Next
प्रेम आणि भांडण
सुरेश खरे
Friday, October 05 | 01:45 PM
15 0 0
Share this storyऑफिसातून घरी आलो. बेल वाजवली. सुलू माझ्या आधीच भगिनी मंडळातून परत आलेली होती. तिनं दार उघडलं. मात्र नेहमीप्रमाणे दारात न थांबता, काही न बोलता, माझ्याकडे पाठ फिरवून आत गेली. काहीतरी बिनसलंय, हे माझ्या लक्षात यायला वेळ लागला नाही. मी निमूटपणे फ्रेश होऊन कपडे बदलून हॅालमध्ये येऊन बसलो. सुलू चहा घेऊन आली आणि माझ्यापुढे कप ठेवून आत जायला वळली. मामला गंभीर होता. मी न राहवून विचारलं, “काय ग? काही बिनसलंय का? काय झालं ?”

“काय व्हायचं? तुमचं मुळी माझ्यावर प्रेमच नाही.” मला आश्चर्याचा धक्का बसला. सुलूच्या आणि माझ्या लग्नाला पंचवीस वर्षं झाली, पण गेल्या पंचवीस वर्षांत सुलूच्या तोंडून असं काही आलं नाही. सुलूचा आणि माझा काही प्रेमविवाह नाही. अगदी रीतसर मुलगी पाहून, चहा-पोहे खाऊन आमचं लग्न ठरलं आणि झालं. खरं म्हणजे आपला प्रेमविवाह व्हावा अशी माझी तीव्र इच्छा होती. परंतु त्यासाठी कुणीतरी तुमच्यावर प्रेम करावं लागतं. आणि इथंच तर घोडं अडलं. माझ्यावर कुणी प्रेमच करीना. म्हणजे कुणी भेटल्याच नाहीत, असं नाही. माझा चेहरा सात्त्विक असल्यामुळे आणि वागणं सुसंस्कृत आणि विनयशील असल्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येक मुलीला माझ्याविषयी आदर वाटायचा. एखादा गुण कसं तुमचं नुकसान करतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. शेवटी मी नाइलाजानं मुली पाहायला सुरुवात केली. सुलूला होकार देण्यापूर्वी मी अकरा मुली पाहिल्या होत्या.

एकही चांगली मुलगी सांगून येईना. बस स्टॉपवर, दुकानांत, बागेत इतक्या छान छान मुली पाहतो, त्यातली एखादी आपल्याला कशी सांगून येत नाही, याचं मला आश्चर्य वाटे. त्या काळी मुलगी पाहायला गेलं की ती तिला गाणं म्हणायला सांगत. तिला गाण्याचं अंग असो, नसो. मी पाहिलेल्या अकरा मुलींपैकी आठ जणींनी ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ हे गाणं म्हटलं, हे गाणंसुद्धा बेसूर म्हणता येतं, हे मला तेव्हा समजलं. दोघींनी ‘लाजली सीता स्वयंवराला’ हे गाणं म्हटलं. त्यावेळी मीच लाजलो. एकीनं ‘माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविशी,’ हे गाणं म्हटलं. त्या गाण्यातल्या पहिल्या कडव्यातील दुसरी ओळ ‘तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी’ ही तिनं माझ्याकडे पाहून म्हटली. त्यामुळे ती मुलगी तशी बऱ्यापैकी असूनही मी तिला नकार दिला.

उगाच धोका कशाला पत्करा? सुलू दिसायला चांगली आहे. त्यामुळे तिनं ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख…’ (एव्हाना तळं बदकांनी भरून गेलं होतं) हे गाणं म्हणूनही मी तिला पसंत केली. सांगायचा मुद्दा, जरी आमचा प्रेमविवाह नव्हता तरी माझा स्वभाव मुळात प्रेमळ असल्यामुळे मला सुलूवर प्रेम करायला अडचण पडली नाही. आणि आता पंचवीस वर्षांनंतर सुलूला माझं तिच्यावर प्रेम नाही, असा साक्षात्कार व्हावा याचं मला आश्चर्य वाटलं. असं काय घडलं याचा एकदा सोक्षमोक्ष लावून टाकावा म्हणून मी सुलूला हाक मारली, “सुलू, आधी बाहेर ये.” सुलू बाहेर आली आणि माझ्यासमोर उभी राहिली. “बैस… अग बैस ना!
नाहीतर मी उभा राहतो. म्हणजे आपल्याला एका पातळीवरून बोलता येईल.” सुलू बसली.

“सांग. माझं तुझ्यावर प्रेम नाही असं कसं म्हणतेस? मी तुला सुखात ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. तुझी प्रत्येक हौस, आवड पुरवतो. तुझ्या माहेरच्या माणसांना कधीही नावं ठेवत नाही. तुझ्या सगळ्या नातेवाईकांचं हसतमुखानं स्वागत करतो. तुझा मूड असला तर मला जेवढं शक्य असतं तेवढं रोमॅन्टिक वागण्याचा प्रयत्न करतो. तर तू, मी काही न करता, ‘अहो, काय करताय काय?’, म्हणून माझा मूड घालवतेस. तरी मी कधी तक्रार करीत नाही. आपले लहानमोठे वाद होत असतील, पण मी कधी तुझ्याशी भांडत नाही...”

“तुम्ही भांडत नाही म्हणूनच मी म्हणते, तुमचं माझ्यावर प्रेम नाही. आज महिला मंडळात व्याख्यान होतं, कुमारी सावित्री यडगुंजवार यांचं. ‘सुखी संसाराचा मूलमंत्र’ या विषयावर. त्यांनी सांगितलं, ‘सुखी संसारासाठी पती-पत्नीनं भांडलं पाहिजे. प्रेम असलं तरच भांडण होतं. भांडणानं प्रेम वाढतं.”
“त्या येडगुंजवार बाईला म्हणावं, आधी लग्न कर आणि मग ‘सुखी संसाराचा मूलमंत्र’ वगैरे सांगायला लाग. सुलू, तुझीपण कमाल आहे, बाई ग, भांडणानं प्रेम वाढत असेल. पण त्याचा अर्थ असा नाही की भांडलं नाही तर प्रेम नाही. काय तुझं एकेक!”

“पण तरीही मला वाटतं आपण मधूनमधून भांडलं पाहिजे.” “असं म्हणतेस? तुझा आग्रहच असेल तर भांडेन मी मधूनमधून तुझ्याशी. पहिल्यांदा आपल्याला भांडणांचे विषय ठरवावे लागतील. इंधनदरवाढ, रुपयाची घसरण, ध्वनिप्रदूषण वगैरे निरुपद्रवी विषय आहेत. तुझी माहेरची माणसं हा चांगला विषय़ आहे. दोघांकडे भांडायला भरपूर मुद्दे आहेत. पण कडाक्याचं भांडण हवं असेल तर मला बाहेर काहीतरी भानगड, आय मीन ‘अफेअर’, करायला लागेल. अर्थात तुझी परवानगी असेल तर.”
“अवश्य करा. माझी परवानगी आहे.” “काऽऽऽय ?”
“दचकू नका. काय आहे, ‘अफेअर’ करुया म्हणून करता येत नाही. ते ‘होतं”. आणि आतापर्यंत तुम्हाला जे जमलं नाही ते यापुढे थोडंच जमणाराय?”
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link