Next
मंदिर बनणे स्वगौरवासाठी आवश्यकच
विशेष प्रतिनिधी
Friday, October 19 | 03:30 PM
15 0 0
Share this story


या  वर्षीचा विजयादशमीचा पवित्र उत्सव संपन्न करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. हे वर्ष श्रीगुरुनानकदेव यांच्या प्रकटनाचे ५५०वे वर्ष आहे. भारताच्या प्राचीन परंपरांनी प्राप्त झालेले सत्य विसरून, आत्मविस्मृत होऊन जेव्हा आपला सारा समाज दांभिकता, स्वार्थ तसेच भेदाच्या दलदलीत आकंठ फसला होता, दुर्बल, पराजित आणि विघटित होऊन सीमेपलिकडून सतत क्रूर आक्रमकांकडून होणाऱ्या छळामुळे हैराण झाला होता, तेव्हा श्रीगुरुनानकदेव यांनी आपली जीवनज्योत प्रज्वलित करून समाजात अध्यात्माचा, युगानुकूल आचरणातून आत्मोद्धाराचा नवा मार्ग दाखवला. भरकटलेल्या परंपरांचा शोध घेऊन समाजाला एकात्मता व नवचैतन्याची संजीवनी दिली. त्यांच्याच परंपरांनी आपल्याला देशातील हीनदीन अवस्था दूर करणाऱ्या दहा गुरूंची मालिका दिली आहे.

याच सत्य व प्रेमावर स्थापित झालेल्या सर्वसमावेशी संस्कृतीचा, विविध महापुरुषांनी वेळोवेळी देश-काल परिस्थितीनुसार पुरस्कृत आणि प्रवर्तित केलेल्या प्रबोधनाच्या सातत्याचा ज्यांच्या जीवनावर परिणाम झाला, ज्यांचे १५०वे जयंतीवर्ष सुरू आहे, अशा महात्मा गांधी यांनी सत्य व अहिंसेवर आधारित राजकीय अधिष्ठानावर देशाची स्वातंत्र्यचळवळ उभी केली. अशा सर्व प्रयत्नांमुळेच देशातील सामान्य जनता स्वराज्यासाठी घराबाहेर पडून, पुढे येऊन नैतिक बळासह इंग्रजांच्या दमनचक्रासमोर उभी ठाकली होती.स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांत देशाने उन्नतीच्या अनेक आयामांमध्ये चांगला पल्ला गाठला आहे. परंतु सर्वांग परिपूर्ण राष्ट्रीय जीवनाच्या अन्यही अनेक आयामांत आपल्याला अजून पुढे जायचे आहे. विश्‍वात आपला देश सुसंघटित, समर्थ व वैभवसंपन्न होऊन पुढे गेल्याने ज्या शक्तींच्या स्वार्थप्राप्तीचा खेळ समाप्त होतो, त्या शक्ती विविध क्लृप्त्या करून देशाच्या मार्गात अडथळे आणणे थांबवणार नाहीत. अशी अनेक आव्हाने आपल्याला अजून पार करायची आहेत.

देशाची सुरक्षा
कोणत्याही देशाला प्रथम स्वतःच्या सीमांची सुरक्षा तसेच अंतर्गत सुरक्षेची परिस्थिती यांचा विचार करावा लागतो. कारण या सुरक्षा व्यवस्थित असतील तरच देश समृद्ध होतो आणि विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी अवकाश व संधी प्राप्त होतात. आंतरराष्ट्रीय संबंधांतील ताणेबाणे नीट समजून घेऊन, आपल्या देशाच्या सुरक्षेच्या चिंतांशी त्यांना जोडणे आणि त्यांचा सहयोग, समर्थन प्राप्त करण्याचे आपले सफल प्रयत्न झाले आहेत. पश्‍चिम सीमेपलिकडील देशात झालेल्या सत्तापरिवर्तनामुळे आपल्या सीमेवर तसेच पंजाब, जम्मू-काश्मीरसारख्या राज्यांत उघड आणि छुप्या प्रक्षोभक कारवाया कमी होण्याची अपेक्षा नव्हती, तसे झालेही नाही. अन्य देशांसोबत योग्य प्रमाणात परस्पर आदान-प्रदानासह, सुरक्षाउत्पादनांबाबत देशाच्या स्वयंपूर्णता साध्य केल्याशिवाय सुरक्षेप्रती आश्‍वस्त होता येणार नाही. या दिशेने देशाच्या प्रयत्नांची गती अधिक असायला हवी.
अनुसूचित जाती व जनजाती वर्गांसाठी आखल्या गेलेल्या योजना, उपयोजना व अनेक प्रकारच्या तरतुदी वेळेवर आणि योग्यप्रकारे लागू करणे याबाबत केंद्र व राज्य शासनाने अधिक तत्पर, संवेदनाशील आणि पारदर्शक होण्याची आवश्यकता आहे. दुर्बल घटकांच्या प्रगतीच्या प्रयत्नांत तत्पर असणे, संवेदनशील आत्मीयता तसेच पारदर्शकता व आदरपूर्वक व्यवहार यांत त्रुटी राहतात. अशा वेळी अभाव, उपेक्षा व अन्यायाच्या माऱ्याने जर्जर वर्गांच्या मनात संशय, फुटीरता, विवेकाचा अभाव, विद्रोह व द्वेष वाढतो तसेच हिंसेचे बीजारोपण सहजपणे शक्य होते. याचाच फायदा घेऊन आपल्या स्वार्थप्रेरित उद्देशासाठी, देशविघातक कृत्यांसाठी, गुन्हेगारी कारवायांसाठी दारूगोळ्याच्या रूपात वापरणाऱ्या शक्ती कटकारस्थांनांचा खेळ खेळतात. येणाऱ्या निवडणुकांमधील मतांकडे लक्ष ठेवून सामाजिक एकात्मता, कायदा, संविधानाचे अनुशासन यांची नितांत उपेक्षा करत स्वार्थीपणे सुरू असलेले सत्तालोलुप राजकारण या सगळ्या घटनांमागे स्पष्ट दिसते. परंतु आता या सर्व निमित्तांचा वापर करून समाजात भरकटवण्याचे, फुटिरतेचे, हिंसेचे, अत्यंत विषप्राय द्वेषाचे तथा देशविरोधाचे वातावरण उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘भारत तेरे टुकडे होंगे’ अशा घोषणा ज्या समूहातून दिल्या गेल्या त्या समूहातील काही मुख्य चेहरे अशा घटनांमध्ये प्रामुख्याने भडकावू भाषण करताना दिसून आले. मुख्यत्वे वनप्रदेशांत अथवा अन्य सुदूर क्षेत्रांत होणाऱ्या हिंसात्मक कारवायांचे कर्तेधर्ते व पाठराखण करणारे आता शहरी माओवादाचे पुरस्कर्ते होऊन अशा आंदोलनांत अग्रक्रमाने दिसून आले. सुरुवातीला छोट्याछोट्या अनेक संघटनांचे जाळे पसरवून तसेच विद्यार्थिवसतिगृहात सतत संपर्कातून एक वैचारिक अनुयायी वर्ग उभा केला जातो. नंतर उग्र व हिंसक कारवायांच्या छोट्या-मोठ्या आंदोलनांमध्ये घुसून, अराजकतेचा अनुभव देऊन, त्या अनुययांमधील प्रशासन-कायद्याविषयीची भीती तसेच नागरी शिस्तीची भीती दूर केली जाते. दुसऱ्या बाजूला समाजात आपापसांत व समाजातील स्थापित व्यवस्था आणि नेतृत्वाबाबत तिरस्कार व द्वेष उत्पन्न केला जातो. अशा उग्र रूप घेणाऱ्या घटनांच्या माध्यमातून समाजाच्या सर्व अंगांमध्ये प्रस्थापित सर्व विचारांचे नेतृत्व - जे समाजव्यवस्था, कमी-अधिक प्रमाणात नागरिक व्यवहारातील सौम्यतेच्या शिस्तीने बांधलेले असते - ते अचानक उद्ध्वस्त केले जाते. नवीन अपरिचित, अनियंत्रित केवळ नक्षली नेतृत्वाशी जोडले गेलेले अंधानुयायी आणि खुले पक्षपाती नेतृत्व स्थापन करणे ही शहरी माओवाद्यांची डावी कार्यपद्धती आहे. समाजमाध्यमे, अन्य माध्यमे तसेच बुद्धिजीवींमध्ये व अन्य संस्थांमध्ये सुरुवातीपासून किंवा नंतर आलेले डाव्यांचे हस्तक अशा घटनांच्या वेळी कार्यान्वित असतात. भ्रामक प्रचार, बौद्धिक तसेच अन्य सर्व प्रकारचे समर्थन याबाबत सुरक्षित अंतरावरून आणि तथाकथित कृत्रिम प्रतिष्ठेच्या कवचात राहून संलग्न राहतात. प्रचाराचा विखार अधिक प्रभावी करण्यासाठी असत्य आणि विषारी, प्रक्षोभक भाषेचा स्वच्छंदतापूर्वक वापर करणेही त्यांना व्यवस्थित जमते.

देशाच्या शत्रुपक्षाकडून मदत घेऊन स्वदेशद्रोह करणे हे तर अतिरिक्त कौशल्य मानले जाते. समाजमाध्यमांवरील आशय आणि वर्णन याचा उगम शोधण्यासाठी शोध घेतला तर ही गोष्ट स्पष्ट होते. जिहादी आणि कट्टरपंथी व्यक्तींची काही ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थिती अशा घटनांमध्ये समान दिसून येते. हा सारा घटनाक्रम केवळ प्रतिपक्षाचे सत्ताप्राप्तीचे राजकारण न राहता देशी-विदेशी भारतविरोधी शक्तींच्या साट्यालोट्यातून धूर्तपणे चालवले जाणारे कटकारस्थान असल्याचे दिसून येते. हे नष्ट करण्यासाठी शासन-प्रशासनाला समाजात याचा फायदा उपद्रवी शक्ती घेतील अशा घटना होऊ नयेत यासाठी सजग राहावे लागेल, तर दुसरीकडे अशा उपद्रवी शक्ती व व्यक्तींवर कडक नजर ठेवून ते अशा कारवाया करणार नाहीत हेही पाहावे लागेल.
समाजाने अंगिकारलेली शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा, तिचे स्वरूप आणि कारणांचा मूळ विचार केला गेला नाही. धार्मिक परंपरांच्या प्रमुखांची बाजू, कोट्यवधी भक्तांची श्रद्धा विचारात  घेतली गेली नाही. महिलांमधील एक खूप मोठा वर्ग या नियमांचा समर्थक आहे, त्यांचे म्हणणे ऐकले गेले नाही. कायदेशीर निर्णयाने समाजात शांती, सुस्थिरता आणि समानता येण्याऐवजी त्या स्थानावर अशांती, अस्थिरता आणि भेदांची निर्मिती झाली. हिंदू समाजाच्या श्रद्धांवरच असे वारंवार आणि विनासंकोच आघात का केले जातात, असे प्रश्‍न समाज मनात उठतात आणि असंतोषाची स्थिती तयार होत जाते. ही स्थिती समाजजीवनाचे स्वास्थ्य आणि शांतीसाठी अजिबात चांगली नाही.

स्वतंत्र देशाचे ‘स्व’आधारित तंत्र
भारतीय जीवनाचे सर्व अंगांनी नवनिर्माण करताना भारताच्या मूल्यबोधाच्या शाश्‍वत आधारावर ठाम राहूनच प्रगती करावी लागेल. आपल्या देशात जे आहे त्यात देश-काल-परिस्थितीनुसार सुधारणा करून, परिवर्तन करून किंवा मग आवश्यक असेल तर काही गोष्टींचा पूर्णत: त्याग करूनही युगानुकूल बनवणे तसेच जगात जे भद्र आहे, चांगले आहे त्याला देशानुकूल बनवणे या दोन्हीं निर्णयांचा आधार हाच मूल्यबोध आहे. हाच आपल्या देशाचा प्रकृतिस्वभाव आहे. हेच हिंदुत्व आहे. आपल्या प्रकृतिस्वभावावर ठाम आणि स्थिर राहूनच कुठलाही देश प्रगत होतो, अंधानुकरणातून नाही. शासनाच्या चांगल्या धोरणांचा परिणाम समाजात शेवटच्या रांगेत उभे असलेल्या व्यक्तीपर्यंत दिसला पाहिजे याकरिता प्रशासनाकडून तत्परता, पारदर्शकता आणि संपूर्णतेसह जी कार्यवाही व्हायला हवी, त्याप्रमाणात आजही होत नाही. इंग्रज आपल्या भूमीवर, राज्यांवर केवळ सत्ता चालवण्याचे काम करत होते. आता भारतात आपल्या शासकांनी आपल्या प्रशासनाला प्रजापालक प्रशासन बनवावे, ही अपेक्षा आहे.
स्वतंत्र भारताची जनाकांक्षा ही आपल्या संविधानाची प्रस्तावना, मूळ अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये या चारही प्रकरणांत परिभाषित आहे. यांच्या प्रकाशात आपल्याला राष्ट्राच्या जीवनव्यवहारातील, राष्ट्राच्या विकासाची लक्ष्यदृष्टी, दिशा आणि तद्नुरूप जीवनाच्या अर्थासहित सर्व अंगांच्या विकासाचा आपला विशिष्ट भारतीय प्रतिमान उभा करावा लागेल. तेव्हा आपले सगळे प्रयत्न, सर्व धोरणे पूर्णत: क्रियान्वित व फलित होत असलेली दिसतील. जगभरातील चांगल्या गोष्टी घेऊनदेखील आपण आपल्या तत्त्वदृष्टीच्या पायावर आपल्या विशिष्ट विकासाचे प्रतिमान आणि त्यानुसार त्याची व्यवस्था उभी करावी लागेल. हे आपल्या देशाच्या विकासासाठी अनिवार्य आहे.

श्रीराम जन्मभूमी
राष्ट्राच्या ‘स्व’च्या गौरवासंदर्भात आपल्या कोट्यवधी देशबांधवांसोबतच श्रीराम जन्मभूमीवर राष्ट्राच्या प्राणस्वरूप धर्ममर्यादांचे विग्रहरूप असणाऱ्या श्रीरामचंद्राचे भव्य राममंदिर तयार करण्याच्या प्रयत्नांत संघ सहयोगी आहे. सर्व प्रकारचे साक्षीपुरावे त्या ठिकाणी कधीतरी मंदिर होते हेच सांगत आहेत. तरीही मंदिर निर्माण करण्याकरिता जन्मभूमीचे स्थान उपलब्ध होणे बाकी आहे. न्यायप्रक्रियेत वेगवेगळ्या नवनवीन बाबी उपस्थित करून निर्णय होऊ न देण्याचा खेळ काही शक्ती खेळत आहेत. समाजाच्या धैर्याची विनाकारण परीक्षा घेणे हे कोणाच्याही हिताचे नाही. काही कट्टरपंथीय देशहिताच्या या बाबतीत साप्रंदायिक राजकारण करून आपले स्वार्थ साधण्यासाठी अडथळा आणत आहेत. असे कट होऊनही लवकरात लवकर त्या भूमीच्या मालकी हक्कांसंबंधी निर्णय व्हावा आणि शासनाद्वारे योग्य आणि आवश्यक कायदा तयार करून भव्य मंदिराच्या निर्मितीचा मार्ग प्रशस्त व्हायला हवा.

निवडणूक
देशाचे नेतृत्व कोण करते, जी धोरणे लागू आहेत ती योग्य आहेत अथवा अयोग्य, या सर्व बाबींचा निर्णय देशातील लोकशाही व्यवस्थेत पाच वर्षांतून एकदा सामान्य मतदाराने करावा, हे त्याचेच कर्तव्य मानले जाते. ती पंचवार्षिक निवडणूक आपल्या समोर आहे. या अधिकारातून एकप्रकारे आपण देशाच्या परिस्थितीचा निर्णय आणि नियंत्रण करणारे होत असतो. परंतु आपल्याला हेही माहीत आहे, की त्या एका दिवसाच्या मतदानातून आपण जो निर्णय घेतो, त्याचे चांगले-वाईट तात्कालिक परिणाम भोगणे आणि दीर्घकालीन नफा-तोटा झेलण्याचे काम पुढे पुष्कळ वर्षांपर्यंत अथवा जीवनभर करत राहणे, बस! त्या एका दिवसानंतर आपल्या हातात यापेक्षा अधिक काही राहत नाही. पश्‍चात्ताप होऊ नये असा निर्णय मतदारांद्वारे प्राप्त करायचा असेल तर मतदारांना राष्ट्रहिताला सर्वोपरी मानून; स्वार्थ, संकुचित भावना आणि आपल्या भाषा, प्रांत, जात आदी छोट्या चौकटीतील अहंकारातून बाहेर पडून विचार करावा लागेल. उमेदवाराची प्रामाणिकता आणि क्षमता, पक्षाच्या धोरणाचे राष्ट्रहित व राष्ट्राची एकात्मतेसोबत प्रतिबद्धता तसेच या दोन्हींच्या भूतकाळातील तसेच वर्तमानातील कार्यांचा अनुभव; याचा स्वतंत्र बुद्धीने मतदारांना विचार करावा लागेल. लोकशाहीतील राजकारणाचे चरित्र आजतागायत असे आहे, की कोणालाही संपूर्णत: योग्य अथवा संपूर्णत: अयोग्य असे मानता येत नाही. अशा स्थितीत मतदान न करणे किंवा ‘नोटा’च्या अधिकाराचा उपयोग करणे, मतदाराच्या दृष्टीने जे अयोग्य आहे त्याच्याच बाजूने जाते. याकरिता सर्व प्रचारांना ऐकून, त्याच्या जाळ्यात न अडकता राष्ट्रहित सर्वोपरी ठेवून १०० टक्के मतदान होणे आवश्यक आहे.

 आवाहन
देशहिताकरिता मूलभूत अनिवार्य आवश्यकता आहे, की भारताच्या ‘स्व’च्या ओळखीच्या सुस्पष्ट अधिष्ठानावर उभा राहिलेला सामर्थ्यसंपन्न व गुणवत्तावान संघटित समाज या देशात व्हावा. ही आपली हिंदू ओळख आहे. जी आपल्याला सगळ्यांचा आदर, सगळ्यांचा स्वीकार, सगळ्यांची एकजूट आणि सगळ्यांचे भले करण्याचे शिकवते. याकरिता संघाला हिंदू समाजाला संघटित व अजेय सामर्थ्यसंपन्न बनवायचे आहे आणि तो हे कार्य संपूर्ण संपन्न करेलच. आपापले संप्रदाय, परंपरा आणि राहणीमानाने आपल्याला वेगळे मानणारे अथवा ‘हिंदू’ शब्दाने भयभीत होणाऱ्या समाजातील वर्गाला हे समजून घेण्याची आवश्यकता आहे, की या देशाच्या सनातन मूल्यबोधालाच हिंदुत्व तर म्हटले जाते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link