Next
अर्थाचा नसेना पत्ता
- डॉ. नीलिमा गुंडी
Friday, April 12 | 03:30 PM
15 0 0
Share this story

कवितेत काही वेळा निव्वळ  शब्दाला शब्द  जुळवत गंमत साधलेली असते.
‘एक होती ऊ,
तिला झाली टू’
वगैरे बडबडगीतं तुम्हाला माहीत असतीलच.
‘गाणी गाऊ आता,
अर्थाचा नसेना पत्ता!’
असं म्हणत  तुम्ही मुलं त्यात रमणार, याची कवींना बहुधा  खात्रीच असते.
मंगेश पाडगावकर यांच्या एका कवितेचं नावच आहे,  ‘जुळवाजुळवी . त्यात यमक जुळवण्याचा खेळ आहे. तो असा -
‘भाऊसाहेब पवार,
रोज खातात गवार’
अनंत भावे  यांनीही भिंगरीसारखे शब्द  फिरवत कशी गंमत साधली आहे, पाहा –
‘अगडंबाळू , पगडंबाळू
बगडंबाळू , गगडंबाळू
बाळू लाडका...
त्याच्या खिशात खारका’
आई मुलाला लाडात कशी खूप नावं ठेवते,  अगदी तसंच वाटतं  हे. विंदा करंदीकर यांच्या एका कवितेत जादुगाराचं नाव आहे, ‘अल्लख बिलंदर’ आणि  जादूची करामत करण्याचा त्याचा मंत्र आहे-
‘डुक्रांव, डुक्रांव,  डुक्रांव, डुक्रांव!’ कवी नवे शब्द कसे निर्माण करतो ते पाहा.
रात्रीच्या वेळी  बेडकाच्या ‘डराव’ या आवाजाला मुलं घाबरतात.  त्या आवाजाशी थोडा मिळताजुळता असा गूढ आवाज  कवीनं नेमका टिपला आहे.  पाडगावकर यांनी एका कवितेत यमक साधून धमाल  आणली आहे.
‘एक होतं कासव
ते चिमणीला म्हणाले
‘तू मला चड्डी नेसव!’
गंमत म्हणजे ही कविता ऐकून एका छोट्या  मुलानं दोन ओळी  रचल्या आणि  पाडगावकरांना कळवल्या, त्या अशा –
‘एक होता बैल
तो चिमणीला म्हणाला
‘माझी चड्डी झाली सैल’
अशा या रचना एकीकडे  तुम्हाला  हसवतात आणि त्याचवेळी नकळत तुमचे कान भाषेच्या बाबतीत तल्लखही करतात. तुम्ही मुलं मातीकाम  करताना ओल्या मातीशी खेळता, तसंच शब्दांशी खेळत राहता आलं पाहिजे. त्यातूनही भाषेची गोडी  निर्माण होते.  

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link