Next
होल्डरचा विंडीज संघ चमत्कार घडवेल?
शरद कद्रेकर
Friday, May 03 | 03:00 PM
15 0 0
Share this story

विश्वचषक क्रिकेटस्पर्धा जेमतेम २५ दिवसांवर आली असताना संभाव्य विजेत्यांच्या यादीत गतविजेता ऑस्ट्रेलिया, यजमान इंग्लंड, विराट कोहलीच्या भारतीय संघाच्या नावाची चर्चा सुरू आहे. स्पर्धेतील धोकादायक संघांत जेसन होल्डरच्या विंडीजची गणना होत आहे. क्रिस गेल, आंद्रे रसेल, डॅरन ब्रावो, किमार रोश अशा नावाजलेल्या खेळाडूंची फौज होल्डरकडे मौजूद आहे.
क्लाईव्ह लॉईडच्या विंडीज संघाने १९७५, १९७९ च्या विश्वचषकस्पर्धांत लागोपाठ जेतेपदाची किमया केली होती, परंतु कपिलदेव निखंजच्या भारतीय संघाने लॉर्ड्सवर लॉईडच्या विंडीजचे विश्वचषकजेतेपदाच्या हॅटट्रिकचे मनसुभे उधळून लावत १९८३मध्ये प्रुडेंशियल वर्ल्डकपवर भारताचे नाव कोरले. मागील तीन तपांमध्ये विंडीजला विश्वचषक पटकावणे दूरच राहो, अंतिम फेरीदेखील गाठता आलेली नाही. दरम्यानच्या काळात ब्रायन लाराच्या विंडीजने यजमान इंग्लंडला नमवून चॅम्पियन्स करंडकावर आपले नाव कोरले ते ओव्हलवर! २००४ मध्ये विंडीजला हे यश लाभले. तीन वर्षांपूर्वी कोलकाताच्या इडन गार्डन्सवर डॅरन सॅमीच्या विंडीजने इंग्लंडला हरवून टी-२० विश्वचषकस्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. कार्लोस ब्रेथवेटच्या चार सणसणीत षटकारांनी इंग्लंडचा विजयाचा घास हिरावून घेतला.
क्रिस गेलची ही पाचवी व अखेरची विश्वचषकस्पर्धा. ३९ वर्षीय गेलने गेल्या विश्वचषकस्पर्धेत (२०१५) झिम्बाब्वेविरुद्ध १४७ चेंडूत २१५ धावा फटकावल्या होत्या. एकदिवसीयमधील त्याचे हे एकमेव द्विशतक. यंदाच्या मोसमात गेल विलक्षण फॉर्मात असून एकदिवसीयमध्ये अव्वल रॅंकिंग असलेल्या इंग्लंडविरुद्ध त्याने चार एकदिवसीय सामन्यांत ४२४ धावा फटकावल्या त्या १०६च्या सरासरीने. त्याचा स्ट्राइक रेट होता १३४चा. विश्वचषकस्पर्धेदरम्यान गेल आपला ३००वा सामना खेळेल.
विंडीज क्रिकेट मंडळ आणि विंडीज संघातील ज्येष्ठ खेळाडू यांच्यातील संघर्षाचा फटका त्यांच्या क्रिकेटला बसला. जगभरातील विविध टी-२० लीग क्रिकेटस्पर्धांत गेल, ब्रावो, पोलार्ड, सुनील नरीन, आंद्रे रसेलसारखे नामवंत खेळाडू खेळत असतात. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या विंडीज क्रिकेट मंडळाशी ज्येष्ठ, अनुभवी खेळाडूंचे सतत वादविवाद होत राहिले. टी-२० लीग क्रिकेटस्पर्धेत रग्गड कमाई करणाऱ्या खेळाडूंनी स्वहित जपताना विंडीज क्रिकेटकडे पाठ फिरवली. अर्थात याबाबत क्रिकेटपटूंना सर्वस्वी दोषी ठरवणे योग्य होणार नाही. विंडीज क्रिकेट मंडळाचा ढिसाळ कारभार याला कारणीभूत आहे.
निवडसमितीचे अध्यक्ष रिचर्ड हेन्स, माजी कर्णधार जिमी अॅडम्स, स्किरिट यांनी निवडलेल्या विंडीज चमूत अनुभवी तसेच नवोदितांचा समावेश आहे. प्रशिक्षक फ्लाइड रिफर यांच्या मते संघ समतोल आहे. खेळाडूंचे कौशल्य, फिटनेस तसेच इंग्लंडमधील खेळपट्ट्यांचा विचार करून संघाची निवड करण्यात आल्याचे रिफर यांनी सांगितले. चार वर्षांपूर्वी जेसन होल्डरकडे विंडीजच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु गेल्या चार वर्षांत, खासकरून यंदाच्या मोसमात (२०१८-१९) होल्डरच्या संघाने संस्मरणीय विजय संपादले. जो रुटच्या इंग्लंडचा पराभव करून विंडीजने विस्डेन करंडक पटकावण्याची किमया केली. तसेच, एकदिवसीय मालिकेतही विंडीजने इंग्लंडला चांगली झुंज दिली.
आंद्रे रसेल, डॅरोन ब्रावो, जेसन होल्डरसारखे अष्टपैलू खेळाडू ही विंडीजची जमेची बाजू. कर्णधार जेसन होल्डरच्या खेळात विलक्षण प्रगती झाली असून आयसीसी अष्टपैलू खेळाडूंच्या रॅंकिंगमध्ये होल्डर अव्वल क्रमांकावर आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत द्विशतक झळकावताना होल्डरने डावरिचबरोबर त्रिशतकी भागिदारी रचली. द्विशतकी खेळीमुळे होल्डरचा आत्मविश्वास दुणावला. परिणामी विंडीजची कामगिरीही उंचावली.
किमार रोश, ओशन थॉमस, शेनॉन गॅब्रिएल, जेसन होल्डर ही तेज चौकडी विंडीजच्या आक्रमणाची धुरा वाहील. फॅबियन अॅलन फिरकी आक्रमण सांभाळेल. शाही होप, निकलस पुरण ही यष्टीरक्षक-फलंदाजांची जोडी होल्डरकडे आहे. ब्रेथवेट, लुईस हेटमेयर यांसारखे होतकरू फलंदाज विंडीजच्या चमूत असल्यामुळे त्यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. १९९६च्या विश्वचषकस्पर्धेत विंडीजने उपांत्य फेरी गाठली होती. मागील दोन विश्वचषकस्पर्धांत (२०११, २०१५) विंडीजने उपांत्यपवूर्व फेरीत प्रवेश केला होता. यंदा इंग्लंडमध्ये होल्डरच्या संघाकडून चमत्कार घडतो का ते बघायचे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link