Next
ती तर मैत्रीण!
पूजा कुलकर्णी
Friday, August 09 | 03:00 PM
15 0 0
Share this story


झालं गेलं दु:ख, वळून कधी बघायचं नसतं
सुख शोधण्यासाठीच तर पुढे जगायचं असतं
आपण नेहमीच आयुष्यात आलेलं दु:ख कुरवाळत बसतो. त्यापेक्षा पुढे येणाऱ्या सुखाचा विचार करता आला पाहिजे. हे ज्या व्यक्तीकडून मी शिकले ती म्हणजे माझी आई. आई नव्हे तर आई नावाची माझी मैत्रीणच ती. सगळ्यांच्या आईसारखीच तरीही वेगळी. वयाच्या तिसऱ्या वर्षी पोलिओसारख्या आजाराबरोबर बिनधास्तपणे लढणारी, कळत्या वयात घराची संपूर्ण जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेणारी माझी आई खूप खंबीर आहे. घरात एकूण सहा बहिणी आणि आईवडील या सगळ्यांचा मोठ्या भावाप्रमाणे आधार झाली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे तिला कायम सर्व मूलभूत सुविधांसाठी झगडावं लागलं.
घरच्यांसमोर तिच्या लग्नाचा प्रश्न आ वासून समोर असताना तिला तिचा जोडीदार मिळाला. ते माझे बाबा, तेही तिच्यासारखेच. त्यांनाही पोलिओ होता. त्या दोघांच्या वयामध्ये अंतर असल्यामुळे साहजिकच स्वभावात खूप फरक होता. परंतु एकमेकांना सांभाळून, स्वीकारून दोघांनी आनंदानं संसार केला आणि माझा जन्म झाला. आईवडील अपंग असताना बाळ मात्र ठणठणीत असल्यामुळे दोघांच्याही आनंदाला पारावर उरला नाही. खूप लाड झाले माझे. त्या दोघांनी जेवढं होईल तेवढं माझ्यासाठी सर्वतोपरी केलं. मी जेमतेम चार वर्षांची असेन, बाबांनी या जगाचा निरोप घेतला. त्या परिस्थितीतही आईनं खचून न जाता खंबीरपणे परिस्थितीला तोंड दिलं, माझ्यासाठी ती पुन्हा उभी राहिली. माझ्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी तिनं जे काही कष्ट केले ते मी कधीही विसरू शकत नाही. तिनं आमच्या घरातील वातावरण असं ठेवलं की मी तिच्याशी आई म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून कोणतीही गोष्ट शेअर करते. अगदी मैत्रिणींबरोबर आपण ज्या गोष्टी एन्जॉय करतो त्या सगळ्या मी आईबरोबरसुद्धा करते.
खूप जण मला म्हणतात, तुझं आईशिवाय पानदेखील हालत नाही. त्यांना मी हेच सांगते, की मी आईशिवाय स्वत:ला इमॅजिनच करू शकत नाही. माझी आई उत्तम सुगरण आहे. तिच्या हातच्या पदार्थासाठी मी कायम भुकेलेलीच असते.
मला वाटतं आपल्या बालपणापासून तारुण्यापर्यंत मुलींच्या सर्व व्यथा फक्त आणि फक्त तिची आईच समजू शकते. आईच्या मायेतच इतकी ताकद आहे, की रागापेक्षा तिनं अवखळपणे केलेलं प्रेम अधिक लक्षात राहतं. तिच्याकडे बघूनच मला प्रसन्न वाटतं. आई, तू कायम अशीच माझ्याबरोबर मैत्रीण म्हणून राहा!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link