Next
चित्तथरारक ‘मर्दानी दसरा’
पराग पोतदार
Friday, October 04 | 01:00 PM
15 0 0
Share this story


महाराष्ट्रातील अठरापगड जातींचे कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा! आणि येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा ‘मर्दानी दसरा’ म्हणजे आनंदाची पर्वणीच! वीररसाचे एक मूर्तिमंत प्रतीक. आजच्या आधुनिक युगामध्ये दसऱ्याचे स्वरूप काही अंशी बदलले असले तरीही जेजुरीगडावर साजरा होणारा हा दसरा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. खंडा उचलणे, आतषबाजी, पालखीसोहळा अशा परंपरा आजही मनापासून येथे जपल्या जातात आणि ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात हा मर्दानी दसरा प्रथेप्रमाणे उत्साहात साजरा होत असतो. गुजरातमधील बडोदा, कर्नाटकातील म्हैसूर, महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील जेजुरीचा दसरा हे विशेष लोकप्रिय आहेत.
या उत्सवाला ‘मर्दानी दसरा’ हे नाव मिळाले ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे. ही प्रथा अनेक वर्षे जेजुरीगडावर सुरू असते. परंतु या दसऱ्याचे वेगळेपण बाबासाहेबांनी जेव्हा अनुभवले तेव्हा त्यांच्याकडून आपसूकच उद्गार निघाले, ‘अरे हा तर मर्दानी दसरा!’ तेव्हापासून जेजुरीगडावर साजऱ्या होणाऱ्या दसऱ्याला मर्दानी दसरा हे नाव पडले ते आजतागायत.
मर्दानी दसऱ्याचा उत्सव साजरा होत असताना त्यातील प्रथापरंपरांना फार महत्त्व आहे. कोल्हाटी समाजातील कलावंत नऊ दिवस देवापुढे हजेरी देत असतात. आश्विन शुद्ध प्रतिपदेला सनई-चौघड्यांच्या मंगल स्वरात खंडोबागडावरील नवरात्रमहालात घटस्थापना केली जाते. नेत्रदीपक अशा विद्युत रोशणाईने सारा गड रात्रीच्या वेळी उजळून निघत असतो. वाघ्या-मुरळी, गोंधळी विविध प्रकारची गाणी म्हणून देवाची आळवणी करतात. घडशी समाजातील कलावंत जेजुरीगडावर दिवसरात्र सनईचौघड्याचा नाद सुरू ठेवतात. नगारा वाजवत राहतात. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी पेशवे इनामदारांच्या आदेशाची वाट पाहिली जाते. त्यांनी आदेश दिल्यावर हजारो ग्रामस्थ, राज्यभरातून आलेले भाविक, भक्त यांच्या सहभागाने भेटाभेट होण्यासाठी पालखी निघते. पालखीमध्ये खंडोबा आणि म्हाळसादेवीची मूर्ती ठेवलेली असते. ‘सदानंदाचा येळकोट... जय मल्हार’ असे म्हणत भंडाऱ्याची मुक्त उधळण करत ही पालखी मार्गस्थ होते. जयघोषामध्ये भंडाऱ्याची आणि आपट्याच्या पानांची उधळण होते. संपूर्ण जेजुरी पिवळीधमक होऊन जाते. गडातून पालखी जात राहते. डोंगरदरीमधील रमणा या ठिकाणी ही पालखी आणून ठेवली जाते. रात्रीच्या वेळी हजारो भाविक कडेपठारावरील खंडोबाच्या मंदिरात जातात. तेथून रात्रीच्याच वेळी पारंपरिक वाद्यांच्या निनादात पालखी भेटीसाठी निघते. गुडूप अंधारात पेटत्या दिवट्या, मशाली यांनी आसमंत उजळून निघतो आणि त्या अंधारवाटेवरून पालखी मार्गस्थ होत राहते.
ही पालखी उचलण्यासाठी साधीसुधी नाही. तिचे वजन खूप असल्याने एकावेळी किमान ५० ते ६० खांदेकरी तिला आधार देत असतात. अंधारातील वाटही सोपी नसते. त्यातील वाटावळणांतून चालताना कसरत होत असते. मात्र मुखामध्ये ‘जय मल्हार’चा जयघोष त्यांना पुढची वाट दाखवत राहतो. वेगवेगळे उंचवटे-उतार पार करून ही पालखी आनंदात पुढे जात राहते. काही जागा तर डोंगरकपाऱ्यांमध्ये अशा आहेत जिथे खांदेकऱ्यांचाही कस लागतो व पूर्वानुभवाचे कसब पणाला लावावे लागते. ‘सुसरटिंगी’ नावाची एक निमुळती, उंच टेकडी तर चढायला अतिशय अवघड आहे. त्यातून खांद्यावर पालखी असताना चढणे त्याहून जिकिरीचे. परंतु हे खांदेकरी तेही आव्हान पेलतात. इतर सगळे लोक हातांची साखळी करून या खांदेकऱ्यांना वर घेतात. पालखी डोंगरात एका ठिकाणी ठेवल्यानंतर सारे भाविक रात्रीच्या अंधारात दरीमध्ये उतरतात. या दरीमध्ये रात्रीच्या दोन वाजता भेटाभेटीचा सोहळा सुरू होतो. रात्रीचे चांदणे, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ची डोंगरदऱ्यांतून घुमणारी ललकारी, फटाक्यांची आतषबाजी, आकाशात उडणारे रंगीत तोफांचे गोळे, भाविकांचा ओसंडून वाहणारा उत्साह अशा एका भक्तिमय आणि आनंदी वातावरणात मध्यरात्रीनंतर हा सोहळा रंगत असतो.
नाभिक समाजातील मानकरी दोन्ही पालख्यांच्या मागे आरसे धरतात. पालखीसमोर भुईनळे पेटवले जातात. त्याच्या प्रकाशामध्ये दोन्ही पालख्यांच्या मूर्तींना परस्परांचे दर्शन घडते. भेटाभेट झाल्याची घोषणा झाल्यानंतर ही पालखी पुन्हा खंडोबागडाकडे येण्यास निघते. वाटेमध्ये येत असताना एका ठिकाणी आपट्याचे पूजन केले जाते व त्याच ठिकाणी रावणदहनही केले जाते. मजल दरमजल करत पहाटेच्या वेळी पालखी गडाच्या पायथ्याशी येते. तेव्हा उत्साहात पालखीचे स्वागत केले जाते. धनगर समाजातील कलावंत सुंबरान मांडून ओव्या आणि गाणी म्हणतात. पालखीवर मेंढ्याची लोकर उधळली जाते. स्थानिक कलावंतांसाठीदेखील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा गणला जातो. देव दमून आलेले आहेत असे मानून त्यांना रिझवण्यासाठी व रमवण्यासाठी विविध प्रकारची गाणी म्हणून हे कलावंत त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात. हा पालखीसोहळा तब्बल १८ तास सुरू असतो.
पालखीसोहळ्यानंतर स्पर्धा सुरू होते ती ऐतिहासिक खंडा (तलवार) उचलण्याची. जेजुरीगडावरील हा सर्वांत प्रेक्षणीय आणि मर्दुमकीला आव्हान देणारा प्रकार असतो. हा खंडा प्रचंड जड अर्थात एक मण म्हणजे ४२ किलो वजनाचा असल्याने एका हातात जास्तीत जास्त वेळ उचलून धरण्याची व तो हातात धरून विविध कसरती सादर करण्याची स्पर्धा होते. पेशवाईच्या काळामध्ये सोनोरीचे सरदार रामराव व महिपतराव पानसे यांनी हा खंडा खंडोबाला अर्पण केल्याची नोंद इतिहासात आहे. या कसरती पाहण्यासाठी राज्यभरातूनच लोक येतातच शिवाय परदेशांतूनही लोक मोठ्या संख्येने येतात. दाताने तलवार उचलणे, एका हाताने युद्धासारखी फिरवणे, दातात तलवार धरून उठाबशा काढणे अशा चित्तथरारक कसरती या निमित्ताने केवळ याच दिवशी पाहायला मिळतात. स्पर्धेतील विजेत्या मर्दांना मोठी बक्षिसे दिली जातात. यानंतर रोजमोरा अर्थात ज्वारी वाटून १८ तास चालणाऱ्या या मर्दानी दसऱ्याची सांगता होत असते.
प्रतिवर्षी याच उत्साहात हा मर्दानी दसरा साजरा होत असतो. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी दसरा साजरा होतो त्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीचा दसरा जेजुरी येथे साजरा होत असल्याने त्याचे वेगळेपण निश्चितच आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link