं त्याचं त्यांनी कधीही अवास्तव कौतुक केलं नाही. ‘हे तर अपेक्षितच होतं’ अशी त्यांची प्रतिक्रिया असायची.  त्यामुळे मलाही काम करताना फार दडपण येत नाही. जेव्हा तुम्हांला माहीत असतं की तुमचं काम तुम्हांला येतंय, तेव्हा त्याचा ताण येत नाही. मी ज्यांच्याबरोबर काम केलं त्यांनीही मला छान समजून घेतलं. मालिकेच्या सेटवर तांत्रिक बाजू खूप शिकायला मिळाल्या.
या क्षेत्रात माझा कुणीही गुरू नाही. ज्याचं बोट धरून मी पुढे आले आहे वगैरे असंही कुणी नाही. मी कुवतीनुसार सगळ्यांकडून काही ना काही शिकत गेले.  ‘अग्निहोत्र’ मालिकेतल्या भूमिकेसाठीही माझं खूप कौतुक झालं. कॉलेजपासून कौतुक माझ्या वाट्याला येतच होतं, त्यामुळे मला अप्रूप होतं ते आणखी मोठ्या स्तरावर आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतोय याचं! एका कलाकाराची तीच इच्छा असते की आपल्या कक्षा रुंदावायला हव्यात. मालिकेच्या माध्यमातून ते साध्य होत होतं, याचा अधिक आनंद होता.  अजूनही मला लोकांनी ओळखलं नाही तर त्याचं वाईट वाटत नाही किंवा कौतुक केलं तर हुरळून जायला होत नाही. फार वेगळं काहीतरी करतेय असं वाटत नाही. कारण आयुष्यात हे मला अपेक्षितच होतं आणि तेच घडत आहे. ‘अग्निहोत्र’ मालिका सुरू असतानाच ‘कुंकू’ मालिका आली आणि पुन्हा एक अपेक्षित असं नवीन वळण आलं. मात्र आता हे वळण सोपं नव्हतं. एकावेळी दोन टीव्ही मालिका मी करत होते. ‘कुंकू’ आणि ‘अग्निहोत्र’ काही महिने एकत्रच चालू होत्या. ‘अग्निहोत्र’ मालिका संपल्यानंतरची तीन वर्ष मी ‘कुंकू’ मालिका करत होते आणि तेव्हा माझी खरी तारेवरची कसरत सुरू झाली. ती कशी ते पुढच्या भागात...

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link