Next
पण नको, आणि
डॉ. राजेंद्र बर्वे
Friday, April 12 | 04:00 PM
15 0 0
Share this story


माझं नाव प्रसाद. नावाप्रमाणेच मी सत्यनारायणाच्या प्रसादासारखा आहे. म्हणजे गोरा रंग, तकतकीत कांती. गोरा आहे पण गुलाबी गोरा नाही, तकतकीत कांती आहे पण जरा तेलकट दिसतो. खरंय की मी थोडासाच आकर्षक आहे. म्हणजे आकर्षक दिसू शकतो पण उंची कमी आहे. तसा मी शिकलेला आहे, इंजिनीयर आहे पण आयआयटीतला नाही. मला चांगली नोकरी आहे, पण पगार हवा तितका नाही. माझं वय बत्तीस-तेहतीस आहे, पण मी वयानं मोठा दिसतो. माझे आईवडील मला सपोर्ट करतात, पण मला स्वत:चे निर्णय घ्यायला देत नाहीत.
मला लग्न करायचंय, पण जमत नाही. मला मुली पसंत करतात, पण मी त्यांना नकार देतो. मी ज्यांना पसंत करतो, त्या मला आवडतात, पण मी त्यांना आवडत नाही. मी तुमचे लेख वाचतो, आवडतात, पण मला ते समजत नाहीत. मला काही लेखांतील काही विचार समजतात, पण ते आचरणात आणता येत नाहीत. मला स्वत:ला बदलायचं आहे, पण कसं ते कळत नाही. कळतं पण वळत नाही.
तर हा प्रसाद, मित्र हो, एका मोटिव्हेशन सेशनमध्ये मला भेटला. आवर्जून माझ्याशी बोलला. मग मी त्याला एकच प्रश्न विचारला, “तू बोलायचं ठरवलं होतंस; मला प्रश्न विचारायचं निश्चित केलं होतंस, होय ना? मग विचारू शकलास का, याचं उत्तर आधी दे.”
तो बुचकळ्यात पडला. “मला समजलं...” त्याला तोडून मी म्हटलं, “आता कोणता शब्द वापरणार होतास?” तो गोंधळून म्हणाला, “पण... मला कळालं नाही!” “थांब, थांब. तू आणखी बोलू नकोस. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहेस. तू मला प्रश्न विचारू शकलास कारण तू ‘पण’ हा शब्द वापरला नाहीस. तू माझ्याशी बोलायला सुरुवात केल्यापासून किमान १४ वेळा ‘पण’ हा शब्द वापरलास. मनातल्या मनात तर ‘पण’ हा शब्द त्यापेक्षा कितीतरी वेळा उच्चारला असशील.”
“तुझ्या सगळ्या समस्येचं उत्तर ‘पण’ या शब्दामध्ये आहे. ‘पण’ हा शब्द वापरतोस तेव्हा तुझी मनोवृत्ती स्पष्ट दिसते. तुझ्या वाक्याचे दोन भाग पडतात. पहिल्या भागात तुझी होकारात्मक वृत्ती दिसते. म्हणजे आपले कोणते गुण चांगले आहेत, आपल्या कोणत्या होकारात्मक बाजू आहेत, कोणती सकारात्मक उद्दिष्टं आहेत, हे त्यातून प्रतीत होतं. तर ‘पण’ या शब्दानंतरच्या वाक्यात तुझ्यामधल्या तथाकथित कमतरता, त्रुटी अथवा कौशल्यांचा अभाव अशा गोष्टी व्यक्त होतात. त्या ‘पण’मुळे तुझं सगळं अडून राहतंय. ‘पण’नंतरच्या वृत्तीमधून नकारात्मकता आणि असहाय्यता जाणवते. ‘आहे मनोहर तरी, गमते उदास’ अशी वृत्ती दिसते. त्यातून तू मार्ग काढू शकत नाहीस. तू हतबल झाला आहेस असं जाणवतं. अरे, जाणवतं म्हणजे तुझ्या अबोध मनातून ते व्यक्त होतं. तुझ्या नकळतपणे ते बाहेर पडतं.”
प्रसाद विचारात पडला. तो बोलणारा इतक्यात मी म्हटलं, “आता म्हणशील, पण मी काय करू? सांगा.” यावर तो पटकन हसला. “अगदी बरोबर, असंच म्हणणार होतो!”
“तुला एक युक्ती सांगतो. ‘पण’ या शब्दाला आता सोडून दे. ‘पण’ऐवजी ‘आणि’ या शब्दाचा वापर करून वाक्य पुढे ने. म्हणजे मला लेख समजतो आहे आणि...” मी थांबून प्रसादकडे पाहिलं. “आणि मला तो नीट समजून घ्यायचा आहे आणि त्यासाठी मी काय करू?” प्रसाद वाक्य पूर्ण करून म्हणाला. “सर, चक्क जादू आहे ‘आणि’ या शब्दात. म्हणजे मी प्रश्नाचं उत्तर शोधायला तयार होतो. मी गुलाबी गोरा नाही आणि ते मी स्वीकारतो. माझी उंची कमी आहे आणि ते मी स्वीकारतो. माझा पगार कमी आहे आणि तो अधिक असावा, यासाठी मला प्रयत्न करायचा आहे. मी काही मुलींना पसंत करतो आणि काही मुली पसंत करतात आणि एकमेकांना पसंत करणारे जोडीदार मी शोधतो आहे.”
“...आणि सर, मनापासून आभारी आणि मी हे नेहमी लक्षात ठेवेन.” आणि आम्ही हसलो.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link