Next
माळरानावरील नीलगाय
अतुल साठे
Friday, June 28 | 04:00 PM
15 0 0
Share this story


निळसर राखाडी शरीराचा आणि घोडा किंवा गायीसारखा दिसणारा थोराड व दणकट प्राणी म्हणजे नीलगाय. गायीशी असलेल्या साधर्म्यावरूनच त्याचे असे नाव पडले असावे. नावातच गाय असल्याने भारतात बहुतांश ठिकाणी स्थानिकांकडून नीलगायीला संरक्षण दिले जाते. प्राचीन ग्रंथांपैकी ऐतरेय ब्रह्मणामध्ये नीलगायीचा उल्लेख आहे. शिवाय मध्ययुगीन भारतातील लिखाणात, चित्रांत व खंजिरांच्या मुठींवरील नक्षीवर नीलगाय अनेकदा दिसून येते.
फक्त भारतीय उपखंडातच आढळत असल्याने ही एक प्रदेशनिष्ठ प्रजाती आहे. हिमालय, ईशान्य भारत, बंगाल, पाकिस्तानचा बहुतांश भाग, तामिळनाडू, सह्याद्रीतील जास्त पावसाचा प्रदेश व श्रीलंका वगळता नीलगाय या उपखंडात सर्वत्र सापडते. महाराष्ट्रात जास्त पावसाचे कोकण व सह्याद्री घाटमाथा हे भाग सोडले तर बहुतांश जिल्ह्यांत नीलगाय आढळते. विशेष म्हणजे कोकणात रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोलीसारख्या काही ठिकाणी सड्यांवर (पठार) नीलगायीचा वावर असल्याचे स्थानिक लोक सांगतात. मी आतापर्यंतच्या जंगलभ्रमंतीत ताडोबा, नान्नज व गीर अभयारण्यांत नीलगायी पाहिल्या आहेत. नागपूरसारख्या काही विमानतळांच्या धावपट्टीच्या आसपास मोकळ्या परिसरातसुद्धा प्रवाशांना नीलगायी कधी कधी दिसतात. बोसेलाफस ट्रॅगोकॅमेलस असे शास्त्रीय नाव असलेल्या नीलगायीला हिंदीत रोजडा किंवा रोज व मराठीत रोहू अशी नावेसुद्धा आहेत.

भारदस्त हरीण
कुरंग कुळातील हे आशियातील सर्वात मोठे हरीण आहे. एस.एच. प्रॅटर या अभ्यासकानुसार नराची खांद्यापाशी उंची साधारण साडेचार फुटांहून थोडी जास्त असते. नराचे वजन साधारण १५० किलो व त्याहून अधिक भरते. खांद्यापासून शेपटीपर्यंत मागच्या बाजूला उतरत जाणारी पाठ, मोठी मान, खांद्यावर आयाळीसारखा मोठ्या केसांचा पट्टा, कानांच्या टोकाला काळा रंग, चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंना काही पांढरे ठिपके, गळ्यावर छोट्या मोत्यासारखे दिसणारे ठिपके, खुराजवळचे पांढरे भाग ही नीलगायीची काही वैशिष्ट्य आहेत. नरांच्या गळ्याखाली दाढीसारखे केस असतात आणि डोक्यावर साधारण ८-१० इंच लांबीची दोन छोटी, सरळ व शंकू आकारासारखी दिसणारी शिंगे असतात. तसेच, अन्य नरांशी लढताना संरक्षण मिळावे म्हणून डोके व मानेवरील त्वचा जाड असते. क्वचित काही माद्यांनाही शिंगे असतात.
प्रौढ नर काळपट असले तरी लहान वयाचे नर, माद्या व पिल्ले पिवळट तपकिरी रंगाची असतात. नीलगायीच्या शेपटीची व मांड्यांची आतील बाजू पांढरी असते. श्रवणेंद्रिय व घ्राणेंद्रियांच्या तुलनेत नीलगायीची दृष्टी अधिक चांगली असते. मोकळ्या भागात राहणारा हा प्राणी असल्याने दूरवरचा शत्रू आधीच दिसण्यासाठी त्याच्या चांगल्या दृष्टीचा फार उपयोग होतो.

माळरानावर वास्तव्य
गवताळ प्रदेश आणि खुरटी झाडे-झुडपे असलेली विरळ जंगले हा नीलगायीचा अधिवास असून दाट जंगलांत त्या सापडत नाहीत. निरनिराळ्या भौगोलिक प्रदेशांत त्यांच्या संख्येची घनता कमी-अधिक असल्याचे दिसते. सपाट भाग तसेच कमी उंचीच्या टेकड्या असे दोन्ही भूप्रदेश त्यांना चालतात. कोरड्या वातावरणात उत्क्रांत झाल्याने पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या ठिकाणीही नीलगाय आढळते. ती पाणी न पिता बराच काळ राहू शकते. एखाद्या ठिकाणचे पाण्याचे सर्वच स्रोत आटले तर मात्र नीलगायी तिथून निघून जातात. सूर्याच्या उष्णतेचा त्यांना सहसा फारसा त्रास होत नाही. रात्र व दुपारची अगदी कडक उन्हाची वेळ सोडल्यास नीलगायी दिवसाच्या सर्व वेळांना चरतात. गवत व झाडाची पाने हे त्यांचे मुख्य अन्न होय. उंचीमुळे त्यांना फांद्यांवरील पानेसुद्धा खाता येतात. शिवाय आवश्यकतेप्रमाणे व ऋतूनुसार बोरे व अन्य फळे, विविध बिया व शेंगा आणि पळस व मोहासारखी फुलेसुद्धा त्या खातात. नीलगायी विष्टा टाकायला ठरलेल्या ठिकाणी रोज येतात.
नीलगायींचे कळप छोटे असतात. त्यात मुख्यत्वे माद्या व लहान-मोठी पिल्ले असतात. कळपातील जनावरांची संख्या ४ ते १० असते. क्वचित ही संख्या २० किंवा त्याहूनही जास्त असू शकते. विणीचा काळ वगळता नर एकटे किंवा वेगळे कळप करून राहतात. धोक्याची जाणीव झाल्यास स्वभावाने बुजऱ्या असणाऱ्या नीलगायी वाटेतील अडथळे यशस्वीपणे पार करत वेगाने दौडू शकतात. संभाव्य शत्रूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी इतर हरणांप्रमाणेच नीलगायी हा पर्याय निवडतात. नान्नजमध्ये मला असा अनुभव आला की चालत येणाऱ्या पर्यटकांना पाहून नीलगाय एकटक बघत राहिली, मात्र त्यांना आणखी जवळ येताना पाहून मग पळाली.
गवताळ प्रदेश व खुरटी जंगले येथील नैसर्गिक परिसंस्था राखण्यात नीलगायीचा महत्त्वाचा वाटा आहे. इतर अनेक तृणभक्षी प्राण्यांप्रमाणे नीलगायीकडूनही विष्टेतून बीजप्रसार होतो. त्याचप्रमाणे नीलगायीच्या विष्टेतून मातीचा कस वाढत असल्याच्या काही अभ्यासकांच्या नोंदी आहेत. नैसर्गिक अधिवास घटला आणि वाघ, सिंह, बिबट्या, रानकुत्रा व लांडग्यांसारखे नैसर्गिक भक्षक कमी झाले की विपुल संख्येने असलेल्या नीलगायी शेतात घुसण्याचे प्रमाण वाढते. शेतीचे नुकसान झाले की यातून मानव व वन्य प्राणी यांच्यात संघर्ष उद्भवतो. आता पीकरक्षणासाठी नीलगायी मारण्याची परवानगी शेतकऱ्यांना काही राज्यांनी दिली आहे. मात्र भक्षक प्राण्यांसकट नैसर्गिक अधिवास शाबूत ठेवणे, हाच या समस्येवरील शाश्वत उपाय आहे. त्याचा अवलंब केल्यास नीलगायी व अन्य प्राणी शेतांत घुसण्याचे प्रसंग नक्कीच कमी होतील आणि या उमद्या जिवाचा उपद्रव होणार नाही.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link