Next
प्रशिक्षकाच्या निवडीचा फार्स कशासाठी?
अमित मधुकर डोंगरे
Friday, August 09 | 03:30 PM
15 0 0
Share this story

भारतीय क्रिकेटसंघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यापासून रवी शास्त्री यांचे संघावर नियंत्रण असून खेळाडूंशी आणि मंडळाशीदेखील अत्यंत चांगले संबंध आहेत. त्यांची फेरनिवड होणार हे स्पष्ट असतानाही मंडळाने समिती का स्थापन केली याचे आश्चर्यच वाटत आहे. या पदासाठी अनेकांचे अर्ज आले असले तरी शास्त्री यांना आव्हान मिळेल असा एकही अर्ज आलेला नाही. तसेच, ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यातदेखील एकही असा प्रशिक्षक नाही जो शास्त्री यांच्यापेक्षा जास्त अनुभवी आहे, मग शास्त्री यांची थेट फेरनियुक्ती करण्याऐवजी हा खेळ का खेळला जात आहे ते समजत नाही. या समितीत अध्यक्ष म्हणून माजी कर्णधार कपिल देव, माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड आणि महिला क्रिकेटसंघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे. आधी अशाच एका समितीच्या अध्यक्षपदी असताना कपिल देव यांनी महिला क्रिकेटसंघाच्या प्रशिक्षकाची निवड केली होती. आता त्यांच्याच समितीकडे पुरुष संघाच्या प्रशिक्षकाची निवड करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शास्त्री यांनी जेव्हा ही जबाबदारी स्वीकारली होती त्यानंतर संघाची कामगिरी उंचावली होती. त्यांच्या कारकिर्दीत संघाच्या यशाची टक्केवारी जवळपास सत्तर टक्के होती, त्यामुळेच त्यांची फेरनियुक्ती होणार हे उघड आहे, मग हा समितीचा फार्स कशासाठी, असा प्रश्न उपस्थित राहतो.
खरे तर शास्त्री यांच्याकडील जबाबदारी विश्वकरंडकस्पर्धेपर्यंतच होती. मात्र त्यांना मुदवाढ देत वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत पदावर कायम ठेवले आहे. हा दौरा ३ सप्टेंबरला रोजी संपणार असून त्या दरम्यान नवा प्रशिक्षक निवडला जाणार आहे. या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात या समितीची बैठक होणार असून त्यात नव्या प्रशिक्षकाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. प्रशिक्षक निवडीसाठी सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांची समिती काही नावे निश्चित करेल व मुख्य समितीकडे अहवाल सोपवेल. त्यांनतर ही समिती प्रशिक्षकांच्या मुलाखती घेऊन तसेच त्यांचे प्रेझेंटेशन पाहून नवा प्रशिक्षक निवडेल. अर्थात नव्या अर्जदारांबरोबरच शास्त्री यांनादेखील फेरअर्ज करण्याची परवानगी होती. त्यानुसार त्यांनीदेखील फेरअर्ज केला असून त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब  केले जाण्याचे जवळपास निश्चित असताना हा काखेत कळसा गावाला वळसा कशासाठी? शास्त्री यांनाच कायम ठेवत उर्वरित सपोर्ट स्टाफमध्ये फलंदाजीच्या साहाय्यक प्रशिक्षकपदात बदल अपेक्षित आहे. या पदावर काम करणाऱ्या संजय बांगर यांची उचलबांगडी होण्याचे संकेत असून त्यांच्या जागी प्रवीण आमरे, लालचंद राजपूत आणि विक्रम राठोड यांच्या नावाची चर्चा असली तरीही त्यात शास्त्री यांच्या पसंतीचे आमरे हेच नियुक्त केले जातील असेच चित्र आहे. लालचंद राजपूत यांनी खरेच गांभीर्याने अर्ज केला किंवा कसे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. राठोडच्या बाबतीतदेखील कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा मुद्दा होऊ शकतो. कर्णधार विराट कोहलीनेदेखील वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत शास्त्री यांच्यावरच विश्वास दर्शवला होता, तसेच त्यांच्याच फेरनियुक्तीसाठी आपला पाठिंबा असल्याचे सांगितले होते. हे कोहलीचे वैयक्तिक मत असल्याचे नंतर मंडळाने स्पष्ट केले.
मुख्य प्रशिक्षकपदासाठी जवळपास दोन हजार अर्ज आले असून फलंदाजी प्रशिक्षकपदासाठीदेखील अनेकांनी अर्ज केलेले आहेत. मुख्य प्रशिक्षकपदी शास्त्री यांची फेरनियुक्ती झाली, की अन्य स्टाफमध्येदेखील शास्त्री यांच्याच पसंतीच्या व्यक्तीलाच नियुक्त केले जाईल. गेल्या दीड मोसमापासून कोहलीबरोबरच सगळ्याच खेळाडूंचे शास्त्री यांच्याशी अत्यंत चांगले संबंध निर्माण झालेले आहेत. अशा स्थितीत कोहलीच्या मताला डावलून नव्या व्यक्तीची निवड करणे संघाच्या कामगिरीसाठी प्रतिकूल निर्णय ठरेल. खरेतर ऑस्ट्रेलियात होणारी टी-२० विश्वकरंडकस्पर्धा, त्यानंतरची कसोटी जागतिक विजेतेपद मालिका, तसेच देशात व परदेशात यंदाच्या मोसमात होणाऱ्या मालिका आणि २०२३ ची विश्वकरंडकस्पर्धा यांचा विचार करून शास्त्रींकडेच हे पद राहणे संघासाठी योग्य ठरणार आहे.
असो, हा फार्स एकदा पूर्ण झाला, की शास्त्री यांच्याच नावावर ठसा उमटवण्यात येईल, हे उघड आहे. मात्र पुढील काळात मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती छोट्या कालावधीसाठी न करता किमान तीन वर्षांसाठी करावी तसेच या कालावधीत संघाची कामगिरी पाहून ही मुदत वेळेपूर्वीच संपवावी का वाढवावी, या बाबत ठोक भूमिका मंडळाने घ्यायला हवी. संघाचा समतोल महत्त्वाचा असून अनाकलनीय समित्यांची स्थापना करणे मंडळाने थांबवायला हवे. शास्त्री आणि कोहली कंपनी यांच्यातील उत्तम समन्वयाने सातत्याने यश मिळत असेल, तर दीर्घ मुदतीचा करार प्रशिक्षकाशी करणे संघासाठी चांगले ठरेल, मात्र त्यासाठी मंडळाने मैदानाबाहेर सुरू केलेला खेळ आधी थांबायला हवा!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link