Next
संगणकशिक्षणाचे आकर्षण
शर्मिला लोंढे
Friday, November 30 | 05:38 PM
15 0 0
Share this storyआपला समाज पुरातनकाळापासून आधुनिक काळापर्यंत अनेक क्षेत्रांतील बदलांचा साक्षीदार ठरला आहे. औद्योगिकीरण आणि शहरीकरण या दोन प्रक्रियांनी समस्त जनतेचं आयुष्य पालटून टाकलंच शिवाय विज्ञान व तंत्रज्ञान या दोन क्षेत्रांतील प्रगती व विकासानं माणसाचं आयुष्य अधिक सोपं, सोयीचं, सुसह्य पण गतिशील बनवून टाकलं. याच विज्ञान व तंत्रज्ञानाचा चमत्कार म्हणजे संगणक. संगणक या संकल्पनेला लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. उदाहरणार्थ, आश्चर्य, अप्रूप, कुतूहल, भीती, धास्ती, गोंधळ, अनाकलन इत्यादी. अजूनही काही जणांना संगणाकाचं तंत्र चांगलं जमतं, काहींना ते अजिबात जमत नाही, तर काही जण नाइलाजानं कसंबसं जमवतात. काहीही असलं तरी एक गोष्ट नक्की, आज संगणकाशी मैत्री आवश्यक झाली आहे आणि संगणक आपल्या दैनंदिन व व्यावसायिक जीवनचा एक अविभाज्य घटक बनला आहे.

अशा या अपरिहार्य संगणकाचं आकर्षण कुणाला नसेल? सध्याच्या मुला-मुलींना खेळ म्हणून, टाइमपास म्हणून, शिक्षण म्हणून आणि व्यवसाय म्हणून असणारच! माझ्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये माझा असा अनुभव आहे की अनेक विद्यार्थ्यांना संगणकाचं शिक्षण घ्यायचं असतं, त्यातच करिअर करायचं असतं व सध्याच्या सर्वच मुला-मुलींना संगणाकाचं तंत्र चांगलंच जमत असल्यानं आपल्याला त्यात निश्चितच करिअर करता येईल याची त्यांना खात्री असते. पण काय आहे ना, त्यावेळी जी कुठली गॅजेट, मशीन, माध्यमं प्रस्थापित व प्रचलित असतील, ती उपजतच त्या पिढीला हाताळता येतात. त्यामुळे सध्याची तरुण पिढी जर संगणक सहज हाताळत असेल तर त्यावरून काहीच सिद्ध होत नाही.

संगणकशिक्षणाचा विचार माझ्या मते, तीन पद्धतींनी करायला हवा. एक म्हणजे, जळी-स्थळी प्रत्येक गोष्टीसाठी संगणकाची गरज भासल्यामुळे, नाइलाजास्तव, अडू नये म्हणून लागणारं मूलभूत, गरजेनुसार बेतलेलं शिक्षण. या गटात सर्व वयोगटांतील, सर्व व्यवसायातील कुठली तरी माणसं बसतीलच. उदाहरणं अनेक देता येतील. इ-लर्निंगमध्ये अनेक विद्यार्थ्यांना संगणकाच्या माध्यमातून शिक्षण घ्यावं लागतं किंवा घेता येतं. पर्यायानं अनेक शिक्षकांनाही संगणकाशी फारसं स्वरस्य नसलं तरी ते तंत्र अवगत करावं लागतं. आमच्या मानसशास्त्राच्या क्षेत्रामध्येसुद्धा पूर्वी निदान करणारे जे अवहाल हस्तलिखित स्वरूपात दिले जायचे ते आता संगणकाच्या साहाय्यानं प्रिंटआउटच्या स्वरूपात देणं क्रमप्राप्त झालं आहे. याच निदान करणाऱ्या चाचण्यांचं स्कॅनिंग पूर्वी मॅन्युअली केलं जायचं, ते आता संगणकाच्या माध्यमातून केलं जातं किंवा कधी कधी तसंच होऊ शकतं.

सध्याचा जमाना ‘प्रेझेन्टेशन’चा आहे. तुम्ही इंजिनीयर असा, आर्किटेक्ट असा, मार्केटिंग मॅनेजर असा किंवा CEO असा, प्रत्येक व्यवसायात काही ना काही प्रेझेन्टेशन लागतंच. त्यामुळे सर्व क्षेत्रांतील सर्व वयाच्या माणसांना संगणकाची मूलभूत माहिती, प्रेझेन्टेशन बनवण्याचं तंत्र, ते सुरळीतपणे चालवण्याची सवय अशा गोष्टी अनिवार्य आहेत. आता बँकेचे व्यवहार, अगदी पेन्शन मिळणं यासाठीही संगणकाचा नीट परिचय करून घेणं गरजेचं आहे. घराघरातून मुलं परदेशी जाऊन स्थानिक होत असल्यामुळे किंवा निदान शिक्षणासाठी परदेशी जात असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी, जवळीक जोपासण्यासाठी, इमेल, स्काइपची मदत घेणं अपरिहार्यच आहे, नव्हे ते शहाणपणाचं आहे. या परिस्थितीमुळे काका, काकू, मावशी, आत्याच नाही तर आजी, आजोबागटांतील लोकही आता ‘कॉम्प्युटर-फ्रेंडली’ झाले आहेत. एकदा त्याचा शौक लागला की मग म्हातारपणी टाइमपाससाठी यूट्यूब इत्यादींचे हितचिंतक बनून अगदी कॉम्प्युटरसॅव्हीसुद्धा झाले आहेत.
तात्पर्य काय, तर संगणक आपलं आयुष्य केवळ सोपं, सोयीचं, सुसह्य व सुखावहच करत नाही तर आपलं अस्तित्व हळूहळू संगणकावर अवलंबून झालं आहे. त्यामुळे त्याची भीती वा धास्ती तर वाटून घेताच कामा नये. पण हो, कुतूहल जितकं जास्त असेल तितकी अनाकलनीयता कमी होऊ शकेल.

वर नमूद केलेल्या गटासाठी घरातच इतर मंडळींकडून किंवा नोकरी/व्यवसायाच्या ठिकाणी असलेल्या सहकाऱ्यांकडून मित्र-मैत्रिणींकडून संगणकाची मूलभूत माहिती/ज्ञान/परिचय/शिक्षण घेणं हा एक चांगला पर्याय असूच शकतो. या गटातील माणसांना संगणकाच्या एखाद्या मूलभूत कोर्सचाही चांगलाच फायदा होऊ शकतो.

असे मूलभूत कोर्सेस Windows, Paint, Notepad, Word pad, Cut, Copy, Paste, Save, Print, Microsoft Word Document, Editing, Font, Paragraphs, Compose, Attach, Inbox, Brows, Space, Delete अशा शाखांशी ओळख करून देतात, ज्यामुळे संगणकावरचा प्रवास सुकर होतो.
संगणकावरच्या आपल्या पुढच्या प्रवासात पाहुया संगणकशिक्षणाचा विचार आणखी दोन पद्धतींनी...

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link