Next
अभ्यंगम् आचरेत् नित्यम्।
वैद्य उर्मिला पिटकर
Friday, November 02 | 02:00 PM
15 0 0
Share this story

उठा उठा दिवाळी आली, अभ्यंगस्नानाची वेळ झाली।
ही ओळ आता सर्वांनाच पाठ झाली आहे. साधारण दिवाळीच्या सुमारास हवेमध्ये कोरडेपणा वाढायला लागलेला असतो. सकाळी आणि रात्री थंड तर दुपारी गरम असे वातावरण असते. शरदऋतूतील उष्म्यामुळे या कोरडेपणात आणखी भर पडते. त्वचा कोरडी होते, त्वचेला भेगा पडू लागतात .
म्हणूनच शरदऋतूच्या मध्यावर ,म्हणजे आश्विन कृष्ण चतुर्दशीला सुरू होणाऱ्या, दिवाळी या सणाच्या निमित्ताने अभ्यंगस्नानाची प्रथा सुरू करण्यात आली असावी. त्यानिमित्ताने आता अंगाला तेल लावा, अशी आठवण करून दिली जाते. तेलामध्ये स्निग्धपणा हा महत्त्वाचा गुण असतो. त्या स्निग्धपणामुळे त्वचेत निर्माण होणारा कोरडेपणा नाहीसा होतो. अभ्यंग म्हणजे सर्व शरीराला तेलाचे मालिश करून तेल जिरवणे.

आपल्या त्वचेत असंख्य छिद्रे आहेत. त्वचा हे आयुर्वेदानुसार वातदोषाचे स्थान आहे. त्यामुळे त्वचेवर तेलाचे अभ्यंग केल्यास सर्व शरीरातील वातदोष संतुलित होतो.
 आपली त्वचा ही आपल्या आरोग्याचा आरसा असतो. कोणतीही शारीरिक किंवा मानसिक व्याधी झाल्यास, तिचा परिणाम त्वचेवर त्वरित होताना दिसतो. आपण आजारी असलो, मन उदास असले, तर त्वचा काळवंडते. निरोगी, प्रसन्न आणि आनंदी व्यक्तीची त्वचा तुकतुकीत, तेजस्वी असते. त्यामुळे त्वचेवर केलेल्या अभ्यंगामुळे शरीर व मन दोन्हीचे आरोग्य सुधारते.

रोज शक्य नसल्यास किमान आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी सर्व शरीराला अभ्यंग करावे . थंडीच्या दिवसांत मात्र शक्यतो रोज अभ्यंग करावा.
अभ्यंगम् आचरेत्  नित्यम्
स जरा श्रमवातहहा।
दृष्टी प्रसाद पुष्टी आयु, सुस्वप्न स्निग्धत्वक् दार्ढ्यकृत्।।

नित्य अभ्यंग केल्यामुळे आपण दीर्घकाळपर्यंत तरुण राहतो. शरीराला झालेले श्रम, ताण निघून जातो. मन प्रसन्न होते. वातदोषाचे नियंत्रण होते. त्यामुळे वातामुळे होणाऱ्या सर्वच आजारांपासून संरक्षण मिळते. नजर- दृष्टी उत्तम राहते. शरीर बांधेसूद राहते.  झोप उत्तम लागते. त्वचा तेजस्वी व तुकतुकीत राहते. शरीर बलवान आणि दृढ होते. निरोगी दीर्घायुष्य लाभते.
अरे वा!  हे तर एक Total health Package च आहे की!
एवढे सगळे फायदे होणार असतील तर अजून काय पाहिजे. त्यासाठी  रोज शरीराला तेल लावणे, ये कोई बहोत बडी कठीन चीज नहीं है बाबू!

अभ्यंगविधि -
रोज सकाळी व्यायाम केल्यानंतर, रिकाम्या पोटी, स्नानापूर्वी एका वाटीमध्ये तिळाचे तेल, खोबरेल तेल किंवा आपल्या प्रकृती व ऋतूसाठी योग्य असे तेल वैद्याच्या सल्ल्याने घ्यावे. अभ्यंग करत असताना त्या खोलीत पंखा, एसी, कूलर इत्यादींचा वापर करू नये.
डोके, चेहरा, मान, गळा, छाती, पोट, हात, पाठ, कंबर, पाय या सर्व अवयवांना क्रमाने व्यवस्थित तेल लावून जिरवावे.
अशा प्रकारे अभ्यंग करण्यासाठी आठ  ते दहा चमचे तेलाची आवश्यकता असते आणि बारा ते पंधरा मिनिटांचा वेळ लागतो.
एखादा दुर्धर रोग झाल्यानंतर, पंचकर्मकेंद्रात जाऊन कैक लिटर तेलाच्या ट्रीटमेंट घेण्यापेक्षा, हे रोज सात-आठ चमचे तेल वापरणे काय वाईट?  अभ्यंग केल्यानंतर लगेच स्नान न करता, थोडा वेळ आपली अन्य कामे करून अर्ध्या ते पाऊण तासाने स्नान करावे .

स्नान करताना कोमट पाण्याचा वापर करावा. साबण अजिबात वापरू नये. साबणाऐवजी चंदन, वाळा, नागरमोथा, संत्रासाल, शिकेकाई, आवळाचूर्ण अशा प्रकारच्या सुयोग्य वनस्पतींनी बनविलेले उटणे वापरावे.

 यालाच आयुर्वेदाच्या भाषेत उद्वर्तन असे म्हणतात. उद्वर्तन म्हणजे औषधी उटण्याने शरीर रगडणे. उद्वर्तनाने अभ्यंगामुळे शरीरात निर्माण झालेला चिकटपणा, ओशटपणा निघून जातो, परंतु साबणामुळे होणारे दुष्परिणाम मात्र जाणवत नाहीत. ज्यांना नेहमीच अभ्यंग करणे खरेच शक्य नाही अशांसाठी एक छोटीशी युक्तीसुद्धा आयुर्वेदाने सांगून ठेवली आहे.

शिरः कर्ण पादेषु तं विशेषेण शीलयेत्।
जे सर्व शरीराला अभ्यंग करू शकत नाहीत, त्यांनी किमान डोके, पायाचे तळवे आणि कान यामध्ये नित्य तेल घालावे.
डोके आणि पायाचे तळवे म्हणजे शरीराची दोन मुख्य प्रवेशद्वारे. या दोन्ही ठिकाणी जर सातत्याने तेल घालून पहारा ठेवला, तर दारावरच शत्रूला रोखता येते आणि पुढे वातदोष बिघडून होणाऱ्या दुर्धर आजारापासून शरीराचे संरक्षण होते. कान हेही असेच दोन द्वारपाल. तेही वाताचे स्थान म्हणून कानात तेल घालणे तेवढेच महत्त्वाचे! वात-पित्त-कफ या त्रिदोषांचा लीडर वातदोष! जर तो शांत झाला, तर मग बाकी दोन्ही आपोआपच काबूमध्ये राहतात. म्हणूनच संपूर्ण त्वचा व डोके, तळवे व कान या तिन्ही चौक्यांवर नियमितपणे तेल घालत राहणे आरोग्यरक्षणासाठी आवश्यक ठरते!
डोक्यावर तेल घालणे म्हणजे शिरोभ्यंग. पूर्वीच्या काळी अंघोळीनंतर रोज डोक्यावर खोबरेलतेल लावण्याची पद्धत होती. आता मात्र ‘उडती केस भुरूभुरू’ ही फॅशन आल्यापासून, केसांचा आणि तेलाचा संबंध तुटला.  पूर्वीच्या काळी नियमितपणे तेल, शिकेकाई वापरणाऱ्या आपल्या आया-आज्या यांचे केस उत्तम होते, की आता शाम्पू-कंडिशनरच्या जमान्यातल्या मुलींचे, हा निरीक्षण करण्यासारखा मुद्दा आहे. रात्री झोपताना किंवा सकाळी अंघोळीनंतर जर डोक्यावर तेलाचा अभ्यंग केला तर त्यामुळे झोप शांत लागते, केसांच्या सर्व तक्रारी दूर होतात व दृष्टीही उत्तम राहते.

पादाभ्यंग -

पायाच्या तळव्याला तेल चोळणे म्हणजे पादाभ्यंग. पादाभ्यंग नेहमी रात्री झोपतानाच करावा. पूर्वी प्रत्येक घरामध्ये खोबरेलतेलाची बाटली आणि काशाची वाटी ही जोडी असेच आणि रात्री झोपताना पायाच्या तळव्याला तेल लावण्याची पद्धत होती. आज आपण थायलंडला गेल्यावर भरपूर पैसे मोजून मोठ्या कौतुकाने foot massage करून घेतो, परंतु आपल्या घरातील तेलाची बाटली आणि काशाची वाटी मात्र दुर्दैवाने लुप्त झालेली आहे.  पायाच्या तळव्याला अभ्यंग केल्यामुळे संपूर्ण शरीरातील उष्णता व कोरडेपणा नाहीसा होतो. झोप उत्तम लागते, दृष्टी सुधारते. अनियमित जेवणाच्या वेळा, जागरणे, धावपळ, चिंता अशा प्रकारच्या सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये रोज पादाभ्यंग केल्याने, अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांपासून बचाव होतो. आपली कार्यक्षमता वाढते.

“अरे अरे माकडा कान कर वाकडा” असे म्हणून कानात तेल घालणारी आजी आता घराघरातून नाहीशी झालेली आहे. हे तेल घालण्यासाठी प्रत्येक घरामध्ये चांदीची किंवा स्टीलची झारी असायची. रोज नाही तरी, निदान आठवड्यातून एकदा तरी कानामध्ये तेल घालणे अत्यावश्यक आहे. सध्या शहरांमध्ये असणारा गोंगाट, सतत कानावर पडणारे चित्रविचित्र आवाज यामुळे बहिरेपणा, चिडचिड, मानसिक अस्वास्थ्य या गोष्टींचे प्रमाण खूप वाढले आहे. नित्य कर्णपूरण केल्यामुळे कानाची कार्यक्षमता सुधारते.

तिळाचे तेल, खोबरेलतेल किंवा वैद्याने सुचवलेले,  आपल्याला योग्य असलेले तेल किंचित कोमट करून, आतील छिद्र भरेपर्यंत कानात घालावे आणि पाच ते दहा मिनिटांनंतर कान उपडा करून सर्व तेल काढून टाकावे. अशाप्रकारे सकाळी अंघोळीपूर्वी किंवा रात्री झोपण्यापूर्वी कर्णपूरण करावे. फक्त कानामध्ये पू किंवा कोणताही स्राव येत असेल, कान दुखत असेल तर वैद्यांच्या सल्ल्याशिवाय कानांमध्ये काहीही घालू नये.

दिवाळी ते होळी रोज  व उन्हाळा ते पावसाळा निदान संडे टू संडे तरी अभ्यंग करावा. तेही जमणार नसेल तेव्हा निदान डोके, पाय व कानात तरी तेल घालावे. नित्य अभ्यंग करणे हा खरा खुरा आयुर्वेदिक health insurance आहे!  तेव्हा नक्की करुया, या दिवाळीपासून अभ्यंगाला सुरुवात !
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link