Next
बंदिशींची रंगत
सावनी शेंडे
Friday, November 02 | 03:00 PM
15 0 0
Share this story

ही आठवण आहे १९९८ सालची. पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मी पहिल्यांदाच दिवाळीपहाट कार्यक्रमात गाणार होते. आयोजकांनी खूप छान तयारी केली होती. खऱ्या पूर्वापार पणत्या (चायनीज किंवा मेणाच्या नाहीत) सगळीकडे लावल्या होत्या. आकाशकंदील, रांगोळी अशी सगळी सजावट केली होती. तिथे पाऊल टाकताक्षणीच मला खूप प्रसन्न वाटलं. एरवी आम्ही गायकमंडळी पहाटे उठून रियाज करतोच, पण इथे शेकडो प्रेक्षकांसमोर गायचं होतं.
मला आठवतंय, की कार्यक्रमाच्या आदल्या रात्री मला झोपच लागली नव्हती. पहाटे चार वाजता उठून मी घरी रियाज केला होता. स्वर लावून पाहिला होता. आवाज तापवून घेतला होता. दिवाळीपहाट कार्यक्रमासाठी आवाजाची एक वेगळी तयारी करून घ्यावी लागते. तशी तयारी करून मगच मी कार्यक्रमाला गेले होते. आपल्याकडून काही कमतरता राहू नये यासाठी तो प्रयत्न होता. तिथे पोहोचले तर प्रेक्षक अभ्यंगस्नान आटपून, पारंपरिक वेशभूषेत आले होते. दिवाळीपहाटला एवढा तुडुंब प्रतिसाद असतो, की हे वातावरणच तुम्हाला खूप स्फूर्ती देऊन जातं. प्रेक्षकांचा उत्साह, मंगलमय वातावरण यातून एक सकारात्मक ऊर्जा मला आजूबाजूला जाणवत होती. तीच ऊर्जा घेऊन मी गायले. तापलेल्या आवाजातच पहिला सूर लावला आणि प्रेक्षकांनी इतका जबरदस्त प्रतिसाद दिला, की मी भारावून गेले. त्यानंतर दिवाळीपहाटचे अनेक कार्यक्रम केले, पण तो पहिला कार्यक्रम माझ्यासाठी अविस्मरणीय होता.

त्यानंतर एके वर्षी ‘हवेली संगीत’ या संकल्पनेवर आम्ही पुण्यात दिवाळीपहाट कार्यक्रम केला होता. तो एक वेगळा कार्यक्रम होता, कारण मुळात हवेली संगीत ही संकल्पनाच वेगळी होती. त्यातील सगळ्या बंदिशी
पं. जसराजजींनी गायलेल्या होत्या. त्या आम्हाला गायच्या होत्या आणि पं. जसराज स्वतः त्या कार्यक्रमाला हजर होते. त्यांच्यासमोर त्या बंदिशी सादर करणं ही एक आव्हानात्मक जबाबदारी होती. सोबतीला इतर गायक, नृत्य अशी त्या कार्यक्रमाची छान आखणी केलेली होती. आमच्या गाण्यांना ते छान दाद देत होते. नंतर स्वतः मंचावर येऊन त्यांनी हवेली संगीत आणि तोडी राग गायला होता. दिवाळीपहाटच्या निमित्तानं आम्हाला त्या क्षणांचे साक्षीदार होता आलं याचं खूप समाधान त्या कार्यक्रमानं दिलं. त्यामुळे ती दिवाळीपहाटसुद्धा अविस्मरणीय अशी होती, कारण साक्षात पं. जसराजजी यांच्याकडून पाठीवर शाबासकीची थाप मिळाली होती.
आणखी एक अशीच आठवणीतील मैफल म्हणजे अमेरिकेतील दिवाळीपहाट. लग्नानंतरची माझी पहिली दिवाळी होती आणि त्याच वर्षी अमेरिकेत आम्ही दिवाळीपहाट कार्यक्रम केला होता. तिथे शक्यतो शनिवार-रविवार रात्रीच कार्यक्रम असतात, पण त्या वर्षी तिथे आम्ही पहाटे कार्यक्रम केला आणि अमेरिकेतल्या आपल्या मराठी मंडळींनी इतका छान प्रतिसाद दिला, सहभाग घेतला, की एक वेगळीच दिवाळीपहाट उजाडली आहे, असं वाटत होतं. पारंपरिक दागिने, कपडे, फराळ, सगळं होतं. दिवाळीपहाट अमेरिकेतसुद्धा तितकीच रंगू शकते, यावर माझा विश्वास बसला. शेवटी भारतीय मन आपली परंपरा विसरत नाही, हेच खरं!
दिवाळीपहाटचा एक कार्यक्रम आम्ही बडोद्याला केला होता. तिथे अर्थातच मराठीसोबत अनेक अमराठी रसिकसुद्धा खास दिवाळीपहाट कार्यक्रम काय असतो, या उत्सुकतेपोटी आले होते. मिश्र प्रेक्षक आहेत हे लक्षात घेऊन तिथे आम्ही आपल्या मराठी गाण्यांबरोबरच संत सूरदास, संत मीराबाई, संत कबीर यांच्या रचना निवडल्या होत्या. ठुमरी, दादरा गायलो होतो आणि त्या ऐकून अमराठी प्रेक्षक जाम खुश होऊन गेले. तो अनुभव निश्चितच वेगळा होता.

पुण्यातील एका दिवाळीपहाट कार्यक्रमात मी आणि माझी बहीण बेला शेंडे, एकत्र गायलो होतो. ती संकल्पनाही वैशिष्ट्यपूर्ण अशी होती. आम्ही दोघी फारशा कधी एकत्र मैफली करत नाही, जर एखादी थीम असेल तरच आम्ही एकत्र येतो. त्या कार्यक्रमात मी गाजलेल्या बंदिशी आणि काही स्वरचित बंदिशी गात होते व बेला तिची मराठी गाणी गात होती. हा जो शास्त्रीय आणि चित्रपटगीतांचा संगम होता तो प्रेक्षकांना खूप आवडला. पुण्यात अविनाश कुळकर्णी यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात काही गाण्यांमध्ये राग कॉमन होते, काही गाण्यांमध्ये विषय कॉमन होता, तर काही गाण्यांमध्ये अर्थ कॉमन होता. एक वेगळा प्रयोग म्हणून आम्ही तो कार्यक्रम केला होता. म्हणून ती दिवाळीपहाट विशेष लक्षात राहिली. आता ४ नोव्हेंबरला असाच कार्यक्रम मी आणि बेला दिल्लीत करणार आहोत. खूप उत्सुकता आहे, कारण राजपथावर दिवाळीपहाट साजरी करायला मिळणार आहे. त्यामुळे या मैफलीलाही वेगळं महत्त्व असणार आहे, कारण आम्ही इंडिया गेटच्या त्या परिसरात सहा-सात हजार प्रेक्षकांसमोर कार्यक्रम करणार आहोत. दिल्ली मराठी प्रतिष्ठाननं कार्यक्रम आयोजित केला आहे. राजपथावर मंच उभारण्यात येणार आहे. इतक्या भव्यदिव्य ठिकाणी आपली दिवाळीपहाट हजारो मराठी-अमराठी रसिक प्रेक्षकांसमोर साजरी होणार असल्यानं आम्ही दोघी खूप उत्सुक आहोत. आम्ही दोघी निस्सीम देशभक्त असल्यामुळे आमच्यासाठी तो एक रोमांचकारी क्षण असणार आहे हे नक्की!n
िदवाळीपहाट शब्दांकने : मनीषा िनत्सुरे-जाेशी 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link