Next
स्वीकारशीलता... जीवनाचे मर्म
मानसी वैशंपायन
Friday, September 28 | 03:30 PM
15 0 0
Share this story

‘साक्षी’ असणे म्हणजे ‘प्रत्यक्षदर्शी’ असणे. भावनेमध्ये विविध मनोभाव, अनुभूती, कल्पना, विचार हे सारेच अंतर्भूत असते. साक्षीभावाच्या साधनेत या साऱ्यांवर कोणताही निर्णय न घेता चेतनागत मनाने, अलिप्त भावाने त्यांच्याकडे पाहिले जाते. साक्षीभावनेची साधना करताना कोणत्याही आरामदायक स्थितीत बसायला हरकत नाही. प्रथम डोळे बंद करावे. काहीवेळ प्राणधारणेचा अभ्यास करावा. त्यानंतर मनात येणाऱ्या विचार, भावना व आवेगांकडे तटस्थपणे बघायला सुरुवात करावी. त्याच्यावर चांगला किंवा वाईट कोणताही अभिप्राय देऊ नये व त्यांना नियंत्रित करण्याचाही प्रयत्न करू नये. आपण समुद्राच्या किंवा नदीच्या काठी बसून त्या जललहरींकडे जसे पाहतो तसे पाहावे. या पाण्यावर उठणाऱ्या तरंगांशी आपला काहीही संबध नसतो. त्याप्रमाणे या भावना, विचार, विकार यांच्याकडे तटस्थपणे केवळ पाहावे. यावेळी नैसर्गिक श्वासोच्छ्वास सुरू ठेवावा. साधनेच्या शेवटच्या टप्यात मनाला थोडावेळ पुन्हा प्राणधारणेत गुंतवावे व मग हळूहळू डोळे उघडावेत. रोज साधारण ५ ते १० मिनिटांचे एक आवर्तन केले तरी लाभ मिळायला सुरुवात होते. मात्र ही साधना करताना चेतन मन मूळ स्वभावानुसार या मानसिक क्रियांना नियंत्रित करू लागण्याची किंवा या विचार, विकार भावनांमध्ये गुंतून पडण्याची शक्यता असते. त्यामुळे चेतन मनाला तटस्थ करणे खूप प्रयत्नसाध्य व प्रयासानेच जमते. यात व्यत्यय आल्यास प्राणधारणा अधिक काळ करावी.

जे कृष्णमूर्ती म्हणतात, ‘स्वत:शी प्रामाणिक राहून जगावं, आपण कसं जगतो आहोत याचं ‘अवधान’ ठेवावं’. ओशो म्हणतात, ‘इस तरह जिओ की संसार तुम्हे छू न पाए.’ डॉ. अनिता अवचटांसारख्या व्यक्ती याच तटस्थतेच्या भावनेतून कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी लढा देतात. त्यांच्यामध्ये असलेल्या सहनशीलतेतून आणि सकारात्मकतेने जे समोर आले आहे त्यांचा शांत स्वीकार करण्याच्या वृत्तीमुळे, आपली व्याधी त्या ग्रेसफुली ‘कॅरी’ करू शकल्या. इतक्या असाध्य दुखण्याबाबत ही माणसे तटस्थता राखू शकतात. मग आपल्या आयुष्यात येणाऱ्या लहान-सहान त्रासदायक गोष्टीबाबत आपण ‘तटस्थ’ का नाही राहू शकत?
साक्षीभावाच्या साधनेतून काय मिळेल? सुख आले, तर सुख जगणे आणि दु:ख आले, तर दु:ख जगणे! दोन्हींचाही अंश, व्रण, ओरखडे मनात राहू द्यायचे नाहीत. या दोहोंच्या परिणामांचा अलिप्तपणे स्वीकार करणे हे जीवनाचे मर्म आहे. ही शिकवण साक्षीभावाच्या अभ्यासातून मिळते. जन्मापासून मरेपर्यंत माणूस सतत कोणते ना कोणते कर्म करत असतो. कर्म करताना कर्माच्या परिणामांपासून अलिप्त राहण्याची कला ‘साक्षीभावा’तून शिकता आली तर आपण या कर्माचे केवळ साक्षी आहोत असे वाटू लागते. येथे ‘मी करतो’ हा अहंभाव नाहीसा होणे अपेक्षित आहे. सुख आणि दु:ख दोन्ही ईश्वराच्या इच्छेनुसार प्रत्येकाच्या वाट्याला येत असते, हे समजून घेतले तर सुखाची वा दु:खाची परिणती समाधानातच होते. सुख-दु:ख, मान-अपमान, जय-पराजय हे सारे ईश्वराच्या चरणी समर्पित केले, की आपले कर्तृत्व व उपभोग यामागचा आपला अहंकार गळून पडू लागतो. ईश्वराशी अद्वैत साधू लागते व साधक हळूहळू या वाटेवर अधिक प्रगती करू लागतो. एकदा लिनची या साक्षात्कारी झेन गुरूंना कोणीतरी विचारले, ‘साक्षात्कारानंतर आताशा आपण काय करता?’ तेव्हा ते म्हणाले, ‘पूर्वी ‘मी’ लाकडे फोडीत असे, कावडीने पाणी भरत असे, आता माझ्याकडून लाकडे फोडली जातात, कावडीने पाणी भरले जाते.’ याचा अर्थ काय? साक्षीभाव जागृत झाला की जीवनात आपण काही ‘करत’ नसून गोष्टी ‘घडत’ जातात. जीवन जसे आहे तसेच परिपूर्ण आहे हा बोध झालेला असतो.

ओशो सांगतात, की आपले दोष दूर करण्यासाठी ध्यान हा हुकमी इलाज आहे. दोष व्यक्त करणे, दोष दाबून टाकणे या कृती नेहमी आपल्या हातून घडत असतात. मात्र ध्यानाद्वारे दोषांचे तटस्थपणे निरीक्षण करणे या जाणीवपूर्वक केलेल्या कृतीमुळे हळूहळू दोष कमी होत जातात. ध्यानाच्या साधनेतून ‘अंतर्यामीचा साक्षी’ जागा करता येतो, असे आध्यात्मिक गुरू विमलाजी ठकार म्हणतात. चंद्राच्या पाण्यातील प्रतिबिंबामुळे चंद्र पाण्यात आहे असे वाटले तरी खरा चंद्र पाण्यापासून अलिप्तच असतो, नाही का? आपण स्वप्नातून जागे झाल्यावर त्या स्वप्नाकडे तटस्थपणे पाहतो तसेच साक्षीभाव ध्यानसाधनेने मिळवायचे आहे. ‘एलिस इन वंडरलँड’ या कथेत एलिसच्या आग्रहाखातर जरा नाखुशीनेच पऱ्यांची राणी तिला राजमहालात घेऊन जाते. राजा पलंगावर झोपलेला असतो. एलिस परीराणीकडे हट्ट करते, की ‘राजाला उठव, मला त्याच्याशी बोलायचे आहे.’ परीराणी तिला परोपरीने सांगते, की ‘राजाला उठवणे अशक्य आहे.’ एलिसचा हट्ट थांबत नाही. तेव्हा परी तिला म्हणते, की ‘तुला हे समजणे कठीण आहे, पण मी सांगते त्यावर विश्वास ठेव. राजाला उठवून तू त्याच्याशी बोलू शकणार नाहीस. कारण राजाला एक स्वप्न पडत आहे आणि आपण सगळे त्या स्वप्नातच वावरत आहोत. राजा जागा होताच स्वप्न विरून जाईल आणि आपणही नाहीसे होऊ.’ योगसाधनेतून काहीही मिळवायचे नसते व बाहेरूनही काही आणायचे नसते. योगसाधनेतून चित्तशुद्धी होते व विवेक जागा होतो. योग्याच्या अंतरंगात जी गोष्ट प्रथमपासूनच आहे ती उदयाला येते, प्रज्ञा उजळते, प्रतिभा उमलते, ज्ञानदीप्ती तेजाळते, याचा प्रत्यय ज्ञानदेवांसारख्या योगीजनांच्या जीवनातून येतो.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link