Next
आनंदाचे डोही आनंदतरंग
सुप्रिया देवस्थळी-कोलते
Friday, February 01 | 03:00 PM
15 0 0
Share this story

भिंतीवर नवं कॅलेंडर दिसू लागलं, की राजधानीला वेध लागतात ते प्रजासत्ताकदिनाचे, प्रजासत्ताकदिनाची परेड राष्ट्रपतीभवन परिसरातून सुरू होऊन, राजपथमार्गे इंडिया गेट आणि पुढे लालकिल्ल्यापर्यंत जाते. या संपूर्ण मार्गावर परेड पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी असते. राजपथाच्या दुतर्फा बसण्याची व्यवस्था केलेली असते. या बसण्याच्या व्यवस्थेचं काम सुरू झालं, की प्रजासत्ताकदिन जवळ आल्याचं लक्षात येतं.
आमचं घर इंडिया गेटच्या जवळच आहे. एक दिवस अचानकच घराच्या छतावरून विमान जातंय असं वाटावं इतकं जवळून विमानाचे आवाज आले. नंतर लक्षात आलं प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाचा सराव सुरू झाला आहे. मी अनेक वर्षं प्रजासत्ताकदिनाची परेड टीव्हीवर पाहिली होती, परंतु ती प्रत्यक्षात पाहण्याचा अनुभव जबरदस्त होता. आपल्या सैनिकांचं शौर्य आणि पराक्रम, साहसी बालकांचं शौर्य पाहून देशप्रेमानं मन उचंबळून आलं नाही तरच नवल! राजपथावर तिरंगा फडकावला जातो, राष्ट्रपतींचे सुरक्षारक्षक राष्ट्रीय सलामी देतात, बॅण्डवर राष्ट्रगीत वाजतं आणि २१ तोफांची सलामी दिली जाते, तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. अशा जोरदार सुरुवातीनंतर परेड सुरू होते.
परेडच्या सुरुवातीलाच हेलिकॉप्टर्समधून राजपथावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो. या पाकळ्यांच्या मंद सुगंधाने वातावरण एकदम उत्साहाचं आणि आनंदाचं होऊन जातं. यातल्या काही पाकळ्या आपल्याही अंगावर अलगद येऊन विसावतात किंवा काही पाकळ्या आपल्याला ओंजळीत झेलता येतात, तेव्हा आपल्याला लहान मुलांसारखा आनंद होतो. परेडमध्ये तीनही सेनादलांचा समावेश असतो, त्याव्यतिरिक्त सीमा सुरक्षादल, राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षादल, एनसीसी यांचाही सहभाग असतो. पुष्पवृष्टीनंतर परेड कमांडर, नंतर सेकंड इन कमांड, परमवीरचक्र आणि अशोकचक्र या शौर्यपदकांचा बहुमान मिळवलेले पराक्रमी राजपथावरून लालकिल्ल्याकडे निघतात. परमवीरचक्र आणि अशोकचक्र मिळवलेल्या वीरांच्या गात्रागात्रातून देशप्रेम ओसंडून वाहत असतं. वेगवेगळ्या सेनादलांचे बँड वाजवणारी पथकंही परेडमध्ये असतात. लष्कराचं अश्वपथक राजपथावरून दिमाखात जायला लागतं तेव्हा त्यांच्या टापांच्या आवाजानं वातावरण भारून जातं. सीमा सुरक्षादलाचं उंटावरचं पथक अगदी रंगीबेरंगी दिसतं. उंटांवर जी झूल घातलेली असते ती लाल, पिवळा, केशरी अशा तजेलदार रंगांची असते. उंटावरचं हे जगातलं एकमेव पथक आहे. सीमा सुरक्षादलाचे जवान उंटावरून बँड वाजवत जात होते, हे पाहून मला त्या पथकाबद्दल धन्य वाटलं.
वेगवेगळ्या दलांच्या नंतर येतात वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ. या वर्षी महात्मा गांधी हे या चित्ररथांचं सूत्र होतं. महात्मा गांधीजींची १५०वी जन्मशताब्दी आपण यंदा साजरी करत आहोत. यावेळी २२ चित्ररथ परेडमध्ये होते. महाराष्ट्राचा चित्ररथ हा १९४२च्या चले जाव आंदोलनाचं दृश्य दाखवणारा होता. महाराष्ट्राच्या चित्ररथाची बहुतेक वर्षी परेडमध्ये निवड होते हे कळल्यामुळे मला महाराष्ट्राचा सार्थ अभिमान वाटला. राष्ट्रीय बालपुरस्कार विजेती मुलंही परेडमध्ये उघड्या जीपमधून सहभागी झाली होती. ही मुलं जेव्हा समोरून गेली तेव्हा सर्वांनी उत्स्फूर्तपणे उभं राहून त्यांच्या शौर्याला आणि साहसाला दाद दिली. यानंतर शाळकरी मुलांनी छान नृत्यं सादर केली. त्यानंतर परेडच्या शेवटच्या आणि अतिशय रोमहर्षक भागाला सुरुवात होते. सैन्यदलाच्या सिग्नल्स विभागातल्या जवानांची मोटारसायकलवरची प्रदर्शनं जबरदस्त होती. सुरुवातीलाच मोटारसायकलला बांधलेली एक शिडी आणि त्या शिडीच्या टोकावर उभं राहून पायानं अगदी सराईतपणे मोटारसायकल चालवत जाणारा जवान पाहूनही आपल्या हृदयाचा ठोका चुकतो.
परेडच्या शेवटी येतात वेगवेगळी विमानं. हवाई दलाच्या विमानांनी आकाशात साकारलेला त्रिशूल तर लाजबाब आणि अविस्मरणीय होता. सुखोई विमान तर सरळ रेषेत उभं राहतं आकाशात आणि परत नेहमीच्या आडव्या रेषेत येऊन उडायला लागतं तेव्हा ते विमान चालवणारा जिगरबाज वैमानिक आणि असे जिगरी वैमानिक निर्माण करणारं भारतीय हवाई दल यांचा अभिमान वाटतो. भारतीय तिरंग्याच्या रंगांचे फुगे आकाशात झेपावले आणि प्रजासत्ताकदिनाच्या परेडची समाप्ती झाली. परेड संपली तरी मनाच्या भारलेपणाची भैरवी होते ती २९ जानेवारीला राष्ट्रपतीभवनाच्या जवळच असलेल्या विजयचौकात पार पडणाऱ्या बीटिंग रिट्रीट या कार्यक्रमानं. या कार्यक्रमाचे प्रमुख राष्ट्रपती असतात. यात तीनही सेनादलांचे बँड सहभागी होतात. वेगवेगळी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सैन्यगीतं, देशभक्तीपर गीतं बॅण्डमध्ये वाजवली जातात. राष्ट्रगीताचे सूर राजधानीतल्या हवेत पसरतात आणि देशभक्तीनं आणि देशाभिमानानं आपण नतमस्तक होतो.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link