Next
म्हैसूरचा राजेशाही थाटमाट
साधना तिप्पनाकजे
Friday, October 04 | 01:15 PM
15 0 0
Share this story


दक्षिणेत सहलीला गेल्यावर बहुतेक महाराष्ट्रीय पर्यटक म्हैसूरचा राजवाडा आवर्जून पाहतात. मात्र प्रत्यक्ष दसऱ्याला आपल्यापैकी अनेकांची जाण्याची वेळ येत नसेल, परंतु तिथला थाटमाट दाखवताना दसऱ्याला इथला सोहळा कसा असतो, त्याचं वर्णन सांगितलं जातं. तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर ती नवलाई आपसूकच दिसू लागते.
म्हैसूर दसरामहोत्सव भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारूपाला आलेला महोत्सव आहे. नवरात्रीचे नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा परमोच्च बिंदू असतो विजयादशमीचा दिवस. नवरात्रीचे नऊ दिवस संपूर्ण म्हैसूरमध्ये विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. म्हैसूरचा राजवाडा आणि सरकारी इमारतींवर आकर्षक रोशणाई करण्यात येते. या महोत्सवाची सांगता अतिशय भव्यदिव्य मिरवणुकीनं होते. विजयादशमीला राजवाड्याहून ही मिरवणूक निघते. दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची तयारी महिनाभर आधी सुरू होते. तर महोत्सवाचं प्रमुख आकर्षण असणाऱ्या जंबो सवारीची तयारी सहा महिने आधीच सुरू होते. दसरा मिरवणुकीतल्या या जंबो सवारीत दहा हत्ती सहभागी होतात. यातील एका हत्तीवर सोन्याच्या अंबारीत म्हैसूरचे महाराजे ओडेयरू कुटुंबांची कुलदेवता चांमुडेश्वरी विराजमान असते. पूर्वी या मिरवणुकीत स्वतः राजेही हत्तीवर बसायचे. परंतु काळाप्रमाणे बदलत केवळ राजघराण्याची कुलदेवताच सुवर्ण अंबारीत असते.
या महोत्सवाचे दरबार दसरा किंवा खासगी दसरा आणि सार्वजनिक दसरा असे दोन भाग असतात. खासगी दसऱ्यामध्ये ओडेयरू राजघराण्यातील सर्व सदस्य, राजघराण्यानं निमंत्रित केलेले पाहुणे आणि सरकारचे प्रतिनिधी सहभागी होतात. या दहा दिवसांत म्हैसूरचे राजे पारंपरिक पोषाख घालून दरबार भरवतात. पूर्वीच्या काळी जसा दरबार भरायचा, त्या प्रकारेच हा दरबार भरवला जातो. नवरात्रीत रोज संध्याकाळी, अंबाविलास दरबार हॉलमध्ये राजे सुवर्णसिंहासनावर विराजमान होतात. आताही दरबार भरवला जातो. पण राज्याची खबरबात किंवा राजकुटुंबाविषयी माहिती देण्याऐवजी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. रोज सकाळी राजवाड्यात कुटुंबाच्या चालीरीतीप्रमाणे देवीची विधिवत पूजा करण्यात येते. सध्या केवळ दसरा महोत्सवादरम्यानच या सुवर्णसिंहासनाला दरबार हॉलमध्ये आणलं जातं. दसरा महोत्सवाच्या आधी चार दिवस आणि महोत्सवाच्या नंतर दहा दिवस हे सिंहासन लोकांना पाहता येतं. इतर दिवशी राजवाडा पाहण्याच्या वेळेत वेगळं तिकिटं काढून हे सिंहासन पाहता येतं. इतर वेळेस या सिंहासनाचे वेगवेगळे भाग करून चोख बंदोबस्तात ठेवण्यात येतात. महोत्सवाच्या आधी विधिवत पूजा करून हे भाग जोडण्यात येतात. शाही हत्ती, घोडा आणि गाईला शाही वस्त्रं नेसवून या पूजेकरता आणलं जातं. पायऱ्या आणि छत्र धरून या सिंहासनाचे चौदा भाग जोडण्याकरता नंजनगुड तालुक्यातल्या गेजागल्ली गावातले कारागीर येतात. सिंहासन जोडण्याकरता हे कारागीर परंपरागत मानकरी आहेत. सार्वजनिक दसरामहोत्सवात सर्वांना सहभागी होता येतं.
नवरात्रीच्या आठवडाभर आधीच म्हैसूरच्या रात्री प्रकाशात न्हाऊन निघतात. चौकाचौकांमध्ये, सरकारी आणि खासगी इमारतींना रोशणाई करण्यात येते. मुळातच जुनं म्हैसूर अजूनही त्याचा पारंपरिकपणा, स्थापत्यशैली, आखीवरेखीवपणा, सुटसुटीत रस्ते टिकवून आहे. इतर शहरांप्रमाणे म्हैसूर शहरही आता चोहोबाजूंनी वाढत आहे. या वाढत्या म्हैसूरमधील चौक, रस्ते आणि इमारतीही या रोशणाईनं झळाळून उठून दिसतात. नवरात्रौत्सव सुरू व्हायच्या चार-पाच दिवस आधीच देश-विदेशातले पर्यटक मैसूरमध्ये यायला सुरुवात होते. मित्र-मैत्रिणी, कुटुंबाचे गटच्या गट रस्त्यांवर फिरत या रोशणाईचा आनंद घेत असतात. कुठेही धांगडधिंगा नसतो, शिस्तीनं लोक सर्वाचा आनंद घेत असतात. या काळात म्हैसूर शहरात विविध सांस्कृतिक आणि क्रीडास्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. यात शास्त्रीय संगीत, लोकसंगीत गायन आणि वादनाचे अनेक कार्यक्रम असतात. नाटकांचे प्रयोग सादर होतात. चित्रकला, हस्तकलेची प्रदर्शनं असतात. ज्येष्ठ आणि मान्यवर कलाकारांसोबतच स्थानिक कलाकारांनाही आपली कला या कार्यक्रमांमध्ये सादर करता येते. कोल्हापूरप्रमाणे म्हैसूरमध्येही कुस्तीची लोकप्रियता आहे. त्यामुळे कुस्तीस्पर्धांचही आयोजन करण्यात येतं. साहित्य, नाटक, चित्रकला, काव्य, कला, तंत्रज्ञान आणि क्रीडा यांच्याशी संबंधित भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल या नऊ दिवसांत म्हैसूरमध्ये पाहायला मिळते. चांमुडेश्वरीदेवीचं मंदिर असणारं चांमुडी बेट्टाही (टेकडी) उत्सवरंगात न्हाऊन निघते.


गेल्या काही वर्षांपासून विजयादशमीची मिरवणूक ही कर्नाटक राज्याची विकासगाथा सांगायचं माध्यम बनली आहे. प्रजासत्ताकदिनाला राजपथावर जसे चित्ररथ असतात, त्याचप्रमाणे कर्नाटक सरकारच्या विविध खात्यांचे आणि जिल्हापरिषदांचे चित्ररथ आपली विकासकामं, योजना या मिरवणुकीत चित्ररथाद्वारे दाखवतात. या मिरवणुकीत जंबो सवारीसोबतच माऊंटेड पोलिसांचं संचलनपथक, लोककलांची पथकं, नृत्यपथकं, विविध वाद्यवृंद आपल्या कलांचं सादरीकरण करत असतात. ही सर्व पथकं, ६०-७० चित्ररथ, जुनी आयुधं अशी ४-५ किलोमीटर लांबीची ही भव्य मिरवणूक असते. विजयादशमीच्या दिवशी सकाळी राजवाड्याहून निघालेली ही मिरवणूक बन्नीमंडपात येऊन विसर्जित होते. शमीवृक्षाच्या जवळ पूजा करून राजघराण्याच्या दसरामहोत्सवाची सांगता होते.
बन्नीमंडप हे एक मैदान असून तिथंच हा शमीवृक्ष आहे. कर्नाटक राज्याची स्थापना झाल्यावर संपूर्ण दसरामहोत्सवाचं यजमानपद कर्नाटक सरकारनं घेतलं आहे. १९७२ सालापासून नॅशनल हेरिटेज अॅक्टनुसार सरकार या दसरामहोत्सवाचं आयोजन करत आहे. संध्याकाळी बन्नीमंडपात राज्यपाल टॉर्च परेडचं उद्घाटन करतात. या परेडला फक्त निमंत्रित पाहुणे आणि तिकिटधारकांनाच प्रवेश मिळतो. सैन्य आणि पोलिसखात्यातली पथकं यावेळी विविध सैनिकी कवायती सादर करतात. दसरामहोत्सवाची सांगता झाल्यानंतरही इथल्या एक्झिबिशन ग्राऊंडमध्ये या सोहळ्याची रंगत आणखी महिनाभर पाहायला मिळते. सरकारच्या विविध खात्यांचे स्टॉल्स, विविध कलांचे स्टॉल्स, कारागिरांचे स्टॉल्स महिनाभर या ठिकाणी असतात. मागील ४-५ वर्षांपासून अगदी ख्रिसमसपर्यंत या एक्झिबिशन ग्राऊंडमध्ये स्टॉल्स असतात. यात सरकारच्या विविध योजना तर माहीत होतातच आणि सरकारच्या कित्येक चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहचतात. आपल्याला विविध खात्यांच्या अनेक बारीकसारीक गोष्टींची माहिती इथं मिळते. काही शासकीय स्टॉल्सवर खेळाच्या माध्यमातून माहिती करून दिली जाते. त्यामुळे दसरामहोत्सवाला तुम्हाला जायला नाही मिळालं, तरी दिवाळीच्या सुट्टीत म्हैसूरला गेलात तर इथं नक्की जा!
आता जरा इतिहासात डोकावून या दसरामहोत्सवाविषयी आणखी जाणून घेऊया. इसवी सन ६१० मध्ये म्हैसूर राज्यावर ओडेयरू राजघराण्याचा अंमल सुरू झाला. राजा ओडेयरू यांनी राजदरबारात दसरामहोत्सवाची परंपरा सुरू केली. म्हैसूर राज्याची पहिली राजधानी श्रीरंगपट्टणा इथं हा उत्सव सुरू झाला. म्हैसूर काही काळाकरता विजयनगरच्या साम्राजाचा भाग होता. इथले यदुवंशीय राजे कृष्णदेवरायांच्या राजघराण्यातही दसरामहोत्सवाची परंपरा होती. त्यामुळे श्रीरंगपट्टणाहून हा दसरामहोत्सव काही काळ हंपीमध्ये साजरा होत होता. पुढे विजापूरच्या सुलतानासोबत इतर चार सुलतानांकडून पराभव झाल्यावर विजयनगर साम्राज्याचा पाडाव झाला. परंतु कृष्णदेवरायाच्या शेवटचा वंशज रामराय यांच्या जावयाला राज्य राखण्यात काही प्रमाणात यश आलं. त्या कुटुंबाच्या दोन शाखा आंध्रच्या तेलगोंडा व तिरुपतीजवळील चंद्रगिरी भागात स्थायिक झाल्या. दक्षिण भारतातला मोठा भाग तेलगोंडाच्या अधिपत्याखाली होता. तेलगोंडाच्या राजानं दसऱ्याची ही परंपरा आपल्याकडे सुरू ठेवली. तेलगोंडाच्या राजवंशातील राजाचा श्रीरंगपट्टणा इथं पराभव करून ओडेयरू पुन्हा म्हैसूरच्या सत्तास्थानी आले. आणि पुन्हा एकदा ही दसरामहोत्सवाची परंपरा ओडेयरू राजघराण्याकडे आली. १६१० सालापासून जो कोणी म्हैसूरच्या गादीवर असतो, तो आजतागायत ही दसऱ्याची परंपरा पाळतोच. आताच्या कर्नाटकातल्या बहुतांश भागासोबतच तामिळनाडूतलं कोईमतूर, सेलमपर्यंत ओडेयरूंची सत्ता होती. काही कमकुवत राजांमुळे ओडेयरू राजघराण्यातलं सत्ताकेंद्र हैदरअली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान यांच्याकडे गेलं. तरीही दसराउत्सव साजरा होतच राहिला.
टिपूच्या मृत्यूनंतर परत ओडेयरूंकडे हे सत्ताकेंद्र आलं. कृष्णराज ओडेयरू तिसरे हे संगीतउपासक होते. त्यांच्या दरबारात देशोदेशीचे कलाकार आपली सादर करायला यायचे. त्यांच्या काळातच या उत्सवाला महोत्सवाचं रूप आलं. त्यांच्या कारकिर्दीत दसराउत्सवाच्या काळात सामान्य जनतेलाही या कार्यक्रमांचा आनंद घेता यायचा. राजाला प्रत्यक्ष पाहता यायचं. नवरात्री आणि देवीच्या पूजेचा धार्मिक कार्यक्रम झाल्यावर विजयादशमीच्या दिवशी राजे सीमोल्लंघनाकरता बाहेर पडायचे. आता ही पद्धत औपचारिकता म्हणून पाळण्यात येते. राजे वाजतगाजत मिरवणुकीनं बन्नीमंडपापर्यंत येतात आणि शमीवृक्षाची पूजा करतात. सुरुवातीला भारतीय पारंपरिक पद्धतीनं साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवावर म्हैसूरमध्ये ब्रिटिश आल्यावर त्यांचा प्रभावही या मिरवणुकीवर दिसून येतो. लष्करी संचलन, माऊंटेड पोलिसपथक हा ब्रिटिश अमलाचाच परिणाम आहे. पण इथल्या स्थानिक परंपरांचा बाजही अद्याप कायम आहे.
गेल्या काही वर्षांपासून एकत्रितपणे सार्वजनिक दसरामहोत्सव साजरा करण्याऐवजी मुख्य महोत्सवांतर्गत प्रत्येक विभागाकरता स्वतंत्र जागेवर दसरा आयोजित करतात. जसे, क्रीडादसरा, कलादसरा, साहित्यदसरा, युवादसरा, आहारदसरा असे विभाग करण्यात आले आहेत. यंदाच्या दसरामहोत्सवाची सुरुवातही चामुंडी बेटावर देवीच्या पूजेनं झाली. ज्येष्ठ साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते मुख्य दसरामहोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. पी.व्ही. सिंधू हिच्या हस्ते क्रीडादसऱ्याचं उद्घाटन करण्यात आलं. दरवर्षी या दसरा महोत्सवात काही ना काही नवीन गोष्टीची भर पडतच असते. म्हैसूरच्या सामान्य माणसापासून, राजघराणं आणि सरकारी विभागातील प्रत्येक जण हा महोत्सव उत्कृष्ट होण्याकरता झटत असतो. म्हैसूरच्या वैभवशाली परंपरेनं सुरू केलेल्या या महोत्सवाचा अनुभव आपण एकदा तरी घ्यायलाच हवा.

(ऐतिहासिक संदर्भ – प्रा. राघवेंद्र कुलकर्णी, प्राचार्य -चित्रकला परिषद, प्रा. चंद्रा)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link