Next
लक्ष्य कांगारुंच्या शिकारीचे
भूषण करंदीकर
Friday, October 26 | 04:00 PM
15 0 0
Share this storyदक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या दौऱ्यात सपाटून मार खाल्ल्यावर काहीशा दिशाहीन झालेल्या भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध दोन्ही कसोटी जिंकून पुन्हा आत्मविश्वास कमावला आहे. म्हणूनच आगामी ऑस्ट्रेलियादौऱ्यात टीम इंडियाचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे.

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या दौऱ्यात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर यावेळी असेल. या दोन्ही दौऱ्यांत भारतीय संघाने मोठी चूक केली, ती म्हणजे सराव सामने कमी खेळण्याची. ही चूक या दौऱ्यात टाळण्याचा प्रयत्न होईल, ही अपेक्षा. कारण या चुका ठळकपणे दिसतात. यावर भारताचा माजी कर्णधार, द वॉल राहुल द्रविड यानेही लक्ष वेधले होते. त्यामुळे आतातरी भारतीय संघ सराव सामने खेळण्यास तयार असेल, किंबहुना मानहानी टाळण्यासाठी तरी त्यांनी सराव सामने खेळावेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या, तिथले वातावरण यांच्याशी जुळवून घेणे भारतीय संघाला काहीसे  सोपे होईल. तिथे चेंडूला मिळणारी उसळी हा आपल्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरणारा मुद्दा आहे. याशिवाय सध्या संघात सातत्याने होणाऱ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर होणारा हा दौरा संघ निवडीच्या दृष्टीनेही तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे.

मुरली विजयला सतत तळ्यातमळ्यात ठेवणाऱ्या निवड समितीवर त्याने माध्यमांकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर आता त्याला संघात संधी मिळेल याची आशा कमीच आहे. त्याला पर्याय म्हणून के. एल. राहुल, कसोटी पदार्पणात शतकी खेळी करून सगळ्यांचे लक्ष वेधणारा पृथ्वी शॉ अशा नावांची चर्चा होऊ शकते. पृथ्वीने त्याच्या पहिल्याच सामन्यात दमदार फलंदाजी केली. मात्र हे सगळे घडले भारतात, तेही विंडीजविरुद्ध! तेव्हा आता खऱ्या अर्थाने पृथ्वीला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात आपली जागा निश्चित करण्याची चांगली संधी आहे.

मधल्या फळीचा विचार केला, तर सध्या कर्णधार विराट कोहली हा एकच फॉर्मात असलेला फलंदाज आपल्या संघात आहे. अजिंक्य रहाणेला तो खेळेल खेळेल म्हणेपर्यंत परत यावे लागते. त्याच्या दर्जाविषयी शंका कधीच नव्हती आणि नसेलही, पण सध्याचा त्याचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. हार्दिक पंड्या या एका जबरदस्त अष्टपैलू खेळाडूचा पर्याय खरे तर आपल्याकडे आहे, पण सध्या तो तंदुरुस्त आहे की नाही यावर बरेच काही अवलंबून आहे. यष्टिरक्षक वृद्धिमान साहा तंदुरुस्त नसल्यामुळे, रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोघांनाही ऑस्ट्रेलियाचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

भारताच्या गोलंदाजीबद्दल तशी फारशी चिंता करण्याचे कारण नाही. कारण त्यांचा खेळ दिवसेंदिवस उंचावताना दिसत आहे. कसोटी सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाचे २० फलंदाज बाद करणे जास्त महत्त्वाचे असते, जे भारतीय गोलंदाजांनी अलिकडच्या काळात सिद्ध करून दाखवले आहे. गोलंदाजीत फक्त भुवनेश्वरचीच थोडी चिंता आहे. त्याचे तंदुरुस्त असणे भारतीय संघासाठी खूप आवश्यक आहे. भारतीय गोलंदाजांना फलंदाजांनी चांगली कामगिरी करून जर साथ दिली तर नक्कीच या दौऱ्यात समाधानाचे वेगळे चित्र दिसेल.

आता भारतीय क्रिकेटपटू त्यांच्या पत्नीला किंवा प्रेयसीला परदेश दौऱ्यावर नेऊ शकणार आहेत. तशी रीतसर परवानगीच कोहली आणि मंडळींनी बोर्डाकडून घेतली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर कितपत होतो, हेही या दौऱ्यात दिसेलच. तेव्हा दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या दौऱ्यात झालेल्या मानहानिकारक पराभवांची मालिका ऑस्ट्रेलियाचा दौऱ्यात खंडीत होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link