Next
संघबांधणी दुर्लक्षित?
भूषण करंदीकर
Friday, November 02 | 03:00 PM
15 0 0
Share this story

वेस्ट इंडीजच्या भारतीय दौऱ्यातून फार काही साध्य होईल, असं म्हणणं म्हणजे अभिषेक बच्चनचा सिनेमा हिट जाईल, अशी शक्यता बाळगण्यासारखं होईल. टीम इंडियाची खरी सत्त्वपरीक्षा सुरू होणार आहे ती ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतरच्या न्यूझीलंड दौऱ्यात! त्यानंतर भारतीय संघाला विश्वचषकस्पर्धेत उतरावं लागणार आहे. हे लक्षात घेतलं तर संघात वारंवार होणारे बदल टाळून संघबांधणीला प्राधान्य देणं गरजेचं आहे. सध्या वेस्ट इंडीज संघाच्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाज तुटून पडत आहेत, तर भारताचे गोलंदाज विंडीजच्या फलंदाजांना मामा बनवण्यात धन्यता मानत आहेत. तरी अभी ऑस्ट्रेलिया दूर नहीं... नोव्हेंबरपासून सुरू होणारा ऑस्ट्रेलियाचा दौरा हा टीम इंडियाला थकवणारा दौरा असणार आहे. जितक्या खोऱ्यानं धावा आपले फलंदाज जमवत आहेत, थोडक्यात विंडीज गोलंदाजांना लुटत आहेत, ते पाहिलं तर विंडीज संघाचं शोषण सुरू असल्याचं दिसतं. प्रत्येक सामन्यागणीक भारतीय फलंदाजांचा आत्मविश्वास द्विगुणित झाल्याचं दिसत आहे. आजच्या जमान्यात ३५० धावासुद्धा कमी वाटू लागल्या आहेत. आणि इथे विंडीज संघासमोर छप्पन इंचांची छाती काढून खेळणारे आपण तरी एक सामना त्यांना देऊन टाकतो! विषय असा आहे, की आता भारतीय संघाची दमछाक सुरू होणार आहे. दिवाळी संपली, की ऑस्ट्रेलियाचा दौरा. त्यानंतर न्यूझीलंडचा दौरा. हवामान वेगळं, खेळपट्ट्या वेगळ्या. या सगळ्यांशी जुळवून घेत विजयासाठी लढायचं ध्येय ठेवावं लागेल.

सध्याचा ऑस्ट्रेलियाचा संघ तुलनेनं थोडा कमकुवत वाटत असला तरी तेसुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये परतण्यासाठी इच्छुक आहेत. अशावेळी आपला संघ तिथे खेळणार आहे. सावज आयतंच जाळ्यात येत आहे, तर कोण सोडेल? ऑस्ट्रेलियाचा संघ कमकुवत असला तरी तो त्यांच्याच देशात कधी कमकुवत नसतो. त्यांना कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाहीच, पण त्यांना फार महत्त्व देईल असंही दिसत नाही. याला कारण आहे ते सध्याच्या संघातील आक्रमक वृत्ती. ‘अरेला कारे’ करण्याची सवय. विराटनं ही सवय संघात भिनवली आहे यात दुमत नाही. याची प्रचीती नुकतीच आली. विंडीजच्या फलंदाजाला बाद केल्यावर आपल्या एका गोलंदाजानं केलेलं सेलिब्रेशन आयसीसीला खटकलं. त्याच्यावर कारवाई झाली. त्यामुळे थोडा फायदा मानसिकदृष्ट्या संघाला होईल.
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यानंतर टीम इंडिया लगेचच न्यूझीलंडला जाणार आहे. तो दौराही नक्कीच आव्हानात्मक ठरणार आहे. त्यानंतर सुरू होणार आहे विश्वचषकस्पर्धा. सायबांच्या देशात ही स्पर्धा होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दौऱ्यांचा टीम इंडियाला नक्कीच फायदा होणार आहे. मात्र संघ नेमका कसा असेल, याचा अंदाज बांधता येत नाही. निवडसमिती इतके प्रयोग करत आहे, की विश्वचषकस्पर्धेसाठी नेमका संघ कधी ठरणार, हे अजून स्पष्ट होत नाही. धोनीला पर्याय शोधण्याचे प्रयत्न दिसत आहेत. तर संघाला धोनीची गरज आहे, असं सद्यस्थितीत दिसत आहेत. आता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यात संघनिवड कशी होत आहे, त्यात पुन्हा प्रयोग होणार की विश्वचषकासाठीचा संघ या दौऱ्यात दिसणार हे पाहावं लागेल. सध्याची निवडसमिती अजूनही तरुण क्रिकेटपटूंना संधी देऊ पाहत आहे. कोण जाणे त्यातून एखादा क्लिक झालाच तर... किंवा पुढच्या विश्वचषकासाठीची ही संघबांधणी ठरू शकेल... असो, मुद्दा हाच आहे की यातून भारतीय संघाची तयारी दिसायला हवी ती अद्याप दिसत नाही.
वेस्ट विंडीजची टीम माघारी परतली, की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला सुरुवात होईल. कांगारूंची आणि किवींची शिकार आपले सिंह करतात की ते केवळ कागदावरच तगडे ठरतात, हे लवकरच कळेल. विश्वचषकाच्या संघनिवडीला वेळ आहे, परंतु संघबांधणीची वेळ उलटून गेली आहे एवढं मात्र निश्चित. त्यापूर्वी काही बदल करून पाहायचे असल्यास रणजीचा हंगाम सुरू होत आहे. त्यातून काही हाती लागतं का ते पाहावं लागेल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link