Next
प्रेमाचा राजदूत
श्वेता प्रधान
Friday, October 26 | 02:30 PM
15 0 0
Share this story

‘बो लो सियारामचंद्र की...जय!’ दिल्लीच्या रामलीलेत गर्जना झाली, स्टेजवरच्या वानरसेनेत जोश संचारला. वानरसेनेतला एक वानर झाला होता शाहरुख खान! लांबलचक शेपूट सांभाळत गदा उंच धरून कोरसमध्ये जयघोष करणाऱ्या शाहखचा तो अभिनयातला डेब्यू. लोक म्हणायचे, धड काम करायचं सोडून हा मुलगा वायफळ उद्योग करत असतो. शाहरुखचे वडील त्याला समजवायचे,“बेटा, कुछ काम करना, और ना मन हो तो मत करना...क्यूँकि जो कुछ नहीं करते, वो कमाल करते हैं!”
त्याचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. ‘एनएसडी’चं कँटिन ते चालवत. शाळेपेक्षा या कँटिनमध्ये रमलेल्या शाहरुखला लहानाचं मोठं होताना रोहिणी हट्टंगडी, राज बब्बर, नासिरुद्दीन शाह, अनुपम खेर अशा मातब्बर कलाकारांचा सहवास मिळाला. ‘सूरज का सातवा घोडा’, ‘तुघलक’ अशा नाटकांचे संस्कार झाले. काही नाटकांमध्ये त्यानं कामही केलं. पाठांतर, स्टेजवरचा आत्मविश्वास साऱ्याचं कौतुक व्हायला लागलं. त्याला वाटलं, यार अपनी तो निकल पडी! पण मेहमूदच्या मुलानं नव्याकोऱ्या कॅमेऱ्यातून शाहरुखचे फोटो काढून ‘अभिनय चांगला असला तरी  दिसायला चांगला नाहीएस, त्यामुळे हिंदी फिल्मचा हिरो काही होता येणार नाही’ अशी प्रतिक्रिया दिली आणि एका क्षणात शाहरुखची अवस्था ‘छन् से जो तुटे कोई सपना’सारखी झाली.  
तसं दिसण्यावरून शाहरुखला आजही ऐकून घ्यावं लागतंच. ना गोंडस चॉकलेट हिरो आणि ना मॅचो अॅक्शन हिरो. तरीदेखील १९९२ पासून शाहरुख खान बॉलिवूडचा अनभिषिक्त राजा झाला. ‘इतनी शिद्दत से तुम्हे पाने की कोशिश की हैं, के हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की हैं’(ओम शांती ओम) हा त्याचा डायलॉग त्यालाच लागू पडतो.
मुंबईला पाय टेकवल्यापासून त्यानं आपल्या इच्छांचा पाठपुरावा असा काही केला, की एका दिवसात पाच फिल्म्स साइन झाल्या. एका क्षणात जादूची कांडी फिरावी तशा फूटपाथ आणि रेल्वे स्टेशनच्या बाकांवर काढलेल्या रात्री, निर्मात्यांच्या दारात बसून काम मिळण्याची वाट पाहणं हे सगळं मागे पडलं. ‘फौजी’, ‘सर्कस’, ‘दुसरा केवल’ या मालिकांमुळे काहीसा ओळखीचा झालेल्या शाहरुखला ‘दिवाना’मध्ये ‘ऐसी दिवानगी देखी नहीं कहीं’ म्हणत बॉलिवूडनं बॉक्स ऑफिस आणि पुरस्कारांचा पेटारा उघडून दिला.
त्याला फक्त ‘डर’ आणि ‘बाजीगर’सारखेच चित्रपट करायचे होते. ओठांच्या कोपऱ्यातून रक्त सांडत तुफान मारामारी करायची होती.’अब सैलाब आयेगा मदन चोपडा...सैलाब! (बाजीगर)’ किंवा ‘कककक किरण’ (डर) म्हणत हिरोइनला घाबरवायचं होतं. आदित्य चोप्रानं त्याच्यासाठी अॅक्शन फिल्म लिहायलाही घेतली. पण कसं कोण जाणे, ती राहिली बाजूला आणि कागदावर उमटला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ नावाचा इतिहास!
स्क्रिप्ट वाचून एका झटक्यात शाहरुखनं नकार दिला. तो स्वप्नातही स्वतःला रोमँटिक हिरोच्या भूमिकेत बघू शकत नव्हता. बऱ्याच मनधरणीनंतर तो तयार झाला; अट होती, ‘क्लायमॅक्समध्ये मारामारीचा सीन हवा आणि चेहऱ्यावरून रक्ताचे ओघोळ वाहायला हवे!’
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा केवळ शाहरुखच्या कारकिर्दीचाच नव्हे, तर एकूणच हिंदी चित्रपटसृष्टीचा माइलस्टोन ठरला. १९९५ ते २००५ या दहा वर्षांच्या काळातल्या हिंदी सिनेमांच्या प्रकृतीचं चलनवलन ‘दिलवाले दुल्हनिया...’नं ठरवलं. बॉलिवूडमध्ये ताजं रोमान्स-युग सुरू झालं आणि त्याचा क्युपिड होता शाहरूख खान. ‘पलट...पलट’चा सीन, ‘मैं आ रहा हूँ सिमरन’मधलं अव्यक्त प्रेम, ‘तो क्या हुवा अगर ये आवारा तुम्हे दिवानों की तरह प्यार करता हैं’ म्हणताना शाहरुखचे डबडबलेले डोळे.....भारतीय स्त्रीला प्रेमात पाडण्यासाठी जे जे म्हणून असावंसं वाटतं, ते सगळं ‘दिलवाले..’च्या ‘राज’नं केलं. एका रात्रीत शाहरुख खान प्रेमाचा ब्रँड अँबॅसेडर बनला!  
‘दिल तो पागल हैं’, ‘येस बॉस’, ‘परदेस’, ‘कुछ कुछ होता हैं’, ‘कभी ख़ुशी कभी गम’, ‘मोहोब्बतें’, ‘कल हो ना हो’, ‘दिल से’, ‘वीर-जारा’, ‘मैं हूँ ना’, ‘रब ने बना दी जोडी’, ‘जब तक हैं जान’ यांसारख्या रोमँटिक फिल्म्स  शाहरुखच्या लोकप्रियतेचे खरे मापदंड आहेत.
कधी राज तर कधी राहुल होत, उजव्या पायात वाकून सिग्नेचर पोज देत मधाळ रोमान्स करणाऱ्या शाहरुखच्या यशात संवादलेखक आणि दिग्दर्शकाचा मोठा वाटा आहे. ‘और पास..’ (दिल तो पागल हैं), ‘मर्द का सर सिर्फ तीन औरतों के सामने झुकता हैं’ (कुछ कुछ होता हैं), ‘चुभ तो नहीं रहा…’(कभी ख़ुशी कभी गम), ‘एक लडकी थी दिवानी सी’(मोहोब्बतें) हे आणि असे अनेक सीन्स आळवत शाहरुखच्या प्रेमात पडणाऱ्यांची संख्या करोडोंनी वाढत गेली. ‘कभी अलविदा ना कहना’च्या वेळेचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. न्यू यॉर्कला शूटिंग सुरू होतं. शाहरुखची आंतरराष्ट्रीय लोकप्रियता लक्षात घेता करण जोहरनं तिथल्या फिल्म काउन्सिलकडे जादा सुरक्षारक्षकांची मागणी केली. ‘आम्ही टॉम क्रूज आणि ब्रॅड पिटला सांभाळू शकतो, तर शाहरुख काय चीज आहे’ असं म्हणत त्यांनी ती धुडकावून लावली. प्रत्यक्षात शाहरुख आल्यावर जी काही गर्दी झाली, की रेल्वे स्टेशन बंद करावं लागलं आणि ट्रेन्स रद्द झाल्या!

शाहरुखला मिळणारं सर्व वयोगटांतल्या स्त्रियांचं फॅन-फॉलोइंग सहसा बघायला मिळत नाही. स्त्रीला ती जशी आहे तसं स्वीकारण्याचा विचार त्याच्या रोमान्समध्ये असल्यानं तो स्त्रियांचं मन जिंकून घेण्यात यशस्वी ठरला. ‘व्हॉट डज अ वुमन वॉन्ट’’ या जागतिक समस्येचं निराकरण कोणी करू शकत असेल तर तो शाहरुख खान! त्याची एक इच्छा आहे, ‘गिटार, त्यावर किमान दहा तरी गाणी वाजवता यावी आणि येताजाता गिटारवर गाणं ऐकवून, ‘किस का हैं ये तुमको इंतजार मैं हूं ना,’ म्हणत काही मिनिटांपुरतं का होईना, स्त्रियांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटवावं…’
येत्या दोन नोव्हेंबरला शाहरुख त्रेपन्न वर्षांचा होईल. २५ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत २८०हून अधिक पुरस्कार, स्कॉटलंडच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ एडेनबर्ग’नं बहाल केलेली डॉक्टरेट, ‘दाटुक’ (योद्धा) हा मलेशियानं दिलेला बहुमान, रेड चिलीज् हे प्रॉडक्शन हाऊस, भारतातला अत्याधुनिक व्हीएफएक्स सेटअप, पल्स पोलिओ ते युनेस्कोपर्यंत पसरलेलं सामाजिक कार्य, गौरीसोबत २७ वर्षांचा संसार, आर्यन-सुहाना-अबराम ही मुलं आणि अगणित चाहत्यांचं प्रेम...मागे वळून पाहायचं ठरवलं, तर त्यालाच त्याचं आयुष्य एखाद्या फँटसी लँडसारखं दिसेल.
एक दिवस असा आला होता, की २०००च्या मध्यावर पोहोचताना हा ‘किंग ऑफ रोमान्स’ रोमान्सलाच कंटाळला. परिणामी, आपल्याला ‘स्वदेस’, ‘चक दे इंडिया’सारखे वेगळे चित्रपट पाहता आले. आता शाहरुख परिपक्व सिनेमेसुद्धा देईल, असं वाटत असतानाच त्याच्या स्वभावातला हट्टीपणा वारंवार उसळी मारत होता. हट्ट कसला, तर ‘मलापण हवं!!’ दिलीपकुमारनं ‘देवदास’ अजरामर केला? मीपण करणार! ‘डॉन’ हा अमिताभ बच्चनचा अविस्मरणीय चित्रपट आहे? मलापण हवा, तोही दोनदा! हृतिक रोशनचा ‘क्रिश’ सुपरहिरो हिट झाला? मग मीपण ‘रा-वन’ बनवणार! दिलीपकुमारचा ‘मधुमती’ अजरामर ठरला? मीपण ‘ओम शांती ओम’ करणार! अगदी त्याच्या आगामी ‘झिरो’मध्येही ‘कमल हासन’नं ‘अप्पू राजा’मध्ये ठेंगणा नायक केला होता, म्हणून मलापण करायचाय!’ यात हट्टीपणाचा भास होतोय.
त्याचा दुसरा हट्ट म्हणजे नवीन नायकांसारखं राहण्याचा अट्टहास. ‘ओम शांती ओम’च्या वेळेस सिक्स पॅक अप्सच्या नादी लागला, तेव्हाच त्याचा मूळ चार्म कमी-कमी होत गेला. अलिकडच्या काही वर्षांत तो काहीसा ताणानं ओढलेल्या चेहऱ्यानं वावरतोय. बॉलिवूडचा हा अनभिषिक्त किंग खान अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्यांच्या स्पर्धेत कधी सामील झाला, हे त्याचं त्यालाही कळलं नसेल. ‘हॅप्पी न्यू इयर’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘फॅन’, ‘रईस’ हे काही शाहरुख खानची खासियत असणारे चित्रपट नाहीत. ‘दिलवाले’देखील इतका सुमार होता, की ‘रंग दे तू मोहे गेरूआ’ वगळता शाहरुख-काजोल जोडीला बघण्याचा आनंदच मावळला. एक लव्हस्टोरी पुन्हा करून बघू म्हणणाऱ्या शाहरुखचा ‘जब हॅरी मेट सेजल’चा प्रयत्नही गेल्या वर्षी फसला. बॉक्स ऑफिसवर हंगामा करणाऱ्या शाहरूखला अलिकडे एक सुपरहिट सिनेमा मिळण्याची वाट बघावी लागतेय.
‘शाहरुख खान संपला’ असं अनेकांनी जाहीर करून टाकलंय. पण म्हणतात ना, जोपर्यंत आपण स्वतः हार मानत नाही, तोपर्यंत पराभव होत नसतो. या इंडस्ट्रीत प्रत्येकाची बलस्थानं वेगवेगळी आहेत; आमीर खान, अक्षयकुमार आपापलं सामर्थ्य ओळखून वागतात, शाहरुख मात्र सोप्प्या असलेल्या गोष्टी अवघड करायच्या नादात भलतीकडेच वाहवत जातोय. ‘कभी कभी हम मुश्किल रास्ता इसलिये चुनते हैं क्यूँ कि हमे लगता हैं इम्पॉर्टन्ट चीजे पाने के लिये मुश्किल रास्ता अपनाना चाहिये.. बट् व्हाय? आसान रास्ता क्यूँ नहीं चुन सकते? क्या बुराई हैं उसमें?’ या ‘डिअर जिंदगी’मधल्या त्याच्याच डायलॉगचा नेमका अर्थ त्यानं लक्षात घेण्याची आता वेळ आलीये...

विचित्र सवयी
शाहरुखला निद्रानाशाचा त्रास आहे. रात्री जेमतेम ३ ते ४ तास झोपतो. पाणी पिण्याची किंवा वेळेत आणि नीट खाण्यापिण्याची त्याला सवय नाही. शाहरुख चेन-स्मोकर आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. एकांतवास किंवा अतिमहत्त्वाच्या मीटिंग्स करण्यासाठी आवडती जागा म्हणजे त्याची प्रशस्त बाथरूम. त्याला गॅजेट्स आणि व्हिडिओ गेम्सचं वेड इतकं आहे, की बंगल्याचा अख्खा एक मजला त्यासाठी राखून ठेवला आहे.   

ब्रँड एसआरके

एकेकाळी सगळ्या टॉप ब्रँड्सचा चेहरा असणाऱ्या शाहरुखची मार्केट-व्हॅल्यू अलिकडे १८ ते २० टक्क्यांनी घसरली. टुकार फिल्म्समुळे चाहतावर्ग नाराज झाला, बॉक्स ऑफिसवरची जादू कमी झाली, वाढतं वय अशी कारणं पुढे आली. तरीदेखील, आजच्या घडीला त्याची ब्रँड व्हॅल्यू जवळपास सहाशे कोटींच्या घरात आहे.

फॅन्सच्या गळ्यातला ताईत
शाहरुखच्या वाढदिवसाला त्याचं एक दर्शन मिळावं म्हणून ‘मन्नत’च्या समोर जो अफाट जनसागर उसळतो, त्यापुढे पलिकडच्या बॅण्डस्टॅण्डच्या लाटाही फिक्या वाटाव्या. शाहरुखच्या फॅन्सचे कारनामे अजब आहेत. कोणी त्याच्या पोस्टर्सनी अख्खं घर सजवतं, तर कुणी सकाळी डोळे उघडल्यावर त्याच्या फोटोचं दर्शन घेतं. शाहरुखच्या आयुष्यात जे घडेल त्याचे चिकणमातीचे पुतळे करण्याचा ध्यास एका अमेरिकन चाहतीनं घेतलाय. हे कमी वाटेल की काय, म्हणून एक ऑस्ट्रेलियन चाहती ‘लुनार रिअल इस्टेट’वर बुकिंग करून शाहरुखच्या नावानं दरवर्षी चंद्रावर थोडीथोडी प्रॉपर्टी विकत घेत बसते म्हणे.

लहानपणी....
खोड्या केल्यावर पकडला गेला, की ‘घरी आई-बाबा खूप छळतात, तुम्हीच माझ्यावर आईसारखं प्रेम करता,’ असं म्हणत केविलवाण्या नजरेनं बघितलं, की टीचरलाच अश्रू अनावर होत असत. अभिनय इथेच शिकला असेल तो!  शाळेत असल्यापासून त्याला हॉकी नाहीतर फूटबॉलमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करायचं होतं. मात्र खांदा आणि पाठीच्या दुखापतीमुळे ते स्वप्न काही पूर्ण होऊ शकलं नाही. मग तो निघाला आर्मीमध्ये. आई, मावश्यांनी थांबवलं. शिवाय केस बारीक कापावे लागतील, या भीतीनं तोही थांबला. 

वादांचा ससेमिरा
‘असहिष्णू’ हा एक शब्द त्याला इतका महागात पडला, की ‘शाहरुख-विरोधी मोहीम’ सुरू झाली. निषेध मोर्चे, सिनेमावर बहिष्कार टाकण्यापर्यंत प्रकरण गेलं.
२०१२च्या आयपीएल सामन्यांच्या वेळी वानखेडे स्टेडियमवर ‘कोलकाता नाइट रायडर्स’ टीमचा मालक शाहरुख खान आणि सुरक्षारक्षक यांच्यात बाचाबाची झाली. मुंबई क्रिकेट असोसिएशननं शाहरुखला वानखेडेवर प्रवेश करण्याची पाच वर्षं बंदी घातली. अबरामच्या जन्माच्या वेळेस गर्भलिंगचाचणी केल्याचा आरोप, पार्किंगसाठी अनधिकृत बांधकामाचं प्रकरण, ‘माय नेम इज खान’वर घातलेली बंदी, ‘रा-वन’ फ्लॉप झाला म्हणून चिडवल्यानं फराह खानच्या नवऱ्याला - शिरीष कुंदेरला- संजय दत्तच्या पार्टीत मारहाण केल्याचा वाद, प्रियांका चोप्राशी अफेअर असल्याचा संशय, शाहरुख-सलमान भांडण, करण जोहरशी गे-रिलेशनशिप असल्याचं गॉसिप... शाहरुख खान आणि विवाद अखंड सुरू असतात.

किंग खान
बॉलिवूडचा सम्राट शोभावा अशीच शाहरुखची अफाट संपत्ती आहे. जगातल्या सर्वात श्रीमंत कलाकारांच्या यादीत तो पहिल्या पाचांत असतो. दिल्लीला आलिशान घर, लंडनचं शाही अपार्टमेंट आणि दुबई इथला बादशाही व्हिला त्याच्या नावावर आहे. १५ कोटींना विकत घेतलेल्या वांद्रे इथल्या त्याच्या ‘मन्नत’ बंगल्याची आजची किंमत आहे २०० कोटी. ‘मन्नत’बाहेर ऑडीपासून बीएमडब्ल्यू, बेन्टले, लँड क्रूजर, रॉल्स रॉइस अशा एक से एक महागड्या गाड्यांची रांग उभी असते.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link