Next
निवृत्तीची गंभीर घोषणा
भूषण करंदीकर
Friday, December 07 | 05:00 PM
15 0 0
Share this storyगौतम गंभीरच्या निवृत्तीनंतर आणखी एका खेळाडूनं निवृत्ती जाहीर केली, एवढीच काय ती प्रतिक्रिया आहे. तरीही क्रिकेट गंभीरपणे खेळणाऱ्या या गौतीला त्याचे चाहते विसरणं शक्य नाही. २००७चा टी-२० वर्ल्डकप आणि २०११चा वर्ल्डकप या दोन्ही विजेत्या संघांत गंभीर होता. सर्वोत्तम फॉर्मात असण्याच्या काळात त्यानं भारतीय क्रिकेटचाहत्यांना त्याच्या खेळानं मनमुराद आनंद दिला. वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर यांच्या साथीनं काही महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या त्यानं रचल्या. गंभीरची सर्वात लक्षवेधी खेळी ठरली ती २०११च्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातली. खरं तर धोनीनं त्या मॅचचा केलेला शेवट आणि केलेली खेळी यामुळे गंभीरच्या खेळीकडे दुर्लक्ष झालं एवढं निश्चित! गंभीर तेव्हा शतक पूर्ण करू शकला नाही. परंतु त्याच्या खेळीनं भारताला विजयाच्या समीप नेऊन ठेवलं होतं.

खरं तरं सलामीला कोण, ही भारतीय संघाची कायमची डोकेदुखी गंभीरच्या रूपानं थोडीशी कमी झाली होती. उजव्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजांची जोडी सलामीला खेळवण्याचा साधारण ट्रेंड जागतिक क्रिकेटमध्ये रूढ होता. गांगुलीच्या निवृत्तीनंतर संघात डावखुरा सलामीचा फलंदाज कोण यावर शोधाशोध झाली होती. २००३ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून गंभीरनं पदार्पण केलं, तरं २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून त्याच्या कसोटी कारकिर्दीला सुरूवात झाली. २००८च्या श्रीलंकादौऱ्यापासून २०१०-११च्या दक्षिण आफ्रिकादौऱ्यापर्यंत या पठ्ठ्यानं खोऱ्यानं धावा केल्या. तो जवळपास आठ शतकी खेळी या दरम्यान खेळल्या, त्यातल्या सलग पाच कसोटीत त्यानं शतकी खेळी साकारल्या. गंभीर हा निवडक डावखुऱ्या फलंदाजांपैकी एक होता. तो फॉर्ममध्ये असताना त्याच्या बॅटमधून निघणारे फटके डोळ्यांचं पारण फेडणारे असायचे. सचिन आणि सेहवाग या दोघा आक्रमक फलंदाजांसमोर जेव्हा तो डावाची सुरुवात करण्यासाठी यायचा तेव्हा स्वतःच्या काहीशा आक्रमक शैलीला मुरड घालून तर कधी स्वतः पुढाकार घेऊन डावाची जबरदस्त सुरुवात करण्याची जबाबदारी तो घ्यायचा.

आयपीएलमध्ये त्यानं दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि कोलकाता नाईट राइडर्स अशा दोन संघांचं काहीकाळ प्रतिनिधित्व केलं होतं. १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २००९ साली तो आयसीसीचा सर्वोत्कृष्ट कसोटी फलंदाज ठरला. गंभीरच्या रूपानं भारताला परिपूर्ण डावखुरा फलंदाज लाभला. त्याच्या फलंदाजीत वैविध्य होतं. त्याचं पदलालित्य वाखणण्याजोगं होतं, विशेषतः फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना त्याचं पदलालित्य पाहण्यासारखं असायचं. एखाद्या जलदगती गोलंदाजाला तिन्ही यष्ट्या दाखवत डीप मिडऑफवरून ज्यापद्धतीनं तो भिरकावून द्यायचा तेव्हा हे किती सोपं आहे, असं वाटायला लागायचं. वास्तविक तेच जास्त अवघड असतं. सचिन-सेहवाग या आक्रमक फलंदाजांसोबत डावाची सुरुवात करणं म्हणजे परीक्षाच, परंतु या परीक्षेत गंभीर पास झाला. वर वर शांत वाटणारा गंभीर मैदानावर प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंनी खोडी काढल्यावर किंवा डिवचल्यावर आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं. त्याची ही आक्रमक म्हणा किंवा काहीशी रोखठोक प्रवृत्ती मैदानाबाहेरही दिसली आणि राजकारणावर केलेल्या टिप्पणीमुळेही तो चर्चेत राहिला.

प्रत्येक क्रिकेटपटूच्या आयुष्यात येणारा बॅडपॅच गंभीरच्याही कारकिर्दीत आला. विजिगीषू वृत्तीच्या गंभीरनं त्यातून बाहेर पडण्यासाठी बराच प्रयत्न केला. पुन्हा रणजी स्पर्धेत खेळून स्वतःला सिद्ध केलं. त्यानंतरही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे न उघडल्यानं त्यानं आयपीएलवर लक्ष केंद्रित केलं. आयपीएलच्या २०१७च्या सीझनमध्ये त्याची कामगिरी बरी झाली, पण २०१८च्या सीझनमध्ये तो सपशेल अपयशी ठरला. २०१६ला तो अखेरचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला.

बॅडपॅचमधून जाणारा गंभीर शेवटच्या कसोटी सामन्यात २९ आणि ० अशा धावा करू शकला. थोडक्यात, कसोटी कारकिर्दीची अखेरही फारशी चांगली झाली नाही. संस्मरणीय तर नाहीच नाही. गंभीरला वगळण्याचा निर्णय नेमका का घेतला गेला यावर अनेक तर्कवितर्क लढवले गेले, चर्चा झाली, पण गंभीर आंतरराष्ट्रीय संघात परतला नाहीच.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link