Next
कर्तव्यात आनंद उत्सवाचा
आदित्य बिवलकर
Friday, November 02 | 04:00 PM
15 0 0
Share this story

शाळेतल्या मुलांसोबतचा फराळ
दिवाळीपहाटचा कार्यक्रम असो किंवा मैदानामध्ये होणारी फटाक्यांच्या आतषबाजीत, अग्निशमनदलाच्या कर्मचाऱ्यांना नेहमीच अलर्ट राहावं लागतं. अग्निशमनदलाच्या सुट्ट्या या दिवसांमध्ये रद्द केल्या जातात. अशावेळी आळीपाळीने घरी जाऊन कर्मचारी दिवाळी साजरी करतात, फराळ करून कुटुंबीयांसमवेत काही वेळ घालवतात आणि पुन्हा कामावर रुजू होतात. ‘गेल्या वर्षीच्या दिवाळीमध्ये आमच्यासाठी शाळेतल्या मुलांनी त्यांच्या घरून फराळ आणला होता आणि आमची कामाची पद्धत जाणून घेऊन त्यांनी आमच्यासोबत फराळ केला त्यावेळी आनंद झाला होता,’ असं अग्निशमनदलातील कर्मचारी श्रीकांत सबनीस सांगतात.

रुग्णांसोबतच सणाचा आनंद

२४ तास ७ दिवस रुग्णांच्या सेवेत अनेक रुग्णालये सुरू असतात. दिवाळीच्या काळात रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांना सलग सुट्ट्या देणे शक्य नसते. त्यामुळे प्रत्येकाला एक दिवस सुट्टी देण्यात येते. बऱ्याच वेळा सुट्टी असतानादेखील अचानक काम निघाल्यामुळे रक्तपेढीमध्ये यावे लागते. त्यामुळे रक्तपेढीमध्येच कर्मचारी दिवाळी साजरी करतात. ‘रुग्णसेवा हाच खरा आनंद मानत आम्ही सण साजरा करतो’ असे डॉ. मृणाल कुलकर्णी सांगतात, ‘दोन वर्षांपूर्वी दिवाळीमध्ये कट्यार काळजात घुसली हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यावेळी डोंबिवलीमध्ये या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी चित्रपटातील कलाकारांना भेटून हा प्रयोग रुग्णालयातील काही रुग्णांनी अनुभवला होता. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद काहीसा निराळाच होता. आजही त्या आठवणी मनात कायम आहेत.’

लोकांच्या प्रेमाची दिवाळी
दिवाळीचे सर्वच दिवस पोलिस अहोरात्र ड्युटीवर असतात. त्यामुळे दिवाळीनंतर आठवडाभराने कुटुंबीयांसोबत प्लॅन करून आनंद साजरा करण्याचा प्रयत्न पोलिस विभागातील अनेक जण करतात. ड्युटी सांभाळून काही वेळ कुटुंबीयांना देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. गेल्या वर्षी मुंबईतील एका मार्केटमध्ये  अशीच दिवाळी साजरी करत असताना मुस्लिम बांधवांनी येऊन सर्व पोलिसांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन एकतेचा संदेश दिला होता. त्यांनी सर्व पोलिसांची चौकशीसुद्धा केली होती . तो अनुभव सर्वांनाच भारावून टाकणारा होता. याचप्रमाणे मुंबईतील काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पोलिसांना चहा आणि खाऊ देऊन त्यांना धन्यवाद म्हणण्याचा उपक्रमसुद्धा दिवाळीमध्ये राबवला होता. ती आठवण स्पेशल असल्याचे इन्स्पेक्टर गणेश साळुंके सांगतात. आमची दिवाळी ड्युटीशी निगडित राहते त्यामुळे ही कामे पार पाडण्यास आमचे प्राधान्य असते, असे ते सांगतात. 

महावितरण कार्यालयात सेलिब्रेशन
दिवाळीचे तीन दिवस महावितरणचे वायरमन, इंजिनीयर यांना २४ तास ड्युटीवर हजर राहावे लागते. काही तांत्रिक कारणाने कुठे कधी वीज जाईल, याचा नेम नसल्याने कर्मचारी सजग असतात. शॉर्ट सर्किट किंवा इतर घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन कर्मचारी कार्यालयात सज्ज असतात. शिवाय महावितरणची विशेष टीम वेगवेगळ्या भागातील सुरक्षेचा आढावा सुट्टीच्या दिवशीही घेते. मुख्य बाजारपेठेत दिवाळीची खरेदी करण्यासाठी गर्दी होत असते. समस्या आल्यास ग्राहकांचे व व्यावसायिकांचेही हाल होऊ शकतात. विद्युत रोशणाईमुळेमुळे डीपीवर लोड येऊन वीज जाण्याची शक्यता असते. ‘वीज गेल्यामुळे इतरांच्या आनंदामध्ये विघ्न येऊ नये, यासाठी आम्ही कार्यरत राहतो,’ असे अधिकारी सांगतात.

कुटुंबीयांची दिवाळी मॉलमध्ये
खरेदीसाठी मॉलमध्ये झुंबड उडते. मॉलमधील सुरक्षा कर्मचारी, कामगार आणि यंत्रणांना त्यामुळे सुट्टी नसते. दिवाळीनंतर किंवा दिवाळीच्या आधी या सुट्ट्या दिल्या जातात. सकाळची शिफ्ट असेल तर रात्रीच्या वेळी घरी स्त्रिया फराळ आणि अन्य कामे करून पुन्हा मॉलमध्ये ड्युटीवर हजर होतात. दिवाळीच्या दिवशी कुटुंबासोबत राहावे अशी इच्छा असल्याने संपूर्ण कुटुंबीय मॉलमध्येच एकत्र येतात. मॉलच्या कर्मचाऱ्यांचे या निमित्ताने गेट टूगेदर होते. कुटुंबीयांनाही मॉलची सफर घडते. लक्ष्मीपूजन, भाऊबीज, पाडवा यांसारखे सण मात्र सुरक्षा कर्मचारी मॉलमध्येच साजरा करतात. मॉलमध्ये जास्त गर्दी असल्याने डबल ड्युटीसुद्धा करावी लागते.

एसटीमधील गोड बातमी
दिवाळीच्या दिवसांमध्ये चाकरमानी आपल्या घराकडे जाण्यासाठी एसटीचा वापर करतात. एकीकडे चाकरमानी नटूनथटून घरी जात असताना एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टर मात्र या उत्सवापासून दूर असतात. आपल्या कुटुंबीयांपासून दूर दिवाळीचे सर्व दिवस प्रवासामध्ये साध्या युनिफॉर्मवर आपली ड्युटी करत असतात. चाकरमान्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि समाधान निराळे असल्याचे चालक प्रसाद सावंत सांगतात. वेगवेगळ्या डेपोमध्ये जेव्हा आम्ही चालक एकत्र भेटतो तेव्हा एकत्र दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि फराळ किंवा आमच्याजवळील पदार्थ एकमेकांना देऊन आमची दिवाळी साजरी करतो असे ते म्हणाले. तीन वर्षांपूर्वी कोकणात राजापूर येथे एका पॅसेंजरला आपल्या बायकोच्या माहेरी जायचे होते. तिकीट नसताना थोडीशी अडजेस्टमेंट करून त्यांना प्रवेश देण्यात आला. त्यावेळी त्यांना अपत्य झाल्याची बातमी बसमध्ये कळल्यावर त्यांनी संपूर्ण बसमध्ये पेढे वाटून आनंद साजरा केला. आजही दिवाळीचा तो फराळ लक्षात आहे, असे सावंत सांगतात.

पहिला दिवस कामावरच
नरकचतुर्दशीला अभ्यंगस्नान करून कुटुंबीयांसोबत फराळ करणं हा अनेकांचा प्लॅन ठरलेला असतो. मात्र पहिल्या दिवशी सकाळी सफाईच्या कामाला सफाई कामगारांना हजर राहावे लागते. दिवाळीच्या मिळालेल्या बोनसमधून मुलांसाठी फटाके आणि अन्य खरेदी करून कामगार रुजू होतात. कुटुंबीयांच्या आनंदामध्ये सहभागी होता येत नसले तरी त्यांच्या आनंदामध्ये समाधान मिळत असल्याचे सफाई कामगार रमेश मोरे सांगतात. दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाके आणि इतर कारणांमुळे रस्त्यावर धूळ आणि कचरा मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे या दिवसांमध्ये काम अधिक असते. मात्र अशावेळी सर्व कामगार एकत्र येऊन काम करतो. त्याचबरोबर काम झाल्यावर, एकत्र फराळ करून दिवाळी साजरी करतो, असे ते सांगतात. ज्या इमारतींमध्ये आम्ही सफाईचे काम करतो त्या ठाण्यातील दोस्ती इमारतीत गेल्या वर्षी दिवाळीपहाटच्या कार्यक्रमासाठी आम्हाला सर्वांना निमंत्रण दिले होते. त्याचबरोबर इमारतीच्या किल्लेबांधणीसाठीसुद्धा आमच्या मुलांना आणायला सांगितलं होतं. त्यामुळे कामावरच दिवाळी असली तरी आनंद झाला होता, असे महेश मिश्रा सांगतात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link