Next
मॅनेक्विन – फॅशन क्वीन!
चारुशीला धर
Friday, October 26 | 02:30 PM
15 0 0
Share this story


त्या दिवशी मी आणि माझी मैत्रीण खरेदीसाठी बाजारात फिरत होतो. चालता चालता शोकेसमधल्या एका मॅनेक्विनने म्हणजे पुतळ्याने तिचे लक्ष वेधून घेतले. तो स्त्री-पुतळा मोहक होता.  बोलके डोळे, कमनीय बांधा आणि तिच्या निमुळत्या बोटांच्या हातांची अदा, त्यावरून अलगद लहरणारा जॉर्जेटच्या साडीचा पदर! आम्ही त्या पुतळ्याला आणि तिने परिधान केलेल्या सुंदर साडीला पाहून भारावूनच दुकानाच शिरलो. माझ्या मैत्रिणीला तीच साडी हवी होती. आणि दुर्दैवाने तो एकच पीस होता. म्हणून दुकानदाराने विनम्रपणे सांगितले की तुम्ही उद्या या. आज रात्री दुकान बंद झाल्यावर आम्ही ती साडी काढून घेऊ आणि उद्या देऊ. दुकानातल्या किंवा शोरूमच्या दर्शनी भागात असणारे हे मॅनेक्विन्स किंवा पुतळे ग्राहकांसाठी आणि विक्रेत्यांसाठी किती महत्त्वाचे असतात ना! मग मनात विचार आला की रोज नवनवीन वस्त्र-प्रावरणे घालून सजणारे हे पुतळे घडतात कसे? कुठले सर्जक हात घडवत असतील यांना? आणि मग या विषयाचा शोध घ्यायचा विचार पक्का झाला.
मॅनेक्विन किंवा व्यापारी लोक ज्याला ‘पुतळा’ म्हणतात- त्या उत्पादकांचा शोध घ्यायला लागले. मुंबईतील ‘केन मॅगेक्विन’चे अशोक धर्मानी यांच्याशी भेट झाली. आणि त्यांनी खूप सविस्तर माहिती दिली. मग त्यांच्या कार्यशाळेलाही भेट दिली आणि सर्व प्रक्रिया सविस्तर समजावून घेतली. सुंदर सुंदर वस्त्रांनी नंतर सजणारे पुतळे तयार झाल्यावर निर्वस्त्र, मानवी देहाच्या प्रतिकृती असतात. त्यामुळे कपड्यांच्या शोरूममध्ये त्यांना वस्त्रे चढवताना काचेची शोकेस बाहेरून कापडाने आच्छादित केली जाते आणि मगच ही वस्त्रे नेसवली किंवा बदलली जातात. नाहीतर दुकान बंद असताना हे काम होते. मॅनेक्विन हा फ्रेंच भाषेतला शब्द आहे आणि त्याचा अर्थ ‘Artist’s jointed model’ असा आहे. १५व्या शतकात मॅनेक्विनची संकल्पना उदयास आली. फॅशनेबल कपड्यांच्या प्रदर्शनासाठी वापरली जाणारी मॅनेक्विन छोटेखानी (मिनिएचर) स्वरूपाची असायची. पुढे १८ व्या शतकाच्या मध्यावर पूर्णाकृती पुतळे प्रचलित झाले. आताचे हे पुतळे प्लास्टिक किंवा फायबर ग्लासचे असतात. फायबर ग्लास किंवा फायबर वापरल्यामुळे पुतळे जास्त खरे वाटतात. मानवी चेहऱ्याचा नैसर्गिक आयाम त्यात ठळकपणे दिसतो. त्यावर रंगभूषा उठून दिसते. तसेच, शरीराचे स्नायू आणि चेहऱ्यावरचे भावही हुबेहुब मानवी चेहऱ्यासारखे साकारता येतात. रेझीन आणि लिक्विड कोबाल्ट यांच्या मिश्रणाने पुतळ्याची मूलभूत रचना साच्यातून काढली जाते. मग त्याला मजबुतीसाठी आतून नेट लावली जाते. ही नेट चीनमधून आयात होते. बाथटब बनवण्यासाठी जे मटेरियल वापरले जाते तेच हे पुतळे बनवण्यासाठी वापरतात. बाथटब बनवणारे कारागीरच हे पुतळे बनवतात. हातात मूर्तिकलेचे कसब असलेल्या कारागिरांकडून या पुतळ्यांची निर्मिती होते, पण कोणतेही प्रशिक्षण या कारागिरांनी घेतलेले नसते. हे कारागीर प्रामुख्याने उत्तर प्रदेशातून येतात आणि ते या कामात पारंगत असतात. महाराष्ट्रातले मूर्तिकार प्रामुख्याने शाडूच्याच मूर्ती बनवत असल्याने हे ह्या व्यवसायात कमी आहेत, मॅनेक्विनचे काम मशिनने होत नाही, ते हातानेच करावे लागते.

ह्या पुतळ्याचे हात, पाय आणि धड असे वेगवेगळे भाग असतात. शोरूममध्ये गेल्यानंतर ते स्क्रूने जोडले जातात. याशिवाय, चेहरा वेगळा तयार होतो. प्रथम शाडूच्या मातीने बेसिक चेहरा बनवला जातो. त्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसचा (पीओपी) आणि मग फायबरचा अशा तीन पायऱ्यांमधून चेहरा बनतो. चेहरा बनवण्याचे काम आणि कसब मूर्तिकाराचे असते. चेहरा तयार झाला की त्याला चेहऱ्याचे रंग देण्याचे काम सुरू होते. यात स्कीन टोन (Tone), रिअॅलिस्टिक, पांढरा, मॅट अशा वेगवेगळ्या रंगच्छटा असतात. कधी कधी गोल्डन अॅबस्ट्रॅक्ट, पर्ल फिनिश असेही टोन वापरले जातात. कलरिंगचे हे काम हे स्प्रे गनने केले जाते.
मूर्तिकारानंतर चेहऱ्याची वैशिष्ट्ये – म्हणजे डोळे, नाक, ओठ ह्यांना सुंदर आणि रेखीव करतो तो शिल्पकार. घासूनपुसून त्या पुतळ्यात सौंदर्य ओतण्याचे काम शिल्पकार करतो. डोळ्यांना पापण्या चिकटवल्या जातात. डोळ्यांचे तपकिरी, निळे, काळे असे रंग दिल्यानंतर डोळ्यातल्या पाणीदारपणाचा प्रत्यय येण्यासाठी एका स्पेशल रंगाचा वापर केला जातो आणि मग पुतळा पुतळा न वाटता माणूसच वाटू लागतो. त्यानंतर वेगवेगळ्या केशरचनांचे विग डोक्यावर चिकटवले जातात. पुतळ्याच्या हातांचे पंजे आणि पापण्या चीनमधून आयात केल्या जातात. शिल्पकार आणि रंगकाम करणारा मेकप आर्टिस्ट या पुतळ्याला सजीव दिसण्यात मदत करतात. एक पुतळा बनवायला साधारण पाच ते आठ दिवस लागतात. स्त्री, पुरुष, लहान मुले हे मॅनेक्विनमधले प्रमुख प्रकार. त्याशिवाय छातीपर्यंतचा भाग असलेले (bust), विविध पोज घेतलेले, चेहऱ्याचा फक्त लंबगोलाकार आकार असलेले (faceless) असे कितीतरी वैविध्य यात आढळते. Faceless पुतळ्यांचा नवा ट्रेंड सध्या चालू आहे. प्रामुख्याने अमेरिकेत प्रचलित असलेला हा प्रवाह आता भारतातही बाळसे धरू लागला आहे. लहान मुलांचे मॅनेक्विन्स उंचीला कमी असतात. त्यातही नाचणारी, धावणारी मुले चितारली जातात. महिलांच्या वस्त्रप्रावरणांसाठी उभ्या, बसलेल्या, कलंडलेल्या अशा पोजेस असतात. पुरुषांचे पुतळे उभे, बसलेले, धावणारे असे असतात.

स्त्रियांच्या पुतळ्यांचे कलर टोन एकाच प्रकारचे नसतात. कारण त्यात सतत वैविध्य येत राहते. जसा ट्रेंड बदलेल तसे ते बदलतात. कधी स्कीन टोनला मागणी असते, तर कधी गोऱ्या रंगाला. साधारणपणे ग्लॉसी टोन हे त्या त्या शोरूमच्या अंतर्गत प्रकाशयोजनेवर अवलंबून असतात. मग त्यावर उठून दिसतील अशाच रंगाची वस्त्रे घातली जातात. पिवळ्या रंगाची प्रकाशयोजना असेल तर पिवळी वस्त्रे अजिबात घालत नाहीत. क्रोमफिनिशच्या बाबतीतही असेच. विरुद्ध रंगाच्या शेड्सचे कपडे त्यावर जास्त उठून दिसतात. प्रथमदर्शनीच हे पुतळे ग्राहकांना आकर्षित करतात. त्यामुळे साहजिकच त्यांच्या फिगरचे निकष काय असतात हा विचार मनात आला. त्याविषयी बोलताना अशोक धर्मानी म्हणाले की साधारणत: फॅशन मॉडेल्सच्या शरीराच्या मापांप्रमाणेच त्या प्रमाणात या पुतळ्यांची मापे ठरवली जातात. याची उंचीही बरीच असते. नाहीतर वस्त्रप्रावरणे खुलून दिसत नाहीत. या पुतळ्यांची दुनियाच इतकी मोहमयी आहे. की रोज त्यात नवनवीन प्रकार अंतर्भूत होत आहेत. सामान्यपणे आपण पाहतो ते सुंदर साड्या नेसलेले, ड्रेसेस घातलेले, काचेच्या शोकेसमधल्या किंवा दुकानाच्या, शोरूमच्या बाहेर उभे असलेले आणि ग्राहकांना आकर्षित करणारे स्त्री-पुरुषांचे पुतळे. आज फक्त वस्त्रप्रावरणांपुरता ह्यांचा उपयोग राहिलेला नाही. सोनारांच्या दुकानातही हे पुतळे दिसतात. ते फक्त bust म्हणजे शरीराच्या उर्ध्वभागाचे असतात. प्रामुख्याने नेकलेस, कर्णफुले, बिंदी या अलंकारांसाठी ते वापरले जातात. बहुतांशी ते काळ्या रंगाचे असतात. वस्त्रप्रावरणांतही आजकाल plus size चे पुतळेही दिसतात. याशिवाय गर्भवती महिलांच्या पोशाखांची जाहिरात करणारे pregnant पुतळेही हळूहळू तयार होऊ लागले आहेत. ऑटोमोबाइल क्षेत्रातही या पुतळ्यांचा अंतर्भाव करण्याची कल्पना काही ठिकाणी सुरू झाली आहे. बाइकवर आरूढ होणाऱ्या या पुतळ्याला हेल्मेट, जॅकेट, हातमोजे अशा उत्पादनांच्या जाहिरातीसाठी वापरले जाते.
याशिवाय हॉटेलव्यवसायातही काही लोकांनी याचा वापर सुरू केला आहे. पदार्थ वाढणारे पुतळे आपल्याला तिथे दिसतात. ह्या कार्यशाळेत मी जेव्हा गेले तेव्हा तिथे एक नौदलाचा जवान तयार करून ठेवला होता. गोव्याच्या नौदलासाठी हे मॉडेल तयार करण्यात आले आहे. हे मॉडेल बनवणे हे मोठे आव्हानात्मक काम होते. कारण चेहऱ्यावर कोणताही भाव प्रामुख्याने दिसायला नको होता. अतिशय अलिप्त, निर्विकार चेहरा, करारी देहबोली हे सगळे साकारण्यात कारागीरांचे कसब पणाला लागते. याशिवाय, ऑप्टिशियन्स चष्म्याच्या फ्रेमसाठी, विविध प्रकारच्या टोप्यांच्या जाहिरातीसाठी अशा अनेक उद्देशांनी हे पुतळे वापरतात. फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये ह्या पुतळ्यांना मागणी आहे. तसेच, मोठमोठ्या सूटिंगशर्टिंगच्या शोरूममध्ये फॅब्रिक ड्रेपिंगसाठी या पुतळ्यांना मागणी असते. साधारण पुतळ्याची किंमत चार हजारांपासून सुरू होते. क्रोम प्लेटिंगचे पुतळे महाग असतात. हे पुतळे भाड्यानेही मिळतात. फॅक्टरीतून ग्राहकांकडे जाताना हे पुतळे दोन हात, दोन पाय आणि डोक्यासह मधले धड अशा तीन भागांत वेगवेगळे करून हार्ड पॅकिंगमध्ये पाठवले जातात. मग ते जोडले जातात. पुतळ्याला वस्त्र चढवता आधी वस्त्रे चढवून मग हात जोडण्यात येतात. जसजशी वस्त्रप्रावरणांची बाजारपेठ वाढत चालली आहे, तसतशी ह्या पुतळ्यांची अपरिहार्यताही वाढत चालली आहे. ह्यात एकदा गुंतवणूक केली की दीर्घ काळासाठी हे पुतळे वापरात राहतात. या उलाढालीसाठी मुंबई हे सगळ्यात मोठे मार्केट आहे. त्या पाठोपाठ अहमदाबाद, हैदराबाद, रायपूर, छत्तीसगढ इथेही पुतळ्यांना बरीच मागणी आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा एका क्षेत्रात – वैद्यकीय क्षेत्रात ह्या पुतळ्यांची कामगिरी मोठी आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय समजावून देण्यासाठी सिलिकॉन रबरापासून हे पुतळे बनवले जातात. आपल्या दैनंदिन आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कुठे हे पुतळे आपल्यासमोर येऊन उभे राहतील, सांगता येत नाही!


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link