Next
‘तुझे तू, माझे मी’
मंगला मराठे
Friday, January 25 | 04:00 PM
15 0 0
Share this storyआजचे तरुण मुलगे आणि मुली लग्नाबद्दल जे बोलतात ते ऐकून त्यांच्या पालकांच्या पिढीला थोडे चक्रावून जायला होते. ह्या  मुलांना  लग्नात,
घर-संसारात काही रस नाही, असे वाटते. त्यांना मुलाबाळांची ओढ आहे की नाही अशी शंका येते. मुलांचा दृष्टिकोन पालकांना समजत नाही. पचनी पडणे दूरच. त्यांना मुलांची काळजीही वाटते.

आजवर लग्न ही आयुष्यातली सर्वात मोठी व सर्वात महत्त्वाची घटना होती. मोजक्या ध्येयवेड्या माणसांचा अपवाद वगळता साधारणपणे सर्व स्त्रीपुरुषांना असेच वाटायचे. लग्न केल्यामुळे आयुष्याला स्थैर्य मिळते, असा विचार होता. त्या मानसिकतेतून विचार करणाऱ्या पालकांना मुलांच्या लग्न, संसाराबद्दलच्या अलिप्तपणाची काळजी वाटते.

लग्न, संसाराला आजची पिढी  प्राधान्य देत नाही. खास करून ज्यांचे काही विशेष करिअर आहे, जे काहीशा हटके क्षेत्रात काम करीत आहेत त्यांच्यासाठी त्यांचे करिअर, त्यांची स्पेस या गोष्टी पहिल्या पायरीवर असतात. लग्न, संसार,  घर हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे, पण ‘नॉट अॅट द कॉस्ट ऑफ करिअर.’ त्याच्यासाठी आपण काही खास करायला पाहिजे, हा विचार नाही. हे आपोआप होत राहील, असे त्यांना वाटते. बहुतांश करिअरमध्ये आज जीवघेणी स्पर्धा आहे. त्यामुळे लग्न कधी करायचे, कुठे राहायचे, मूल कधी होऊ द्यायचे ह्या सगळ्या गोष्टी करिअरसापेक्ष ठरवतात. हा टोकाचा व्यक्तिवाद आहे की विवेकी  विचारसरणी आहे, नातेसंबंधांवर याचा काय परिणाम होईल, हे आज  ठरविणे कठीण आहे. या प्रकारचे प्राधान्य मानणारी ही पहिलीच पिढी आहे; मुलींची तर नक्कीच.
आधीच्या पिढीतील मुली नवऱ्याच्या करिअरप्रमाणे आपले करिअर बेतायच्या. नोकरी  टिकवून ठेवण्यासाठी नियमात बसेल तेवढेच पदरात पाडून घ्यायच्या. त्यात त्यांच्या रजा संपायच्या, सेवाज्येष्ठता जायची. बदली नको म्हणून बढती नाकारायच्या. अनेक जणी मुलांसाठी, घरातल्या वृद्धांसाठी करियर अर्ध्यातून  सोडून द्यायच्या. काही जणी पूर्णवेळ घरी राहायच्या. अनेक पुरुषांनीही बढती नाकारली, नोकरीच्या नवीन संधींचा विचार केला नाही. त्यात या स्त्री-पुरुषांना कर्तव्यपूर्तीचे समाधान, त्यागाची झिंग आणि करिअर सोडावी लागल्याची खदखद अशा सगळ्या भावना आहेत. ह्यातली एकेक भावना कधी कधी डोके वर काढताना दिसते, पण त्यांना त्याचा पश्चात्ताप होताना फारसा कधी दिसत नाही. “ठीक आहे. काही गोष्टी नाही मिळाल्या पण त्याऐवजी ह्या ह्या गोष्टी मिळाल्या,” असे ती मंडळी म्हणताना दिसतात.

आजच्या करिअरिस्ट तरुण पिढीची गणिते वेगळी  आहेत. सहजीवन, घर-संसार याकडे आयुष्यातला एक भाग, इतक्याच मर्यादित दृष्टीने ते बघतात. नवरा-बायकोने सतत एकत्र राहायचे, ‘दो जिस्म मगर एक जान है हम’ या कल्पना या मुलांच्या डोक्यात नाहीत. त्यांचे एकमेकांवर प्रेम असते, मात्र त्या प्रेमात हातात हात घालून सतत एकाच वाटेवरून चालण्याची त्यांना गरज वाटत नाही.  आपापल्या वाटेवरून पुढे चालायाचे आणि मधे मधे एकमेकांना साद घालायची हे त्यांना पुरेसे वाटते आहे.

ही मुले एकमेकांना गृहीत धरत नाहीत. एकमेकांचे कार्यक्रम एकमेकांना माहीत असतातच, असे नाही. त्याची त्यांना गरजही वाटत नाही. एकमेकांच्या पैशांच्या व्यवहारात ते डोकावत नाहीत. एकमेकांच्या कोणत्याही गोष्टीबाबत ‘मला माहीत नाही, त्याला/तिला विचारावं लागेल,’ असे उत्तर या मुलांकडून अगदी सहजपणे येते. ‘मी माझ्या कामात आहे ना? मग मला कसं सगळं माहीत असणार?’ असे म्हणतात ही मुले. आजच्या ‘तुझे तू, माझे मी’ च्या (TTMM) जमान्यात यांचे सहजीवनही याच पद्धतीवर आहे की काय, असे पालकांना वाटते.

एक गोष्ट नक्की दिसू लागली आहे. या मुलांमधे सबुरी अजिबात नाही. काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो. भावनिक गुंतवणूक करावी लागते.  यासाठी लागणारी मानसिक ताकद या मुलांकडे दिसत नाही. ती सगळी करिअरच्या ताणतणावात खर्च होते. वाढीच्या वयात कॉलेज, क्लास, परीक्षा या चक्रात त्यांचे सोशलायझेशन राहून गेले. पालकांना काळजी आहे ती मुलांच्या मन:स्वास्थ्याची. आणि ती काळजी बिनबुडाची आहे, असे म्हणता येत नाही.
 
ही मुले माणूसघाणी किंवा निर्मम नाहीत. घरासाठी, एकमेकांसाठी,  एकमेकांच्या नातेवाईकांसाठीही त्यांच्या डोक्यात जागा असते. वाढदिवस, सणाचे दिवस त्यांच्या डोक्यात असतात, पण त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असेलच असे नाही.  एखाद्याला मदतीची गरज आहे हे त्यांच्या लक्षात येताच ते जमेल तशी मदत करतात. ही मुले म्हणतात, ‘प्रगती हवी तर समोर आलेली प्रत्येक संधी घ्यायलाच हवी. आपल्या मुलांना क्वालिटी लाइफ द्यायचं तर त्यासाठी अपडेटेड इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. त्यासाठी पैसाही लागतो आणि स्वत:ला अपडेट ठेवावं लागतं. शिवाय प्रत्येकाला स्वत:ची स्पेस असायला हवी. आपल्या माणसांवर आपलं प्रेम असतंच. ते कुठे जाणार आहे? त्यासाठी तंगड्यात तंगडं अडकवून एकमेकांना बांधून कशाला ठेवायचं?’    

या मुलांच्या पालकांना मात्र त्यांची काळजी वाटते, कारण कुटुंब आणि त्यातली भावनिक नाती हाच पालकांच्या संसाराचा पाया आणि आयुष्याचा गाभा होता. ‘ह्या मुलांना आईवडिलांसाठी सोडा पण एकमेकांसाठी, स्वत:च्या लेकरांसाठीसुद्धा वेळ नाही. कसलं हे आयुष्य. आता तरुण वयात, कामात बुडालेले आहेत, तोपर्यंत ठीक आहे. मात्र तरुणपण ओसरल्यावर याचं काय होईल? तेव्हा जिवाभावाची साथ लागेल नं? हे असं आपलं आपलं आयुष्य जगण्याची सवय लागली तर तेव्हा अशी साथ कशी मिळणार?’ या दोन विचारसरणींतली कुठली बरोबर कुठली चूक, हे काळच ठरवेल.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link